आंतरजालावरची संकेतस्थळे ‘हॅक’ करण्यासाठी कुख्यात असलेल्या ‘ड्रॅगन फोर्स मलेशिया’ने शुक्रवारी, १० जूनच्या रात्री भारतीय वेळेनुसार ८ वाजून २२ मिनिटांनी ट्वीट करून ‘ऑप्स पाटुक’ची माहिती दिली. ‘पाटुक’ म्हणजे चोच मारणे. या ट्वीटचा रोख भारतीय संकेतस्थळांवर उत्पात घडवण्याचाच होता, यात शंका नाही. मात्र अनेकांना तेव्हा हा दावा पोकळ वाटला. त्यामुळेच ‘हे खरे कशावरून?’ असे प्रश्न ट्वीटखालीच विचारले गेले. त्या कुणाला ‘ड्रॅगन फोर्स मलेशिया’ने काही उत्तर दिले नाही. मात्र नागपुरातील ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’चे संकेतस्थळ चालेनासे झाल्याची तक्रार रविवारी करण्यात आली, तेव्हा त्या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर ‘ड्रॅगन फोर्स मलेशिया’च्या चिन्हासह इंग्रजीतील त्यांचा संदेशही दिसत होता. ‘भारतीय सामान्यजनांशी आमचे भांडण नाही. तुम्ही तुमचा धर्म पाळा, पण आमच्या धर्माचा अवमान करू नका,’ अशाच अर्थाचा संदेश पुढे आणखी काही संकेतस्थळांवरही दिसू लागला, त्यात इस्रायलच्या दूतावासाचेही संकेतस्थळ होते. मात्र भारतातील सरकारी विभागांची संकेतस्थळे, शैक्षणिक संस्थांची वा प्रसारमाध्यमांची जाल-पाने यांवर खरा रोख होता. ‘आमचे संकेतस्थळ हॅक झाले’ असे स्वत:हून सांगणे ही खरे तर नामुष्कीच. त्यात सरकारी संकेतस्थळे हॅक होणे हे सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे. पण तरीही हा ना तो गट असे हल्ले करण्यास सरसावत असतो. याच ‘ड्रॅगन फोर्स मलेशिया’ने गेल्या वर्षी इस्रायलमध्ये अशा प्रकारचे हल्ले केले होते. एप्रिल ते सप्टेंबपर्यंत हे हल्ले अधूनमधून सुरूच ठेवायचे, अशी या गटाची तेव्हाची रणनीती होती. इस्रायलच्या सरकारी संकेतस्थळांसह साऱ्यांनाच जेरीस आणणारा हा गट पॅलेस्टिनीसमर्थक असल्याचा शिक्का त्या वेळी मारण्यात आला. मात्र या गटाचे इस्लामधार्जिणेपण व्यापक असल्याचे आता स्पष्ट होते आहे. स्वत:ला ‘हॅक्टिव्हिस्ट’ म्हणजे हॅकिंगच्या क्षेत्रातील कार्यकर्ते म्हणवणारा हा गट केवळ राजकीय/ धार्मिक अस्मितेच्या कारणांसाठी हॅकिंग करतो. आर्थिक व्यवहार होत असलेल्या संकेतस्थळांवर डल्ला मारणाऱ्या आणि ‘खंडणी द्या- तरच तुम्हाला तुमची विदा परत मिळेल’ अशी धमकी देणाऱ्या हॅकरपैकी हा गट नाही, असे गेल्या सुमारे सव्वा वर्षांतील अनुभवावरून म्हणता येते. मात्र ‘भारतीय बँकांवरही त्यांचा रोख होता’ असे पोलिसांकडून सांगण्यात आले. ‘त्यांनी फक्त संकेतस्थळे खराब केली. हा तर हल्ल्याच सर्वात सौम्य प्रकार’ असे तज्ज्ञांचे म्हणणे. पण हॅकरांचा हा गट भारताला जुमानत नाही, एवढे सिद्ध झाले.

राजकीय पक्षाने केलेल्या कारवाईपुरतेच नूपुर शर्मा प्रकरण मर्यादित राहाते, भाजपच्या या निलंबित प्रवक्तीवर गुन्हा दाखल करतानाही तिने काय गरळ ओकले याची माहिती देणाऱ्या विशेषत: मुस्लीम ट्विटर-वापरकर्त्यांवरही गुन्हे दाखल होतात, डझनाहून अधिक देशांनी भाजपच्या प्रवक्तीने काढलेल्या उद्गारांबद्दल भारताची निंदा करूनही पंतप्रधान गप्प राहातात.. हे वर्तन जगाला कितीही असहिष्णू वाटले तरी, एकापरीने भाजपकडील सत्तेच्या ताकदीचे प्रदर्शनसुद्धा त्यातून होत असते. सत्ता-ताकदीचा असाच धाकयुक्त दरारा प्रयागराज आदी ठिकाणच्या ‘बुलडोझर’ कारवाईतून दिसतो. मात्र तो धाक, तो दरारा आणि त्यामागची सत्तेची ताकद या साऱ्यांपलीकडल्या सायबर-विश्वात ‘अदृश्य’पणे दंगल वा निदर्शने करणाऱ्यांचा बंदोबस्त कसा करणार, त्यांना जरब कशी बसवणार, यावर कदाचित पुढल्या हल्ल्यांत सामान्य भारतीयांच्या बँक खात्यांचे काय होणार, हा धर्मनिरपेक्ष प्रश्नही अवलंबून राहील.