आव्हान कायम…

राज्यात ९ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत १३.५१ कोटींहून लशी दिल्या गेल्या. परंतु उत्तर प्रदेशची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा कितीतरी अधिक आहे.

करोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात मंगळवारी, ९ नोव्हेंबर रोजी १० कोटी कोविड प्रतिबंधक लशींचा टप्पा ओलांडला गेला. जवळपास ६.८ कोटी नागरिकांना पहिली आणि ३.२ कोटी नागरिकांना लशीच्या दोन्ही मात्रा मिळालेल्या आहेत. लसमात्रा घेतलेल्यांना पुन्हा कोविड होण्याचे प्रमाण, पहिल्या मात्रेनंतर ०.४८ टक्के आणि दुसऱ्या मात्रेनंतर ०.२९ टक्के इतके अत्यल्प असल्यामुळे या लसीकरणाचे महत्त्व लक्षात यावे. राज्य सरकार, या सरकारने नेमलेले कोविड प्रतिबंधक कृतिदल, जिल्हा प्रशासने, जिल्ह्यांतील व शहरांतील आरोग्य यंत्रणा, खासगी वैद्यक आणि लाखो आरोग्यसेवकांच्या अथक परिश्रमातून आणि असीम त्यागातून हे उद्दिष्ट साध्य झाल्याने हे सर्वच अभिनंदनास पात्र आहेत. देशात इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण देशात केवळ उत्तर प्रदेशातच झालेले आहे. त्या राज्यात ९ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत १३.५१ कोटींहून लशी दिल्या गेल्या. परंतु उत्तर प्रदेशची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यामुळे लाभार्थी लोकसंख्येपैकी एकेरी व दुहेरी लसीकरण झालेल्यांची या राज्यातील टक्केवारी महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, पहिली व दुसरी मात्रा घेतलेल्यांमध्ये उत्तर प्रदेशात प्रचंड तफावत दिसून येते. तेथे जवळपास ९.९९ कोटी नागरिकांनी पहिली मात्रा घेतली, पण दुसरी मात्रा घेतलेल्यांची संख्या आहे ३.५२ कोटी. याउलट महाराष्ट्रात पहिली मात्रा (६.८० कोटी) आणि दुसरी मात्रा (३.२० कोटी) घेतलेल्यांमध्ये इतकी तफावत नाही. याचाच अर्थ महाराष्ट्रात लसीकरण पाठपुराव्याबाबत सरकारी पातळीवर सातत्य आहे आणि नागरिकांमध्ये एकेरी लसीकरणानंतर गाफील राहण्याचे, तसेच लस अनास्थेचे प्रमाण तुलनेने कमी आहे. या कोविड मोहिमेत महाराष्ट्राच्या दृष्टीने आणखी एक कळीचा मुद्दा म्हणजे पारदर्शिता. सुरुवातीपासूनच राज्यातील कोविडबाधितांची संख्या अधिक असल्याबद्दल विविध स्तरांवर टीका होत होती. परंतु हा वाढीव आकडा करोना चाचण्यांचे मोठे प्रमाण आणि त्यातही ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांना दिले गेलेले प्राधान्य, तसेच बाधित आणि बळींची वास्तव माहिती प्रसृत करण्यावर भर दिला गेल्यामुळे दिसत होता. त्यामुळे खऱ्या व घोषित कोविडबळींच्या तफावतीवरून ज्या राज्यांवर प्रखर टीका झाली, त्यांमध्ये महाराष्ट्र नव्हते! अर्थात या मोहिमेत पूर्णविराम किंवा विजयी लक्ष्य असे काही नसते. करोनाविरोधात अजूनही बरीच मोठी मजल महाराष्ट्रासारख्या अजस्रा राज्याला मारावयाची आहे. मुंबई आणि पुणे या जिल्ह्यांना सुरुवातीला करोनाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसला, परंतु येथील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सक्षम असल्यामुळे विशेषतङ्म करोनाच्या प्रलयंकारी दुसऱ्या लाटेत परिस्थिती पूर्णतङ्म हाताबाहेर गेली नव्हती. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक कोटीच्या आसपास लसीकरण झालेले आहे. मुंबईत तर जवळपास सर्व लाभार्थींना किमान एक मात्रा मिळालेली आहे. इतर जिल्ह्यांनी या दोहोंचा कित्ता गिरवण्याची गरज आहे. ३६ जिल्ह्यांपैकी जवळपास केवळ डझनभर जिल्ह्यांमध्येच एकेरी लसीकरणाचे प्रमाण ८० टक्क्यांच्या आसपास आहे. ते वाढवण्याची गरज आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढली नाही ही बाब दिलासादायकच. येत्या काही दिवसांमध्ये दिवाळीनंतरच्या रुग्णसंख्येची आकडेवारी स्पष्ट होईल. महाराष्ट्रात नागरीकरण आणि औद्योगिकीकरण इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत गाफील राहून चालणार नाही. एखादे उत्परिवर्तन लशींवर वरचढ ठरले, तर हाहाकार उडू शकतो असा इशारा आरोग्यतज्ज्ञ आजही देताहेत. शिवाय लशीपेक्षाही मुखपट्टी अधिक परिणामकारक, या साध्या नियमवजा इशाऱ्याकडे तर सर्रास दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे १० कोटी हा निव्वळ एक टप्पा आहे. ते शिखर नव्हे याचे भान राखणे केव्हाही हितकारक.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Worst hit of the corona virus maharashtra stage of covid preventive vaccines akp

ताज्या बातम्या