राजकारणात परंपरागत शत्रूशी दोन हात करणे तसे तुलनेने सोपे असते. पण आधी मित्र असलेल्या आणि नंतर शत्रू झालेल्याशी सामना करणे मात्र कठीण ठरते. भाजपला भविष्यात सेनेच्या माध्यमातून याचीच प्रचीती वारंवार येणार याचे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून मिळाले. मुख्यमंत्रीपद क्षणभर बाजूला ठेवून, शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष या नात्याने केलेले हे भाषण पंतप्रधान वा केंद्रीय गृहमंत्र्यांनीही पक्षप्रचारात मग्न असण्याच्या नवपरंपरेला साजेसे होते. हिंदूत्वाचा पुरस्कार करणारा एकमेव पक्ष अशी आपली प्रतिमा निर्माण करण्यात भाजपला यश आले खरे, पण आता त्यांचेच मुद्दे घेऊन त्यांच्याशीच दोन हात करायचा सेनेचा मनसुबा असल्याचे हे भाषण निदर्शक आहे. त्यामुळे ठाकरेंची ‘चलो दिल्ली’ची घोषणा दखलपात्र ठरते. मोदींच्या उदयानंतर आक्रमकता हाच भाजपचा स्थायीभाव राहिला. त्याला जशास तसे उत्तर देण्याची हिंमत ममता बॅनर्जीचा अपवाद वगळला तर फक्त सेनेमध्ये आहे. शिवाय ममतांकडे नसलेले हिंदूत्व सेनेकडे आहे. कडवे, लढवय्ये सैनिक, सोबतीला भगवा आणि हिंदूू परंपरेशी नाते सांगणारे पक्षाचे चिन्ह या बळावर भाजपला जेरीस आणले जाऊ शकते हे गेल्या दोन वर्षांत सेनेने राज्यात अनेकदा दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरेंची प्रतिस्पर्ध्याला त्याच्याच शैलीत उत्तर देणारी ही भाषा या सगळय़ा गोष्टींना संस्थात्मक बळ देणारी आहे. खरे तर सेना हा अस्मितेचे राजकारण करणारा पक्ष आहे. सेनेने मुंबई वगळता राज्यात इतर कुठेही संस्थात्मक राजकारणाकडे फारसे लक्ष दिले नाही. उलट भाजपचा पाया संघटनात्मक पातळीवर विस्तारत गेला आहे. त्या बाबतीत भाजप आणि सेनेची तुलना होऊ शकत नाही. पण ‘अरे’ला ‘कारे’ म्हणण्याची क्षमता असणाऱ्या सेनेच्या लढाऊ बाण्याची जाणीव भाजपला आहे. शिवाय सेनेकडे असलेल्या ‘बाळासाहेब’ या ‘पेटंट’चा उल्लेख झाला की भाजपला अनेकदा निरुत्तर व्हावे लागते. हे लक्षात घेतले तर उद्धव ठाकरे यांचे भाषण हे सेनेच्या भविष्यातील राजकारणाची चुणूक दर्शवणारे ठरते. सेना हा व्यक्ती तसेच कुटुंबकेंद्रित पक्ष आहे, ही टीका करणाऱ्या भाजपचीदेखील आता त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे सेनेच्या विरोधासाठी हा मुद्दाही भाजपसाठी अडचणीचा ठरू लागला आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ‘आजची आणीबाणी संपवण्याचे’ विधान भाजपच्या वर्मावरच घाव घालणारे आहे. आम्ही अंधारात सत्ता मिळवलेली नाही, हे विधान हा भाजपवरील दुसरा घाव. राज्यात सत्ता मिळवायची असेल तर सेनेशिवाय पर्याय नाही हा संदेशही त्यातून गेला आहे. हे लक्षात घेतले तर सेनेचे मनसुबे गांभीर्याने घ्यावे लागतील अशीच परिस्थिती आज भाजपसमोर निर्माण झाली आहे. सेनेच्या या पवित्र्याने भाजपची दोन प्रकारे पंचाईत करून टाकली आहे. एक म्हणजे समान विचाराच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा धर्मनिरपेक्ष पक्षांना झाला आणि त्यापायी सत्तेपासून वंचित राहण्याची वेळ आली. उद्धव ठाकरे यांचे शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त सैनिकासमोर रविवारी केलेले भाषण आजवर सतत रस्त्यावर उतरण्याची भाषा करणारी शिवसेना आता दरबारी राजकारण शिकू आणि करू लागली आहे याची चुणूक दाखवणारे होते. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात भाजप आणि सेनेमधला राजकीय संघर्ष अधिक टोकदार होणार हे निश्चित!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena uddhav thackeray plans to expand its reach beyond maharashtra aim for national role zws
First published on: 25-01-2022 at 00:53 IST