रेल्वे अर्थसंकल्प हा देशाच्या जीवनातील एक अर्थपूर्ण उत्सव. तो गुरुवारी झाला. असा उत्सव ही अर्थातच वृत्तवाहिन्यांसाठी मोठीच पर्वणी. या वेळी मात्र अभिनेता संजय दत्त याने या वाहिनीकारांची चांगलीच पंचाईत केली. नेमक्या याच दिवशी संजय दत्त याची तुरुंगातून सुटका झाली. त्यामुळे वाहिन्यांना त्याचा जल्लोष साजरा करता आला नाही. तरीही ५६ वर्षांच्या या ‘संजूबाबा’ने तुरुंगातून बाहेर पडताच तिरंग्याला कशी वंदना दिली, मग त्याने पहिली सेल्फी कोणाबरोबर काढली, तेथून तो कुठे गेला असे क्षणाक्षणाचे वार्ताकन वाहिन्यांच्या पत्रकारांनी मोठय़ा उत्साहात केलेच. ते पाहून संजय दत्त हा कोणी स्वातंत्र्यवीर तर नाही ना, अशी शंकाही काहींच्या मनात निर्माण झाली असेल. अर्थात संजयने नंतर आपली प्रतिमा उजळवली, मुन्नाभाईच्या भूमिकेतून त्याने अहिंसावादाचे समर्थन केले, तुरुंगातील त्याची वर्तणूकही चांगली होती, तेव्हा संजय दत्त याला खलनायकाच्या भूमिकेतून पाहता कामा नये, असे त्याच्या समर्थकांचे म्हणणे असू शकते. अलीकडच्या काळात बादरायण संबंध हेही युक्तिवादातील एक अस्त्र बनले आहे. त्याचेच हे एक उदाहरण. मात्र मुन्नाभाईच्या भूमिकेमुळे संजय प्रत्यक्षातील नायक बनत असेल, तर त्या न्यायाने सरकारी देशभक्त अनुपम खेर यांनी डॉ. डेंगची भूमिका केली म्हणून त्यांना आजन्म देशद्रोह्य़ाच्याच पंक्तीत बसवावे लागेल. तेव्हा वास्तवाकडेच पाहावे, हे बरे. संजयला शिक्षा झाली त्या गुन्ह्य़ाचे स्वरूप येथे लक्षात घ्यायला हवे. मुंबई बॉम्बस्फोटांच्या आधी भारतात आलेल्या शस्त्रसाठय़ातील एक रायफल त्याच्या घरात सापडली होती. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. ही घटना १९ एप्रिल १९९३ची. त्यानंतर ‘टाडा’खालील आरोपांतून त्याची सुटका झाली, परंतु शस्त्रास्त्र कायद्याखाली त्याला सहा वर्षांची शिक्षा झाली. पुढे सर्वोच्च न्यायालयाने ती एका वर्षांने कमी केली. अशा प्रकारे गुन्ह्य़ानंतर तब्बल २० वर्षांनी (मधले सुमारे १६-१७ महिने वगळता) तो तुरुंगात गेला. तेथूनही तो अधूनमधून रजेवर बाहेर येत होताच. या तुरुंगवासातील चांगली वर्तणूक पाहून सरकारने त्याची शिक्षा १४४ दिवसांनी कमी केली. ही चांगली वर्तणूक नेमकी कोणती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आर्थर रोड तुरुंगात असताना त्याने कैद्यांसाठीचे कपडे घालण्यास नकार दिला होता ही घटना चांगल्या वर्तणुकीचे उदाहरण नक्कीच म्हणता येणार नाही. सेलेब्रिटी आणि इतरांसाठीच्या त्या व्याख्या बहुधा भिन्न असाव्यात. अन्यथा संजयसारखे अनेक कैदी आजही तुरुंगात खितपत पडले आहेत. अनेक जण साध्या जामिनाअभावी कैद्याचे जीवन जगत आहेत आणि संजयसारखा कैदी मात्र रुबाबात सुटत आहे हे चित्र फार प्रशंसनीय नाही. त्याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केवळ घोषणा दिल्या म्हणून काहींना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली जाते आणि ज्याच्या घरात शस्त्रे सापडली आणि ती शस्त्रे ज्यांच्याकडून आली ते बॉम्बस्फोटाचे गुन्हेगार होते असे असतानाही तो ‘उगवता तारा’ ठरवला जातो, हा पक्षपात झाला. तो कोणत्या सरकारच्या काळात झाला हा प्रश्नच गौण आहे. भारतात अशा पक्षपाताआड पक्षभेद कधी येत नसतो. आताही जेल मॅन्युअलचा आधार घेऊन संजयला मुक्त करण्यात आलेच आहे. संजयवर देशद्रोहाचा आरोप ठेवावा असे कुणाचेही म्हणणे नाही. त्याचा गुन्हा त्या प्रकारचा नसल्याचे टाडा न्यायालयाने म्हटले आहे, परंतु मग ज्या कृत्यांसाठी देशद्रोहाचा आरोप ठेवला जातो ती कृत्ये तरी तपासून घेतली पाहिजेत. न्यायव्यवस्थेतील असा पक्षपात हा देशद्रोह नसला, तरी जनद्रोह ठरत आहे हे सर्वानीच लक्षात घेतले पाहिजे.