एकोणिसाव्या शतकातील पूर्वार्धात भारतीय समाजात वाढत चाललेल्या अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा, रूढीपरंपरा, जातिपंथादी भेदभावना आणि परकीयांची गुलामगिरी या दोषांमुळे सर्वत्र काळोख पसरत असतानाच थोर समाजसुधारकांच्या प्रगत विचारांमुळे प्रबोधनाची पहाट उगवली. त्यांचे कृतिशील आदर्श जीवन आणि सुधारणावादी उदात्त विचार यांमुळे सामान्य जनतेचे मौलिक प्रबोधन झाले. त्यामुळेच सत्य ज्ञानाच्या जागृतीचा रचलेला पाया पुढे समाजाच्या नवनिर्मितीचा केंद्रबिंदू ठरला.
राजा राममोहन राय यांचा ‘ब्राह्म समाज’, न्यायमूर्ती म. गो. रानडे यांचा ‘प्रार्थना समाज’, महात्मा फुले यांचा ‘सत्यशोधक समाज’, कर्नल अल्काट यांची ‘थिआसॉफिकल सोसायटी’ यांसारख्या संस्थाबरोबरच महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या ‘आर्य समाज’ या संस्थेने देशवासियांना जे पथप्रदर्शन केले, ते निश्चितच उपकार ठरले.
अज्ञान, अविद्या, अकर्मण्यता व अंधश्रद्धांच्या आहारी गेलेला मानव समाज त्रिविध दुःखांच्या जाळ्यातून मुक्त होऊन सर्वदृष्ट्या सुखाने मार्गक्रमण करो, तसेच जगात शांतता व सुव्यवस्था नांदो, असा मंत्र देणारी ही चळवळ गेल्या दीडशे वर्षांपासून राष्ट्रीय, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. थोर वेदज्ञ समाजसुधारक महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई शहरात १० एप्रिल १८७५ रोजी या संस्थेची स्थापना करून तिच्या माध्यमातून समाजमनावर साचलेली अनर्थकारी विचारांची धूळ झटकून काढली व जगातील प्रत्येक मानवाला ‘वेदांकडे चला!’ अशी हाक देऊन वेदाध्ययनाचा अधिकार अखिल मानव जातीला मुक्तहस्ते बहाल केला.
स्वामी दयानंद हे गुजरातेतील काठीयावाड जवळच्या टंकारा या गावी जन्मले. कुमार अवस्थेत असताना शिवमंदिरातील मूषकलीला पाहून बालमनावर वैराग्य बिंबले. त्यातूनच खऱ्या ईश्वराच्या, सत्यज्ञानाच्या शोधार्थ आणि मृत्युंजयी होण्याकरिता घरदार सोडले. जवळपास ३५ वर्षे भ्रमंती व तपाचरण करीत शेवटी मथुरेत प्रज्ञाचक्षू गुरु विरजानंदांची भेट झाली. तीन वर्षांच्या अपूर्व ज्ञानसाधनेनंतर गुरूंकरवी व्याकरण महाभाष्य व निरुक्तादी ग्रंथांच्या माध्यमाने वेदमंत्रांचे यौगिक, आध्यात्मिक व आधिभौतिक अर्थ लावून प्राचीन ऋषीप्रणित शैलीतून भाष्य केले.
अर्वाचीन काळात वेदांचे भाष्यकार उव्वट, सायण, महीधर इत्यादी आचार्यांनी तर आधुनिक काळातील विदेशी अभ्यासक मॅक्सम्युलर यांनी लावलेल्या चुकीच्या अर्थांमुळे वेदज्ञान दूषित होऊ लागले. मंत्रांचे योग्य अर्थ न दिल्याने यज्ञात गोमेध, अश्वमेध, नरमेध यांच्या नावावर बळी देणे, गोमांस भक्षण, मद्यपान, जातिभेद, स्त्रिया व शूद्रांना ज्ञानापासून वंचित ठेवणे, तसेच बहुदेवतावाद इत्यादी अनेक भ्रामक कल्पना उदयास येऊ लागल्या.
यामुळे विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणारा नवा सुशिक्षित वर्ग वेदज्ञानापासून दुरावू लागला. इतकेच नव्हे तर विचारवंतांचा वेदांवरील विश्वास उडत चालला होता. अशावेळी स्वामीजी दयानंद यांनी वेदमंत्रांचे सुयोग्य व बुद्धिगम्य अर्थ लावून वेद हे सत्य ज्ञान-विज्ञानाचे आगर आहेत, असे ठासून सांगितले. त्यांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाचा मूलाधार म्हणजे हेच ते विशुद्ध वेदज्ञान !
गुरूंच्या आज्ञेने स्वामी दयानंदांनी सामाजिक सुधारणांना प्रारंभ केला, तेव्हा एखादी संघटना स्थापन करावी, असा विचार त्यांच्या मनात आला. मुंबईसारखी देशाची आर्थिक राजधानी सांस्कृतिक, सामाजिकदृष्ट्यादेखील प्रगत व अनुकूल असल्याचे लक्षात आल्याने अनुयायांशी विचारविनिमय करून त्यांनी या महानगराची निवड केली. २० ऑक्टोबर १८७४ रोजी मुंबई शहरात दाखल झाले आणि ४८ दिवस मुंबईत राहिले. त्या काळात मुंबई शहरात अवैदिक वल्लभ संप्रदायाचे थोतांड वाढीस लागले होते.
ज्याप्रमाणे आजकाल महाराष्ट्र व इतर राज्यात भोंदूगिरी करणाऱ्या बुवा बाबांचे पेव फुटले आहे त्याचप्रमाणे त्याही काळात मुंबईसारख्या शहरात अशा पाखंडी धर्मगुरूंचा व्यभिचार व भ्रष्टाचार वाढीस लागला होता. याला सर्वाधिक बळी पडत होत्या त्या महिला. अध्यात्म व धर्माच्या नावावर सामान्य समाज मोठ्या प्रमाणात अधोगतीला चालला होता. भक्ती क्षेत्रातील हा बाजार रोखण्यासाठी त्या धर्ममार्तंडासोबत शास्त्रार्थ करणे अत्यंत गरजेचे होते.
यासाठी अद्वैतवादी मतांचे श्री जयकृष्ण व्यास व वल्लभ संप्रदायाचे श्री धर्मसी खीमसी या दोघांनी स्वामीजींना मुंबईत येण्याचे आमंत्रण दिले. स्वामीजींनी ‘मूर्तिपूजा आणि वल्लभ संप्रदाय’ व इतर विषयांवर अनेक व्याख्याने दिली. त्यावेळी त्यांना प्रतिपक्षाकडून जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आणि मुंबईतून पळवून लावण्याचा प्रयत्न झाला. परंतु स्वामीजी डगमगले नाहीत.
याच मुंबई मुक्कामी स्वामीजींनी भरीव ग्रंथ निर्मिती केली. संस्कारविधी, पंचमहायज्ञविधी, आर्याभिविनय, वेदांतिध्वांतनिवारण, वेदविरुद्ध मतखंडन शिक्षापत्रीध्वान्तनिवारण या ग्रंथांचा यात समावेश आहे. याच भेटीदरम्यान स्वामीजींनी अनेक विद्वानांशी चर्चा केली. जवळपास ६० जणांनी सदस्य होण्याकरिता सहमती दर्शवली. त्यानंतर स्वामीजी गुजरातच्या दौऱ्याला गेले. अहमदाबाद व राजकोट या आपल्या जन्मभूमीच्या शहरात आर्य समाजाची स्थापना करण्याचा विचार झाला, पण असंख्य अडचणींमुळे हे कार्य होऊ शकले नाही.
नंतर २९ जानेवारी १८७५ रोजी स्वामीजी पुन्हा मुंबईला आले. ४ महिने २३ दिवसांच्या मुक्कामात त्यांनी विविध विषयांवर व्याख्याने दिली. १० एप्रिल १८७५ रोजी गिरगावातील प्रार्थना समाजाच्या शेजारी असलेल्या डॉ. माणिक जी आदेर या पारशी गृहस्थाच्या उद्यानात सायंकाळी ५.३० वाजता आर्य समाजाची रीतसर स्थापना झाली. हाच तो जगातील ऐतिहासिक पहिला आर्य समाज. तो दिवस शनिवार गुढीपाडव्याचा होता.
संघटनेची रीतसर घटना तयार करण्यात आली. त्याच्यात २८ नियमांचा समावेश होता. कालांतराने लाहोरमध्ये या नियमांना संक्षिप्त रूप देऊन दहा नियम ठरविण्यात आले. आर्य समाजाचे हे १० नियम म्हणजे वैश्विक मानवतेची एक प्रकारे आदर्श आचारसंहिताच होती. स्वामीजींनी या जागतिक संस्थेची घटना बनविण्याकरिता दादोबा पांडुरंग तर्खडकर, पानाचंद आनंदजी पारेख व सेवक लालकृष्णदास यांची उपसमिती तयार केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध विधिज्ञ श्री गिरधरलाल दयालदास कोठारी यांच्याशी विचार विनिमय करून हे नियम सुव्यवस्थित करण्यात आले होते. या पहिल्या आर्य समाजाच्या प्रारंभिक सदस्यांची संख्या १०० होती. अनुयायांनी स्वामीजींना अध्यक्ष बनण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी नम्रपणे ती नाकारली आणि पदांपासून राहणे पसंत करून स्वतःला सामान्य सदस्यत्व घेतले.
सदस्यांच्या यादीत स्वामीजींचा ३१ वा क्रमांक होता. यावरून स्वामीजी हे पदप्रतिष्ठा व प्रसिद्धीपासून चार हात दूर होते, हे लक्षात येते. सर्वांच्या उपस्थितीत लोकशाही पद्धतीने गिरधरलाल कोठारी यांना अध्यक्ष व पानाचंद पारेख यांना मंत्री म्हणून निवडण्यात आले. यावेळी स्वामीजींनी सांगितले की आर्य समाजाचे कार्य लोकशाही पद्धतीने चालले पाहिजे. महंत व किंवा बुवाबाजीला अजिबात स्थान दिले जाऊ नये.
स्वामीजींनी स्थापन केलेला आर्य समाज म्हणजे नवीन मतपंथ किंवा संप्रदाय नव्हे. आर्य म्हणजे श्रेष्ठ व सद्गुणी सज्जन होय. अशा सदाचारसंपन्न व माणुसकीने युक्त असलेल्या लोकांचा समूह किंवा समाज म्हणजे ‘आर्य समाज’. एक प्रकारे प्राचीन काळातील मूल्याधिष्ठित आदर्श समाजाची पुनर्स्थापना म्हणजेच आर्य समाज. याविषयी स्वामीजी मुंबईत म्हणाले होते- ‘माझा एखादा वेगळा पंथ किंवा संप्रदाय नाही. मी वेदांच्या आधीन नाही. मला कीर्तीची अभिलाषा मुळीच नाही. कोणी माझी स्तुती करो अथवा निंदा, मी आपले कर्तव्य समजून धर्म ज्ञानाचा प्रचार करतो. योग्य वेळी आपण यात सुधारणा करू शकता.’ आपल्या अनुयायांना किती मोठे स्वातंत्र्य स्वामीजींनी या विधानातून दिले आहे. स्वामीजींचे प्रखर सुधारणावादी अनुयायी लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख हे याच आर्य समाजाचे १८७९ ते १८९२ पर्यंत अध्यक्ष होते.
प्रारंभी आर्य समाजाला स्वतःची जागा नव्हती. कार्यक्रम गिरगाव रोडवरील दानशूर प्रसिद्ध उद्योगपती नाना जगन्नाथ शंकरशेठजी यांच्या वाड्यातील गोविंद विष्णू खासगी इंग्लिश शाळेत होत. या कार्यक्रमांना सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित राहत. पुढे महर्षी दयानंद हे ३० डिसेंबर १८८१ रोजी आपल्या शेवटच्या मुंबई भेटीला आले.
जवळपास सहा महिने म्हणजे २४ जून १८८२ पर्यंत ते इथेच थांबले. त्यादरम्यान आर्य समाजास जागा घेण्याचे निश्चित झाले. सर्वांनी मिळून गोकुळदास करमसी यांच्याकडून गिरगाव रोडवर दगडी चाळीची दोन मजली इमारत ६४०० रुपयांना विकत घेतली. तेव्हापासून आजतागायत आर्य समाज काकडवाडीची ही भव्य वास्तू दिमाखाने वैदिक मानवतेचा संदेश देत उभी आहे. गेल्या दीडशे वर्षांत मुंबईत विविध ठिकाणी आर्य समाजाच्या शाखा स्थापन झाल्या. आर्य प्रतिनिधी सभा, मुंबई ही संघटना त्यांचे सक्षमपणे नेतृत्व करीत आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आर्य समाजाने फार मोठे योगदान आहे. काँग्रेसच्या जन्माआधीपासून स्वामी दयानंदांनी आपल्या लिखाणातून व उपदेशातून स्वदेशी व स्वराज्याचा उद्घोष केला. राष्ट्रीय भाषा म्हणून सर्वात प्रथम हिंदीचा पुरस्कार व प्रसार करणारी संस्था म्हणजे आर्य समाज. काँग्रेस किंवा अन्य पक्षातील मोठमोठ्या नेतेपदी राहुन स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे आर्य समाजाचे अनुयायीच होते. स्वामी श्रद्धानंद, लाला लाजपत राय, भाई परमानंद, लाला हरदयाल, श्यामजी कृष्ण वर्मा, रामप्रसाद बिस्मिल , सरदार अर्जुन सिंह, स्वामी स्वतंत्रानंद इत्यादी थोर राष्ट्रभक्त आर्य समाजाची देणगी होय. याच नेत्यांकडून इतरही क्रांतिकारकांना प्रेरणा मिळत गेली. तर दक्षिणेतील हैदराबाद संग्रामात सर्वाधिक बलिदान आर्य समाजाने दिले आहे.
ब्रिटिशांविरुद्धचा क्रांतिकारक लढा असो, की दक्षिणेत हैदराबादला निजामाच्या तावडीतून मुक्त करणे असो, हिंदी सत्याग्रह असो की गोहत्या बंदी सत्याग्रह…! प्रत्येक आंदोलनात आर्य समाजाच्या क्रांतिकारी वीर योद्ध्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राण तळहाती घेऊन बलिदान दिले. म्हणूनच प्रसिद्ध इतिहासातज्ज्ञ डॉ. पट्टाभिसितारम्मय्या यांनी स्वातंत्र्य चळवळीत जवळपास ८० टक्के योगदान आर्यसमाजी राष्ट्रभक्तांचे होते, असे नमूद केले आहे.
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आर्य समाजाविषयी विश्वकोशाच्या दुसऱ्या खंडात म्हणतात – आर्य समाजाने १९ व्या शतकाच्या अखेरीस धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठी कामगिरी केली असल्याने भारताच्या अर्वाचीन पुनरुत्थानाच्या कार्यात त्याचा वाटा फार मोठा आहे. मानव जातीच्या वैज्ञानिक व पारमार्थिक विचारांचा उगम वेदात आहे. म्हणून आर्य समाजाने चार वेदांच्या मंत्रसंहिताच प्रमाण मानल्या, ब्राह्मण ग्रंथ नव्हे. सहा शास्त्रे, स्मृती व १८ पुराणे त्यांनी प्रमाण म्हणून मान्य केली नाहीत. भारताला पुन्हा वैदिक मार्गावर नेणे व जगाला वैदिक धर्म शिकविणे ही आर्य समाजाने आपली परम श्रेष्ठ कर्तव्ये ठरविली.
अमेरिकेचे दार्शनिक विद्वान डॉ. जॅक्सन डेविस यांनीही आर्य समाजाविषयी गौरवोद्गार काढताना म्हटले होते की मी एका अशा अग्नीला पाहत आहे, जो सर्वदूर व्यापक रूप धारण करत आहे. तो प्रेमरूप अग्नी साऱ्या जगात भडकलेल्या द्वेष -मत्सराच्या अग्नीला भस्मसात करण्यासाठी प्रज्वलित होत आहे. सर्वांना पवित्र करण्यासाठी ती तत्पर आहे. याला विझविण्याकरिता भारतासह जगातील सर्वच मत-संप्रदायांनी धावपळ केली, पण हा स्वर्गसम अग्नी दिवसेंदिवस वाढत व पसरत गेला.
आर्य समाजाने धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढत चाललेल्या घोर रूढी परंपरा व अंधश्रद्धा यांना दूर करीत तर्क व विवेकाच्या कसोटीवर सत्य तेच समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. देवा-धर्माचा अनाठायी बाजार थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कृती धोरण अवलंबिले. परमेश्वर एक सर्वव्यापक, चेतन, सर्वशक्तिमान, अजर, अमर व न्यायकारी आहे.
मूर्तीमध्ये किंवा चित्रांमध्ये तो राहूच शकत नाही. तो तर सृष्टीच्या कणांकणात व्यापलेला आहे. म्हणून देवळे, तीर्थस्थळे, मठ किंवा पीर-दर्गे, गुरुद्वारा, चर्च इत्यादीमध्ये नाही. अंतरात्म्याने त्या महान शक्तीचा अनुभव घ्यावयाचा असतो. ज्याचे प्रतिपादन वेदादी शास्त्रात केले आहे. धर्मभोळेपणा, ढोंग, लबाडी, भूत, प्रेत, पिशाच इत्यादीवर विश्वास न ठेवता माणसाने बुद्धीप्रामाण्यवादी झाले पाहिजे. सर्वात आधी अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्यापक कार्य करण्यात आर्य समाज पुढारलेला होता, हे नाकारता येत नाही.
दैववादावर विसंबून न राहता किंवा फलित ज्योतिष, जन्म- लग्न- कुंडली, हस्तसामुद्रिक, मुहूर्तांचे शुभाशुभ फळ वगैरेंना बळी न पडता पुरुषार्थ केला पाहिजे. धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालून जे बुद्धीला पटेल, तेच कार्य करावे. यज्ञ म्हणजे केवळ व्यर्थ थोतांड किंवा कर्मकांड नव्हे, तो तर प्रदूषणावरचा सर्वात मोठा वैज्ञानिक उपाय आहे. सृष्टीतील दिव्य तत्वांना सुगंध प्रदान करून धार्मिक भावना जागृत करणे हा या मागचा उद्देश आहे.
आर्य समाज हा कोणताही जातीभेद, वर्ण किंवा पंथ संप्रदाय याबाबतीत भेदभाव बाळगत नाही. हे भेद मानवनिर्मित आहेत. जन्माने कोणी उच्च किंवा नीच नसतो, तो तर कर्माने असतो. हाच धागा पकडून आर्य समाजाने गुण, कर्म स्वभावावर आधारित वर्णव्यवस्था अंगिकारली आहे. अज्ञानातून निर्माण झालेली जाती व पंथांची व्यवस्था तोडण्यासाठी आर्य समाजाने आंतरपंथीय, आंतरजातीय, आंतरप्रांतीय किंवा आंतरराष्ट्रीय विवाहांना प्रत्यक्ष कृतीतून चालना दिली. धृ धारणे म्हणजे जे काही सत्य आहे, ते धारण करणे हा धर्म होय. तो एकच असून वेदप्रतिपादक मानव धर्म आहे. जगातील सर्व मानव एकसारखे आहेत. सर्वांचे पूर्वज एकच होते. हेच प्रतिपादन वेदांनी केले आहे.
आर्य समाजाने स्त्रियांचा नेहमीच गौरव केला आहे. ‘माता निर्माता भवति!’ आई ही राष्ट्राची निर्माणकर्ती आहे. म्हणून तिचा सदैव सन्मान झाला पाहिजे. पुरुषांबरोबर स्त्रियांनादेखील शिक्षण व इतर क्षेत्रांत पुढे येण्याचा अधिकार आहे. पुरुषांपेक्षाही स्त्रियांचा सर्वांत मोठा दर्जा आर्य समाजाने बहाल केला आहे.
बालविवाह, सती प्रथा, विधवा विवाह, हुंडा पद्धती यांच्याविरोधासह स्त्रीला पती निवडीचा अधिकार आर्य समाज प्रदान करतो. आर्य समाज हा चारित्र्य निर्मितीवर सर्वाधिक भर देतो. आश्रम व्यवस्थेनुसार विद्यार्थ्यांनी कटाक्षाने ब्रह्मचर्य नियमांचे पालन केले पाहिजे. तरच तन, मन व बुद्धीचा विकास होतो. यासाठी प्राचीन गुरुकुलीय शिक्षण पद्धतीचा पुरस्कार आर्य समाजाने केला आहे.
आजही भारतातील विविध ठिकाणी चालवली जाणारी मुलां-मुलींची स्वतंत्र गुरुकुले प्राच्यविद्या संस्कृत, वेद, उपनिषद, व्याकरण, दर्शन यांच्या शिक्षणाबरोबरच तसेच सर्वंकष विकासासाठी प्रयत्नशील आहेत. शाळा – महाविद्यालयांत क्रमिक पुस्तकांपेक्षा पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न करणे. त्याकरिता गुणवत्तेबरोबरच सद्व्यवहार व सदाचारसंपन्न आदर्श शिक्षक व आचार्य यांची नियुक्ती करणे, ही काळाची गरज आहे, असे आर्य समाज मानतो.
स्वातंत्र्यापूर्वी या चळवळीने झंजावाताचे रूप धारण केले होते, त्यानंतर मात्र काही प्रमाणात शिथिलता आल्याचे दिसते. उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आर्य समाजाच्या शाखा सक्रिय आहेत. त्या मानाने दक्षिण भारतात महाराष्ट्रातील काही भाग वगळता त्याचे प्रमाण फार कमी आहे. यावर कार्यकर्ते व सदस्यांनी चिंतन करण्याची गरज आहे. सध्याच्या संक्रमण युगात व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र व वैश्विक स्तरावर या संस्थेच्या वतीने सामान्य कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठांपर्यंत काळाची पावले ओळखून नूतन पद्धतीने कार्य विस्तार करण्याची वेळ आली आहे.
nayanacharya3671n@gmail.com
(लेखक संस्कृत व वेद साहित्याचे अभ्यासक असून राज्य आर्य समाज शाखेचे प्रभारी आहेत.)
