उत्तम जोगदंड
नाशिक येथील हाय प्रोफाइल विकृत भोंदू बाबा अशोक खरात यास पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने महिलांवर केलेल्या हिडीस अत्याचारांचे काळे कारनामे उजेडात येऊ लागले आहेत. त्यांची वर्णने कोणाही संवेदनशील व्यक्तीस अस्वस्थ करणारी आणि चीड आणणारी आहेत. त्याच्या अत्याचारास बळी पडलेल्या स्त्रियांमध्ये सुशिक्षित, सरकारी अधकरी असलेल्या महिलांचाही समावेश आहे. त्याच्या ‘भक्तां’मध्ये राजकीय क्षेत्रातील वजनदार असामींचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर खरातच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांवर केल्या जात असलेल्या अत्यंत अनुदार शेरेबाजीचा समाचार घेणे आवश्यक आहे.
‘एवढ्या शिकलेल्या बायकांना अक्कल कशी नाही?’, ‘गर्दीत चुकून धक्का लागला तरी शिव्या घालतात, पण खरातचे लैंगिक चाळे कसे चालतात?’, ‘खरात जे करतोय त्यास संमती असल्याचे व्हीडिओत दिसते’, ‘एवढे दिवस तो बलात्कार करतोय, मग एकदाही तोंड का नाही उघडले?’, ही काही उदाहरणे आहेत विविध माध्यमांवरील उपहासात्मक शेरेबाजीची. असे उथळ शेरे मारणाऱ्यांत महिलांचा सहभाग धक्कादायक आहे.
पीडित महिलेची मन:स्थिती कशी होती याचा विचार न करता, पूर्ण माहिती न घेता, केवळ व्हिडिओ पाहून स्वतःच न्यायाधीश बनून निष्कर्ष काढणारे हे लोक क्रूर आहेत असेच म्हणावे लागेल. त्याच वेळी स्त्रिया असे अत्याचार का सहन करतात, याचे तटस्थपणे विश्लेषण केले पाहिजे.
स्त्रियांची संमती ही एकतर मनापासून दिलेली असू शकते किंवा मनाविरुद्ध. मनाविरुद्धची संमती ही गळ्यावर चाकू ठेवून, डोक्याला पिस्तूल लावून, ओलिस ठेवलेल्या नातेवाइकाचा जीव घेण्याची धमकी देऊन, जबरदस्तीने घेतलेली असू शकते. अशा वेळी पीडिता कसलाही प्रतिकार करीत नाही म्हणून त्याला तिची संमती आहे असे म्हणणे हे तिच्यावर अन्याय करणारे आहे. म्हणून, पीडितेविषयी करुणा बाळगून तिच्या मन:स्थितीचा विचार केला पाहिजे.
खरात प्रकरणातील पीडित स्त्रियांच्या गळ्यावर या भोंदूने न चाकू ठेवलेला आहे न डोक्यावर पिस्तूल. परंतु जी माहिती बाहेर येत आहे त्यावरून असे दिसून येईल की या स्त्रियांवर खरातने तसेच समाजाने देखील अनेक अदृश्य स्वरुपातील चाकू आणि पिस्तुले रोखलेली आहेत. हा नक्की काय प्रकार आहे ते पाहू या.
खरात आपल्यात दैवी शक्ति असल्याचे, ज्योतिष-अंकशास्त्राचे ज्ञान असल्याचे सांगून, समस्या सोडवतो असा दावा करत असे. अनेक मंत्री, आमदार, नेते त्याचा सल्ला घेत असल्याने समाजात त्याचे वेगळे स्थान निर्माण झाले होते आणि लोकांचा त्याच्याव विश्वास बसू लागला. याचे कारण आहे आपल्याला हजारो वर्षांपासून अज्ञाताचे, दैवी किंवा दुष्ट शक्तीचे, चमत्कारांचे भय दाखवले जात आहे.
अनेक अनिष्ट रूढी, परंपरांचा, ज्योतिषाचा, वास्तुशास्त्र इत्यादी छद्मविज्ञानांचा चा मारा सातत्याने होत आहे. जीवनातील समस्यांवर अंगी दैवी, चमत्कारी शक्ति असलेले बुवा-बाबा मार्ग काढतात अशी मानसिकता खोलवर रुजवली गेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये चिकित्सक, विवेकी, प्रश्न विचारण्याची वृत्तीच जागृत होत नाही. मग भोंदू बुवा त्यांच्या गळ्यावर अदृश्य चाकू ठेवतो जादूटोण्याच्या, ग्रहदशेच्या भयाचा, धोक्याचा. आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याच्याकडे उपाय असतात विविध विधींचे. विधीचाच भाग म्हणून शरीरसंबंधाची मागणी देखील येते. आत्यंतिक भयामुळे, काही वाईट घडू नये म्हणून ते करून घ्यायला स्त्रिया तयार होतात.
या खरातने काही महिलांना गुंगीचे औषध पेयातून देऊन त्या गुंगीत गेल्यावर त्यांच्यावर अत्याचार केला आणि त्याचे व्हिडिओ काढून त्यांच्यावर अजून एक अदृश्य बंदूक रोखली, ती म्हणजे ब्लॅकमेल करण्याची. त्यातून त्या स्त्रियांवर तो वारंवार अत्याचार करू लागला. बरे, मग लगेच प्रश्न येतो, त्या एवढे दिवस अत्याचार सहन का करीत राहिल्या. याचे कारण आहे समाजाने त्यांच्या गळ्यावर ठेवलेला अदृश्य चाकू, तो म्हणजे योनिसूचितेचा.
त्यामुळे, आपल्याकडे बिचार्या पीडित महिलेला कलंकित मानले जाते तर बलात्कारी गुन्हेगार समाजात प्रतिष्ठेने वावरतो. पीडित महिलेला जगात तोंड दाखवणे मुश्किल होऊन बसते. तिच्या कुटुंबाची अप्रतिष्ठा होते. हल्ली तर बलात्कारी गुन्हेगारांचा सन्मान देखील केला जातोय. अशा परिस्थिति ती पीडित स्त्री आपल्यावर अत्याचार झाल्याचे दडवूनच ठेवणार आणि वारंवार होणारे अत्याचार सहन करीत राहणार.
आपल्याकडे स्त्रिया शिक्षणापासून वंचितच ठेवल्या गेलेल्या होत्या. ‘पिता रक्षति कौमार्ये, भर्ता रक्षति यौवने, पुत्रश्च स्थाविरे भावे, न स्त्री स्वातंत्र्यमर्हती’, अशी ही कसलेही स्वातंत्र्य नसलेली स्त्रीची अवस्था होती. चूल-मूल यात अडकवलेली, पतीची, कुटुंबाची सेवा करणारी, अखंड सौभाग्याची आकांक्षा करून नवर्याआधी स्वतःच मरण्याची इच्छा बाळगणारी, नवऱ्यासाठी वटसावित्री, करवा चौथ, मंगळागौर इत्यादि व्रते, कडक उपास-तापास करणाऱ्या आदर्श ‘भारतीय नारी’चे जीवन पतीच्या भोवतीच फिरत असते. त्या पतीच्या जीवालाच ग्रहदशेमुळे किंवा काळ्या जादूमुळे धोका निर्माण झाल्यास सौभाग्याचा अदृश्य चाकू गळ्यावर असल्याने ती नवऱ्याच्या जिवासाठी वाट्टेल ते करायला तयार होते.
वरील विवेचनावरून लक्षात येईल की स्त्रीने खरात यास दिलेली ‘संमती’ आणि डोक्यावर बंदूक ठेवल्याने एखाद्या स्त्रीने दिलेली ‘संमती’ यात गुणात्मक दृष्ट्या काहीही फरक नाही. डोक्यावर बंदूक टेकवल्यास बँकेचे कॅशियर दरोडेखोरांच्या पिशवीत मुकाट पैसे टाकतात, एखाद्या देशाचा मंत्री अतिरेक्यांना विमानाने सोडून येतो, दागिन्यांचा दुकानदार सोन्याचे दागिने चोराच्या बॅगेत टाकतो. तेव्हा ते सारे खुशीने, संमतीने होते, असे कसे म्हणता येईल? मग हाच न्याय अशा प्रकरणांतील पीडित स्त्रियांना का लावला जात नाही?
स्त्रियांवर आपणच रोखलेले हे संस्कृतीचे आणि व्यवस्थेचे चाकू किंवा पिस्तुले जोपर्यंत आहेत तोपर्यंत ती नाइलाजाने अत्याचार सहन करीत राहणार आहे. समाज म्हणून याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी पीडित महिलांवर अभद्र टीका करणे हे त्या महिलांवर अन्याय करणारे आहेच. शिवाय आपली दुटप्पी मानसिकता, दांभिकता दर्शवणारे आहे. ही दांभिकता सोडून देऊन स्त्रियांकडे समतेने आणि सन्मानाने पाहणे जरुरीचे आहे आणि अशी टीका करणे तात्काळ बंद केले पाहिजे.
उत्तम जोगदंड
uttamjogdand@gmail.com
