कोणतेही राष्ट्र नेमके कशापासून बनते? ते भौगोलिकदृष्टय़ा जिथे असते त्या विशिष्ट भूभागापासून की तिथे राहणाऱ्या लोकांपासून? की त्या भौगोलिक सीमेमध्ये राहणाऱ्या समूहांच्या मनांमध्ये असलेल्या अस्मितेपासून?

राष्ट्र ही एक सजीव संकल्पना आहे. राष्ट्राचे जिवंत अस्तित्व असते. ते कृत्रिम नसते. जसे एखाद्या ठिकाणी तीन-चार अनोळखी व्यक्ती एकत्र येऊन परिवार बनत नाही तसेच राष्ट्राचेही असते. समजा आपण एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गेलो आणि तेथील अनोळखी असे एक प्रौढ पुरुष, महिला आणि दोन मुले यांना बोलावून एका घरात एकत्र ठेवले तर त्याला कुटुंब म्हणणार नाही कारण कुटुंब बनण्यासाठी परिवारातील सदस्यांमध्ये मूलभूत आवश्यकता असते ती आपापसातील रक्तसंबंधांची. आई-वडील, मुलगा-मुलगी असे रक्तसंबंध जेव्हा तयार होतात तेव्हा कुटुंब अस्तित्वात येते. राष्ट्र म्हणजेही जमिनीचा केवळ तुकडा नव्हे किंवा केवळ एखाद्या भूप्रदेशास आपण राष्ट्र म्हणू शकत नाही. उदाहरणार्थ, उत्तर ध्रुव वा दक्षिण ध्रुवावरील भूभागास कोणी राष्ट्र असे संबोधणार नाही. एखाद्या निर्जन प्रदेशात माणसे केवळ जाऊन राहिली तर त्याने राष्ट्र बनणार नाही. राष्ट्र बनण्यासाठी त्या भूप्रदेशात राहणाऱ्या समाजाचे त्या प्रदेशाशी भावात्मक संबंध आवश्यक असतात.

uddhav thackeray and kangana
“भाजपाई कंगनाने तिचे अगाध ज्ञान पाजळून इतिहासाची…”, ठाकरे गटाचा टोला
mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about New problems and demands of western Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… पश्चिम महाराष्ट्र : आहे मनोहर तरी…

राष्ट्र बनण्यासाठी एका विशिष्ट भूमीची आवश्यकता असते हे खरे, परंतु त्यावरील नदी, पहाड, मैदान, वृक्ष वा निर्जीव वस्तूंचे राष्ट्र बनत नाही. राष्ट्र बनण्यासाठी त्या देशात राहणाऱ्या लोकांच्या हृदयात, त्या भूमीविषयी (देशाविषयी) असीम श्रद्धा असावयास हवी. मातृभूमीविषयी श्रद्धा बाळगणारे, समान आदर्श, समान इतिहास, समान शत्रू – मित्र, समान ऐतिहासिक पुरुष व महिलांचा आदर करणारे लोक एका विशिष्ट भूमीत राहतात, तेव्हा त्याचे राष्ट्र बनते. राष्ट्राचे मोठेपण त्या राष्ट्रातील सर्वसामान्य माणसे देशाविषयी कसा दृष्टिकोन बाळगतात, देशाविषयी त्यांचा आचार, विचार व व्यवहार कसा आहे यावर अवलंबून असते. इंग्लंडचे उदाहरण द्यायचे झाले तर असे म्हणतात की तिथे अधिकांश काळ थंडी असून सूर्यदर्शन अत्यंत कमी होते. अन्न-धान्यासाठी ब्रिटिशांना परदेशावर अवलंबून राहावे लागते. अशाही परिस्थितीत एखाद्या ब्रिटिश नागरिकास आपण विचारले की पृथ्वीच्या पाठीवर तुला कोणता देश सर्वाधिक प्रिय वाटतो तर तो उत्तर देईल ‘माझा इंग्लंड देश मला सर्वात प्रिय आहे.’ ही भावना प्रकट करणारी एका इंग्रज कवीची कविता आहे, इंग्लंड! विथ ऑल दाय फॉल्ट्स, आय लव्ह दी! (हे आंग्लभूमी! तुझ्या सगळय़ा दोषांसह, मी तुझ्यावर प्रेम करतो.)

जिथे आपण राहतो त्या भूमीविषयी केवळ ममत्व असून चालत नाही, तर त्यावर आत्यंतिक निष्ठा हवी. मातृभूमीवर नि:सीम प्रेम हवे. काही लोक राष्ट्र म्हणजे लिव्ह-इन-रिलेशनशिप असा विचार करतात, परंतु असा विचार करणे म्हणजे विकृती आहे. प्रभू रामचंद्रांनी ‘‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी’’ असे मातृभूमीचे वर्णन केले आहे. जगभरात परागंदा झालेला ज्यू समाज १८०० वर्षांच्या  संघर्षांनंतर आपल्या मातृभूमीत म्हणजे इस्रायलमध्ये स्थायिक झाला. एका पत्रकाराने तेथील एका युवकास विचारले, की एवढी वर्षे संघर्ष करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? तेव्हा तो तात्काळ म्हणाला  ‘अवर इंटेन्स लव्ह टू मदरलॅण्ड’. कवी इक्बालचे देशभक्तीपर गाणं आपण नेहमी गातो ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदूुस्ताँ हमारा । हम बुलबुले हैं उसकी, ये गुलसिताँ हमारा ।।’

हे गाणे चांगले आहे. देशभक्तीने ओत-प्रोत आहे. गाण्यातील बगिचा व बुलबुल पक्ष्याची उपमा उत्तम, परंतु त्याचा भावार्थ जर आपण नीट जाणून घेतला तर बुलबुल पक्षी आणि त्याचे बगिच्याशी असलेले स्वार्थी नाते लक्षात येईल. गाण्यातील जो बुलबुल पक्षी ते झाड जेव्हा फळा-फुलांनी बहरलेले असते तेव्हा तो त्याच्यावर बागडत असतो.

परंतु जेव्हा शिशिर ऋतू सुरू होतो, त्या वेळी पानगळ व्हायला लागते तेव्हा तोच बुलबुल पक्षी त्या बगिच्यातील झाडाशी आपले नाते तोडतो आणि दुसऱ्या ठिकाणचा बगिचा शोधावयास बाहेर पडतो जिथे त्याला पुन्हा आनंद मिळेल. तात्पर्य, व्यक्तीचे देशाशी असलेले नाते एवढे तकलादू असता कामा नये. देशाच्या आनंदात आनंद तसे देश दु:खात असेल तर व्यक्तीससुद्धा दु:ख वाटले पाहिजे. याला म्हणतात भावात्मक संबंध किंवा तादात्म्यता.

या भावात्मक संबंधांना काही जण पितृभूमी (फादरलॅण्ड) तर काही मातृभूमी (मदरलॅण्ड) म्हणून प्रकट करतात. रशिया, जर्मनी, ब्रिटनसारखे देश आपल्या भूमीस पितृभूमी म्हणतात तर भारत, चीन त्यास मातृभूमी म्हणतात. जोसेफ मॅझिनी हे इटालीचे थोर पुरुष होते. त्यांनी राष्ट्रास ‘एका जनसमूहाचे व्यक्तित्व’ (अ‍ॅन इंडिव्हिज्युलिटी ऑफ पीपल) असे संबोधले होते. तर महान देशभक्त बिपिन चंद्र पाल यांनी मॅझिनीवर भाष्य करताना म्हटले की राष्ट्र म्हणजे केवळ तेथील जनसमूहाचे व्यक्तित्व नाही तर जनसमूहाची अस्मिता आहे (नेशन इज नॉट अ‍ॅन इंडिव्हिज्युअलिटी ऑफ पीपल बट अ पर्सनॅलिटी ऑफ पीपल). पाल यांनी ‘इंडिव्हिज्युलिटी’ आणि ‘पर्सनॅलिटी’ यांत मूलभूत फरक असल्याचे सांगून असे विशद केले की ‘इंडिव्हिज्युअलिटी’ मध्ये एकदुसऱ्यापासून वेगळेपणाची भावना प्रतीत होते. तर ‘पर्सनॅलिट’’मध्ये आपण सर्वजण एक असल्याची भावना आहे. थोर अर्थचिंतक व एकात्म मानवदर्शनकार पं. दीनदयाळ उपाध्याय यांची अलीकडेच पुण्यतिथी झाली. ते असे म्हणत की प्रत्येक राष्ट्राचे एक मूलतत्त्व असते आणि त्यास राष्ट्राची प्रकृती म्हणतात. आपल्या शास्त्रकारांनी त्यास ‘चिती’ हे नाव दिले असल्याचे ते नेहमी सांगत.

चिती म्हणजेच राष्ट्राची चिरजीवन शक्ती, राष्ट्रीय अस्मिता. व्यक्तीच्या जीवनांत अस्मितेचे जसे महत्त्व तसेच राष्ट्रीय जीवनांत राष्ट्रीय अस्मितेचे. राष्ट्रीय अस्मितेमुळे राष्ट्र जिवंत राहते. या अस्मितेचा लोप झाला तर राष्ट्राची विनाशाकडे वाटचालसुद्धा होते. आज जगात काही प्राचीन देश आहेत ते इतिहासजमा झाले आहेत. आधुनिक उर्दू कवी महम्मद इक्बाल यांचे प्रसिद्ध काव्य आहे. ते म्हणतात

युनान, मिस्र, रोमां सब मिट गये जहाँ से, अब तक मगर है बाकी नामो निशां हमारा ।

कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों से रहा है, दुश्मन दौरे जहां हमारा ।।

(जगातील इजिप्त, पॅलेस्टाईन, रोमन साम्राज्याचा अस्त झाला परंतु भारतावर अनेक आक्रमणे होऊनसुद्धा हिंदूुस्थान जिवंत राहिला कारण इथे एक सांस्कृतिक सत्त्व  कायम होते, अस्मिता जिवंत होती, म्हणून राष्ट्रीयतेचा तो अक्षुण्ण प्रवाह कायम चालू राहिला.)

राष्ट्रीय अस्मिता म्हटले की आपल्यासमोर एका विशिष्ट भूमीवर निवास करणारा एक  विशिष्ट मानवसमूह उपस्थित होतो. त्यामुळे राष्ट्र म्हटले की जनसमूहाचा किंवा जनसमाजाचा बोध होतो. हा जनसमाज राष्ट्रीय निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्याची त्या भूमीची बांधिलकी असावी लागते. पुत्राला मातेविषयी जसे प्रेम वाटते तसे प्रेम आपल्या मातृभूमीविषयी वाटणारा समाज ज्या भूभागावर राहतो, त्या राष्ट्राची एक प्रकृती तयार होते.  राष्ट्रीय अस्मिता अस्तंगत होते म्हणजे त्याची मूळ प्रवृत्ती लोप पावते. राष्ट्राचे स्वरूप त्याच्या या अस्मितेत नेहमी वास करत असते.

दीनदयाळजींच्या शब्दात सांगायचे तर, कोणत्याही राष्ट्राचे स्वरूप तेथील एकरूप ‘जनसमाजाच्या’ सामूहिक मूळ प्रकृतीनुसार निश्चित होते, त्यालाच चिती म्हणतात. आपली मातृभूमी परमसुखात असावी अशा भावनेच्या स्वरूपात ही चिती जनसमूहातील प्रत्येक व्यक्तीच्या अंत:करणात वास करते. जोपर्यंत ही चिती जागृत असते, निर्दोष असते तोपर्यंत राष्ट्राचा अभ्युदय होत राहतो. या चेतनेच्या आधारे राष्ट्र संघटित होते. चितीमुळे जी शक्ती जागृत होते तीच राष्ट्राचे संरक्षण करते. तिलाच ‘विराट’ शक्तीही म्हणतात. चितीच्या प्रकाशात राष्ट्राचे विराट स्वरूप प्रकट झाले म्हणजे राष्ट्र जागे झाले असे समजावे. हे विराट स्वरूप राष्ट्राला प्राणाप्रमाणे असते तर चिती आत्म्याप्रमाणे!

लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आहेत.

ravisathe64 @gmail.com