गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com
@girishkuber

आपले समव्यावसायिक निरीक्षणांविषयी, प्रयोगांविषयी इतके अशास्त्रीय कसे, असा प्रश्न डॉ. इग्नाझ यांना पडला. जे काही चाललंय ते मंजूर नव्हतं म्हणून अस्वस्थ आणि सुरक्षारक्षकांच्या मारहाणीमुळे अशक्त, अशा अवस्थेतच त्यांनी प्राण सोडला..

arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
High Court
अपंगांसाठीचे कायदे पुस्तकापुरते मर्यादित ठेवू नका, दृष्टीहीन महिलेला रेल्वेतील नोकरीबाबत दिलासा देताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

साधारण १५५ वर्षांपूर्वीच्या या मरणाचं आज कोणालाच काही वाटणार नाही. ज्याच्या मरणाविषयी बोलायचंय त्या व्यक्तीचं नाव इग्नाझ सेमेलवेस (Ignaz Semmelweis) होतं असं सांगितलं तरीही काही कळणार नाही. कारण या नावाची व्यक्ती फार प्रसिद्ध होती असंही नाही. पण तरीही या व्यक्तीचं स्मरण सध्याच्या या भीतीदायक वातावरणात करायलाच हवं. फार वाईट मरण आलं या इग्नाझ यांना.

१३ ऑगस्ट १८६५ या दिवशीची ही घटना. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथल्या मनोरुग्णांच्या वसतिगृहात त्यांचं निधन झालं. आसपासच्यांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. पण उपचाराची संधीच मिळाली नाही. ते मूळचे आताच्या हंगेरीतल्या पेस्ट या गावातले. बुडापेस्टमधलं पेस्ट. तिथं त्यांचं पार्थिव मग नेलं गेलं. पण गावातही कोणी त्यांची वाट पाहात होतं असं नाही. सर्वानीच त्यांना वेडं ठरवलं होतं. त्यामुळे फारसे कोणी त्यांच्या अंत्ययात्रेलाही गेले नाहीत. १५ ऑगस्ट या दिवशी त्यांच्या अस्वस्थ आणि अशक्त कुडीला मूठमाती दिली गेली. अस्वस्थ होते ते कारण जे काही चाललंय ते त्यांना मंजूर नव्हतं आणि अशक्त होते ते कारण रुग्णालयात सुरक्षारक्षक त्यांना मारहाण करायचे. ते मारहाण करायचे कारण इग्नाझ यांना रुग्णालयातून बाहेर जायचं असायचं. त्यांचं म्हणणं इतकंच होतं की मी वेडा नाही. पण सुरक्षारक्षकांना त्याची सवय होती. कारण मनोरुग्णालयातल्या प्रत्येकालाच तसं वाटत असतं.. मी वेडा नाही.

फरक इतकाच की इग्नाझ खरोखरच तसे नव्हते. ते डॉक्टर होते. चांगले स्त्रीरोगतज्ज्ञ. आता त्या काळी स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणजे काय मोठीच गोष्ट म्हणायची. मुळात डॉक्टर कमीच त्या काळी. त्यात हे विशेषज्ञ. त्यातही परत कुठे? तर व्हिएन्ना सरकारी रुग्णालयात. त्या रुग्णालयात महिलांच्या आजारांचे हे तज्ज्ञ. समाजात चांगला मान होता त्यांना. पण त्यांच्यावर नाराज होते आणि असायचे ते डॉक्टर. त्याला कारणही तसंच होतं.

या इग्नाझ यांच्या ध्यानात त्या वेळी एक गोष्ट आली. ती अशी की त्या वेळी व्हिएन्नातल्या महिलांना सरकारी रुग्णालयांत प्रसूत करून घेणं नको असायचं. फारच विरोध असायचा त्यांचा या रुग्णालयाला. त्यापेक्षा जुन्याजाणत्या सुईणी, दाई या महिलांना जवळच्या आणि खात्रीशीर वाटायच्या. या शहरातील एखादी महिला गर्भार राहिली रे राहिली की ती या सुईणींच्या शोधाला लागायची. कंत्राट करून बांधून ठेवलं जायचं या ज्येष्ठ सुईणींना. पण काहीही झालं तरी सरकारी रुग्णालयात पाय टाकायचा नाही, असा या महिलांचा निग्रह असायचा. त्यांचे नवरे, पालकही त्यांच्या या वेगळ्या हट्टास पाठिंबा द्यायचे. हा हट्ट इतका टोकाचा होता की तशीच वेळ आली तर या महिला घरातल्या कोणा ज्येष्ठ महिलेच्या साक्षीनं बाळंतपण करायच्या. पण सरकारी रुग्णालयात पाऊल टाकायच्या नाहीत.

डॉ. इग्नास यांना ‘असं का’ हा प्रश्न पडला. ही त्यांची पहिली चूक आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी शोधलं ही दुसरी चूक.

या शोधयात्रेत त्यांना लक्षात आलं की महिलांचा सरकारी रुग्णालयातल्या बाळंतपणास विरोध आहे कारण या रुग्णालयात प्रसूती झाल्या झाल्या नवजात अर्भकांचे प्राण जाण्याचं प्रमाण खूप होतं. जन्मल्यानंतर या रुग्णालयातून सुखरूपपणे आपापल्या घरी गेलेली बाळं आणि बाळंतिणी या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच. पण रुग्णालयातच प्राण सोडणाऱ्या बालकांची संख्या मात्र प्रचंड. हे लक्षात आल्यावर डॉ. इग्नास यांनी त्या पारंपरिक सुईणींच्या पद्धतीचा अभ्यास केला. त्याचे निकाल धक्कादायक होते. चांगल्या सुविद्य, सुप्रशिक्षित वैद्यकापेक्षा व्हिएन्नातल्या महिला या सुईणींहाती बाळंतपण करणं का पसंत करतात याचंही उत्तर त्यात आढळलं. या पारंपरिक दाईंहातच्या बाळंतपणातून सुखरूप वाचलेल्या बाळांचं प्रमाण जवळपास शंभर टक्के इतकं होतं.

हे धक्कादायक म्हणायचं. का होत असेल असं? डॉ. इग्नाझ यांनी पुन्हा शोध सुरू केला. हातचं काम सोडून ते ही पाहणी करत बसायचे. पुरेसा अभ्यास झाल्यानंतर त्यांचे याबाबत काही निष्कर्ष तयार झाले. ते त्यांनी आसपासच्या सहव्यावसायिकांना सांगितले. पण त्यांना काही असं वाटतं नव्हतं. ते सर्व डॉक्टर यांचं काहीही ऐकायला तयार नव्हते. आपलं काही चुकतंय हे त्यांना पटणं अशक्यच होतं. डॉ. इग्नाझ सांगत होते जिवाच्या आकांतानं. पण कोणीही त्यांना गांभीर्यानं घेत नव्हता. तरीही त्यांनी आपला हट्ट सुरूच ठेवला. हळूहळू काहींना हा मुद्दा पटला. ज्यांना पटला त्यांनी डॉ. इग्नाझ यांचा सल्ला पाळायला सुरुवात केली. त्यांनाही जाणवलं मग. डॉ. इग्नाझ यांचा सल्ला ऐकला तर बाळंतपणात अर्भकं मरत नाहीत. त्यांनी डॉ. इग्नाझ यांना पािठबा दिला. पण जाहीर नाही. कारण डॉ. इग्नाझ यांना विरोध करणाऱ्यांची संख्या मोठी होती. या विरोध करणाऱ्यांचं म्हणणं होतं की डॉ. इग्नाझ यांच्या पाहणीचे शास्त्रीय निष्कर्ष काही प्रकाशित झालेले नाहीत. ते जे काही सांगतायत ती त्यांची प्राथमिक पाहणीतली अनुमानं आहेत आणि त्यांना महत्त्व द्यायचं तरी किती?

मग डॉ. इग्नाझ यांनी आपल्या पाहणीतली निरीक्षणं नोंदवायला सुरुवात केली. त्यावर आधारित पुस्तकही त्यांनी प्रकाशित केलं मग. The Etiology, Concept and Prophylaxis of Childbed Fever हे असं भारदस्त नावाचं पुस्तक डॉ. इग्नाझ यांचं. ते प्रकाशित झालं १८६१ साली. त्याआधी साधारण दहाएक वर्ष त्यांनी आपली निरीक्षणं नोंदवली होती. म्हणजे हे पुस्तक हे त्यांच्या दशकभराच्या अनुभवावर आधारित होतं.

पण ते प्रकाशित झाल्यावर डॉ. इग्नाझ यांच्यावर अशी काही सडकून टीका झाली की विचारायची सोय नाही आणि ती करणारे प्राधान्याने होते ते डॉक्टरच. त्यांनी या पुस्तकाचे आणि डॉ. इग्नाझ यांचे इतके वाभाडे काढले की ते पुस्तक आणि पर्यायाने डॉ. इग्नाझ हे मोडीतच निघाले. आपले समव्यावसायिक निरीक्षणांविषयी, प्रयोगांविषयी इतके अशास्त्रीय कसे, असा प्रश्न डॉ. इग्नाझ यांना पडला. खूप निराश झाले ते. काय करावं हे कळेना. पण तरी त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. पण तसं करणं हे पाण्यात राहून माशाशी वैर करण्यासारखं होतं. त्यांनी ते केलंही काही काळ. पण हे ‘मासे’ मग फारच विरोध करायला लागले. प्रकरण हाताबाहेर गेलं. शेवटी या सगळ्यांनी डॉ. इग्नाझ यांना वेडं ठरवलं आणि मनोरुग्णालयात डांबलं. तिथंच त्यांचा शेवट झाला हे सुरुवातीलाच सांगितलंय.

पण प्रश्न असा की या डॉ. इग्नाझ यांचं नक्की ‘पाप’ तरी काय?

हात धुण्याची गरज व्यक्त करणारा हा पहिला डॉक्टर.

आज एकविसाव्या शतकात हे असं काही सांगायला लागलं असेल कोणाला हे खरंही वाटणार नाही. पण डॉक्टरांनीच नव्हे तर सर्वसामान्यांनीही सारखे हात धुवायला हवेत, हा आग्रह डॉ. इग्नाझ यांनी पहिल्यांदा धरला. व्हिएन्ना रुग्णालयात काय पण कुठेच त्या वेळी ही पद्धत नव्हती. व्हिएन्ना रुग्णालयात तर सूतिकागृहालाच लागून देहविच्छेदन व्हायचं. डॉक्टर तिथनंच यायचे आणि थेट बाळंतपण करायचे. त्यामुळे काय होत होतं ते उघड आहे. अलीकडचा शब्द वापरायचा तर ‘हायजीन’ ही संकल्पना डॉ. इग्नाझ यांनी आणली.. स्वत:च्या प्राणांची किंमत मोजून!

सध्याच्या करोना हलकल्लोळात कानीकपाळी ओरडून सांगितलं जातंय.. हात धुवा.. हात धुवा..! आता डॉ. इग्नाझ यांच्या कामाचा मोठेपणा लक्षात येईल. हल्ली १५ ऑक्टोबरला ‘जागतिक हात धुणे दिन’ साजरा केला जातो. त्या दिवशी तरी हात धुताना आपण डॉ. इग्नाझ यांचं ‘हस्तप्रक्षालनार्थे’ स्मरण करायला हवं..