आपल्या काही राजकीय पक्षांस एक खोड आहे. ते पराभव झाल्यास ‘आमच्या मतांची टक्केवारी वाढली’ असे सांगत निकालाचे ढोल वाजवतात आणि जिंकल्यास टक्केवारीचा मुद्दाच येत नाही. हे वास्तव लक्षात घेऊन ताज्या लोकसभा आणि विविध विधानसभा निवडणूक निकालांचा अन्वयार्थ लावायला हवा. लोकसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. त्यातील फक्त मध्य प्रदेशातील एक भाजपच्या पदरात पडली. हिमाचलातील मंडी आणि दादरा नगर हवेली या दोन्ही जागा भाजप विरोधकांकडे गेल्या. हे दोन्ही पराभव भाजपसाठी वेदनादायीच. कारण मंडी हा हिमाचल मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ. तो हातून गेला. आणि दादरा नगर हवेलीत एकेकाळचा सहयोगी पक्ष शिवसेनेने पहिल्यांदाच राज्याबाहेर जात भाजपस धूळ चारली. या दोन जखमांपैकी अधिक ठसठस ही हिमाचलाची असेल. ‘मंडी’च्या लोकसभा निवडणुकीत तर भाजपचा पराभव झालाच. पण या राज्यातील तीनही विधानसभा मतदारसंघ भाजपने गमावले. या दु:खास डागणी म्हणजे या ठिकाणी ‘भ्रष्ट’, देशद्रोही अशा काँग्रेसला मतदारांनी निवडले. तेदेखील काँग्रेसचा कोणी राष्ट्रीय नेता प्रचारास न जाता. भाजपच्या प्रचाराची धुरा दोन ठाकुरांहाती होती. केंद्रीय मंत्री तरुण तडफदार अनुराग ठाकूर आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री जयराम. या निवडणुकांत पश्चिम बंगालची अद्याप ओली जखम पुन्हा वाहू लागण्याची शक्यता आहे. त्या राज्यातील चारही जागांवर ममता बॅनर्जी यांचा तृणमुलचा विजयी ठरला. कर्नाटकात भाजपने एक जागा राखली आणि काँग्रेसला एक मिळाली. पण यात धोक्याचा इशारा असा की मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या घरच्या अंगणात काँग्रेसने भाजपस पराभूत केले. मध्य प्रदेशात भाजपने दोन जागा जिंकल्या खऱ्या. पण इतक्या फाटाफुटीनंतरही काँग्रेसने एक विजय मिळवला. राजस्थानातील दोनही जागा काँग्रेसला गेल्या. त्यातील एक भाजपच्या प्रभावक्षेत्रातील. ‘देशातील सर्वात कार्यक्षम, कल्पक मुख्यमंत्री’ असा ज्यांचा गौरव साक्षात पंतप्रधानांनी केला त्या हरयाणात ‘इंडियन नॅशनल लोक दला’चे अभय सिंग चौताला यांनी भाजपस हरवले. शेतकरी आंदोलनाशी या पराभवाचे काही नाते नाही, असे आता सांगितले जाईल. पण तरीही या पराभवातून जायचा तो संदेश गेलाच. भाजपस निर्विवाद यश मिळाले ते आसामात. त्या राज्यातील पाचपैकी तीन ठिकाणी भाजप तर उर्वरित दोन जागांवर भाजपचा घटक पक्ष निवडून आला. काँग्रेसच्या पदरात या राज्यातून फक्त भलामोठा भोपळा! या विजयाचे श्रेय आसाम गण परिषद-काँग्रेस-भाजप अशा विविध पक्षीय राजकीय अनुभवी मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांना द्यावेच लागेल. बाकी मिझोराम, नागालँड या राज्यांतील स्थानिक पक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली. हे पक्ष तूर्त भाजपचे साथीदार आहेत. तसा बिहारमधेही नीतिशकुमार यांचा जनता दलही सध्या भाजपचा सहयोगी आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या दोन ठिकाणच्या विजयावर भाजपचाही दावा असणार आणि त्यात काही गैर नाही. आंध्रातील एकमेव जागा ‘वायएसआर’ काँग्रेसकडे गेली तर तेलंगणातील एका जागेवर भाजपस विजय मिळाला. एरवी एखाद-दुसऱ्या पोटनिवडणुकची दखल घ्यावी असे काही त्यात नसते. पण या पोटनिवडणुका अनेक राज्यांत झाल्या म्हणून त्या दखलपात्र. तशी दखल घेतल्यास दिसते ते असे : एकूण ३० विधानसभा पोटनिवडणुकांत फक्त भाजपस सात ठिकाणी विजय मिळाला तर फक्त काँग्रेसने आठ जागा जिंकल्या. अन्य पक्षांच्या वाट्यास गेलेल्यांपैकी आठ पक्ष भाजपचे सहयोगी आहेत आणि सात भाजपविरोधी. म्हणजे अंतिम निकाल भाजप आणि भाजपविरोधी असा १५-१५ होतो. हा संख्यासंदेश पुरेसा स्पष्ट आहे.