अपने मरने की खबर न जाना, असं विचारताना कबीरांचा हेतू हा आहे की, मृत्यूनंतर उपयोगी पडेल याच हेतूनं केवळ दान आणि पुण्य करणारे जगताना स्वतच्या ‘आनंदा’साठी स्वार्थानं दुसऱ्यांची लुबाडणूकही करतात आणि पापही बेलाशक करतात! मंदिरं उभारण्यासाठी मोठय़ा देणग्या देऊन ‘पुण्य’ साठवणारे उद्योगपती आपल्या भरभराटीसाठी ‘पापकृत्यं’ही करीत नाहीत का? मग पाप आणि लुटमारीचं फळ भोगण्यासाठी जसं जन्मावं लागतंच त्याचप्रमाणे दान आणि पुण्याचं फळ भोगण्यासाठीही जन्मावं लागतंच. याचाच अर्थ पाप मुक्ती देऊ शकत नाही, हे तर उघडच आहे पण पुण्यसुद्धा मुक्ती देऊ शकत नाही! कबीरांनीच एका भजनात म्हंटलं आहे- पाप पुन्न के बीज दोऊ! पाप आणि पुण्य या दोन्ही बियाच आहेत. भ्रमानं त्यांच्यापैकी कोणत्याही बीचं पोषण केलं तरी रोपटं उगवणार आणि पाहाता पाहात ‘अहं’चा विशाल वृक्ष डवरणार! ‘माझी वट आहे, या दुनियेत मला कोण अडवणार’, या जाणिवेनं पापबीजातून डवरलेला ‘अहं’वृक्ष ताठ उभा असतो. तर ‘माझ्यासारखा पुण्यवान या जगात कोणीच नाही’, या वृत्तीनं पुण्यबीजातून डवरलेला ‘अहं’वृक्ष ताठ उभा असतो. त्या वृक्षांना मग ‘माझे’पणाच्या किती फांद्या, किती फुलं, किती पानं, किती फळं येत राहातात! पुढच्या जन्माची तजवीज करणाऱ्या पारंब्याही अमाप! मग ‘मुक्ती’ कुठली? ती हवी असेल तर? ‘पाप पुन्न के बीज दोऊ, बिज्ञान अगिन में जारिये जी।।’ या बिया मुळातच भाजून टाकल्या तर त्यातून ‘मी’चा वृक्ष आणि ‘माझे’पणाची पानं, फुलं, फळं, फांद्या फुटणारच नाहीत. पण त्या बिया कशा भाजाव्या, याचं ज्ञान धर्मग्रंथ वाचून मिळणार नाही. आता पाककृतीच्या पुस्तकात कसं लिहितात? ‘मंद आचेवर थोडय़ा थोडय़ा वेळानं परता. मग त्यात चिमूटभर अमुक गोष्ट टाका. थोडं तांबूस दिसलं की मग पाणी घाला.’ आता ‘मंद’ म्हणजे नेमकी किती आच? ‘थोडय़ा’ म्हणजे नेमक्या किती वेळानं? ‘चिमूटभर’ म्हणजे अचूक किती? थोडं तांबूस म्हणजे नेमकं किती तांबूस? वगैरे वगैरे.. अशा गोष्टीत फरक पडतोच पडतो. तेव्हा शाब्दिक ज्ञान नुसतं उपयोगी नाही. तो पदार्थ बनविण्यात जो तरबेज आहे त्याच्या हाताखाली मला शिकावं लागेल. जो हे पदार्थ बनविण्यात तरबेज आहे तोच त्यातल्या खाचाखोचा मला सांगू शकतो, माझ्याकडून तो पदार्थ करून घेऊ शकतो. अगदी त्याचप्रमाणे मुक्ती हवी तर जो स्वत: मुक्त आहे त्याच्याच भट्टीत मला तयार व्हावं लागेल. भ्रमाच्या गाळात अधिकच रूतता रूतता मला मुक्ती शिकता येणार नाही. जो भ्रम आणि मोहाच्या गाळात स्वत: रुतला आहे त्याचा हात धरून मी मुक्तीचा मार्ग शिकू शकणार नाही. तर जो स्वत: ज्ञानाग्नीसारखा धगधगत आहे, ज्याच्याकडे भ्रम, मोह, असत्य किंचितही टिकू शकत नाही असा सद्गुरूच मला मुक्तीच्या वाटेवर चालवू शकेल.