|| मिलिंद वि. आमडेकर

नेपाळ आणि काराकोरम भागात आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीची १४ शिखरं आहेत. ती सर्व कमीत कमी वेळात सर करण्याचा विक्रम निर्मल पूर्जानं हिवाळ्यातच पूर्ण केला! पण मुद्दाम हिवाळी पर्वतारोहणाच्या २०० हून अधिक मोहिमा आजवर निघाल्या, त्यांचे अनुभव कसे होते? हे दोन विषय एकमेकांपेक्षा वेगळे, त्यावरची पुस्तकंही दोन निरनिराळी…

गिर्यारोहणाच्या इतिहासात ‘१६ जानेवारी’ ही तारीख तशी दोनच वर्षांपूर्वी सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली. काय घडलं असं त्या दिवशी? ‘के-२’ (के-टू) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे- एव्हरेस्टनंतरचे- सर्वांत उंच शिखर, ऐन हिवाळ्यात १६ जानेवारी २०२० ला म्हणजे गेल्याच वर्षी प्रथमच सर करण्यात आलं. हे काराकोरम पर्वतरांगेतलं पाकव्याप्त काश्मिरातील शिखर. एव्हरेस्ट शिखर सर्वप्रथम सर करण्यात आलं १९५३ साली शेर्पा तेर्नंसग आणि एडमंड हिलरी या जोडीकडून. १९५४ साली ‘के-२’ शिखर सर झालं. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे १९५५ साली जगातील तिसऱ्या क्रमांकाचं शिखर कांचनजुंगा हे प्रथमच सर झालं. पुढे आणखी दहा वर्षांत, आठ हजार मीटरहून अधिक उंचीची जगभरातली इतरही शिखरं सर झाली. मग आठ हजार मीटर्सवरची एकूण १४ शिखरं आहेत ती जास्तीत जास्त कोण सर करते, याची चढाओढ सुरू झाली. १९८० च्या दशकात रेनॉल्ड मेसनरचं नाव चांगलंच गाजत होतं. तो सर्व १४ शिखरं सर्वप्रथम सर करणार असं वाटत होतं. त्यात तो यशस्वीही झाला. मग उरली इतर आव्हानं : वेगळ्या वाटेनं शिखरं सर करणं, कृत्रिम प्राणवायूशिवाय शिखरावर पोहोचणं, कमी वेळात शिखर गाठणं. एकट्याने शिखरं सर करणं… आणि सगळ्यात आव्हानात्मक म्हणजे ऐन हिवाळ्यात या चौदा शिखरांना गवसणी घालण्याचा प्रयत्न करणं!  कोणी आणि किती जणांनी असे प्रयत्न केले? किती जण त्यात यशस्वी झाले? मुळात ऐन हिवाळ्यात या शिखरांवर मोहिमा करण्याची खुमखुमी का? या आणि अशा प्रश्नांचा धांडोळा घेतला आहे, बर्नाडेट मॅक्डोनाल्ड या सिद्धहस्त गिर्यारोहणप्रेमी लेखिकेने तिच्या ‘विंटर ८०००’ या पुस्तकात. मुळात या हिवाळी मोहिमा केल्या जाऊ लागल्या याचं कारण देताना पोलंडचा प्रसिद्ध गिर्यारोहक अ‍ॅडम बायलेकी म्हणतो : दुसऱ्या महायुद्धानंतर वेगवेगळे देश या आठ हजार मीटर उंचीवरच्या १४ शिखरांवर मोहिमा आखत होते. तेव्हा आमच्या देशावर म्हणजे पोलंडवर तत्कालीन सोव्हिएत रशियाचा वचक होता, जणू स्टालिनशाहीचा मोठा लोखंडी दरवाजा आम्हाला कोंडून होता. हताशपणे आम्ही फक्त बातम्या ऐकायचो. १९५० ते १९६४ या १४ वर्षांत सर्व १४ उंच शिखरं सर झाली. १९८० च्या  दशकात हळूहळू हा लोखंडी दरवाजा किलकिला होऊ लागला. आता गिर्यारोहणातील कसब दाखवायचं तर पोलंडच्या गिर्यारोहकांसमोर आव्हान होतं ते वेगळ्या मार्गानं शिखरं सर करण्याचे किंवा तोपर्यंत फारसे प्रयत्न न झालेल्या हिवाळी मोहिमांचं. १७ फेब्रुवारी १९८० रोजी जगातलं सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट ऐन हिवाळ्यात पोलंडच्या ख्रिस्तोप विलिश्की आणि लेशेक चिहे  यांनी सर केलं.

हे पुस्तक लिहिताना बर्नाडेट यांनी अनेक नामवंत गिर्यारोहकांच्या मुलाखती घेतल्या. अनेकांचे अनुभव वाचले. उन्हाळ्यात ही उंच हिमशिखरं चढायची, हेही एक मोठे आव्हान असताना हिवाळी मोहिमांना आणि पर्यायाने गिर्यारोहकांना किती प्रकारच्या प्रतिकूलतेला सामोरं जावं लागतं त्याची कल्पनाच केलेली बरी. उणे २० ते उणे ५० अंशांपर्यंत खाली जाणारे तापमान, वरचेवर घोंघावणारी जीवघेणी वादळं, बर्फात अस्पष्ट होणाऱ्या वाटा, आणखीच विरळ होणारं हवामान, त्यामुळे श्वास घेताना येणाऱ्या अडचणी, अशा प्रतिकूलतेतही गिर्यारोहक आव्हानं स्वीकारतात. पोलंडचा प्रसिद्ध गिर्यारोहक वोयटेक कुर्तीका म्हणतो तशी ही त्यांची  ‘आर्ट ऑफ सर्फंरग’ – ‘हाल सोसण्याची कला’ –  असते. बर्नाडेट यांनी या १४ शिखरांपैकी १३ शिखरं ज्या क्रमाने हिवाळ्यात सर झाली त्यांची नेमकी आणि मोजकी माहिती दिली आहे. ‘के-२’ हे दुसऱ्या क्रमांकाचे शिखर हिवाळ्यात सर करण्यासाठी किती आणि कोणी प्रयत्न केले, हे शेवटच्या प्रकरणात दिलं आहे.

पण हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच नेपाळच्या १० शेर्पांनी ‘के-२’ शिखर सर केलं. या दहा जिगरबाज शेर्पांमध्ये निर्मल पूर्जा (याचीच अन्य नावं निम्सदाई किंवा निम्स अशीही आहेत) हा एक महान गिर्यारोहक होता. त्याचे विक्रम ऐकून अक्षरश: अवाक् व्हायला होतं. हे त्याचे अनुभव त्यानं ‘बियॉण्ड पॉसिबल’ या पुस्तकात कथन केले आहेत. पुस्तकाची सुरुवात होते ती, ‘नंगा पर्बत’ हे जगातलं नवव्या क्रमांकाचं शिखर सर केल्यानंतर, भराभर उतरण्याच्या नादात निर्मल दोर सोडून उतरण्याचा प्रयत्न करतो. काही क्षणांतच त्याच्या पायाखालचा बर्फ सरकू लागतो. त्याचा तोल जाऊन तो खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत घसरू लागतो. पंधरा- वीस- पंचवीस मीटर खाली खाली… आता वेग आणखीच वाढू लागतो… वेळीच नाही प्रयत्न केला तर कपाळमोक्ष ठरलेला.  इतक्यात त्याला एक दोर दिसतो. निर्मल जिवाच्या आकांतानं दोराकडे झेपावतो. दोर हातात आल्यावर एका झटक्यासरशी त्याचं घसरणं थांबतं. परिस्थितीची जाणीव व्हायला त्याला काही क्षण लागतात. सुदैवानं त्याचं गिर्यारोहणाचं साहित्य शाबूत असतं. बुटाला बांधलेले क्रॅम्पॉन्स जागेवर असतात. कुठे काही लागलेलं नाही हे लक्षात आल्यावर निर्मल त्याच दोराला धरून खाली उतरू लागतो आणि यथावकाश तळाच्या कॅम्पवर पोहोचतो! ३ जुलै २०१९ या तारखेची ही घटना त्याला हलवून जाते. मग तो एक मोहीमच आखतो, तिचं नाव ‘प्रोजेक्ट पॉसिबल’! या मोहिमेअंतर्गत तो जगातली ८००० मीटरहून उंच अशी सर्व १४ शिखरं एका वर्षात सर करण्याचा प्रयत्न करणार असतो.

जेव्हा त्यानं हा मनोदय व्यक्त केला तेव्हा अनेकांनी त्याला वेड्यात काढलं. एका चित्रवाणी वाहिनीनं तर त्याची तुलना पोहत चंद्रावर जाण्याशी केली. निर्मल पूर्जा त्यामुळे खचला नाही, विचलित झाला नाही. त्याचा आत्मविश्वास इतका दृढ होता की त्यानं त्यासाठी आपली ब्रिटनच्या ‘स्पेशल बोट सर्व्हि स’मध्ये असलेली नोकरी सोडली. मोहिमेला वाहून घेतलं. साथीदारांची टीम जमवली आणि पहिल्या टप्प्यात या १४ पैकी नेपाळमधली सहा शिखरं सर करायचं ठरवलं. सुरुवात ‘अन्नपूर्णा-१’ या ८०९१ मीटर उंचीच्या, दहाव्या क्रमांकाच्या शिखरापासून केली. निर्मल कृत्रिम प्राणवायू वापरून चढाई करत असे. त्याची सुरुवातीला अनेकांकडून खिल्ली उडवली गेली. त्यावर निर्मलचं म्हणणं असे की आपण जिवंत राहणं आवश्यक आहेच, पण वाटेत कोणी गरजू असला तर त्याला कृत्रिम प्राणवायू देऊनच मदत करता येणं शक्य असतं आणि तशी मदत त्याने एव्हरेस्ट शिखर सर करून उतरताना सीमा नावाच्या भारतीय महिला गिर्यारोहकाला केली. अन्नपूर्णा शिखरावरून उतरताना डॉ. चिन या मलेशियन गिर्यारोहकाला, तर कांचनजुंगा शिखर उतरताना विप्लब आणि कुंतल या दोघांना खाली उतरण्यास निर्मलनं मदत केली. जवळचा कृत्रिम प्राणवायू दिला. विप्लब आणि कुंतल या दोघांचे प्राण वाचू शकले नाहीत, पण भरकटलेल्या रमेश रायला ते वाचवू शकले.

निर्मलची प्रत्येक मोहीम थरारक घटनांनी भरलेली होती. तशाच थरारक गोष्टी बर्नाडेट यांनी त्यांच्या पुस्तकात वर्णिलेल्या आहेत. मग ती नंगा पर्बत शिखर सर करून उतरताना अडकून पडलेली फ्रान्सची गिर्यारोहक एलिझाबेथ रिव्होल हिला वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न असोत वा ‘गशेरब्रम-२’ (८०३५ मीटर, क्रमांक आठ)  हे शिखर सर करून उतरताना सिमोन मोरो, डेनिस उरुब्को आणि कोरी रिचर्डस हे जवळजवळ हिमस्खलनात (अँव्हलांच )मध्ये गाडले गेले असूनसुद्धा सिमोन मोरो बर्फाच्या ढिगाऱ्यातून बाहेर येऊ शकला आणि त्याने दोघा साथीदारांना वाचवलं, याचा थरार असो! मात्र, ‘ब्रॉडपीक’ (८०४७ मीटर, क्र. १२) हे शिखर सर करून उतरत असताना अशीच झुंज मासिऐज बर्बेका आणि  तोमाझ कोवलस्की यांनीही दिली, ती यशस्वी न ठरता त्यांचा करुण अंत झाला. ते सगळं वाचताना अंगावर काटा येतो. बर्नाडेटला माहिती घेताना कळलं की हिवाळी मोहिमा एक-दोन नाही तर जवळपास दोनशे आयोजित केल्या गेल्या होत्या. ज्यात १५०० हून अधिक गिर्यारोहकांनी भाग घेतला होता. अनेक जण जिवंत परतले नाहीत. अशा वेळी मनात विचार येतो, कोणती प्रेरणा या गिर्यारोहकांना अशी  आव्हानं स्वीकारायला भाग पाडते? की ओढून नेते? इतिहासात नाव कोरण्याची इतकी अहमहमिका का? अशा वेळी आपल्या कुटुंबाचा, जबाबदारीचा विचार येत नाही का?

इतिहासात नाव नोंदवण्याची प्रेरणाच निर्मल पूर्जाकडून हे अविश्वसनीय साहस करून घेते… ८००० मीटरहून अधिक उंचीची सर्व १४ शिखरं सर्वांत कमी कालावधीत सर करण्याचा विक्रम २०१३ पासून २०२० पर्यंत कोरियाचा गिर्यारोहक किम चांग हो याच्या नावावर होता. तो कालावधी होता : सात वर्षे १० महिने, सहा दिवस. निर्मल पूर्जा यानं विक्रमांची अशी काही शिखरं उभी केली की वाचणारे अवाक् व्हावेत. निर्मलनं ही १४ शिखरं केवळ सहा महिने, सहा दिवसांत सर केली! एव्हरेस्ट, लोत्से आणि मकालु ही तीन शिखरं तर केवळ ४८ तास, ३० मिनिटे  या विक्रमी वेळेत सर केली. जगातली पहिली पाच उंच शिखरे एवरेस्ट, के-टू, कांचनजुंगा, लोत्से आणि मकालू ही विक्रमी ७० दिवसांत सर केली. काराकोरम पर्वतराजीमध्ये ८००० मीटरवरची पाच शिखरे  आहेत : के-टू, नंगा पर्बत, गशेरब्रम-१, ब्रॉड पीक आणि गशेरब्रम-२. ही पाच शिखरं केवळ २३ दिवसांत निर्मलनं सर केली. एकाच मोसमात (उन्हाळ्यात) ८००० मीटर्सवरची अन्नपूर्णा, धवलगिरी, कांचनजंगा, एव्हरेस्ट, लोत्से, मकालू ही ६ शिखरे केवळ ३१ दिवसांत सर करून विक्रमच प्रस्थापित केला. पण बाकीची शिखरे त्याने हिवाळ्यात सर केली. ही दोन्ही पुस्तके वाचनीय आहेत. रंगीत छायाचित्रं आणि माहितीपूर्ण  परिशिष्टांमुळे संग्राह्यदेखील आहेत.