बुकरायण : विवेकी बेटाचं (भाबडं?) चित्रण…

‘आयलंड’मधलं पाला हे बेट सुमात्रा आणि अंदमान या बेटांच्या मधोमध असलेलं एक जगावेगळं बेट.

‘आयलंड’ लेखक : आल्डस हक्सली प्रकाशक : चॅटो अ‍ॅण्ड विंडस पृष्ठे : ३४४; किंमत : २७० रु.

|| सई केसकर

आल्डस हक्सलीच्या ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ (१९३२) या कादंबरीवर उतारा म्हणून त्यानंच १९६२ साली शेवटची कादंबरी- ‘आयलंड’ लिहिली असं म्हटलं जातं. ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’मधल्या कल्पनांना एक वेगळाच आयाम देऊन हक्सलीनं, डिस्टोपियन कादंबरीतल्याच कल्पना युटोपियात वापरल्या आहेत. त्यामुळे ‘आयलंड’ आणि  ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ अशी तुलना करणं मजेचं आहेच, पण आकलनात भर टाकणारंही आहे. 

माणसांवर पाळत ठेवणे, त्यांची स्वातंत्र्यं कमी करणे, त्यांना भयग्रस्त ठेवणे अशी इतर डिस्टोपियन लेखनातली वैशिष्ट्यं ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’मध्ये नाहीत. ही अक्षरश: बाटलीतून जन्माला येणाऱ्या माणसांची कथा असल्यामुळे, बाटलीतून ‘उगवत’ असतानाच या अर्भकांवर वेगवेगळ्या रसायनांचे मारे करून बुद्धिमत्तेनुसार त्यांच्या जाती तयार केल्या जातात, त्यांचं संगोपन सामूहिक पद्धतीनं होतं. संमोहनशास्त्र वापरून त्यांना हा सगळा डिस्टोपिया म्हणजेच स्वर्ग आहे असं पढवलं जातं. त्यामुळे आपण आहोत त्यापेक्षा वेगळ्या जगात जास्त आनंदी राहू असं इथल्या लोकांना वाटतच नाही.

‘आयलंड’मधलं पाला हे बेट सुमात्रा आणि अंदमान या बेटांच्या मधोमध असलेलं एक जगावेगळं बेट. पालावर बाहेरच्या लोकांना मज्जाव आहे. बेटावर तेलाच्या खाणी आहेत, पण तेल काढून श्रीमंत होण्याला जनतेचा विरोध आहे. या तेलसाठ्यांवर डोळा असलेल्या एका उद्योगपतीशी संगनमत करून विल फार्नबी हा पत्रकार आपली होडी बेटावर आदळून घेत बेटावर दाखल होतो. त्यातल्या दुखापतीवर उपचार घेणाऱ्या विलची भेट रॉबर्ट मॅकफेल नामक डॉक्टरशी आणि सुशीला नावाच्या त्याच्या सुनेशी होते. रॉबर्टचं कुटुंब आणि पालाचं राजघराणं यांचे तीन पिढ्यांचे घनिष्ट संबंध. तीन पिढ्यांच्या वास्तव्यानंतर, राजघराण्यातील तरुण पिढीला त्याचाही कंटाळा आलेला. पालाच्या राणीनं एका धार्मिक पंथाचा मार्ग धरलेला असतो आणि पालामधलं जगणं तिला आता स्वैराचार वाटत असतो. पालातलं तेल विकून श्रीमंत व्हायची स्वप्नं राणी आणि राजकुमार बघत असतात. रॉबर्ट हा मात्र पालाच्या संस्कृतीच्या बाजूचा. चिकित्सक वृत्तीचा विल ‘पाला’ नावाच्या नंदनवनाकडे सुरुवातीपासूनच संशयानं बघतो. वाचकही विलच्या भूमिकेतून पुस्तक वाचू लागतात.

पालनीज संस्कृतीत धर्माला स्थान आहे, देवळं आहेत, लोक ध्यानधारणा, उपास-तापास, प्राणायाम करतात, पण अंधश्रद्धेला तिथे जागा नाही. प्रत्येक धर्मविधीचा शरीरावरचा परिणाम विज्ञानाधारे पडताळून मगच त्याचा अवलंब होतो. किशोरवयीन मुलांना शाळेतच ‘मैथुन’ शिकवलं जातं. संभोगातून आत्मशोधाची कल्पना हक्सलीनं भारतीय तंत्रविद्येतून घेतलेली आहे. या शिक्षणामुळे पालाची प्रजा संभोगाबद्दल संकुचित विचार करत नाही. त्याबद्दल बोलणंच काय, पण कृतीही निषिद्ध नाही. त्यामुळे या बेटावर विकृत संभोगासक्ती नाही किंवा संभोग हा सत्ता गाजवण्याचा मार्गही नाही. गर्भनिरोधाच्या साधनांचा मुबलक पुरवठा आहे. त्यामुळे लोक, विशेषत: स्त्रिया, लैंगिक स्वातंत्र्य अनुभवू शकतात. असं असलं तरी पालामधले स्त्री-पुरुष उत्कट प्रेमही अनुभवतात. एकत्र संतती जन्माला घालतात. ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’मध्येही प्रजेला लैंगिक स्वातंत्र्य असल्याचं सांगितलं जातं. पण परीक्षानळीमधून कृत्रिमरीत्या जन्मलेल्या, त्या लोकांना लहानपणापासून वस्तूंच्या-शरीरांच्या उपभोगाची शिकवण दिलेली असते. त्यांच्या ‘स्वातंत्र्या’ला ही पाश्र्वभूमी असते. उलट पालावासीयांनी आपलंसं केलेलं स्वातंत्र्य डोळस आणि विवेकी आहे. 

‘आयलंड’मध्ये एका प्रकारच्या बुरशीत सापडणाऱ्या सिलोसायबीन या रसायनाचा उल्लेख आहे. त्याचे शरीरावरचे परिणाम एलएसडी (लिसर्जिक अ‍ॅसिड डीथायलामाइड) सारखे असतात. सिलोसायबीनपासून तयार केलेलं ‘मोक्ष मेडिसिन’ पालाची प्रजा वापरू शकते. हक्सलीनं  ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’मध्ये ‘सोमा’ नावाचं असंच रसायन उल्लेखलं आहे. पण ‘आयलंड’मध्ये मात्र पालातले लोक हे औषध वर्षातून एखाद-दोनदाच घेतात. रोज त्या मार्गावर जाण्यासाठी ध्यानधारणाच करतात. ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’मध्ये, नको असलेल्या विचारांपासून सुटण्यासाठी किंवा आनंद उपभोगण्यासाठी ‘सोमा’ घेतलं जातं. व्यसन लावण्याची क्षमता असलेल्या एकाच रसायनाकडे बघण्याचे हे दोन दृष्टिकोन बोलके आहेत.

व्यसनकारक रसायन अधिक धोकादायक की व्यसन लावून घेणारं शरीर आणि मन? आपला आपल्या शरीरावर संपूर्ण ताबा असतो का? शरीराच्या माध्यमातून आपण जसे भौतिक अनुभव घेतो – भूक लागली की जेवतो, कामवासना जागृत झाली की संभोग करतो, थकल्यावर विश्रांती घेतो – तसेच आपल्या अबोध मनाचे दरवाजे उघडणारे अनुभव आपण अशी रसायनं डोळसपणे वापरून घ्यावेत की नाही? आज कायदेशीर असणारे आणि व्यसन लावू शकणारे पदार्थ खरंच बेकायदा पदार्थांपेक्षा सौम्य आहेत का? त्यांबद्दल सार्वत्रिक भीती असण्याचं कारण काय? लागलेलं व्यसन सुटत नाही हेच भीतीचं कारण असेल, तर ही भीती साखरेच्या व्यसनाबद्दल, सोशल मीडिया ज्यावर चालतो त्या डोपामिनच्या व्यसनाबद्दल का वाटत नाही? आपण साखर आणि फेसबुक बेकायदा करावीत का? हे सगळे प्रश्न दोन्ही पुस्तकं वाचून पडतात.

पालामध्ये बालसंगोपन समूहानं केलं जातं. प्रत्येक मुलाला त्याच्या जन्मदात्यांबरोबरच अनेक उप-आया आणि उप-वडील असतात. आपल्या पालकांशी पटेना झालं, पालकांच्या भांडणांमुळे मुलांना घरात नकोसं वाटू लागलं तर ते कुठल्याही उप-कुटुंबात जाऊन राहू शकतात. अशा प्रकारच्या व्यवस्थेला ‘म्युच्युअल अ‍ॅडॉप्शन क्लब’ असं नाव दिलेलं आहे. मुलं मोठी होत असताना अनेकदा, आईवडिलांच्या नकारात्मक मानसिक अवस्थेचा मुलांवर दूरगामी परिणाम होतो. आईच्या अतिप्रेमामुळे किंवा दुर्लक्षामुळे मुलांच्या मानसिकतेमध्ये होणाऱ्या बदलांवर बरंच संशोधन मानसशास्त्रात झालं आहे. असं होऊ नये म्हणून ‘आयलंड’मधली ही व्यवस्था. याउलट ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’मधलं सामूहिक बालसंगोपन कुटुंबसंस्थेलाच झुगारणारं. यंत्रासारखी माणसं तयार करण्यात अडथळा येऊ नये, म्हणून कुटुंबाचा आणि विशेषत: आईचा मुलावरचा प्रभाव पुसून टाकायचा प्रयत्न केलेला दिसतो. ‘आयलंड’मधलं पालकत्व काळजीवाहू आहे. 

पालावासी शांतताप्रिय आहेत. त्यांच्याकडे स्वत:चं सैन्य नाही. शेती आणि उद्योग सहकारपद्धतीनं होतात. पालातले लोक गरजेपेक्षा जास्त उत्पादन करत नाहीत. शस्त्रास्त्रं, परकीय कर्ज आणि वापरून फेकण्याच्या भरमसाट वस्तू या त्रिकोणावर पाश्चात्त्य संस्कृती टिकलेली आहे, असं हक्सली लिहितो. पाश्चात्त्य, भोगवादी संस्कृतीतून निर्माण झालेला ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’सारखा डिस्टोपिया आणि पूर्व-पश्चिमेच्या सहकारातून जन्माला आलेला ‘आयलंड’मधला युटोपिया या दोन्हींकडे बघताना एक महत्त्वाचा फरक जाणवतो, जो वर दिलेल्या सगळ्याच कल्पनांना कवेत घेणारा आहे.

जगातील भोगवादी, भांडवलशाही संस्कृती दु:खाच्या आणि मरणाच्या भीतीच्या पायावर रचलेल्या असतात. आयुष्य क्षणभंगुर आहे आणि आपल्याला दु:ख होणं हा आपला पराजय आहे अशा धारणेतून समाज भोगवादी होतात. याउलट, जन्माला आल्यावर दु:ख आणि मरण अपरिहार्य आहेत, फक्त त्यांना सामोरं कसं जायचं एवढंच आपल्या हातात आहे अशा धारणेवर आधारित असलेले समाज आंधळेपणाने भोगवादी होत नाहीत. पश्चिमेकडचे तर्कशुद्ध विचार, तंत्रज्ञान आणि  व्यक्तिस्वातंत्र्य यांना पूर्वेकडच्या आध्यात्मिकतेची आणि करुणेची साथ मिळाल्यावर हक्सलीच्या कल्पनेतलं आदर्श असं आशावादी जग ‘आयलंड’ या कादंबरीत तयार होताना दिसतं. अर्थात, टोकाचा डिस्टोपिया नकोसा होतो, तसा टोकाचा युटोपियादेखील कंटाळवाणा, कधी अतिभाबडा, असा वाटतो. राजघराण्यातील सदस्यांचा पालाच्या प्रजेशी चाललेला संघर्ष शेवटी टोकाला जातोच. त्यांचं नक्की काय होतं हे कादंबरीतच वाचण्यासारखं आहे. खरं जग मात्र, डिस्टोपिया आणि युटोपिया या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी आहे आणि ते तिथेच राहायला हवं असं या दोन्ही कादंबऱ्या वाचून वाटतं.

‘आयलंड’ प्रकाशित झाल्यावर वर्षभरातच हक्सली कर्करोगाने गेला. त्याच्या आयुष्यात त्यानं अनुभवलेल्या अनेक गोष्टी या कादंबरीत आल्या आहेत. तरुणपणी जागृत झालेल्या जिज्ञासेचा जन्मभर चिकाटीनं पाठपुरावा करणं, वेदान्ताचा सखोल अभ्यास, मेस्कॅलिन आणि एलएसडी यांसारख्या पदार्थांचं क्षणभंगुर आनंदासाठी सेवन न करता त्याबद्दल विस्तृत लेखन करून अनेक कलाकारांना प्रेरित करणं असं बरंच काही. (‘द डोअर्स’ नावाच्या प्रसिद्ध रॉक बँडचं नाव हक्सलीच्या ‘द डोअर्स ऑफ पर्सेप्शन’वरून प्रेरित आहे). हक्सली १४ वर्षांचा असताना त्याच्या आईचं निधन झालं. या घटनेचाही प्रभाव हक्सलीच्या लेखनात जाणवतो.

‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ ते ‘आयलंड’ हा प्रवास हक्सलीच्या आयुष्यानं घडवलेल्या त्याच्या दृष्टिकोनाचाच प्रवास ठरतो!

saeekeskar@gmail.com  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aldous huxley brave new world excerpt from the novel akp

Next Story
व्यवस्थेचीच ‘जुगाड’बाजी
ताज्या बातम्या