|| गिरीश कुबेर
२०१२ पासून भारतानं जगाला ४४ ग्रँडमास्टर्स दिलेत. पण आजतागायत या खेळाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये नव्हता!

नुकतंच संपलेलं ऑलिम्पिक, त्यात भारताची कामगिरी आणि त्या कामगिरीची समीक्षा या सगळ्याबद्दल श्री क्ष हे प्रसारमाध्यमांवर खूपच रागावले आहेत. क्ष इथे नसतात. अमेरिकेत व्हॅलीत राहतात ते. अलीकडे ग्रीनकार्डही मिळालंय त्यांना. त्या काळात खूप काळजीत होते ते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रप्रेमी धोरणांमुळे आपलं ग्रीनकार्ड हुकतंय की काय अशी चिंता त्यांना होती. पण तसं काही झालं नाही. ते मिळालं. आता क्ष आणि त्यांच्या दोन मराठी आडनावांच्या इंग्रजी मुलांना भारतात यावं लागणार नाही म्हणून ते खूश आहेत. खरं तर मुलांचा प्रश्नच नव्हता. ती त्या भूमीतच जन्माला येतील असंच ‘नियोजन’ होतं त्यांचं. त्यामुळे त्यांच्या नागरिकत्वाचा काही मुद्दाच नव्हता. आपली मुलं खूप संस्कारी आहेत, त्यांना परवचा पाठ आहेत, गेल्या वर्षी मुंज झाली (तीही तिकडेच) तेव्हा त्यांची घोड्यावरनं भिक्षावळ काढली होती, याचं कोण कौतुक आहे त्यांना. या क्ष यांचं मायदेशावर खूपच प्रेम आहे. आपल्याला किती अभिमान आहे आपल्या जन्मभूमीचा हे आपल्या कर्मभूमीत (पक्षी : अमेरिकेत) सांगण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. अर्थात मूठभर डॉलर महिन्याला घरी पाठवून पसाभर भारतीय रुपये खर्चणाऱ्या क्ष यांचं कर्तृत्व हा काही आजचा विषय नाही.

तर ऑलिम्पिकच्या निमित्तानं या कर्तृत्वमापनाचे पाश्चात्त्य निकष हा आजचा मुद्दा आहे. म्हणजे भारतीय माध्यमांनी आपल्या महान ऑलिम्पिक कामगिरीचं रास्त मूल्यमापन केलं नाही, असं काही क्ष यांचं म्हणणं नाही. त्यांचा मुद्दा त्याच्या पलीकडचा आहे. म्हणजे ऑलिम्पिकची महानता आपण मान्यच का करायची हा त्यांचा मुद्दा आहे. रक्तदाब अमुकच हवा, रक्तातील शर्करा इतकीच हवी, पर्यावरणात इतकाच प्राणवायू हवा इथपासून ते चलनवाढ, देशाची अर्थस्थिती वगैरे, आंतरराष्ट्रीय चलन म्हणून एकमेव अशा डॉलरचा मान, ऑलिम्पिक, कोणी तरी सैनिक हजारो वर्षांपूर्वी ४२ किमी की काय धावला म्हणून ती मॅरेथॉन, तिचं मोठेपण वगैरे इतरांनी का मान्य करायचं असं त्यांचे मूलभूत प्रश्न आहेत. बाकीच्या सर्व प्रश्नांची चर्चा शक्य नाही इथं. ती ऑलिम्पिकपुरतीच मर्यादित ठेवू या.

विचारलं त्यांना एकदा की तुम्हाला काय वाटतं : कबड्डी, हुतुतू, खोखो, लंगडी, लगोरी अशा खेळांचाही समावेश ऑलिम्पिकमध्ये असायला हवा का? ते हो म्हणतील या दहशतीनं मी देश, त्याची अर्थव्यवस्था, अन्य देशांवर राज्य केलं असेल तर त्याचा झालेला परिणाम आणि संस्कृती टिकण्यासाठीदेखील समृद्ध अर्थव्यवस्था कशी आवश्यक असते वगैरे युक्तिबाण म्यानात जमा करून ठेवले होते. सुदैवाने वेळ आली नाही. क्ष हेच पुढे म्हणाले : या खेळांचं जाऊ द्या पण आपल्या बुद्धिबळाचा तरी समावेश केला आहे का या लबाड पाश्चात्त्यांनी ऑलिम्पिकमध्ये? नाही करणार ते. कारण आपण सुवर्ण पटकावू ना? आज किती पोरं बुद्धिबळ खेळतायत आपल्याकडे? आपण महासत्ता आहोत महासत्ता बुद्धिबळातली. जगाला आपण हा खेळ दिलाय. पण तुम्हाला कौतुक नाही त्याचं कारण तो ऑलिम्पिकमध्ये नाही ना…! यानंतर बुद्धिबळ, महाभारत, सांगली, भाऊसाहेब पडसलगीकर वगैरे वगैरेंवर एक इतिहासाचं बौद्धिक झडलं.

नंतर म्हटलं खरं काय ते तपासू या तरी!

तर लक्षात आलं या क्ष यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. वर्तमानात हा खेळ आता भारतीयांचा वाटावा इतक्या मोठ्या प्रमाणावर  भारतीयांकडून तो खेळला जातोय. एक विश्वनाथन आनंद क्षितिजावर उगवला आणि घराघरांत बुद्धिबळांच्या पटांची खरेदी झाली. घराघरांतले सुपुत्र आणि सुकन्या यांच्यासाठी गणित, तबला (कन्या असेल तर भरतनाट्यम अथवा कथ्थक) यांच्या शिकवण्यांच्या बरोबरीनं आता बुद्धिबळाची शिकवणीही सुरू झाली. मोफत वायफायमुळे बुद्धिबळाच्या ऑनलाइनी सामन्यांकडेही अनेकांचं लक्ष गेलं. त्यात आपला नाशकाचा विदित गुजराती, भक्ती कुलकर्णी यांच्या यशामुळेही बुद्धिबळाच्या लोकप्रियतेचा भराभर गुणाकार होत गेला. त्यामुळे क्ष म्हणतात ते खरं आहे. अनेक अन्य क्षेत्रांप्रमाणे आपण बुद्धिबळात महासत्ता झालो कधी ते आपल्यालाही कळलंच नाही.

देशाचे माजी अर्थसल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी अलीकडेच एका सुंदर लेखातनं ही वस्तुस्थिती समोर आणलीये. गेल्या काही वर्षांत भारतानं या खेळात अमेरिका, चीन अशांना मागे टाकलंय आणि रशियासारख्या देशाला गाठलंय, असं सुब्रमणियन दाखवून देतात. म्हणजे २०१२ पासून भारतानं जगाला ४४ ग्रँडमास्टर्स दिलेत (आता यावर आपल्या क्षंना त्यांना ग्रँडमास्टर म्हणण्यावरही आक्षेप असेल. त्यांना महागुरू का नाही म्हणायचं असा त्यांचा प्रश्न असणार. ही उपाधी किती लहान झालीये हे त्यांना काय सांगणार? असो). तर याच काळात चीनसारख्या आपल्या बलाढ्य शत्रुदेशातून फक्त १८ ग्रँडमास्टर्स येऊ शकलेत. पाकिस्तानात तर एकही ग्रँडमास्टर नाही (ही तर आनंद गगनातून उतू जाईल अशी घटना) आणि चंगळवादी अमेरिकेतनं तर फक्त २२. म्हणजे आपल्या निम्मे! आपल्यापेक्षा रशिया फक्त एकानं पुढे आहे. ही मोठीच कर्तबगारी (संबंधितांनाही हे निश्चित माहीत नसणार. नाही तर… असो.).

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेकडून हा ग्रँडमास्टर हा किताब दिला जातो. काही निकष असतात त्यासाठी. त्याची पूर्तता करणारे ग्रँडमास्टर ठरतात. विश्वनाथन आनंद आता सर्वांनाच माहितीये. पण त्याआधी दिव्येंदु बरुआ, नंतर कोनेरू हम्पी, प्रवीण ठिपसे अभिजित कुंटे, निहाल सरीन वगैरे अशा निवडकांचा ग्रँडमास्टर किताबानं गौरव झालाय. ही बाब आणि त्यातही ही संख्या विशेष कौतुकाची कारण पहिल्यांदा एखादा भारतीय ग्रँडमास्टर ठरला १९८८ साली. त्यानंतर आजतागायत आपण इतक्या झपाट्यानं इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्रँडमास्टर तयार करू शकलो.

यात सुब्रमणियन दाखवून देतात त्याप्रमाणे कौतुकाची बाब अशी की यातले बरेचसे ग्रँडमास्टर हे जेमतेम विशीतले आहेत. आणि दुसरं म्हणजे हे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. महेंद्रसिंग धोनी हा जसा क्रिकेटमधल्या विकेंद्रीकरणाचं आणि लोकशाहीकरणाचं प्रतीक मानला जातो, तसं आहे हे. एरवी खेळांतही मुंबई/ दिल्ली/ कोलकाता/ चेन्नई/ बेंगळूरु अशा निवडक शहरांतल्या उच्चभ्रूंचा भरणा असायचा. आता तसं राहिलेलं नाही. बुद्धिबळात तर असं झालंच नाही. त्यामुळे हे लहान लहान गावांतनं, प्रादेशिक वातावरणातनं येणाऱ्या या नव्या ग्रँडमास्टर्सचं कौतुक.

ऐंशीच्या दशकात बुद्धिबळाच्या भारतीय क्षितिजावर विश्वनाथन आनंदचा तारा उगवला आणि जगज्जेतेपदाच्या ध्रुवावर जवळपास २५ वर्षं तो तळपत राहिला. यानंतर बुद्धिबळाची लोकप्रियता आपल्याकडे झपाट्याने वाढली असं सर्वच मानतात. हे असं होतं. नीरज चोप्रामुळे आता अनेकांना भाले फेकायची स्फूर्ती येताना दिसते, तसंच हे. त्यात संगणकीकरणाचा वाढता वेगही नवबुद्धिबळप्रेमींच्या पथ्यावर पडला. त्याची सॉफ्टवेअर्स, ऑनलाइन खेळण्याची सोय इत्यादींमुळेही या खेळाचा प्रसार व्हायला मदत झाली. त्यामुळे भारतीय ग्रँडमास्टर्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली.

त्याचमुळे या आपल्या क्ष यांचं मत असं की भारत हा बुद्धिबळाची महासत्ता आहे आणि ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश झाला तर आपलं सुवर्णपदक नक्की आहे…!

ही एक बाजू.

दुसरीही तितकीच महत्त्वाची. ती अशी की इतके डझनानं ग्रँडमास्टर्स आपल्याकडे होतायत पण जगातल्या पहिल्या दहांत त्यातला एकही नाही. आणि दुसरं याहून कडू सत्य असं की गेल्या आठ वर्षांत मॅग्नस कार्लसन याला हरवू शकेल असा एकही बुद्धिबळपटू आपल्याकडे निपजलेला नाही. आनंदला हरवून कार्लसन २०१३ साली जगज्जेता बनला. पण त्यानंतर त्याच्या विश्वविजेतेपदास एकाही भारतीयाकडून आव्हान निर्माण झालेलं नाही. सुब्रमणियन सांगतात त्यातलं आणखी एक सत्य अणकुचीदार आहे. ते म्हणजे या इतक्या ग्रँडमास्टर्समध्ये मुली/महिला फक्त दोन आहेत आणि दलित/अल्पसंख्य जवळपास नाहीतच. यापेक्षा कडक सत्य : या ग्रँडमास्टरांत उत्तरेकडल्या राज्यांतले, हिंदीभाषक त्याहूनही नगण्य.

आता हे वाचल्यावर क्ष यांना काय वाटेल हा प्रश्नच आहे. आणि २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये बुद्धिबळाचा समावेश करायचं चाललंय. तोपर्यंत आणखीही काही ग्रँडमास्टर्स वाढतील. विश्वविजेता होईल का हा प्रश्न. संख्या आणि गुणवत्ता यांचा काही संबंध असतोच असं नाही, हे आपल्या आसपासच्या असंख्य क्षंना २०२४ पर्यंत पटेल हे सत्य बहुधा.

girish.kuber@expressindia.com

      @girishkuber

Why was business women Truong My Lan sentenced to death for corruption in Vietnam
भ्रष्टाचाराबद्दल उद्योजिकेला थेट फाशीची शिक्षा… व्हिएतनाममधील घटनेने जगभर खळबळ का उडाली? तेथे मृत्युदंडाचे प्रमाण इतके अधिक का?

Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य

IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईकर शशांक ठरतोय पंजाब किंग्जचा तारणहार, जाणून घ्या त्याची आजवरची वाटचाल

baltimore
US Bridge Collapse: धोक्याची सूचना देणाऱ्या भारतीय खलाशांचे जो बायडेन यांनी मानले आभार