ग्रीसचे धडे – २

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गिरीश कुबेर

ग्रीकांचं शरीरसौष्ठव-प्रेम केवळ पुतळय़ांपुरतं नाही. आजही ते दिसतं आणि पार इतिहासाशी जाऊन भिडतं.. व्यायामाशिवाय शरीर कमावता येणं अशक्यच; पण हा इतिहास मात्र शरीरासोबत बुद्धीच्याही व्यायामाचा..

  पॅरिसमधलं लूव्र किंवा व्हिएन्नातलं आर्ट हिस्टरी म्युझियम किंवा अंथेन्समधलं अ‍ॅक्रोपोलीस संग्रहालय पाहताना मानवी देहाकाराबाबत दोन गोष्टी नजरेत भरल्याखेरीज राहात नाहीत. पुरुषदेहाचं सौष्ठव आणि स्त्री देहाची गोलाई. डेव्हिड, अपोलो, हक्र्युलिस, स्पार्टाकस, मक्र्युरी वगैरे इतकंच नाही तर अगदी त्यांच्यातले गुलामांचे देहसुद्धा सुडौल. त्यातही इतिहासातले ग्रीक पुरुष म्हणजे मदनबाणच. छान व्यायाम करून शरीर कमावलेले. दंडात बेटकुळी. मांडय़ांचे स्नायू चांगले वर आलेले आणि शिरा तटतटलेल्या. तसंच पोटऱ्यांचंही. घोटीव. या अशा वेशाला साजेसा केशसंभार. लांबसडक आणि कुरळे. ग्रीक पुरुष आणि भूमध्यसमुद्री देशातील स्त्रिया आजही निरोगी, निरामय सौंदर्याची परिमाणं मानली जातात. अर्थात ग्रीसचा विषय असल्यामुळे तूर्त फक्त पुरुषांविषयी.    

आजही जातिवंत ग्रीक पुरुष उंचापुरा असतो. रुंद खांदे. नाक सरळ. इतकं धारधार की कागद कापता यावा. घनदाट भुवया. आणि चेहरा पारोसा वाटावा असा दाढीच्या खुंटांना वागवणारा. कसा ते लक्षात येत नसेल तर ‘वोल्व्होरीन’ साकारणारा ह्यू जॅकमन आठवून पाहा. तो ग्रीक आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पुरुष मॉडेल्स हे अशा ग्रीक चेहऱ्यांनी दिले. टणक पुरुषीपणा हे या सर्वाचं वैशिष्टय़. ‘टायटॅनिक’मधला केट विन्स्लेटचा राजिबडा नवरा बिली झेन हाही ग्रीक. हे असे पुरुष वयाने वाढले आणि रोज दाढी करायला लागले की इंग्लंडच्या विद्यमान राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्यासारखे दिसतात. तेही ग्रीक. महिलांबाबत तपशिलात शिरायचं नाही असा निर्धार असला तरी बेटी डेव्हिस किंवा ‘फ्रेंड्स’ ,‘मार्ले अँड मी’ वाली जेनिफर अ‍ॅनिस्टन या नावांचा मोह आवरत नाही. या ग्रीक. असो.

तर ग्रीक पुरुषांच्या या सुदृढतेचं रहस्य काय या एका प्रश्नाचा भुंगा अथेन्समध्ये पाय ठेवल्यापासून होता. एखाद्या घराण्यातले पुरुष निघाले असे राजिबडे तर तितकं काही वाटत नाही. पण एका देशात हे कसं काय असं असू शकतं हा खरा प्रश्न. त्यात प्राचीनकाळच्या या पुरुष आणि स्त्री प्रतिमा थेट नग्न आढळतात. स्त्रियांच्या देहावर एखादा कापडाचा एखादा चतकोर तुकडा. तोही लज्जारक्षणार्थ वगैरे म्हणता येणार नाही, असा. कारण लज्जा हा विषय असता तर इतकं सारं तरी कशाला उघडं टाकलं असतं? पण पुरुषांबाबत तेही नाही. सगळेच ‘तसे’. अगदी देवाधिदेवही. आता वर्तमानात हे असं नाही, हे खरंय (आणि बरंयही). पण तरी ग्रीक पुरुषांचं दिसणं पाहून प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

या भटकंतीत त्याचं उत्तर मिळालं. 

अथेन्समध्ये भर दुपारी, उन्हातला बोचरा थंड वारा आणि जडावलेला देह घेऊन आम्ही हातात मोबाइलवरच्या गूगल मॅप्सच्या आधारे एक पत्ता शोधत होतो. असं काही अनवट स्थळ शोधायचं असेल तर स्थानिक ‘ट्रॅव्हल एजंट टाइपां’ना अजिबात विचारायचं नाही हा स्वत:च स्वत:वर लादलेला नियम. कारण आपल्याला काय हवंय यापेक्षा त्यांना काय विकायचंय हे या एजंटांसाठी जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपलं आपण शोधत जाणं चांगलं. (आणि पुलं म्हणाले तसं ‘‘मला पत्ता शोधायला अजिबात लाज वाटत नाही. कारण लाज वाटेल असा पत्ता शोधायची वेळ माझ्यावर आलेली नाही’’. असो) तर अथेन्समध्ये या पत्त्याचा शोध सुरू होता. थोडय़ा वेळानं गूगल सांगू लागलं युवर डेस्टिनेशन हॅज अराइव्हड. पण तिथे काहीच दिसेना. समोर एक छोटं चर्च होतं. तिथे गेलो. आत सगळा शुभमंगल माहोल. पंगतीची तयारी सुरू होती. आम्ही असे दिसण्यापासून त्या गर्दीत वेगळे. त्यातल्या एकाला लक्षात आलं, आम्ही चुकून तिथे आलो असल्याचं. तो बोलू आला. पण त्याची इंग्रजीची आणि आमची ग्रीकची समान बोंब. शेवटी गूगलवर काय शोधतोय ते त्याला दाखवलं. ग्रीक भाषेत  ‘अरेच्चा’, ‘च्या मारी’सदृश काही तो चित्कारला आणि पलीकडे त्यानं बोट दाखवलं. म्हणजे गूगलचं बरोबर होतं. फक्त प्रवेशद्वाराची दिशा चुकली होती. पलीकडच्या बाजूनं प्रवेश होता. पुन्हा एक वळसा.

तो घालून आत गेलो तर समोर एक मैदान. पीडब्ल्यूडीच्या लोकांनी खणल्यासारखं. मध्येच विटांचे उंचवटे. तेही अर्धे पडके. दोन-चार आखीव खड्डे. त्याच्या कडेनं काही पायऱ्या वगैरे. या सर्वाभोवती कुंपण. कोणीही ते ओलांडून आत जाऊ नये यासाठी सुरक्षा. हे सर्व वरवर पाहिलं की सर्वसाधारण प्रतिक्रिया अशीच असेल: यात काय एवढं? ते दोन कोपऱ्यांवर स्टीलच्या कोरीव, नोटीस बोर्डासारख्या फलकांवर नोंदलेलं..

ते होते ग्रीसमधल्या पहिल्या जिम्नॅशियमचे भग्नावशेष. ती कधी वसवली गेली होती? इसवी सनाच्या आधी सहाव्या शतकात. अथेन्स शहराच्या मध्यवर्ती परिघाबाहेर एक परिसर आहे. तिथे नदी, माफक जंगल अशा वातावरणात त्या काळी ही व्यायामशाळा स्थापन झालेली. तिचा खर्च शहराचं व्यवस्थापन करायचं. म्हणजे नगरपालिका वगैरे. त्यात गरम पाण्याची व्यवस्था, कुस्ती, बॉक्सिंग, भारोत्तोलन वगैरेचं प्रशिक्षण देणारे स्वतंत्र कक्ष. त्यातल्या अध्यापकांचा खर्चही प्रशासनाचाच. तिथल्या विद्यार्थ्यांच्या खुराकाची व्यवस्था वगैरेही शहराकडेच. हेही एक वेळ ठीक. अंगावर काटा आला तो पुढचा नियम वाचून. 

शहरातल्या विद्वान, साहित्यिक, कवी, तत्त्ववेत्ता अशांतल्या कोणाकडे या व्यायामशाळेची जबाबदारी सोपवली जायची. शरीरं घोटवता घोटवता पोरांच्या मनांची मशागतही अशा ठिकाणी व्हायला हवी, हा त्यातला विचार. त्यामुळे सर्वाचा प्रयत्न असायचा की या व्यायामशाळा जेव्हा मुलं व्यायाम करत नसतील तेव्हा काव्यशास्त्रविनोदानंही ओसंडून वाहाव्यात. हेही काहीच नाही. अंगावरच्या काटय़ाचं रूपांतर गदगदलेपणात झालं.. पुढचा तपशील वाचला तेव्हा.. 

जिथे आम्ही उभे होतो त्या व्यायामशाळेचं प्रमुखपद भूषवलं होतं साक्षात अ‍ॅरिस्टॉटल यानं. अ‍ॅरिस्टॉटलचे वडील त्या काळचे वैद्यक. पण तरी कवितेबिवितेत त्यांना रस होता. पोराला त्यांनी तीन गोष्टी शिकवल्या. व्यायाम करणं, संगीत ऐकणं आणि होमरचं महाकाव्य इलियड. मग वयाच्या १७ व्या वर्षी रसरशीत अ‍ॅरिस्टॉटल दाखल झाला अथेन्समधल्या शाळेत. म्हणजे आम्ही जिथे उभे होतो त्या ठिकाणी. व्यायामशाळेच्या परिसरातल्या या शाळेचा इसवीसनपूर्व चौथ्या शतकातला संस्थापक कोण? तर प्लेटो. शाळेचं नाव : अकादेमिया. नंतर इसवीसन पूर्व ३४३-३४२ साली अ‍ॅरिस्टॉटल याला मॅसिडोनियाचा राजा फिलीप यानं बोलावून घेतलं. आपल्या मुलाला शिकवण्यासाठी. फिलिपचा हा मुलगा म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट. या छोटय़ा अलेक्झांडरचं शरीर आणि मन घडवलं अ‍ॅरिस्टॉटलनी. नंतर हा राजा मोठा झाला. मोहिमांवर जायला लागला. 

तेव्हा अ‍ॅरिस्टॉटल पुन्हा अथेन्सला परतला आणि त्यानं स्वत:ची शाळा काढली. ती ही व्यायामशाळा. तिथे व्यायामशाळेत पोरं घुमायला लागायच्या आधी भल्या सकाळी अ‍ॅरिस्टॉटल त्यातल्या काहींना घेऊन परिसरात फेरफटका मारायचा. हेतू हा की जनसामान्यांना आपल्याशी चर्चा करून विविध विषयांचं शंकानिरसन करता यावं! संध्याकाळी हेच. फरक इतकाच की सकाळ जनसामान्यांसाठी होती तर संध्याकाळ विद्वान, अभ्यासक यांच्यासाठी राखीव. अ‍ॅरिस्टॉटल ग्रंथप्रेमी होता. आपल्या पुस्तकांचं त्यानं वाचनालय सुरू केलं तिथं. हे प्राचीन जगातलं पहिलं वाचनालय. ते इतकं उत्तम होतं की त्याच्या धर्तीवर अलेक्झांडरनं इजिप्तमधल्या अलेक्झांड्रियात नंतर भव्य वाचनालय उभारलं. तर आम्ही उभे होतो त्या जागेवर अ‍ॅरिस्टॉटलनं कशाकशाचा अभ्यास केला आणि  कोणकोणत्या विषयावर पुस्तकं लिहिली/ जमवली जी आजही संदर्भ  म्हणून वापरली जातात..  विश्वाची उत्पत्ती (कॉस्मॉलॉजी), तर्कशास्त्र (लॉजिक),  नैतिकता (मोरॅलिटी), भौतिकशास्त्र (फिजिक्स), अधिभौतिकशास्त्र (मेटाफिजिक्स) आणि काव्य-सौंदर्यशास्त्र (पोएटिक्स).. 

बौद्धिक इतिहासाचं हे शारीर दर्शन भारावून टाकणारं होतं. अशा भारावलेपणात तोंडातनं शब्द निघत नाही. काय बोलणार? तिथून बाहेर पडेपर्यंत पाच वाजले संध्याकाळचे. भारतात इकडे साडेसाताची वेळ. वर्तमानपत्राच्या कार्यालयात तर ऐन धामधुमीची ! कार्यालयातल्या सहकाऱ्याचा फोन आला.. इकडे हनुमान चालिसावरून काही गडबड झाल्याचं सांगणारा! कशाकशाचा व्यायाम करायला हवा.. हा एक प्रश्नच आहे.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

मराठीतील सर्व अन्यथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anyatha author girish kuber need exercise bodybuilding without exercise body earning history intellect exercise ysh
First published on: 04-06-2022 at 04:45 IST