उत्तर कोरियाने अंतराळात रॉकेटच्या साह्य़ाने सोडलेला उपग्रह, त्या कृत्याने जागतिक शांतता धोक्यात आली असल्याचा अमेरिकेचा दावा, हे निमित्त साधून अमेरिकेने दक्षिण कोरियाबरोबर ‘क्षेपणास्त्र कवच’ निर्माण करण्यासंबंधी सुरू केलेली चर्चा आणि त्या चच्रेला चीनने घेतलेला आक्षेप अशा सर्व घटनांमुळे जागतिक पातळीवर मोठे वादळ निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय राजनीतीमध्ये दिसते तसे असतेच असे नसते हे पुन्हा एकदा अधोरेखित करणाऱ्या अशा घटना आहेत. त्यांच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक राष्ट्राकडून त्या संदर्भात योजल्या जाणाऱ्या प्रचारव्यूहाच्या – प्रपोगंडाच्या – पडद्याआड डोकावून पाहणे म्हणूनच आवश्यक आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या जागतिक शीतयुद्धाची फलश्रुती म्हणजे उत्तर आणि दक्षिण कोरियात सातत्याने धुमसत असलेला संघर्ष. यातील उत्तर कोरिया हा तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या पंखाखाली असलेला हुकूमशाही देश. किम जॉन उन हा तेथील हुकूमशहा. त्याचा पिता किम जाँग इल यांचे २०११ मध्ये निधन झाले. त्यानंतर वारसाहक्काने किम जॉन उन हा उ. कोरियाचा सर्वेसर्वा बनला. त्याला अर्थातच चीनचा आशीर्वाद होता आणि आहे. अमेरिकेच्या दृष्टीने मात्र उत्तर कोरिया हा सतानी प्रवृत्तीचा देश आहे. धाकटे जॉर्ज बुश यांना अशी धार्मिक (ख्रिस्ती) परिभाषा वापरण्याचा छंद होता. त्यातूनच त्यांनी उ. कोरियाची ‘अ‍ॅक्सिस ऑफ इव्हिल’मध्ये गणना केली. त्याचा प्रभाव अद्याप अमेरिकी जनमानसावर आहे. त्यातूनच आजही एकूणच किम जॉन उन हा कसा सतान आहे, शुद्धीकरण मोहिमेच्या नावाखाली आपल्या आत्याचा नवरा यांग साँग थेक याच्या अंगावर १२० भुकेल्या कुत्र्यांना सोडून त्याला कसे मारले, अशा कथा पाश्चात्त्य माध्यमांतून चवीने चघळल्या जातात. त्यात तथ्य नसेलच असे नाही. मुळातच हुकूमशाही देशांच्या पोलादी पडद्यांआड खरे काय चालते हे कळायला मार्ग नसतो. आपल्यापर्यंत माहिती येते ती प्रामुख्याने पाश्चात्त्य माध्यमांतून. त्यात सत्यांश किती आणि प्रचारव्यूहाचा भाग किती हे तपासून पाहण्याचे साधनच आपणांस उपलब्ध नसते. तर अशा माहितीनुसार उ. कोरियातील नागरिक हे प्रत्यक्षापेक्षा प्रतिमेवर अधिक प्रेम करणारे आहेत. त्यामुळे त्यांना शेजारी देशाला दम वगरे देणारा नेता अधिक भावतो. उत्तर कोरिया अधूनमधून जे शस्त्रबळाचे प्रदर्शन करीत असतो, क्षेपणास्त्रांच्या वगरे चाचण्या करीत असतो, त्यामागे या भावनांची जपणूक करणे आणि दक्षिण कोरियाला आपल्या दाबात ठेवणे हे दोन प्रधान हेतू असतात. सध्याचा अंतराळ कार्यक्रम हा त्याचाच एक भाग आहे. गेल्या ६ जानेवारी रोजी या देशाने हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यातील तथ्येही अद्यापि नीट समोर आलेली नाहीत. मात्र त्या पाश्र्वभूमीवर उत्तर कोरियाने सुरू केलेल्या अंतराळ कार्यक्रमाकडे पाहण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या आडून उत्तर कोरिया आपल्या रॉकेट सोडण्याच्या क्षमतेची चाचणी करीत असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. उत्तर कोरियाच्या उपग्रह प्रक्षेपक रॉकेटमुळे अमेरिकेला कोणताही धोका नसल्याचे पेंटॅगॉन अधिकाऱ्यांचे मत असले, तरी जॉन केरींसारखे जबाबदार मंत्री मात्र त्यातून ‘अमेरिकेला धोका’ असल्याचे सांगत आहेत आणि केवळ त्या संशयावरून त्या देशावर नवी आíथक बंधने घालण्याचे ठरवितानाच दक्षिण कोरियाला क्षेपणास्त्र कवच देण्याची चर्चा अमेरिकेने सुरू केली आहे. हा एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव आहे. आíथक बंधनांचा फटका जितका उ. कोरियाला बसणार आहे, तेवढाच तो चिनी कंपन्यांनाही सोसावा लागणार आहे. दुसरीकडे दक्षिण कोरियातील अमेरिकी शस्त्रप्रभाव वाढवून चीनवर लष्करी दबाव आणण्याचाही अमेरिकेचा प्रयत्न आहे. यामुळे स्वाभाविकच चीन आणि अमेरिका यांच्यातील तणावात भरच पडणार आहे. पण अमेरिकी प्रतिक्रियांचा हेतू बहुधा तोच असावा.