आपण कबीरांचे काही दोहे पाहिले, काही भजनं पाहिली, आता पाहात आहोत ती रमैनी. कबीरांचा सर्वात प्रमाण ग्रंथ आहे ‘बीजक’. बीजक म्हणजे गुप्त आत्मतत्त्वाचं बीज प्रकट करणारा ग्रंथ! त्याची ११ प्रकरणं आहेत आणि त्यातलं पहिलं प्रकरण आहे रमैनी. त्यात ८४ रमैनी आहेत. त्या चौपाई छंदात आहेत. बहुतांश रमैनींच्या शेवटी त्या रमैनीचं सारभूत तत्त्व सामावलेली सूत्ररूप अशी साखी आहे. तर ही रमैनी आहे- पढिम् पढिम् पण्डित करू चतुराई। निज मुकुति मोहि कहो समुझाई।। १।।  हे पढत पंडितांनो, तुम्ही शास्त्रग्रंथ वाचून वाचून शब्दचातुर्य तर भरपूर कमावता आणि मग त्या शब्दचातुर्याच्या जोरावर मुक्ती कशी मिळवाल, यावर लोकांना भारंभार उपदेशही करता. तर मला जरा तुमचा मुक्तीचा अनुभव सांगा हो! शब्द सांगू नका, अनुभव सांगा! त्या मुक्तीचं स्वरूप काय, ती कशी असते, कशी लाभते, हे सांगा! पंडितांना कबीरजी इथे खडसावतात त्यामागे एक विशेष पाश्र्वभूमीही आहे. कबीरांचं वास्तव्य होतं काशीत आणि काशी म्हणजे तात्त्विक धर्मचर्चेचा मोठा आखाडाच झाली होती. शास्त्रार्थासाठी प्रांतोप्रांतीचे पंडित काशीत येत आणि शाब्दिक चर्चेत दुसऱ्याला हरवून स्वतला सिद्ध करण्यासाठी धडपडत. त्यामुळे शाब्दिक कौशल्यालाच ऊत आला होता. अनुभवासाठीच्या तपश्चर्येचं मोल ओसरलं होतं. म्हणून अशा शब्दप्रभूंना कबीरजी सांगतात की, जन्मभर शाब्दिक चर्चा कितीही करा पण प्रत्यक्षानुभूतीची, प्रत्यक्ष अनुभवाची सर त्याला येणार नाही. शब्दचर्चेपेक्षा प्रत्यक्ष अनुभवासाठी तुम्ही प्रयत्न केलेत का? त्या प्रयत्नांनी मग जर तुम्ही मुक्त झाला असाल तर त्या मुक्तीचा अनुभव मला सांगा! पुढे ते म्हणतात- कहँ बसे पुरुष कवन सो गाऊँ । पण्डित मोहि सुनावहु नाऊँ।। २।। याचा शब्दार्थ असा करतात की, तो परमात्मा (पुरुष) कोणत्या गावी निवास करतो (कवन सो गाऊँ), हे पंडितांनो त्याचं नाव (नाऊँ), पत्ता मला सांगा. पण याचा खोल अर्थ असा आहे की, हे पंडितांनो तुमचा मुक्तीचा अनुभवच सांगा, या मुक्तीने कोणी कोणती स्थिती प्राप्त केली, कोणी काय सांगितलं ते मला ऐकवू नका! मग पुढे ते म्हणतात- चारि वेद ब्रrौ निज ठाना। मुकुति का मर्म उनहुँ नहिं जाना।।३।। चारही वेदांना ब्रह्माजींनी स्वत: स्थापित केले, अर्थात इतके ते उच्च कोटीचे ज्ञानी होते, तरी ते देखील मोहात फसल्याचे दाखले पुराणांत आहेत. म्हणजेच त्यांनाही मुक्तीचं खरं मर्म, खरं रहस्य माहीत नव्हतं. याचाच अर्थ त्यांनी स्थापित केलेल्या वेदांतही ते रहस्य प्रकटपणे नाही! मग त्यांचेही दाखले मला देऊ नका. पुढे ते म्हणतात, दान पुन्य उन्ह बहुत बखाना। अपने मरन की खबरि न जाना।।४।। ब्रह्माजींनी दान आणि पुण्याची महती गायली पण त्यांचं फळ मृत्यूनंतर मिळतं असं म्हंटलं आहे. पण आपल्या मृत्यूची खबर तरी त्यांना कुठे आहे?