वेदनेची घरंदाज बाजारपेठ

रेमंड सॅक्लरला तर दानशूरतेसाठी इंग्लंड आणि फ्रान्स या देशांचं ‘नाइटहूड’ समारंभपूर्वक मिळालं.

‘एम्पायर ऑफ पेन’ लेखक : पॅट्रिक रॅडन कीफ प्रकाशक : डबलडे पृष्ठे : ५१२, किंमत : ४,७७० रु.

|| अरुंधती देवस्थळे

अमेरिकेतल्या उच्चभ्रू वर्तुळात कलासक्त, दानशूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सॅक्लर कुटुंबाची ‘सत्यकथा’ धाडसीपणे उजेडात आणणाऱ्या पुस्तकाविषयी…

गेली ७० वर्षं अमेरिकेतल्या उच्चभ्रू वर्तुळात सॅक्लर कुटुंब त्यांच्या कला आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या घवघवीत देणग्यांसाठी ओळखलं जातं. या देणग्या केवळ स्वदेशातील न्यू यॉर्कमधील ‘द मेट्रोपॉलिटन म्युझिअम ऑफ आर्ट (मेट)’ किंवा हार्वर्ड विद्यापीठासारख्या मातब्बरांना नव्हेत, तर ऑक्सफर्ड आणि लूव्रपासून बीजिंगपर्यंतच्या प्रतिष्ठित शैक्षणिक आणि कला संस्थांना पाठबळ देणाऱ्या. अनेक ठिकाणच्या फलकांवर ऋणनिर्देशात झळकणारं हे नाव, पण या कुटुंबाच्या धनार्जनाचा स्रोत मात्र दीर्घकाळ वादग्रस्त होता. २०१७ मध्ये पॅट्रिक रॅडन कीफ या शोधपत्रकारिता करणाऱ्या आणि अतिशय वाचनीय शैलीतील लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या अमेरिकी पत्रकाराने ‘द न्यू यॉर्कर’मध्ये एक दीर्घ लेख लिहिला. ‘फोब्र्स’च्या यादीतील अग्रगण्य २० अमेरिकी श्रीमंतांच्या गणतीत जाऊन बसलेल्या सॅक्लर कुटुंबानं हे प्रचंड धन ‘ऑक्सीकोन्टिन (नार्कोटिक ऑक्सीकोडॉन हायड्रोक्लोराइड)’ या मादक पदार्थापासून बनवलेल्या आणि रुग्णांना वेगानं व्यसनाकडे नेणाऱ्या वेदनाशामकातून मिळवल्याचा खळबळजनक आरोप या लेखातून कीफनं पुराव्यांनिशी लोकांसमोर मांडला. नंतरच्या वर्षांत वादविवाद, न्यायालयीन खटले यांचं अक्षरश: मोहोळ उठलं. दहा हजार कोट रुपयांहून अधिक संपत्तीचे मालक खानदान, या बेजबाबदार औषधामुळे, गेल्या २५ वर्षांत गेलेल्या पाच लाखांवर बळींसाठी जबाबदार ठरवलं गेलं. प्रकरणाची गर्मी इतकी वाढली की, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निवेदन काढून सॅक्लर कुटुंबाच्या मालकीच्या ‘पड्र्यू फार्मा’ आणि ओपीऑइड या वेदनाशामकाचा जीवघेणा व्यापार करणाऱ्या सर्व कंपन्यांना कायद्याचा बडगा दाखवावा लागला. मध्यंतरीच्या काळात, कीफनं ट्विटरवरून वेचक वार्तानोंदींचा मारा चालूच ठेवला होता. ठिणगीचा वणवा होत गेला. पड्र्यू फार्मा, सरकार आणि औषध प्रिस्क्राइब करणारे डॉक्टर्स यांच्यावरल्या अडीच हजारांहून अधिक न्यायालयीन खटल्यांच्या निमित्तानं अनेक गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आली.

…अन् या वादळातून कीफचं ‘एम्पायर ऑफ पेन’ हे पुस्तक आकारास आलं, जे यंदा एप्रिलमध्ये प्रसिद्ध झालं. आरोग्याइतकेच मानवी हक्कांबद्दल अतिशय जागरूक असलेल्या अमेरिकी समाजाच्या जीवनमरणाशी थेट संबंध असलेलं हे पुस्तक, कीफनं आजवर कमावलेल्या जनमानसातील विश्वासार्हतेमुळे बहुचर्चित ठरणार हे उघडच होतं. कीफच्या कीर्तीचा पाया ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मधल्या लेखनानं घातला गेला होता. वेगवेगळ्या गुन्ह््यांची उकल करणारी ‘चॅटर’, ‘द स्नेकहेड’ आणि ‘से नथिंग’ ही त्याची आधीची तिन्ही पुस्तकंही गाजलेली आहेत. तात्पर्य हेच की, पॅट्रिक कीफ हे रसायन भक्कम कण्याचं आहे, मिळालेल्या माहितीचं सोनं करण्याची ताकद त्याच्या लेखणीत आहे.

‘न्यू यॉर्कर’मधील लेख आणि चार वर्षांनी आलेलं हे पुस्तक, या दोन्हीसाठी हाडाचा पत्रकार असलेल्या कीफनं सॅक्लर कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेण्याचे अनेक प्रयत्न केले होते. त्यांना- ‘तुमच्या बाजूने निवेदन तरी द्या’ अशा विनंत्या केल्या होत्या. पण त्यांच्याकडून उडवाउडवीची, डॉक्टरांना न शोभणारी प्रतिक्रिया येत असे. पुस्तकाच्या वेळी तर पाच-सहा वेळा त्यांनी- ‘आम्हाला विचार करायला वेळ द्या,’ असं म्हणत महिना-महिनाभर वेळ मागून घेतला आणि नंतरही प्रतिसाद दिला नाही तो नाहीच. लढाई सरळ नव्हतीच, कारण प्रश्न व्यावसायिक आणि सामाजिक नैतिकतेचा होता, कायद्यातल्या कच्च्या दुव्यांतून पळवाटा शोधण्याचा होता, त्यासाठी गेली चाळीसेक वर्षं नामी वकिलांची फौज गलेलठ्ठ शुल्क देऊन नेमण्यात आलेली आहे.

तर… या नाट्याची सुरुवात झाली १९५०-६० च्या दशकात. शीर्षस्थ होते डॉ. आर्थर सॅक्लर! विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, वेगवेगळ्या युरोपीय देशांतून अमेरिकेत आलेल्या आयझॅक आणि सोफी सॅक्लरची आर्थर, मॉर्टिमर आणि रेमंड ही तीन मुलं. आईवडील मध्यमवर्गीय ज्यू, आदर्शवादी म्हणून मुलांनी डॉक्टर व्हावं आणि लोकांना जीवनदान द्यावं अशी स्वप्नं पाहणारे. खाचखळग्यांतून वाट काढताना वडील मुलांना एकच गोष्ट वारंवार सांगत : ‘मी तुम्हाला पैसाअडका सोडून नाही जाऊ शकणार, पण नाव सोडून जाईन.’ समाजात नाव राखून मुलांनी सन्मानानं जगावं अशीच त्यांची इच्छा. तिन्ही मुलं डॉक्टर तर झाली. वडिलांमागे, स्वत:बरोबर भावांच्या शिक्षणाची जबाबदारी मोठ्या आर्थरनं आर्थिक अडचणी झेलत पार पाडली. तो कलासक्त मनाचा होता, त्याला मानसशास्त्रात अतिशय रस होता; पण त्या काळात पैसा कमावणं ही कुटुंबाची गरज होती. भावांचं हे त्रिकूट आयुष्यभर व्यवसायात एकत्र राहिलं. तल्लख बुद्धीच्या महत्त्वाकांक्षी आर्थरला त्याच्या आयुष्यातल्या नात्यांमध्येही बऱ्या-वाईटाची फारशी चाड नसावी. वेदनाशामक औषधाचा फॉम्र्युला बदलून नवं हुकमी औषध तयार करायचं. त्याच्या ‘साइड इफेक्ट्स’ची फिकीर न करता, फक्त चांगली बाजू लोकांसमोर आणून, त्याचं प्रभावी ‘मार्केटिंग’ करायचं आणि खोऱ्यानं पैसा मिळवायचा, ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली. त्यासाठी सरकारी अन्न आणि औषध प्रशासन विभागातील (एफडीए) नैतिक प्रश्न झटकून टाकणारी ‘कामाची माणसं’ परवान्यासाठी भरपूर किंमत देऊन विकत घ्यायची, आणि तेच तंत्र या साखळीतल्या फार्मासिस्ट्स, डॉक्टर्स आणि मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हज्साठी वापरायचं.

१९५० च्या दशकात अमेरिकेत आलेल्या ‘पेन मॅनेजमेंट’च्या लाटेचा फायदा घेत, आर्थरनं दूरदृष्टीनं केलेल्या एका खेळीतून, प्रथम ‘फायझर’ कंपनीसाठी पेनिसिलीनचा फॉम्र्युला वापरून ‘टेरामायसिन’ बनवून बाजारात आणलं. त्याचं भरघोस यश पाहून थोड्याच वर्षांनी ‘पड्र्यू फ्रेडरिक’ ही कंपनी विकत घेऊन ‘लिब्रियम’ व ‘वॅलिअम’ या झोपेच्या गोळ्या बाजारात आणल्या आणि अफाट पैसा कमावला. नंतर ‘मॅक्अ‍ॅडम्स’नामक वैद्यकीय क्षेत्रातील जाहिरात कंपनी विकत घेऊन ती आपल्या भावांना चालवायला दिली. या जाहिरात कंपनीतर्फे १९६० मध्ये डॉक्टरांसाठी त्यांनी पहिलं वृत्तपत्र सुरू केलं. पुढल्या काही वर्षांत ते आठ प्रमुख भाषांतून २० देशांत मोफत वाटलं जाऊ लागलं. औषध कंपन्या त्या वार्तापत्राला भरपूर जाहिराती देत आणि त्यातून भरघोस प्राप्ती होत असे, हे वेगळं सांगायला नकोच!

त्याच दरम्यान, म्हणजे १९६१ मध्ये, रॉकेफेलर घराण्याशी स्पर्धा करू पाहणाऱ्या आर्थरनं ‘मेट्रोपॉलिटन म्युझिअम ऑफ आर्ट (मेट)’च्या पुनर्बांधणीसाठी दीड लाख डॉलर्सची देणगी देऊ करून, वरच्या मजल्यावरील एक दालन सॅक्लर कुटुंबाच्या नावावर करून घेतलं. त्यात मांडलेल्या कलाकृती आपल्या खासगी संग्रहातून भेट दिल्या आणि तिन्ही भावांची नावं दालनाबाहेर कोरण्यात आली. त्यातही चलाखी अशी की, वस्तूंच्या खरेदीची किंमत आर्थरखेरीज कोणाला माहीत नव्हतीच, संग्रहालयाला देताना मात्र त्याची बाजारातील सद्य  किंमत लावून त्यांनी करात सूट मिळवली होती! आपली देणगी रॉकेफेलरएवढीच असल्यानं आपल्याला ‘मेट’च्या प्रतिष्ठित मंडळावर घ्यावं यासाठी आर्थरनं भगीरथ प्रयत्न केले. त्याच्या कीर्तीवर तोवर संशयाची सावली पडली होती, पण प्रकरण आटोक्यात होतं. नंतर इजिप्तकडून ‘मेट’ला मिळालेल्या ‘टेम्पल ऑफ देन्दूर’साठी आर्थरनं दणदणीत ३५ लाख डॉलर्सची देणगी देऊन ‘रॉकेफेलर विंग’शेजारी ‘सॅक्लर विंग’ (१९७८) बनवून घेतला. बड्या संस्थांना देणग्या देत, कर वाचवत, खानदानी धनवान वर्तुळात शिरण्याचा हव्यासच सुरू झाला. रेमंड सॅक्लरला तर दानशूरतेसाठी इंग्लंड आणि फ्रान्स या देशांचं ‘नाइटहूड’ समारंभपूर्वक मिळालं.

आर्थिक तंगी झेललेल्या कुटुंबात असा एकदम पैसा धो-धो कोसळू लागला, की जे चांगलं होतं ते जगासमोर दातृत्वानं आणलंच, पण जे अक्षम्य अध:पतन होतं त्याचे पडसाद तिन्ही भाऊ आणि त्यांच्या पुढल्या पिढ्यांमध्येही उमटले. कदाचित आर्थरला कुटुंबाच्या तत्त्वांशी त्यानं घडवून आणलेली फारकत बोचत होती, म्हणून धारदार वृत्तीच्या आईशी तो अंतर राखून असे. मधल्या मॉर्टिमरनं मात्र तिचा आयुष्यभर सांभाळ केला. सुबत्तेनंतर आर्थरला चटक लागली देश-विदेशांतल्या, विशेषत: आशियातल्या कलाकृती खरीदण्याची. तर रंगिल्या स्वभावाच्या मॉर्टिमरला व्यवसाय वाढवण्याच्या निमित्तानं प्रवासाची. पण सॅक्लर परिवाराबद्दल अचानक कुणकुण सुरू झाली ती साठच्या दशकात. पत्रकार जॉन लिअरनं प्रश्न विचारण्यास सुरुवात केली होती आणि सीनेटर केफाऊव्हर यांनी मागोवा घ्यायचा प्रयत्न केला, पण काही निश्चित हाताला लागेना. आर्थरनं हाताशी धरलेले मानसोपचारतज्ज्ञ फेलिक्स मार्टी इबानेझ आणि ‘एफडीए’मधला लाचखोर उच्चाधिकारी वेल्च साथीला होतेच, ऑक्टोपसच्या हातांसारखे!

१९६६ मध्ये सॅक्लर बंधूंनी विकत घेतलेल्या ब्रिटिश औषधनिर्माती कंपनी ‘नॅप’मध्ये मॉर्टिमर सॅक्लरच्या नेतृत्वाखाली संशोधक चमूनं नवीन धडाधड विकली जातील अशी औषधं शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. ‘एमएस कॉन्टिन’ हे त्याचंच उत्पादन. १९९६ मध्ये ते ‘ऑक्सीकोन्टीन’ या नावानं नव्या रूपात प्रथम अमेरिकेत आणि मग जगभर विकण्याची कल्पना रेमंड सॅक्लरचा मुलगा रिचर्डची! त्यासाठी सर्व बेकायदेशीर उपद्व्याप काकांसारख्याच महत्त्वाकांक्षी, हरहुन्नरी रिचर्डनं केले. हिशेबाचं परिमाण सांगायचं, तर एका वर्षात ऑक्सीकोन्टिनच्या उत्पादन आणि वितरणासाठीच स्वतंत्रपणे उभारलेल्या पड्र्यू फार्मानं ९० लाख डॉलर्स नुसते डॉक्टरांना अक्षरश: खाऊ-पिऊ घालण्यात गुंतवले होते. त्यांनी या औषधाच्या फायद्यांवर लक्ष केंद्रित करून त्याच्या ‘साइड इफेक्ट्स’कडे, विशेषत: व्यसन लावणाऱ्या घटकाकडे पार दुर्लक्ष केलं… केवळ नफ्याच्या आकड्यावर डोळा ठेवून! ऑक्सीकोन्टिन मूलत: कर्करोगाच्या उपचारांत वेदनाशामक म्हणून दिलं जात होतं. गोळ्या १०, २०, ४०, ८० आणि १६० एमएलच्या असत. त्यांचे प्रमाण व्यसनात हळूहळू वाढत जाई. १६० एमएलची मात्रा बनवली तेव्हा ‘हे जरा जास्तच होतंय’ हे सल्लागारांचं म्हणणं रिचर्ड आणि कुटुंबाचे वकील एडेल यांनी धुडकावून लावलं आणि खरंच या ‘मेगा डोस’नं बाजारात विक्रीची कमान उंचावतच नेली. ‘एफडीए’च्या संमतीचा शिक्का बसला की औषध वेदनाशामक म्हणून कोणत्याही उपचारांसाठी वापरता येतं, या नैतिक विश्वासावर आधारित कायद्यातील पळवाटांचा सॅक्लर बंधूंनी गैरफायदा उठवला होता. पुढे ते इतर वेदनाशामकांसारखं दिलं जाऊ लागलं आणि व्यसन लागल्यासारखं त्यावर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या फुगत राहिली. २००४ च्या दरम्यान प्रामुख्यानं गैरवापर होणाऱ्या औषधांत ऑक्सीकोन्टिनची गणना होत होती. कुटुंबाला लागलेलं पैसा आणि खोट्या प्रतिष्ठेचं व्यसन भागवण्यासाठी सॅक्लरनी देशातील रुग्णांना ओपीऑइड्सच्या गर्तेत ढकललं.

आर्थरच्या मृत्यूनंतर (१९८७) सॅक्लर कुटुंबातील सगळी नाती कोलमडली. त्याच्या आणि भावांच्या आजी आणि माजी बायका, त्यांची मुलं- प्रत्येक जण पैसा, बहुमूल्य वस्तू आणि दुभत्या संस्था वाट्याला याव्यात म्हणून भांडू लागला होता. तिन्ही भावांची पोरं, नातवंडं उद्दाम श्रीमंतीच्या वातावरणात वाढलेली आणि तसेच त्यांचे स्वभाव! त्यातली काही डॉक्टरही झाली. विशेष म्हणजे, एकालाही आपल्या कुटुंबाच्या गैरकृत्यांचं वावडं नव्हतं! कुठल्याही मार्गानं बेगुमानपणे पैसा मिळवण्याचं आणि कर्मचाऱ्यांना कस्पटासमान वागवण्याचं नवं धोरण सुरू झालं. मॉर्टिमरचा मुलगा बॉबीनं अमली पदार्थांच्या आहारी जाऊन आत्महत्या केली, तरीही सॅक्लर परिवाराचे डोळे उघडले नाहीत. शांत वृत्तीच्या रेमंडचा डॉक्टर मुलगा रिचर्डच्या लहरी, उर्मट  व्यवस्थापनाचे अनेक किस्से पुस्तकात सांगितले आहेत. ते वाचून अचानक झालेली भरभराट ऱ्हासाच्या दिशेनं जाऊ लागली याचं आश्चर्य वाटत नाही. अमेरिकेत बदनामी झाली, खटले सुरू झाले म्हणून ‘मंडीफार्मा’ नावाची कंपनी काढून लॅटिन अमेरिका आणि आशियाची बाजारपेठ शोधण्याची मोहीम सुरू केली. २०११ ते २०१६ दरम्यान, या कंपनीच्या भारतीय प्रमुख असलेल्या आशिया विभागाचे उत्पन्न पाच वर्षांत ८०० टक्क्यांनी वाढलं. काय म्हणायचं याला?

आर्थरची तिसरी बायको जिलिअन आणि मोठी लेक एलिझाबेथनं तर आर्थरच्या मृत्यूनंतर- ‘त्याच्या भावांनी ऑक्सीकोन्टीन बनवलं, बाजारात आणलं आणि पैसा मिळवला. या औषधाद्वारे आर्थर वा त्याच्या मुलांनी एकही पैसा मिळवलेला नाही,’ असा दावा केला. नात्यातले काही हा शोध अपुरा असताना वारले, काहींना घटना ठळकपणे आठवत नव्हत्या. करोना साथ असूनही पाठपुराव्यासाठी लेखक कीफनं दोनशेहून अधिक संबंधितांच्या मुलाखती घेतल्या. त्या दरम्यान सॅक्लर कुटुंबातील डॉक्टरांनी एकमेकांना पाठवलेल्या ईमेल्स हाती लागल्या. त्यावरून हे घराणं कमाईच्या बाबतीत कसं चलाख आहे आणि ओपीऑइडने होणाऱ्या नुकसानाची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी मुद्द्याला कशी पद्धतशीर बगल दिलीय, हे स्पष्ट झालं. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना हे औषध बनवणाऱ्या पड्र्यू फार्मानं गवगवा टाळण्यासाठी दिलेली दांडगी भरपाई बोलकी ठरते. कहर म्हणजे या प्रकरणामागे कोण आहे हे सर्वश्रुत असूनही कुठल्याही आरोपपत्रात सॅक्लर हे नाव येऊ नये याची खबरदारी या धूर्त कुटुंबानं घेतली आहे. न्यायालयाची पायरी कुठल्याही सॅक्लरनं अगदी अनिवार्यच झाल्यास चढली असावी. बचाव हाच की, आम्ही असाध्य रोगाच्या वेदना सुसह््य करणारं औषध बनवलं, त्याचं व्यसन कोणी लावून घेतलं तर त्यास आम्ही जबाबदार कसे? सार्वजनीक व्यासपीठावरून क्वचित कोणी प्रतिक्रिया दिली, तरी ती त्रोटक शब्दांत अतिशय हुशारपणे दिशाभूल करू पाहणारी! २००७ मध्ये पड्र्यू फार्मानं सरकारची आणि जनतेची क्षमा मागितली खरी, पण जरा वेळ जाऊ देऊन परत तेच. २०१९ मध्ये मात्र सरकारकडून त्यांना जबरदस्त दंड बसला आणि उत्पादनावर कडक निर्बंध घातले गेले.

मागे वळून बघता लक्षात येतं की, एकतृतीयांश देश वेदनाशामकांच्या नावाखाली नशेला लावणाऱ्या ऑक्सीकोन्टीनच्या प्रसारासाठी विक्रेत्यांइतकेच रुग्णालये, डॉक्टर, भ्रष्ट अधिकारी आणि त्यांचा बचाव करणाऱ्या यंत्रणा जबाबदार आहेत. सॅक्लरना आजवर या औषधांचे बळी ठरलेल्यांना पाच अब्ज डॉलरहून अधिक नुकसानभरपाई द्यावी लागली आहे. अर्थात, ही रक्कम त्यांच्या अफाट कमाईपुढे काहीच नाही. ‘सॅक्लर्स लाय, पीपल डाय’ अशी घोषणा देणारी निदर्शनं होत असूनही सॅक्लर कुटुंबीयांनी या भयानक गुन्ह््याची ना कधी जबाबदारी स्वीकारलीय, ना माफी मागितलीय.

पडद्यामागचं नाट्य उलगडणारं हे पुस्तक बाहेर येताच लाखोंनी प्रती  विकल्या गेल्या आणि जगभरातल्या भाषांत अनुवादांची मालिका सुरू झाली. प्रकरणाचा सोक्षमोक्ष अजून लागलेला नाही, पण कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या पड्र्यू फार्मानं दिवाळखोरी घोषित केली आहे. झाल्या भयानक प्रकारानं अनेक नामवंत संस्था आता सॅक्लर हे नाव भिंतीवर कोणी तरी लिहिलेली शिवी घाईघाईनं पुसून टाकावी तशा खरडून टाकत आहेत. पड्र्यू फार्माच्या औषधाविरुद्ध ठिकठिकाणी जनजागृती आणि विरोध हे नॅन गोल्डिंगसारख्या काही कार्यकर्त्यांचं ध्येय बनलंय. एकुणात, हे पुस्तक उत्कृष्ट प्रतीचं ‘क्राइम थ्रिलर’ आहे, फक्त दुर्दैवानं त्यातला शब्दन् शब्द खरा आहे. छापला जाणारा शब्द समाजात आजही गांभीर्यानं घेतला जातो आणि त्यातून समाजकंटकांना धडा शिकवता येतो, हे या पुस्तकानं दाखवून दिलं आहे.

arundhati.deosthale@gmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: America sackler family metropolitan museum art patrick radon keefe for research journalism akp