परदेशातील आपल्याच दूतावासाचे ट्विटर हँडल ‘हॅक’ करून आपल्याच सरकारला तीन महिने पगार थकवल्याबद्दल जाब विचारणे हे अभूतपूर्वच म्हटले पाहिजे. बेलग्रेडमधील पाकिस्तानी दूतावासाबाबत नुकतेच हे घडले. गेले काही दिवस हा देश आणखी एका गंभीर घटनेबाबत चर्चेत होता. सियालकोटमधील एका कंपनीच्या श्रीलंकन व्यवस्थापकाला काही धर्मांध समाजकंटकांनी कंपनी परिसरात सर्वांसमक्ष ठेचून मारले आणि त्याचा मृतदेह तेथेच पेटवून देण्यात आला. त्या व्यवस्थापकावर मूलतत्त्ववाद्यांनी ईश्वरनिंदेचा ठपका ठेवला. या दोन घटना पाकिस्तानातील सध्याच्या आर्थिक आणि राजकीय स्थितीच्या निदर्शक आहेत. पाकिस्तानी अर्थव्यवस्था पुढील आर्थिक वर्षात ५ टक्क्यांनी विस्तारेल असा गुलाबी अंदाज व्यक्त केला जात आहे. चार वर्षांतील हा उच्चांक ठरू शकेल हे खरे असले, तरी आटोक्याबाहेर गेलेली चलनवाढ आणि कर्जभाराचे आकडे पाहिल्यास ती १० टक्क्यांनी विस्तारूनही फार फरक पडणार नाही अशी परिस्थिती आहे! आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वेळोवेळी मदत करून पाकिस्तान आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला असला तरी ही मदत नेहमीच सशर्त असते. ती पुरेशी पडत नसल्याची किंवा अटी फारच जाचक असल्याची बतावणी करत ‘मित्र देशां’कडे हात पसरण्याची या देशाची सवय जुनीच. कधी अमेरिका, कधी चीन, सध्या सौदी अरेबिया असे धनको या देशाला लाभत राहिले, तरी याचक प्रवृत्ती मुरल्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था स्वयंसिद्ध आणि स्वयंपूर्ण अशी कधी बनूच शकली नाही. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या किमान अटीच जाचक असतात. त्यात त्यांचा स्वयंलाभ असा नसतोच. पण सध्याच्या काळातील चीन आणि सौदी अरेबिया हे तर राष्ट्ररूपी सावकारच. ते ‘मित्रा’ला मदत करतात तेही स्वत:च्या लाभाचा विचार करून! त्यामुळे त्या देशांची तसेच वित्तीय संस्थांची देणी चुकती करणे हे या देशासमोरील प्रमुख आव्हान. पाकिस्तानी रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे इंधनादी आयात डॉलरभावाच्या हिशोबाने प्रचंड महाग बनली आहे. अशा अडीअडचणीच्या प्रसंगी घसघशीत परकीय चलन राखीवसाठा कामास येतो. पाकिस्तानच्या त्या तिजोरीत जवळपास खडखडाट आहे. नोव्हेंबर १९ रोजी पाकिस्तानची मध्यवर्ती बँक स्टेट बँक ऑफ पाकिस्तान आणि इतर सरकारी बँकांकडे मिळून २२०० कोटी डॉलरचा परकीय चलनसाठा शिल्लक होता. या तारखेपर्यंतच्या एका सप्ताहातच परकीय कर्जाच्या परतफेडीपोटी ६९ कोटी डॉलर चुकते करावे लागले होते. कृषी आणि औद्योगिक अशी दोन्ही क्षेत्रे आक्रसल्यामुळे आणि सेवा क्षेत्र पुरेसे सक्षम नसल्यामुळे पाकिस्तानची निर्यात फुटकळ आणि आयात प्रचंड. यात परकीय कर्ज परतफेडीची भर पडल्यामुळे चालू खात्यातील तूट फुगतच गेली. कर्जफेडीसाठीही पैसे शिल्लक राहात नसल्यामुळे नवीन कर्जे, त्यांच्या व्याजाचीच परतफेड करता करता पुन्हा पाकिस्तानी अर्थव्यवस्था मेटाकुटीला आलेली आहे. आर्थिक खडखडाटातून बऱ्याचदा अंतर्गत असंतोषाचा जन्म होतो. पाकिस्तानात वर्षानुवर्षे धार्मिक कट्टरवाद टिकून आहे याचे हे प्रमुख कारण. त्याला वेसण घालण्याची इच्छाशक्ती जिच्या ठायी कणभरही नाही अशी व्यक्ती पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर बसली आहे. इम्रान खान हे पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वाधिक बिनकण्याचे लोकनियुक्त पंतप्रधान ठरतात. ‘तेहरीक- ए- तालिबान पाकिस्तान’ आणि ‘तेहरीक-ए- लबैक पाकिस्तान’सारख्या जहालपंथीयांशी वाटाघाटी करणे किंवा ‘लष्कर-ए- तैयबा’, ‘जैश- ए- मोहम्मद’सारख्या संघटनांना, त्या केवळ भारतविरोधी घातपात घडवून आणतात म्हणून अभय देणे ही इम्रान यांच्या कचखाऊ वृत्तीची ठळक वैशिष्ट्ये ठरतात. ईश्वरनिंदेबाबत पाकिस्तानात कठोर कायदा असला, तरी दोषींविरोधात न्यायालयात खटला सुरू होण्यापूर्वीच अनेकदा अशी मंडळी झुंडबळी ठरलेली आहेत. आर्थिक आणि वैचारिक उजाडतेतूनच हे घडू शकते.