परमात्मा हाच सर्वोच्च आहे, अशी सर्वच धर्माची घोषणा आहे. लोकांचाही परमात्म्यावर विश्वास असतो पण तो आहेच, याबाबत ठोस खात्री असतेच असे नव्हे. धर्म मात्र तो परमसत्य आहे, असंच सांगतात. ‘बायबल’ सांगतं की, “God is Reality ” (22:6) तर कुराणातही म्हटले आहे की, ‘अन अल्ला हुवलहक (एक अल्लाच परमसत्य आहे.) भगवंतच शाश्वत आहे, बाकी सर्व नश्वर आहे. त्यामुळे माणसानं शाश्वताचीच भक्ती करावी, नश्वराची करू नये, हेदेखील कुराणात ठामपणे नमूद आहे. कुराणात म्हंटले आहे की, ‘एक अल्लाच सत्य आहे. परमसत्य आहे. (अन अल्ला हुवलहक) बाकी प्रत्येक गोष्ट नाशवान आहे आणि बंदगीसाठी अर्थात भक्तीसाठी योग्य नाही. तो अविनाशी अल्लाच सर्व वस्तुमात्रांचा अनुभव देणारा परमसत्य (हक़उलमुवीन) आहे. म्हणून केवळ त्याचीच प्रशंसा, बंदगी, भक्ती उचित आहे.’ भगवंताच्या अर्थात अल्लाच्या भक्तीसाठी नामाचा मार्गही इस्लामने दाखविला आहे. नामाचा महिमा हिंदू आणि ख्रिस्ती धर्मग्रंथांमध्ये वर्णिला आहेच. कुराणातही अल्लाच्या पवित्र ९९ नामांचा उल्लेख आहे. ही नामे इसमाअ-उल-जलाल (अल्लाचे सामथ्र्य आणि श्रेष्ठत्व सांगणारी नामे), इसमाअ-उल-जमाल (अल्लाची दया व कृपा अधोरेखित करणारी नामे) आणि इसमाअ-उल-सिफ़ात (अल्लाचे गुणसंकीर्तन करणारी नामे)  या तीन श्रेणीत आहेत. चौथी श्रेणी आहे इस्म-अज़्‍ा-ज़ात! या चौथ्या श्रेणीतील नाम हे अल्लाचे अत्यंत पवित्र, श्रेष्ठ आणि निजनाम असते. अल्लाची सर्वच नामे श्रेष्ठ आणि पवित्र असली तरी इस्म-अज़्‍ा-ज़ात मधील निजनाम हे केवळ पैगंबर आणि वलींनाच माहीत असते, अशी मान्यता आहे. वली म्हणजे सद्गुरूच. आपणही सर्वच नामे पवित्र असली तरी सद्गुरूप्रदत्त अर्थात सद्गुरूंनी दिलेलं नाम श्रेष्ठ मानतोच. याचं कारण काय असावं? अलीकडे प्रवासीपेटय़ांना आकडय़ाचं एक कुलूप असतं बघा. त्यात चार आकडी संख्या ठरावीक क्रमाने आणली की कुलूप उघडतं. आता ते चार आकडे कुणाला माहीत नसतात का? सगळे मिळून आकडे ० ते ९९ यातूनच तर निर्माण होतात. तेव्हा आकडे माहीत असणं, ही प्राथमिक गरज तर असतेच पण आकडे सगळे माहीत असूनही योग्य क्रमाने ते जोवर मांडले जात नाहीत तोवर कुलूप उघडत नाही. आपल्या खटपटीत अचानक तो क्रम लागूही शकतो पण त्याचा भरवंसा नाही. अगदी त्याचप्रमाणे अनंत नामे आपल्याला माहीत असतात. त्यातील कोणतंही एक नाम सातत्यानं घेण्याचा अभ्यास करणं उत्तमच. ते नामही काम करील पण जसा तो ठरावीक क्रम माहीत असलेला माणूस पटकन सांगतो आणि त्या क्रमाने आपण आकडे आणले की कुलूप उघडतं, तसंच गुरूप्रदत्त नाम हे वेगानं कार्य करतं! चित्तातील चिज्जडग्रंथीरूपी कुलूप त्या नामाच्या किल्लीनंच उघडलं जातं. तर असं नामाचं आणि त्यातही गुरूप्रदत्त नामाचं महत्त्वही सर्वच धर्मानी नमूद केलं आहे.