भूलोकीच्या अमरावतीला..

थोडीथोडकी नव्हे, तब्बल ३३ हजार एकर एवढी प्रचंड जमीन अवघ्या आठ महिन्यांत ताब्यात घेण्याचे आक्रीत आंध्र प्रदेशात घडले आहे.

थोडीथोडकी नव्हे, तब्बल ३३ हजार एकर एवढी प्रचंड जमीन अवघ्या आठ महिन्यांत ताब्यात घेण्याचे आक्रीत आंध्र प्रदेशात घडले आहे. या राज्यातून हैदराबाद शहरासह तेलंगण वेगळे झाल्यानंतर नव्या राजधानीसाठी एवढी प्रचंड जमीन संपादित करण्याचे शिवधनुष्य मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पेलले आहे. याच काळात केंद्रातील सरकारला भूसंपादन विधेयकावर माघार घ्यावी लागली असताना हे घडले, याचे कारण त्या जमीनमालकांना त्याच्या मोबदल्यात भरपूर काही देण्याचे आश्वासन नायडू यांनी दिले आहे. अमरावती हे या नव्या राजधानीचे नाव. अठराशे वर्षांपूर्वी सातवाहनांच्या काळात या शहराने राजधानीचा दिमाख अनुभवला होता. आंध्र, तेलंगण, तमिळनाडू आणि महाराष्ट्र एवढय़ा मोठय़ा भूभागावर या अमरावतीतून राज्य चाले. काळाच्या पडद्याआड गेलेल्या या राजधानीला पुन्हा नव्या स्वरूपात उजाळा देण्यासाठी सिंगापूरच्या तज्ज्ञांच्या मदतीने आराखडा तयार करण्यात आला. ब्रिटिशांनी भारतात नवी दिल्ली हे विकसित केले. नेहरूकाळात चंदीगढ शहरही योजनाबद्ध रीतीने वसवण्यात आले. त्यानंतर आता अमरावती हे देशाचे पश्चिम किनाऱ्यावरील ‘गेट वे ऑफ इंडिया’ ठरणार आहे. आंध्रची ही राजधानी केवळ एका राज्याची ठरणार नसून ज्ञान, अर्थ, आरोग्य, पर्यटन, प्रशासकीय, क्रीडा, न्याय, शिक्षण आणि इलेक्ट्रॉनिक या नऊ क्षेत्रांमध्ये देशातील एक महत्त्वाचे केंद्र बनणार आहे. ‘सॅटेलाइट सिटी’ ही संकल्पना महाराष्ट्रात अस्तित्वात येऊनही दोन दशके झाली. त्यामध्ये जमीनमालक समान हिश्शाचे वाटेकरी असतात. उद्योग आणि निवास यांच्याबरोबरच आवश्यक त्या सर्व सुविधा निर्माण करून एक स्वयंपूर्ण स्वतंत्र छोटे शहर वसवण्याच्या या कल्पनेला आता बरीच गतीही मिळाली आहे. नफ्यात वाटेकरी असल्याने त्याबाबत कज्जेदलालीचा प्रश्न फारसा उद्भवला नाही. नव्या ‘अमरावती’साठी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर जमीन संपादित करणे हे फारच अवघड आणि अशक्य कोटीतले काम होते. एखाद्याने जरी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असता, तरी सारीच प्रक्रिया खोळंबण्याची शक्यता. त्याच्या बरोबरीने राजकीय, सामाजिक, प्रशासकीय आणि पर्यावरणीय अडचणींवर मात करीत हे काम सुरळीतपणे पार पडले, याबद्दल चंद्राबाबू नायडू हे अभिनंदनास पात्र आहेत. जमीनमालकांना विकासात थेट भागीदार करून घेऊन अशा प्रकारे एवढे मोठे शहर वसवण्याची स्वतंत्र भारतातील ही पहिली घटना आहे. या जमीनमालकांना खासगी व्यावसायिकांच्या मदतीने पन्नास मजली मनोरे बांधण्यास परवानगी देण्यात आली असली तरीही सरकारी इमारतींची उंची मात्र पंधरा मजल्यांहून अधिक असणार नाही. न्यूयॉर्क शहरातील जुळ्या मनोऱ्यांच्या धर्तीवर अमरावतीतही गगनचुंबी इमारती उभ्या करण्यात येणार आहेत. सम्राट अशोकाच्या काळापासून या शहराचे महत्त्व अबाधित आहे. त्याआधी ‘अमरेश्वरम्’ या नावाने त्याचा उल्लेख स्कंद पुराणातही आढळतो. गौतम बुद्धाच्या भूतकाळाशी सांगड घालत नव्या उमेदीने पुन्हा विकासाची भरारी मारण्यास आंध्र प्रदेश सज्ज होत असल्याचीच ही खूण म्हटली पाहिजे. या नव्या शहराची ही हकिगत कोणत्याही मराठी माणसाला ग. दि. माडगूळकरांच्या ‘सीता स्वयंवर’ चित्रपटातील ‘मनोरथा, चल त्या नगरीला, भूलोकीच्या अमरावतीला’ या गीताची सहज आठवण करून देणारी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Telangana new capital amravati

ताज्या बातम्या