|| गिरीश कुबेर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘जागतिक बड्या भारतीय हॉटेल ब्रँडचं बाजारपेठ मूल्य ४४००० कोटी रु. कोट्यवधींना झटपट-खाद्यं देणाऱ्या हॉटेल साखळीचं बाजारपेठ मूल्य ६०,००० कोटी रु.’’ याची आठवण देणारं ट्वीट एका उद्योगपतीनं झोमॅटो-निमित्तानं केलं

खरं म्हणजे कोणाला चार पैसे मिळत असतील तर इतर कोणाच्या पोटात दुखायचं काही कारण नाही. संपत्ती निर्मिती हाच गरिबी हटावचा चांगला, खरा मार्ग असू शकतो यावर ‘लोकसत्ता’चा ठाम विश्वास आहे. त्यामुळे पैसे मिळवण्याच्या सर्व राजमान्य मार्गांचा ‘लोकसत्ता’ नेहमीच पुरस्कार करत आलाय. त्यासाठी अर्थसाक्षरता वाढायला हवी,  म्युच्युअल फंड्स, भांडवली बाजार आदी मार्ग मराठी माणसानं चोखाळायला हवेत, यात तिळमात्र शंका नाही. उत्तम मार्गांनी चांगली धनसंपत्ती मिळवल्यावर साध्या राहणीला खरं मोल येतं. उद्याची भ्रांत असलेल्यांच्या ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ या तत्त्वाला शून्य किंमत असते. तर नमनाला इतकं तेल घातल्यानंतर मुद्द्याला हात घालायला हवा.

तो म्हणजे ‘झोमॅटो’चा आयपीओ. आता झोमॅटो हे काय प्रकरण आहे हे काही सांगायची गरज नाही. अत्यंत चमकदार कल्पना. टॅक्सीच्या क्षेत्रात ‘उबर’, पर्यटक-निवासाच्या क्षेत्रात ‘एअरबीएनबी’ वगैरे कंपन्यांनी जे करून दाखवलं ते घरी बसल्या बसल्या जेवण वगैरे आणून देण्याच्या क्षेत्रात ‘झोमॅटो’नं करून दाखवलं. वस्तुत: ही फक्त एक सेवा आहे. उबर जशी आहे तशी. ‘उबर’च्या मालकीच्या अशा काही मोटारगाड्या नसतात. पण तरीही ती हजारो, लाखो टॅक्सीवाल्यांशी जोडलेली असते आणि केवळ संदेश-वहनातून आपल्याला वाटेल त्या वेळी टॅक्सी मिळवून देते. झोमॅटोचंही तसंच. यांची काही कुठे खाणावळ आहे वा काही आचारी त्यांच्यासाठी म्हणून काही बनवतायत असं नाही. पण या झोमॅटोनं हॉटेलवाले मात्र जोडले. आपल्याला अमुक काही खावं वाटायचा अवकाश. त्यांच्याकडून तशी मागणी नोंदवली जाते आणि त्यांचाच माणूस आपल्याला हवा तो पदार्थ घरबसल्या आणून देतो.

आधुनिक काळाशी सुसंगत अशी उत्तम कल्पना आणली म्हणून, तसंच त्याहूनही उत्तम व्यवसायसंधी म्हणजे हा झोमॅटो प्रकार. आता तो जगभर लोकप्रिय झालाय. अवघ्या १२-१३ वर्षांपूर्वी दीपिंदर गोयल आणि पंकज छड्डा या दोन तरुणांनी ही आधुनिक कल्पना प्रत्यक्षात आणली. ते या कंपनीचे संस्थापक. जगभरातल्या जवळपास १० हजार शहरांत सध्या हे झोमॅटोवाले घरबसल्या जिभेचे चोचले पुरवायची सेवा देतायत. आशिया खंडातले बरेचसे देश, झालंच तर इंग्लंड, पोर्तुगाल, टर्की आणि अगदी अमेरिकेतही या कंपनीचा चांगलाच विस्तार झालाय. दोन वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्ट, बोइंग आणि अ‍ॅमेझॉन यांची कर्मभूमी असलेल्या सिएटल शहरातली एक अशीच कंपनी झोमॅटोनं विकत घेऊन अमेरिकेत हातपाय पसरले.

बघता बघता ही कंपनी वाऱ्याच्या वेगानं विस्तारली. माहिती तंत्रज्ञान युगात केवळ चटकदार व्यवसाय कल्पना हेच एक भांडवल बनलंय. अशी व्यवसायवृद्धी करून देणारी कल्पना एखाद्याजवळ असेल तर गुंतवणूकदारच पैशाच्या थैल्या घेऊन रांगा लावतात. पूर्वी ‘कल्पना आहे पण भांडवल नाही,’ अशी परिस्थिती होती. आता भांडवलच भांडवल वाट पाहात असतं कोण नवा व्यवसाय शोधतो याकडे डोळे लावून. अलीकडेपर्यंत ‘व्हेंचर कॅपिटॅलिस्ट’ अशी एक कल्पना जोमात होती. म्हणजे ‘जोखीम गुंतवणूकदार’. आता त्याच्या बरोबरीने ‘पीई’ फंड्स आलेत. म्हणजे ‘प्रायव्हेट इक्विटी फंड्स’. यातले बरेचसे परदेशी आहेत. त्यांच्याकडे पैसाच पैसा असतो. म्हणून मग ते बाजारपेठेच्या शोधात असतात. कोटींत पगार असलेले त्यांचे अधिकारी जगभर अशा नवनव्या व्यवसाय कल्पना हुडकत असतात. सापडली अशी एखादी कल्पना की तीत गुंतवणूक करायची, या कल्पनेला उद्योगाचं स्वरूप येईपर्यंत म्हणजे ती वयात येईपर्यंत तिला सांभाळायचं आणि मग सुस्थळी पडली की आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा घेऊन गुंतवणूक काढून घ्यायची. पुन्हा मग सुरू नव्या उद्योगाचा शोध. असा हा साधारण प्रकार.

त्यामुळे त्यांना झोमॅटो डोळ्यात भरली नसती तरच नवल. या अशा गुंतवणूकदारांनी भरभक्कम निधी या झोमॅटोत ओतला. या अशा निधीभरण कार्यक्रमाचा मोठा गाजावाजाही होत असतो. त्यामुळे या कंपनीकडे लक्ष जातं आणि आपोआप तिचा बोलबाला व्हायला लागतो. माध्यमं दखल घेतात. यात अलीकडे एक ‘युनिकॉर्न’ असा नवाच प्रकार सुरू झालाय. याचा शब्दश: अर्थ दोन डोळ्यांमधे, डोक्यावर शिंग असलेला घोडा. म्हणजे काल्पनिक प्राणी. पण व्यवसायउद्योगात युनिकॉर्न म्हणजे ज्याच्या केवळ व्यवसाय कल्पनेचं बाजारपेठीय मूल्य १०० कोटी डॉलर्स वा अधिक आहे असा उद्योग. उबर, टिकटॉक, एअरबीएनबी, स्पेसएक्स, पिंटरेस्ट वगैरे काही यशस्वी युनिकॉर्न. त्या मालिकेत आता आपला झोमॅटो. एकदा का युनिकॉर्न असा दर्जा मिळाला की एक प्रतिमा तयार होते. भावी उद्योगपती, द्रष्टा अशी विशेषणांची बरसात व्हायला लागते. आणि मग ‘ती’ वेळ येते…

भांडवली बाजारात उतरून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची, म्हणजेच ‘आयपीओ’ची. इतके दिवस खासगी काही जणांची असलेली ही कंपनी मग अनेक गुंतवणूदारांची होते. मोठ्या प्रमाणावर भांडवल मिळतं. बाजारपेठेचा विस्तार करता येतो. ‘झोमॅटो’नं नेमकं हेच केलंय. यात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो तो तटस्थ अशा परीक्षकांनी ठरवलेलं कंपनीचं मोल. हा टप्पा महत्त्वाचा अशासाठी की त्यानुसार मग जनता, संस्थात्मक गुंतवणूकदार वगैरेला किती रकमेचे समभाग उपलब्ध करून द्यायचे याचा निर्णय घेता येतो. तर त्याप्रमाणे झोमॅटोनं हे सर्व केलं. झोमॅटोचं मूल्यांकन केलं गेलंय तब्बल ६०,००० कोटी रु. इतकं आणि या कंपनीचा आयपीओ आहे ९,३७५ कोटी रुपयांचा.

वरवर पाहता याचा अर्थ असा होतो की कंपनी गडगंज नफा कमावतीये आणि या नव्या भांडवलामुळे ‘इकडे तिकडे चोहीकडे’ असा गुंतवणूकदारांसाठी नुसता ‘आनंदी आनंद गडे’ असणार आहे. या वातावरणाचा परिणाम असा की पहिल्याच दिवशी पहिल्या काही तासांतच अपेक्षित गुंतवणूक लक्ष्य पार करून ‘झोमॅटो’ किती तरी पुढे गेला. आजपर्यंत तर अपेक्षेपेक्षा अबबबब ४० पट रक्कम या कंपनीकडे जमा झाली. गुंतवणूकदारांचा असा काही प्रतिसाद या आयपीओला मिळाला की वाटावं कुठली बेकारी आणि वेतनकपात. लोकांनी पैसे शब्दश: ओतले या आयपीओत.

इथे आता तो सुरुवातीचा मुद्दा : या कंपनीला इतका प्रचंड पैसा मिळाला म्हणून आपल्या पोटात दुखायचं काहीही कारण नाही.

पण तरीही मुद्दा इतकाच की आजमितीला या कंपनीचा संचित तोटा साधारण ८०० कोटी रुपयांच्या आसपास आहे. गेल्या आर्थिक वर्षात तो दोन हजार कोटींहून अधिक होता. म्हणजे प्रत्यक्षात तोट्यात असलेल्या या कंपनीसाठी गुंतवणूकदारांची ही झुंबड? तीच पाहून एका उद्योगपतीनं ट्वीट केलं : ‘‘जागतिक बड्या भारतीय हॉटेल ब्रँडचं बाजारपेठ मूल्य ४४००० कोटी रु. कोट्यवधींना झटपट-खाद्यं देणाऱ्या हॉटेल साखळीचं बाजारपेठ मूल्य ६०,००० कोटी रु. आणि प्रचंड तोट्यात असणाऱ्या झोमॅटोचं बाजारपेठ मूल्यही ६०,००० कोटी रु.?’’

काय दिसतं यातून? भांडवली बाजारात उतरून दोनाचे चार करायची घाई, लोभ की गुंतवणूकदारांचं अज्ञान. की दोन्ही? हे पाहिल्यावर अनुभवलेले दोन प्रसंग डोळ्यासमोर येतात.

पहिला म्हणजे ‘सत्यम’ कंपनीचा प्रचंड बोलबाला होता तेव्हाचा बातमीदारीतला अनुभव. त्या वेळी काहींनी ‘सत्यम’चं मूल्य ‘टाटा स्टील’ वगैरेंपेक्षाही अधिक दाखवलं होतं. आणि दुसरा प्रसंग एका बड्या उद्योगसमूहाच्या वीज उपकंपनीच्या आयपीओचा. या कंपनीचं शब्दश: एक पैचंही वीज उत्पादन नव्हतं. पण तरी असंच हजारो कोटींचं बाजारपेठ मूल्य तिला दिलं गेलं आणि गुंतवणूकदारांच्या त्यावर उड्या पडल्या. अनेकांनी भविष्य निर्वाह निधीतनं कर्ज वगैरे काढून त्यात पैसे गुंतवले. या अशा आयपीओचा फायदा त्या बड्या गुंतवणूकदारांना झाला. किरकोळ गुंतवणूकदारांचा पैसा आल्याने त्या जोरावर त्यांना आपली गुंतवणूक सुफळ संपूर्णपणे सोडवून घेता आली.

पण आज सत्यम कुठे आहे आणि बड्या उद्योगसमूहाची ती वीज कंपनी आहे की नाही, हेही अनेकांना माहीत नाही. आणि त्यात मार खाणाऱ्या गुंतवणूकदारांची फिकीर आहे कोणाला हा प्रश्नही विचारायची गरज नाही. अर्थात याचा अर्थ झोमॅटोचं असं होईल असा अजिबात नाही. आपण या कंपनीचं शुभचिंतनच करू या…!

प्रश्न इतकाच की गुंतवणूक -मग ती आर्थिक असो किंवा अन्य कसली- करताना ताळेबंद पाहण्याचं महत्त्व आपल्याला कधी कळणार? मूल्य हे स्वत: ‘मापायचं’ असतं- लाटेत समोर येतं ते मनोरंजन!

girish.kuber@expressindia.com

      @girishkuber    

मराठीतील सर्व अन्यथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Price measurement entertainment market for the world largest indian hotel brand akp
First published on: 17-07-2021 at 00:03 IST