तशी प्रगतीच; पण…

लंडनमधला भारतीय मित्र बरोबर असणार होता.

|| गिरीश कुबेर

पाकिस्तानी पासपोर्ट धारकास फक्त ३१ देशांत विनाव्हिसा प्रवेश आहे तर आपल्याला ५८ देशांत. म्हणजे पाकिस्तानच्या जवळपास दुप्पट; ही सकारात्मक प्रगतीच…

यंदाचा हेन्ले निर्देशांक जाहीर झालाय.

त्याची बातमी आली, पाठोपाठ आपले गृहमंत्री अमित शहा यांच्या गोव्यातल्या भाषणाची बातमी आली आणि एक अनुभव आठवला. गोव्यातल्या ताळिगाव इथं भाषण करताना आपले गृहमंत्री म्हणाले : ‘‘हल्ली भारतीय पासपोर्ट पाहिला की देशोदेशींच्या विमानतळ अधिकाऱ्यांच्या चेहेऱ्यावर कसं स्मित झळकतं. देशात मोदी सरकार आल्यापासनं आपल्या पासपोर्टचा मान किती वाढलाय जगात…’’

तर अनुभव सांगायचाय तो काही वर्षांपूर्वीचा. युरोपमधल्या काही देशांचा दौरा होता. लंडनमधला भारतीय मित्र बरोबर असणार होता. तो लंडनला दौऱ्यात सहभागी झाला. पहिला मुक्काम होता बर्लिनला. विमानतळावर उतरलो तर सर्व सरकारी सोपस्कार त्याचे अवघ्या काही मिनिटांत उरकले आणि बाहेर तो वाट पाहात थांबला. मला मात्र तासभर लागला साधारण. माझा येण्याचा हेतू काय, नक्की परत जाणार आहे ना, खरोखरच काही कामं आहेत का, वगैरे प्रश्न त्या केबिनमधल्यानं विचारणं. मग माझ्याकडे आणि पासपोर्टवरच्या छायाचित्राकडे पाहाणं. मग निर्विकारपणे एक स्टॅम्प ठोकणं आणि ‘नेक्स्ट’चा पुकारा. तीनही-चारही ठिकाणी हाच अनुभव. आणि त्याच वेळी या मित्राचं विनासायास सर्व प्रक्रिया संपवून बाहेर निवांत धूर काढत वाट पाहाणं.

परत लंडन विमानतळावर येताना हा म्हणाला… काय फरक पडतो ना पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे यावरनं…

वास्तविक हा मित्रही भारतीयच. मुंबईचा मूळचा. पण बऱ्याच वर्षांपूर्वी लंडनला स्थलांतरित झाला आणि नंतर तर त्या देशाचा पासपोर्टही मिळाला त्याला. त्यानं तो काळपट लालसर रंगातला पासपोर्ट दाखवला की विनासायास सर्व सोपस्कार पूर्ण व्हायचे त्याचे.

परवा हेन्ले निर्देशांक जाहीर झाला आणि हा अनुभव आठवला. लंडनमधल्या स्थलांतर सल्लागार क्षेत्रातल्या या कंपनीकडनं दरवर्षी हा निर्देशांक जाहीर होतो. जवळपास २२५ देशांची प्रवासविदा (डेटा) लक्षात घेऊन हा निर्देशांक तयार केला जातो. प्रक्रिया अगदी पारदर्शी. म्हणजे एखाद्या देशातल्या नागरिकाला दुसऱ्या देशात व्हिसा अर्ज न करताही थेट प्रवेश दिला जात असेल तर १ गुण. मग व्हिसामुक्त प्रवेश, व्हिसा ऑन अरायव्हल वगैरे मार्गांनी प्रवेश असला तरी अशा पासपोर्टला एक गुण. त्याच वेळी प्रवासाआधी रीतसर अर्ज करून व्हिसा मिळवावा लागत असेल -भले तो मग इलेक्ट्रॉनिक का असेना- तर अशा पासपोर्टला शून्य गुण. म्हणजे प्रत्येक देशाचा पासपोर्ट घेऊन त्याची प्रत्येक देशाच्या प्रवेश प्रक्रियेशी तुलना करून प्रत्येक देशाच्या पासपोर्टला गुण दिले जातात. ‘इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन’ (आयएटीए) ही संघटना हे प्रवासाचे यमनियम वगैरे तपशील या निर्देशांकासाठी पुरवते. जगातल्या तब्बल २९० विमान कंपन्या या आयएटीए संघटनेच्या सदस्य आहेत. म्हणजे या वरनं या माहितीच्या सत्यासत्यतेची खात्री पटेल. ही सर्व माहिती गाळून, तिला वेगवेगळ्या चाळण्यांतनं चालवून मग हा निर्देशांक बनतो. त्यातनं मग समोर येतात जगातले ‘पॉवरफुल पासपोर्ट’.

आजच्या घडीला जगात असे सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहेत जपान आणि सिंगापूर या देशांचे. या दोन्हींपैकी कोणत्याही देशाचा नागरिक किंवा त्या देशांच्या पासपोर्टधाऱ्यास किती देशांत कोणत्याही व्हिसा प्रक्रियेशिवाय प्रवेश मिळतो? तब्बल १९२ इतक्या देशांत जपान वा सिंगापूरचे पासपोर्टधारी थेट जाऊ शकतात. व्हिसा वगैरेची झंझटच नाही. दुसऱ्या क्रमांकावर आहेत जर्मनी आणि दक्षिण कोरिया. त्यांना १९० देशांत असा सरळसोट प्रवेश आहे. फिनलंड, इटली, लग्झेम्बर्ग आणि स्पेन या जवळपास सर्व युरोपीय देशांतल्या नागरिकांना १८९ देशांत ही व्हिसामुक्त प्रवेशाची सोय आहे; ते सारे तिसऱ्या क्रमांकावर. ऑस्ट्रिया आणि डेन्मार्क आहेत १८८ देशांच्या मुभेसह चौथ्या क्रमांकावर. फ्रान्स, आयर्लंड, नेदरलँड, पोर्तुगाल, स्वीडन या सर्व युरोपीय देशांचा पासपोर्ट पाचव्या क्रमांकाचा शक्तिशाली आहे. त्यांना १८७ देशांत मुक्त प्रवेश आहे. बेल्जियम, न्यूझीलंड आणि स्वित्झर्लंड हे १८६ देशांत मुक्तद्वार असलेले सहाव्या क्रमांकावर. ब्रेग्झिटमुळे ब्रिटनचा क्रमांक घसरलाय. तो देश अमेरिका, चेक प्रजासत्ताक, माल्टा, नॉर्वे या देशांबरोबर सातव्या क्रमांकावर आहे. त्यांना १८५ देशांत व्हिसा लागत नाही. ऑस्ट्रेलिया, कॅनडा (१८४), हंगेरी (१८३), लिथुआनिया, पोलंड, स्लोवाकिया (१८२) हे अनुक्रमे आठ ते दहा क्रमांकावरचे देश.

म्हणजे पॉवरफुल पासपोर्टचे हे पहिल्या दहा क्रमांकातले देश. ते वाचताना आपण त्यात नाही, हे एव्हाना लक्षात आलंच असेल. मग यातला आपला क्रमांक कितवा?

आपला क्रमांक आहे ९०वा. आपल्याला फक्त ५८ देशांत विनाव्हिसा प्रवेश दिला जातो. आणि या क्रमांकावर आपण एकटे नाही. आपल्याबरोबर आहेत बुर्किना फासो आणि ताजिकिस्तान हे देश. यातला पहिला आहे पश्चिम अफ्रिकेतला नायजेर वगैरे परिसरातला अत्यंत मागास असा देश आणि ताजिकिस्तान म्हणजे मध्य आशियातला नऊ-दहा कोटी लोकसंख्येचा एकेकाळच्या सोव्हिएत युनियनचा घटक असलेला. हे आपले ९०व्या क्रमांकातले वाटेकरी.

पण आपले गृहमंत्री तर म्हणतात पासपोर्टचा मान वाढला; त्याचं काय?

वास्तवात हा मान कमी झालाय. म्हणजे घटला. गेल्या वर्षी या निर्देशांकात आपण ८२व्या क्रमांकावर होतो. आता ९० झालोय. अधोगती हीच प्रगती, मागे जाणे म्हणजेच पुढे असणे वगैरे नव्या ऑर्वेलियन सूत्रानुसार यालाच गृहमंत्री सुधारणा म्हणत असावेत बहुधा. पण आपल्या वेदना इथंच संपत नाहीत. ही २०११ पासूनची आपली सर्वांत नीचांकी पातळी आहे. म्हणजे नीचांक हाच उच्चांक. त्यातही वेदनेतली आग म्हणजे भारताच्या पासपोर्टची सर्वोत्तम कामगिरी नोंदली गेली २०१३ साली. त्या वर्षी १९९ देशांत आपण ७४व्या क्रमांकावर होतो. म्हणजे त्यानंतरच्या आठ वर्षांत आपला निर्देशांक तब्बल १६नं घसरलाय. तेव्हापासून आजतागायत भारतीय पासपोर्टच्या विनाव्हिसा प्रवेशाच्या यादीत फक्त आणि फक्त पाच देशांची भर पडलीये. आपण स्वत:ला ‘ब्रिक्स’ गटाचे महत्त्वाचे सदस्य मानतो. आता तर काय दोन दोन क्वाडचेही आपण सदस्य (मज्जाच मज्जा.). तर ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रिका हे देश म्हणजे ‘ब्रिक्स’. या ‘ब्रिक्स’पैकी सर्वाधिक अशक्त पासपोर्ट आहे तो भारताचा. ज्या काळात आपण फक्त पाच व्हिसामुक्त देशांची भर घातली त्याच काळात चिनी पासपोर्ट ३९ देशांसाठी व्हिसामुक्त झाला आणि ब्राझील ३०, रशिया २९ आणि दक्षिण अफ्रिकासुद्धा ११ देशांपासनं व्हिसामुक्ती मिळवू शकला. अर्थात आपण इतकं काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. आपल्या दु:खावर फुंकर घालायला पाकिस्तान आहेच. त्या देशाचा निर्देशांक आहे १०४. पाकिस्तानी पासपोर्टधारकास फक्त ३१ देशांत विनाव्हिसा प्रवेश आहे तर आपल्याला ५८ देशांत. म्हणजे पाकिस्तानच्या जवळपास दुप्पट. आपण ९० आणि पाकिस्तान १०४! यापेक्षा आनंद तो काय…!

***

तर त्या वेळी लंडनहून मुंबईला परतताना हा मित्र बरोबर असणार होता. एकाच विमानानं आलो. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावरनंही बाहेर पडण्यात या मित्राची आघाडी. पीआयओ (पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन) की एनआरआय (नॉन रेसिडेंट इंडियन) असा कोणता तरी विशेष दर्जा होता त्याला आणि त्याच्या पासपोर्टला.

अन्य आम्हा सामान्य मत्र्य मानवांना मायदेशात परतण्यासाठीही तासभर रांगेत उभं राहावं लागतं. पूर्वी दोन तास लागत असावेत. हा वेळ कमी झाला हीच गृहमंत्री म्हणतात तशी प्रगती असावी का?

girish.kuber@expressindia.com

      @girishkuber

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अन्यथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pakistani passport holders non visa entry in 31 countries akp

Next Story
गवारगाथा
ताज्या बातम्या