आयुर्वेदाचार्य

वैद्य प. य. तथा दादा खडीवाले हे एक अजब रसायन होते.

भारताच्या वायुदलात सतरा वर्षे काम केल्यानंतर रीतसर निवृत्ती घेऊन नंतर सारे आयुष्य आयुर्वेदासाठी वेचणारे वैद्य प. य. तथा दादा खडीवाले हे एक अजब रसायन होते.  दादांनी केवळ पुण्या-मुंबईतच नव्हे, तर साऱ्या महाराष्ट्रात जेथे जेथे शक्य आहे, तेथे आयुर्वेदाचे कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बीड जिल्ह्य़ातील अतिदुर्गम भागात किंवा ठाणे जिल्ह्य़ातील मोखाडा येथे त्यांनी रुग्णसेवा केली. वैद्य खडीवाले केवळ वैद्यकी करीत नव्हते, तर समाजातील विविध घटकांसाठी अनेक उपक्रम राबवण्यात त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. वयाच्या चाळिशीत आयुर्वेदाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि वैद्यकीला प्रारंभ करणाऱ्या दादांचे वडील यशवंत हरि वैद्य यांच्या नावाने वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था स्थापन करून दादांनी या शास्त्राच्या संशोधनाला गती दिली. हरि परशुराम औषधालय हे आयुर्वेदीय औषधांचे विक्री केंद्र चालवताना दोनशेच्या वर औषधांची निर्मिती करणाऱ्या खडीवाले यांनी सर्वसामान्यांसाठी आयुर्वेदाचे ज्ञान सहज पोहोचण्यासाठी मोफत परिचय वर्ग सुरू केले. अव्याहतपणे गेली चार दशके हे वर्ग सतत चालवण्यात येतात. आयुर्वेदीय औषधे बनवताना आवश्यक असणाऱ्या वनस्पतींची उपलब्धता कमी होते आहे, असे लक्षात येताच, त्यांनी सगळ्या औषध कंपन्यांना एकत्र करून अशा वनस्पतींच्या लागवडीसाठी काय करता येईल, याचा विचार सुरू केला. अनेकांच्या मागे लागून उत्तम दर्जाच्या वनस्पतींची लागवड व्हावी, यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. दादा वायुदलात असताना, तेथील जवानांसाठी उत्तमोत्तम पदार्थ तयार करत. त्यातून त्यांना नवनवे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार करण्याचा छंदच जडला. अनेक नव्या पाककृती तयार करणे आणि त्यांची कृती लिहून ठेवणे, हा त्यांचा ध्यास. त्यातूनच ‘लोकसत्ता’च्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘पूर्णब्रह्म’ या वार्षिकांकात दोन वर्षे दादांनी तयार केलेल्या पाककृतींचा समावेश करण्यात आला. वनस्पतींचे औषधी गुणधर्म शोधणे हा त्यांचा संशोधनाचा विषय. त्यासाठी त्यांनी प्रचंड पायपीट केली. कोणत्या रोगावर कोणती वनस्पती उपयोगी ठरू शकते, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून वयाच्या ८४ व्या वर्षी कर्करोग, मधुमेह, किडनी, हृद्रोग, दमा, कावीळ यांसारख्या दुर्धर व्याधींवर नव्या औषधांची निर्मिती त्यांनी केली. पोलिसांच्या प्रकृतीत सातत्याने निर्माण होणाऱ्या तक्रारींवर त्यांनी एक छोटासा प्रकल्प दरवर्षी गणेशोत्सवात राबवला. सामान्यांना परवडतील, अशा दरात औषधे उपलब्ध करून देणे, यावर त्यांचा भर. त्यामुळे दादांच्या दवाखान्यात रुग्णांची अक्षरश: झुंबड उडत असे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या दादांनी जनसेवेचे घेतलेले हे व्रत अखेपर्यंत सुरूच ठेवले. पैसे मिळण्यापेक्षा रुग्णाच्या चेहऱ्यावरील हसू अधिक मौल्यवान असते, यावर त्यांनी विश्वास ठेवला. त्यामुळे आयुष्यभर विनामूल्य काम करणे, हे त्यांच्यासाठी असीधारा व्रत ठरले. समाजातील सर्व घटकांत लोकप्रिय असणाऱ्या दादांच्या गप्पांच्या मैफलीत म्हणूनच सगळ्या राजकीय विचारधारेची माणसे सहज सामावली जात. प्रत्येकाचे उत्तम आणि सुग्रास पदार्थानी स्वागत करणे हा त्यांच्या आवडीचा भाग. पुरस्कार आणि पारितोषिके याबद्दल जरा फटकून वागणाऱ्या दादांना आपल्या कामावर दुर्दम्य विश्वास होता. आयुर्वेदाला जगात स्थान मिळण्यासाठी प्रयोगशाळेतील संशोधन महत्त्वाचे असते, याची जाणीव असल्यामुळे दादांनी हे सारे संशोधन लेखनरूपाने प्रसिद्ध केले. ‘लोकसत्ता’मध्ये गेली अनेक वर्षे त्यांनी केलेले सदरलेखन हे त्याचेच फलित. सुमारे दीडशे पुस्तके आणि किती तरी पुस्तिका दादा स्वखर्चाने प्रकाशित करीत असत. त्यांच्या निधनाने एका आयुर्वेदाचार्यास आपण मुकलो आहोत. त्यांना ‘लोकसत्ता’तर्फे श्रद्धांजली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vaidya parshuram yashwant khadiwale passes away