संजीव चांदोरकर

जागतिक अर्थव्यस्वस्थेत मंदी अगदी महामंदीदेखील नवीन नाही; पण गेल्या १५० वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेत आलेल्या अनेक मंदींशी तुलना करता करोनामुळे येऊ घातलेली मंदी अनेक बाबतींत एकमेवाद्वितीय ठरते..

करोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दाटलेल्या मंदीच्या काळ्याकुट्ट ढगांच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने ‘जागतिक अर्थव्यवस्थेचे भवितव्य’ (ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स) अहवाल जून महिन्यात प्रसिद्ध केला आहे (लेखात यापुढे ‘अहवाल’). १८३ देशांच्या (३६ विकसित आणि १४७ विकसनशील तसेच गरीब) अर्थव्यवस्थांना कवेत घेणाऱ्या या अहवालात भरपूर आकडेवारी आहे. पण सर्वात जास्त अंतर्दृष्टी देते अहवालातील ‘करोना’मंदीची गेल्या १५० वर्षांत (१८७० ते २०२०) येऊन गेलेल्या कमीअधिक तीव्रतेच्या जागतिक मंदींशी केलेली तुलना. त्यावर आधारित हा लेख.

‘मंदी’ची व्याख्या

दीडशे वर्षांतील जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदींची तुलना करायची तर मंदीची सामायिक व्याख्या हवीच, पण त्या व्याख्येला अनुसरून पंधरा दशकांतील आकडेवारी उपलब्ध असणेदेखील अनिवार्य आहे. एखाद्या देशातील अर्थव्यवस्था वर्धिष्णु असूनसुद्धा त्याच्या जीडीपीच्या वाढदरात चढउतार होतच असतात. उदा. जीडीपी गतसालात ५ टक्क्यांनी वाढून या वर्षी ३ टक्क्यांनी वाढला, तर तांत्रिकदृष्टय़ा अर्थव्यवस्था ‘मंदावत’च असते. मग त्या ‘मंदावण्या’ला मंदी म्हणायचे का? हा वाटतो तसा पुस्तकी मुद्दा नाही. कारण जागतिक जीडीपी २.५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी टक्क्यांनी वाढला, तरी जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असेच मानले पाहिजे असे काही अर्थतज्ज्ञ मानतात. ‘गेल्या १५० वर्षांत जागतिक अर्थव्यवस्था २.५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी वेगाने वाढल्याच्या ५४ घटना घडल्या आहेत,’ असे नमूद करून अहवाल ‘तुलने’साठी मंदीची ही व्याख्या स्वीकारत नाही.

दुसरा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेतील तेजीमंदी ठरवताना जीडीपीतील वधघटीच्या जोडीला इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमधील (उदा.- जागतिक व्यापार, खनिज तेलाचा खप, किरकोळ विक्री, रोजगारनिर्मिती इत्यादी) घडामोडी लक्षात घेण्याचा. ‘जीडीपी’केंद्री तेजीमंदीच्या व्याख्यांच्या मर्यादा मान्य करताना अशी क्षेत्रनिहाय संघटित आकडेवारी १९६० पूर्वीच्या दशांकांसाठी उपलब्ध नसल्यामुळे, हादेखील निकष १५० वर्षांच्या काळपट्टीसाठी वापरता येणार नसल्याचे अहवाल सांगतो.

तिसरा मुद्दा आहे लोकसंख्येचा. जगाची लोकसंख्या वर्षांगणिक वाढती राहिली आहे. त्याचे प्रतिबिंब तुलनेसाठी वापरावयाच्या निर्देशांकात पडावयास हवे. म्हणूनच जगातील १५० वर्षांतील ‘दरडोई जीडीपी’च्या निकषावर अहवालातील प्रमुख निरीक्षणे बेतलेली आहेत.

दरडोई जीडीपीचा निकष

या निकषावर १८७० ते २०२० या काळात १४ वेळा जागतिक दरडोई जीडीपीत आधीच्या वर्षांपेक्षा घट झाली असे दिसते : १८७६, १८८५, १८९३, १९०८, १९१४, १९१७-२१, १९३०-३२, १९३८, १९४५-४६, १९७५, १९८२, १९९१, २००९ आणि २०२०. यावरून हे दिसेल की १९५० आणि १९६० ही दोन दशके सोडली तर १५ दशकांच्या काळात बाकीच्या १३ दशकांमध्ये जागतिक दरडोई जीडीपी घटला आहे. पन्नास, साठीचे दशक अपवाद कसे ठरले? दुसऱ्या महायुद्धात सहभागी राष्ट्रांच्या प्रचंड नुकसान झालेल्या अर्थव्यवस्थांच्या पुनरुत्थानासाठी महाकाय भांडवली गुंतवणुका आणि वस्तुमालाचे उत्पादन केले गेले. त्यातून जगाचा दरडोई जीडीपी या दोन दशकांत सातत्याने वाढता राहिला होता.

अहवालाने जगातील राष्ट्रांची विभागणी तीन गटांत केली आहे : विकसित, विकसनशील (ज्यात भारत मोडतो) आणि गरीब. करोनामुळे २०२० सालात तिन्ही गटांतील राष्ट्रांच्या जीडीपी आणि दरडोई जीडीपीवर परिणाम होणे अपेक्षित असले तरी त्याची तीव्रता खालील तक्त्याप्रमाणे भिन्न असेल :

तक्त्याप्रमाणे : (१) विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांना करोनामंदीचा सर्वात जास्त, तर गरीब राष्ट्रांना कमी फटका बसण्याचा संभव आहे. पण हेदेखील खरे आहे की, विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था वेगाने पूर्वस्थितीला येतील आणि गरीब राष्ट्रे आणखी काही वर्षे खितपत पडतील. (२) २०२० मध्ये जागतिक दरडोई जीडीपी ६.२ टक्क्याने कमी होईल. गेल्या १५० वर्षांत १९१४ (उणे ८), १९३०-३२ (उणे १८) आणि १९४५ (उणे १५) नंतर २०२० मधील घट चौथ्या क्रमांकाचा नीचांक असेल.

‘करोना’मंदीचे प्रथमपण

अहवाल ‘करोनामंदी’बाबत खालील तीन गोष्टी नोंदवतो ज्या १५० वर्षांच्या जागतिक मंदीच्या इतिहासात पहिल्यांदा घडत आहेत

(अ) फक्त महासाथीमुळे मंदी पहिल्यांदाच : आधी उल्लेख केलेल्या चौदांपैकी काही वर्षांत जागतिक मंदीसाठी फक्त एकच तगडे कारण पुरेसे ठरले आहे. उदा.- १९७५ सालात ओपेक राष्ट्रांनी तेलाच्या किमती काहीपट वाढवल्यामुळे वा १९४५ सालात दुसऱ्या महायुद्धामुळे मंदी आली होती किंवा २००९ मध्ये अमेरिकेतील सबप्राइम अरिष्ट हेच महत्त्वाचे कारण होते. मात्र एकापेक्षा जास्त कारणे जागतिक मंदीला कारणीभूत झाल्याचीदेखील उदाहरणे आहेत. उदा.- १९१७-२१ काळातील मंदी स्पॅनिश फ्ल्यू आणि पहिल्या महायुद्धाच्या एकत्रित परिणामी होती. तर १९८२ मध्ये अमेरिकेत वाढलेल्या व्याजदरांच्या जोडीला काही लॅटिन अमेरिकन राष्ट्रांनी परकीय कर्जे फेडण्यास दाखवलेली असमर्थतादेखील कारणीभूत ठरली होती. फक्त संसर्गजन्य महासाथीमुळे एवढी गंभीर जागतिक मंदी दीडशे वर्षांत पहिल्यांदाच येत आहे.

(ब) पहिल्यांदा एकाच वेळी एवढय़ा राष्ट्रांवर : जागतिक जीडीपी हा सुट्टय़ा राष्ट्रांच्या जीडीपीची गोळाबेरीज असतो. पण या वार्षिक आकडय़ात राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था किती प्रमाणात परस्परावलंबी झाल्या आहेत हे प्रतिबिंबित होत नसते. परस्पर अवलंबित्वामुळे एका राष्ट्रातील मंदी एकापेक्षा अधिक राष्ट्रांत ‘निर्यात’ होत असते. जागतिकीकरणाच्या चाळीस वर्षांत नेमके हेच घडले. ‘करोना’मंदी जगातील ९० टक्के राष्ट्रांत एकाच वेळी येऊ घातली आहे. जवळपास सर्वच राष्ट्रे एकाच वेळी मंदीग्रस्त होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

(क) आधीच्या अंदाजांत नाटय़पूर्ण सुधारणा : विविध संस्थातील अर्थतज्ज्ञ, संख्याशास्त्रज्ञ नजीकच्या काळात देशांच्या व जागतिक अर्थव्यवस्था किती वेगाने वाढतील वा घटतील याचे अंदाज नियमितपणे प्रसृत करत असतात. आधी व्यक्त केलेल्या अंदाजानंतर काही नवीन माहिती समोर येते. त्याच्या उजेडात अर्थतज्ज्ञांना आपलेच अंदाज सुधारित करावे लागतात. त्यात काहीही गैर मानले जात नाही. आतापर्यंत या सुधारणा फार तर दोन किंवा तीन दशांशाच्या असायच्या; उदा. जागतिक जीडीपी ३ टक्क्यांनी वाढेल असा मूळचा अंदाज असेल तर सुधारित अंदाजात तो ३.२ किंवा २.८ टक्क्यांनी वाढेल अशी सुधारणा केली जायची.

करोना ज्या वेगाने जगावर येऊन आदळला त्यामुळे जानेवारी २०२०मध्ये अर्थतज्ज्ञांनी जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल, जागतिक व्यापाराबद्दल, आंतरराष्ट्रीय भांडवली गुंतवणुकीबद्दल जे अंदाज वर्तवले होते त्यांत फक्त काही महिन्यांच्या काळात नाटय़पूर्ण, प्रचंड सुधारणा करण्याची पाळी त्यांच्यावर आली. उदा.- मागच्या जानेवारी महिन्यात जागतिक बँकेने, ‘२०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्था २.५ टक्क्यांनी वाढेल’ असा अंदाज वर्तवला होता; तो सुधारून ती ‘५.५ टक्क्यांनी घटेल’ असे सांगावे लागले. म्हणजे आधीचा अंदाज ७.७ टक्क्यांनी बदलावा लागला आहे. आर्थिक अंदाज वर्तवण्याच्या उद्योगात असे यापूर्वी कधीच घडलेले नाही.

संदर्भ बिंदू

एखाद्या अरिष्टाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम मोजण्यासाठी जीडीपीतील वधघट हा काळाच्या कसोटीवर उतरलेला निकष आहे हे मान्य. पण दोन मुद्दे टेबलावर ठेवावेसे वाटतात. एक जागतिक दरडोई उत्पन्न (सरासरी) ६.२ टक्क्यांनी घटणार याचा अर्थ काही राष्ट्रांचे, खरे तर त्या राष्ट्रांतील विशिष्ट समाजघटकांचे दरडोई उत्पन्न २० किंवा ४० टक्क्यांनी घटलेले असू शकते. दुसरा मुद्दा आकडेवारीच्या अंगीभूत मर्यादांचा. उद्या जागतिक जीडीपी काही तिमाहीनंतर पूर्वस्थितीला गेला, तरी मधल्या काळातील कोटय़वधी लोकांच्या पिळवटून टाकणाऱ्या मृत्यू-यातना कोठेच मोजल्या जाणाऱ्या नसतात. एक मात्र नक्की की, करोनापश्चात कोटय़वधी लोक नरक-दारिद्रय़ात ढकलले जाणार आहेत.

 

–   जीडीपी     दरडोई जीडीपी

विकसित देश    (७.०)   (७.३)

विकसनशील देश  (२. ५) (३.६)

गरीब  देश         १.०    (१.६)

जागतिक        (५.२)   (६.२)

(कंसातील आकडे ऋण वाढदर दर्शवतात) (संदर्भ: अहवालातील पान १७वरील तक्ता क्र. १.१.१)

लेखक ‘टाटा समाजविज्ञान संस्थे’त अध्यापन करतात.

ईमेल : chandorkar.sanjeev@gmail.com