गेल गेल्यानंतर..

‘ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान’ हे त्या विद्यापीठाचे ब्रीद आचरणात आणले होते.

Dr Gail Omvedt (Twitter/Praful Patel)

‘विश्वबंधुत्वाची संकल्पना ‘मूळची आमचीच’’ असे म्हणतेवेळी या संकल्पनेचा आपणच केलेला पराभव जसा आपल्याला लक्षातही येत नाही; तसेच ‘गेल ऑम्वेट मराठी उत्तम बोलतात’ म्हणून कौतुक करताना, समाजाच्या अभ्यासकाला समाजाची भाषा अवगत असायलाच हवी ही साधी अपेक्षाही आपण बिनगरजेची/ चैनीची मानतो, याची जाणीव अनेकांना नसायची! अर्थात त्या वेळी, गेल ऑम्वेट आपल्यात आहेत आणि त्यांचे मराठीत बोलणारे, महाराष्ट्राची माहिती असणारे, कुणालाही कमी न लेखणारे, अगत्यशील व्यक्तिमत्त्व लोभस म्हणावे असे आहे, या सहजभावनेतून कौतुकाची ऊर्मी अनेक कार्यकर्त्यां/ अभ्यासकांना येई आणि ‘त्या मराठी बोलतात’ याचे कौतुक निव्वळ निरागसपणेच होई. पण ‘जन्माने अमेरिकन असूनसुद्धा मराठी बोलतात’ याच चालीवर कदाचित, ‘पुस्तके लिहिणाऱ्या असूनसुद्धा अननुभवी कार्यकर्त्यांशीही अगत्याने बोलतात’ असेही म्हणता आले असते. या असल्या कौतुकांमधून आपण गृहीत धरलेले विरोधाभास किती उघडे पडताहेत, याची रुखरुख कुणाला वाटायची की नाही कोण जाणे. बुधवारी सकाळी गेल ऑम्व्हेट गेल्या. समाजातले दृश्य-अदृश्य अंतर्विरोध, ‘हे म्हणजेच समाजरचना’ असे मानण्याची पद्धत आणि अशा रचनेतून त्रासच सहन करावा लागणाऱ्या माणसांनी त्यावर उत्तर शोधताना त्या जाचक रचनेत होत गेलेले बदल, तळाचे लोक आपल्या प्रश्नांची- समस्यांची उत्तरे शोधू लागतात तेव्हा होणारे संघर्ष, त्या संघर्षांची वैचारिक धार.. हे सारे गेल यांचे अभ्यासविषय होते. यातून स्त्रियांचे संघर्ष, जातिअंताचे आणि समतेचे लढे, पाण्याच्या समन्यायी वाटपाचे किंवा समान वेतनाचे संघर्ष गेल यांनी अभ्यासलेच. पण या संघर्षांची वैचारिक शिदोरी काय होती हे शोधताना ‘समाजशास्त्रज्ञ’ गेल ऑम्वेट यांच्या अभ्यासाचा सांधा बदलला आणि तो ‘बहुशाखीय’ झाला. त्यात इतिहास आलाच, पण संतवाङ्मयापर्यंत पोहोचल्यावर, वरवर पाहाता आध्यात्मिक वाटणाऱ्या तत्त्वज्ञानाचे सामाजिक अन्वयार्थही आले. भक्ती संप्रदायाच्या परिशीलनापर्यंत  आणि त्याहीपुढे तुकारामांच्या अभंगांविषयी सटीक इंग्रजी पुस्तकाच्या सहलेखनापर्यंत गेलेला त्यांच्या अभ्यासाचा हा प्रवास मुळात सुरू झाला होता वयाच्या विशी-पंचविशीदरम्यान, ‘इंग्रजीची शिक्षिका’ म्हणून अमेरिकी  योजनेखाली अल्पकाळासाठी भारतात येण्यापासून. इथल्या समाजाविषयी पडलेल्या प्रश्नांतूनच, समाजशास्त्रातल्या पीएच.डी. संशोधनाचा विषय तोवर ठरला होता. ही पदवी पुढे मिळालीच, पण वसाहतकाळातल्या सामाजिक संघर्षांचा वैचारिक वारसा आज कुठे आहे, हेही त्या शोधू लागल्या. यातूनच आधी कासेगावच्या इंदुताई पाटणकर आणि मग भारत पाटणकर यांची भेट झाली. शहादा- अक्कलकुव्याच्या आदिवासी भागात भारत यांच्याशी भावबंध जुळले आणि इंदुताईंनीच नव्हे तर कासेगावनेही गेल यांना सून म्हणून- ‘शलाका पाटणकर’ म्हणून-  स्वीकारले. भारत आणि गेल यांचे सहजीवन पुढे, परिवर्तनवादी तरुणांच्या दोन पिढय़ांना प्रेरक ठरले. प्रत्यक्ष काम, चळवळीचे भान आणि अभ्यासाची दिशा यांचा संबंध नेहमीच कायम ठेवणाऱ्या गेल यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फुले-आंबेडकर अध्यासनावर नियुक्ती होण्यापूर्वीच, ‘ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान’ हे त्या विद्यापीठाचे ब्रीद आचरणात आणले होते. ‘मार्क्‍स- फुले- आंबेडकर’ हे वैचारिक संश्लेषण कॉ. शरद पाटील यांनी मांडले, त्यास समांतर मांडणी गेल यांनी केलेल्या ‘ब्राह्मणवादा’च्या चिकित्सेतून विश्लेषकपणे होत होती. त्यांची पुस्तके यापुढेही सोबत असतीलच; पण ‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पॉलिटिकल वीकली’मधील त्यांची अनेक ग्रंथपरीक्षणे, अरुंधती रॉय यांनी ‘नर्मदा बचाओ आंदोलना’ला दिलेला पाठिंबा उथळ का ठरतो याची गेल यांनी केलेली चिकित्सा असे अनेकपरींचे अप्रकाशित लिखाण ग्रंथबद्ध करणे आणि त्यांच्या स्मृत्यर्थ पाठय़वृत्ती सुरू करणे, ही त्यांना खरी आदरांजली ठरेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Researcher author gail omvedt zws

Next Story
हस्तांदोलनापलीकडे..
ताज्या बातम्या