|| गिरीश कुबेर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्यावर १५० वर्षे राज्य करूनही ब्रिटन हा देश लोकशाही कशी राबवावी हे काही आपल्याकडून शिकला नाही. पंतप्रधान एकदा खोटं बोलले म्हणून कुणी त्यांची चक्क पोलीस चौकशी करतं का…?

पहिला : तुमच्या सचिवानं त्या दिवशीच्या पार्टीची निमंत्रणं पाठवलेली होती…

दुसरा : हा व्यापक चौकशीचा भाग आहे…

पहिला : आम्ही चौकशी केली आहे… आणि त्याचा सर्व तपशील स्पष्ट काय तो सांगणारा आहे. २० मे २०२० या दिवशी समस्त देश टाळेबंदीत होता. तुमच्या मंत्र्यानेच सर्व देशाला त्या दिवशी करोना नियमावली पाळण्याची जाणीव करून दिली होती. मोकळ्या जागेत त्या वेळी प्रत्येकाला फार फार तर एका माणसाला भेटायची परवानगी होती. आणि तरी तुम्ही जमलात. त्यामुळे तुम्ही जे काही केलंत ते सरकारने घालून दिलेल्या आरोग्य नियमांचंच उल्लंघन नाही का…?

दुसरा : मला जे काही माहितीये त्यानुसार सर्वांकडून नियमांचं पालनच झालेलं आहे… यात नियमांचा भंग झाल्याचा आरोप कोणी केला आणि तो सिद्ध झाला तर संबंधितांवर जरूर कारवाई होईल.

पहिला : तसा आरोप झालेला आहे, तशी तक्रारही झालेली आहे आणि सरकारी नियमांचा भंग झाला हेदेखील सिद्ध होत आहे. हा नियमभंग केल्याचं तुम्हाला मान्य आहे की नाही?

दुसरा :  हे सर्व नुसते आरोप आहेत आणि त्याची रीतसर चौकशी सुरू आहे.

पहिला : त्या टाळेबंदीच्या काळात अनेकांना आपल्या आप्तेष्टांची लग्नं रद्द करावी लागली. अनेकांना आपल्या जिवलगास अखेरचा निरोपही देता आला नाही. कुटुंबच्या कुटुंबं दुभंगली. लोकांना अतोनात त्रास झाला. पण तुम्हाला यातलं काहीही भोगावं लागलं नाही. तुम्ही मौज करत होतात.

दुसरा : हे सर्व सिद्ध व्हायचंय…

पहिला : पण यातून दिसतंय ते असं की सामान्य जनतेला एक नियम आणि तुम्हाला दुसरा अशी काही व्यवस्था आपल्या देशात आहे का? यातून खरं तर ‘आम्हाला कोणतेही नियम लागू नाहीत’ असाच तुमचा उद्दाम दृष्टिकोन दिसून येतो… तुमच्या वर्तनाविषयी तुम्हाला काही खंत आहे का?

दुसरा : जे काही झालं तो सर्व कामाचाच भाग होता… तांत्रिकदृष्ट्या त्यात सर्व करोना नियमांचं पालन झालं, असाच माझा समज आहे.

पहिला : कामाचा भाग? हे असं कामासाठी तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना नेहमीच बोलावता का?

दुसरा: …आता मागे वळून पाहताना असं वाटतंय की मी त्या वेळी सर्वांना असं एकत्र आणायला नको होतं…

ही प्रश्नोत्तरं अशीच सुरू राहतात आणि अखेरीस यातला दुसरा आपली चूक झाली ‘असावी’ असं मान्य करतो. 

हा दुसरा म्हणजे एके काळी अमेरिकेपेक्षाही अधिक प्रभावी, बलाढ्य असलेल्या ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि पहिला म्हणजे तीन पोलीस अधिकारी. हे तीन पोलीस पंतप्रधानांची उलट तपासणी घेतायत आणि तुम्ही तुमच्याच सरकारचे नियम मोडलेत, असं त्यांना सुनावतायत. आणि पंतप्रधान खजील होताना दिसतायत. हे सारं सारं अद्भुत आणि अविस्मरणीय. पण यातलं काहीही काल्पनिक नाही.

करोनाकालीन नियमांचा भंग केला म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या सुरू असलेल्या चौकशीचा प्रसिद्ध झालेला हा वृत्तान्त आहे. पण मुद्दा असा की पंतप्रधानांनी करोना-कालीन नियमांचा भंग केला म्हणजे काय?  तर जॉन्सन यांनी आपल्या कार्यालयातल्या सर्वांना २० मे २०२० या दिवशी संध्याकाळी ‘१० डार्ऊंनग स्ट्रीट’ या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी बोलावलं. त्यांच्या कार्यालयाकडनं त्याची निमंत्रणं दिली गेली. या ‘बैठकी’चा खाण्यापिण्याचा खर्च पंतप्रधानांच्या कार्यालयानं केला का? तर तसंही नाही ! या निमंत्रणात पंतप्रधानांच्या कार्यालयानं स्पष्टपणे लिहिलं होतं : येताना प्रत्येकानं आपापलं मद्य घेऊन यावं ! म्हणजे पंतप्रधानांनी करोनाकाळात दारू पाजली असाही त्याचा अर्थ होत नाही. पण मग या विषयावर इतका गदारोळ होण्याचं कारण काय? भेटले पंतप्रधान जॉन्सन आपल्या कर्मचाऱ्यांना एकत्र तर त्यात काय एवढं? देशासमोर इतके भव्य प्रश्न असताना लाखांच्या र्पोंशद्यानं केला असा किरकोळ नियमभंग तर त्यासाठी त्याचा राजीनामा मागायचा म्हणजे हद्दच झाली. कागदोपत्री पाहू गेलं तर नियम मोडला त्यांनी हे मान्यच. पण देशाचा सर्वोच्च नेता, इतक्या बहुमतानं लोकांनी निवडून दिलेल्या पक्षाचा प्रमुख नेता, साक्षात पंतप्रधान ! त्याला इतके इतरांसाठीचे नियम कसे काय लागू होणार? काही तरी सवलत असेलच ना त्यांना…! निदान या प्रकरणात विरोधकांवर खापर फोडण्याचा, पराचा कावळा केला असं म्हणण्याचा पर्याय आहेच की त्यांना!! नाही तर विरोधकांनीही कधी पूर्वी असा नियमभंग केला होता, हेही शोधता येईल. म्हणजे अशी फिट्टंफाट झाली की या प्रकरणावर पडदा टाकता येईल. पण तसं काही होताना दिसत नाही. कारण यात मूळ मुद्दा पंतप्रधानांनी नियम मोडला किंवा नाही, इतक्यापुरताच मर्यादित नाही.

पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्याविरोधात इतका क्षोभ दाटून येण्याचं खरं कारण आहे की ते खोटं बोलले, हे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी करोना-कालात पार्टी झाल्याची बातमी जेव्हा छायाचित्रासह ‘द गार्डियन’नं प्रकाशित केली तेव्हा प्रथम पंतप्रधानांच्या कार्यालयानं नाकारली. असं काही झालंच नाही, असं ते म्हणाले. पण जेव्हा माध्यमांनी जोर लावला तेव्हा ‘‘झालं असेल बहुधा असं काही… पण माझा काही संबंध नाही’’ असा बचाव त्यांनी केला. पण पंतप्रधानांचं तिथलं छायाचित्रच प्रकाशित केलं गेलं… तेव्हा जॉन्सन म्हणाले… ‘‘हां… गेलो होतो मी काही काळ. पण तो काही पंतप्रधानांच्या कार्यालयाचा कार्यक्रम नव्हता. सगळे आपले जमले सहज योगायोगानं!’’ मग माध्यमांनी त्यांच्या कार्यालयानं धाडलेलं निमंत्रणच छापलं. त्यात हे लिहिलं होतं… आपापलं मद्य घेऊन या, असं. मग मात्र जॉन्सन यांचा नाइलाज झाला. त्यांना मान्य करावं लागलं, ही अशी पार्टी झडली आणि मी तीत होतो.

मुद्दा पार्लमेंटमध्ये गाजला. सर्वांच्या टीकेचा रोख पार्टी झाली यापेक्षा तिच्याबाबत पंतप्रधान खोटं बोलले हा होता. आणि अजूनही तोच आहे. ‘द इकॉनॉमिस्ट’नं स्वत:च्या देशाच्या पंतप्रधानांची संभावना ‘खोटारडा’ अशी केलीये. वातावरण इतकं तापलंय की या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय झालाय. ही चौकशी दुहेरी असेल. एका बाजूनं गुन्हा घडला किंवा काय या अंगानं पोलीस त्याचा तपास करतील आणि दुसरीकडून सु ग्रे यांच्याकडून चौकशी होईल. या सु ग्रे या साध्या अधिकारी आहेत. प्रशासकीय म्हणता येतील अशा. सेवेत ज्येष्ठ आहेत. पंतप्रधानांच्या कार्यालयात काम करण्याचा त्यांचा बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. आता थेट पंतप्रधानांची, त्यांच्या वर्तनाची त्या चौकशी करणार आणि मुख्य म्हणजे एका य:कश्चित अधिकाऱ्याकडून सर्वोच्च पदावरील व्यक्ती स्वत:ची चौकशी करून घेणार. त्याहून कहर म्हणजे सत्ताधारी पक्षांकडून यावर हूं नाही की चूं नाही. आपल्या सर्वोच्च नेत्याची चौकशी होणार तर ती थांबवण्याचा प्रयत्नही पंतप्रधानांच्या सत्ताधारी पक्षानं करू नये, म्हणजे लोकशाही फारच हाताबाहेर चाललीये म्हणायची. आवरायला हवं तिला.

या ब्रिटननं राज्य केलं आपल्यावर. पण लोकशाही कशी आवरायची ते त्यांना नाही कळलं. आपण त्यांच्याकडून काय घेतलं हा प्रश्न असेल. पण ब्रिटननं आपल्याकडून काहीच कसं घेतलं नाही, हा यातला खरा प्रश्न आहे. परिस्थिती तिकडे अशी की प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना पायउतार व्हावं लागेल.

खोटं बोलण्याची ही शिक्षा. मोनिका लुइन्स्की प्रकरणात या ‘प्रकरणा’पेक्षा खोटं बोलणं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याही अंगाशी आलं होतं.

असं आपल्याकडे काय, हे नको शोधायला. आपण म. म. देशपांडे यांच्या कवितेतल्या या ओळीच  ‘आपल्या’ म्हणाव्या… ‘एका साध्या सत्यासाठी, देता यावे पंचप्राण… ’

girish.kuber@expressindia.com

      @girishkuber

मराठीतील सर्व अन्यथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Britain is a democracy all countries lockdown prime minister spoke police interrogation akp
First published on: 29-01-2022 at 00:10 IST