एकोणसाठ हे हल्लीच्या काळात जग सोडून जाण्याचे वय नाही. सतत नव्याचा ध्यास घेणाऱ्या अभिनेत्री रीमा यांच्या बाबतीत तर नाहीच नाही. काल-परवापर्यंत शिवाजी मंदिरात नव्या नाटकांना आवर्जून हजेरी लावणाऱ्या या अभिनेत्रीने हे जग सोडले, हे वास्तव पचविणे अनेकांना जड जाऊ शकते, कारण काळाचा आणि वयाचा कोणताही परिणाम या कलावतीच्या अभिनयात, वागण्या-वावरण्यात जाणवत नव्हता. उलट, सतत नवनव्या माध्यमांना सामोरे जाण्याची त्यांची असोशी त्यांच्या बोलण्यातून कायम जाणवत असे. आई अभिनेत्री मंदाकिनी भडभडे यांच्याकडून अभिनयाचा ‘घराणे’दार वारसा लाभलेल्या रीमा यांनी स्वत:ला कुठल्याही चौकटीत कधीच बांधून घेतले नाही. शालेय शिक्षणानंतर त्यांनी सरळ रंगभूमीचा रस्ता धरला. जणू इथेच आपले भागधेय घडणारे आहे याची त्यांना उपजतच जाणीव असावी, इतक्या सहजपणाने त्यांनी हे केले. समोर येईल ती भूमिका आपलीशी करण्याचे त्यांचे सामथ्र्य पहिल्यापासूनच दिसून येते. जयवंत दळवी लिखित, विजया मेहता दिग्दर्शित ‘पुरुष’ने अनेक कलाकारांची कारकीर्द घडविली. नाना पाटेकर हे नाव सर्वतोमुखी झाले ते त्यांच्या ‘पुरुष’मधील लंपट राजकारणी गुलाबरावच्या भूमिकेमुळेच. तसेच यातल्या बलात्कारित अंबिकाच्या भूमिकेने रीमा यांनी आपली अभिनयाची नाममुद्रा खणखणीतपणे वाजवून दाखवली आणि इथूनच त्यांची चौफेर कारकीर्द सुरू झाली. आपल्यावरील बलात्काराचा सूड घेणाऱ्या अंबिकेचा उद्रेक रीमा यांनी ज्या संयतपणे व्यक्त केला, त्यातून त्यांच्या अभिनयाची खोली जाणकार रसिकांना कळून आली. यानंतर त्यांनी फिरून मागे वळून पाहिलेच नाही. ‘घर तिघांचं हवं’, ‘सविता दामोदर परांजपे’ या त्यांच्या नाटकांनी त्यांच्यातल्या संवेदनशील अभिनेत्रीचे विविध कंगोरे रसिकांसमोर आले. ‘झाले मोकळे आकाश’, ‘विठो रखुमाय’, ‘छापाकाटा’, ‘सासू माझी ढासू’, ‘के दिल अभी भरा नहीं’ अशा वैविध्यपूर्ण पिंडप्रकृतीच्या नाटकांतून त्यांनी लीलया संचार केला. भूमिकेचा सर्वागीण विचार, तिची सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक पाश्र्वभूमी, त्यातून घडलेले ते-ते पात्र आणि या साऱ्या जडणघडणीतून त्या पात्राची व्यक्त होण्याची विशिष्ट ढब त्या सहजी आत्मसात करीत. विलक्षण बोलका चेहरा, विनोदाची सूक्ष्म जाण, अचूक टायमिंग आणि भूमिकेवरची पकड ही त्यांच्या अभिनयाची वैशिष्टय़े होती. विजया मेहता यांच्या आपण शिष्या आहोत याचा सार्थ अभिमान त्यांना वाटे. मात्र बाईंकडून संथा घेताना आपल्या अभिनयात बाई डोकावणार नाहीत याची पुरेपूर खबरदारी रीमा यांनी कायम घेतली. (बाईंच्या नाटय़विचारांच्या आहारी गेलेल्या अनेकांना हे जमले नाही. त्यांच्या अभिनयात विजयाबाईच डोकावत राहिल्या, असो) अनेक नट-नटय़ा या दिग्दर्शकाच्या हाताळणीवर उत्तम वा खराब काम करतात. परंतु रीमा यास अपवाद होत्या. दिग्दर्शक कुणी असो, आपण आपल्या परीने उत्तम तेच आविष्कृत करायचे, हा त्यांचा खाक्या. म्हणूनच ‘सासू माझी ढासू’सारख्या तद्दन धंदेवाईक नाटकातही त्या स्वत:चा ठसा उमटवू शकल्या.

मराठी रंगभूमीवर स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी मराठी-हिंदी चित्रपट, मालिका असा अन्य माध्यमांतही मासोळी जशी तळे असो, नदी असो, समुद्र असो, सहजगत्या मार्गक्रमणा करते तसा मुक्त संचार केला. या माध्यमांतही त्यांनी आपली अमीट छाप उमटविली. मराठी चित्रपटांमध्ये जशा त्यांना विविध पोताच्या भूमिका मिळाल्या, तशा हिंदी चित्रपटांतून मिळाल्या नसल्या, तरी बॉलीवूडमध्ये ग्लॅमरस आईचे नवे पर्व त्यांनी निर्माण केले. ‘मैंने प्यार किया’, ‘हम आप के हैं कौन’, ‘साजन’, ‘वास्तव’, ‘कल हो ना हो’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कयामत से कयामत तक’, ‘आशिकी’ आदी चित्रपटांतून सलमान खान, अक्षयकुमार, श्रीदेवी, काजोल, माधुरी दीक्षित, शाहरूख खान अशा बडय़ा स्टार्सचे कोणतेही दडपण त्यांनी कधी वागविले नाही. मराठी कलावंत हिंदी चित्रपटांत न्यूनगंड असल्यासारखे वावरतात, हा समज त्यांनी खोटा ठरवला. किंबहुना मराठी कलाकारांना सन्मानपूर्वक वागणूक मिळवून देणाऱ्या मोजक्या कलावंतांमध्ये रीमा यांचा समावेश करायला हवा. मराठी कलाकारांच्या हिंदी संवादोच्चारांबद्दल जो गैरसमज बॉलीवूडमध्ये हेतुत: पसरवला गेला आहे, त्याला त्यांनी सकारात्मक छेद दिला. हिंदी मालिकांमध्येही त्यांनी आपल्या वैशिष्टय़पूर्ण भूमिकांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘श्रीमान श्रीमती’, ‘तू तू – मं मं’ या मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत त्या रीमा यांच्या खटय़ाळ, विनोदी भूमिकांमुळेच! हिंदी मालिकांमध्ये तोंडी लावण्यासाठी मराठी कलाकारांना वापरले जाते असा आक्षेप घेतला जात असताना (तो काही अंशी खराही आहेच) रीमा, उषा नाडकर्णी यांच्यासारख्या अभिनेत्रींनी तो खोटा पाडला. आपले नाणे खणखणीत असेल तर प्रतिकूल परिस्थितीतही ते वठतेच, यावर रीमा यांचा विश्वास होता. त्यामुळे अशा अपसमजांना भीक न घालता त्यांनी बडय़ा बॅनरच्या मालिकांमध्येही सन्मानपूर्वक काम केले. प्रतिष्ठा, प्रेम, आत्मीयता मिळवली.. तीही आपल्या शर्तीवर! हे सारे जरी खरे असले, तरी त्या खऱ्या अर्थाने मन:पूत रमत ते मराठी रंगभूमीवरच! नाटक हा त्यांचा श्वास होता. बॉलीवूड, हिंदी मालिकांमध्ये व्यग्र असतानाही त्यांनी नाटकाचा हात कधीच सोडला नाही. हिंदी चित्रपटांमध्ये गेलेले काही मराठी कलाकार तिथे रुळल्यानंतर फिरून मराठी नाटकांकडे कधी वळले नाहीत. तिथला शेर संपल्यावर मात्र त्यांना मराठी रंगभूमीचे प्रेम उफाळून येते. मात्र रीमा यांना असे बेगडी प्रेम व्यक्त करायची वेळ कधीच आली नाही. त्या समांतरपणे मराठी रंगभूमीवरही सक्रिय राहिल्या. बुजुर्ग झाल्यावर येणाऱ्या नव्या पिढीबद्दल उसासे टाकण्याचे काम अनेक कलाकार करतात. रीमा या बाबतीतही अपवाद होत्या. त्या आवर्जून महत्त्वाची आणि वेगळी वाट धरणारी नाटके पाहत. त्याबद्दलची आपली मते, निरीक्षणे कलाकार, लेखक-दिग्दर्शकाला स्पष्टपणे सांगत. तोंडावर छान छान, गोड गोड बोलून आपले खरे मत सार्वजनिक सभ्यता म्हणून किंवा कुणाला कशाला दुखवा, म्हणून व्यक्त न करणाऱ्या कलावंतांच्या या युगात, आपले प्रामाणिक मत व निरीक्षणे निखळपणे मांडणाऱ्या, नाटक आवडले असल्यास तोंडभरून कौतुकही करणाऱ्या रीमा आपल्या या वेगळेपणाने उठून दिसत. अशा या चतुरस्र अभिनेत्रीचे अकाली जाणे म्हणूनच चटका लावणारे आहे.