‘अमेरिकन प्रावदा’ हे पुस्तक १६ जानेवारी २०१८ रोजी अमेरिकेत प्रकाशित होईल.  अमेरिकेतच ते अधिक खपेल. पण खरं तर, अन्य देशांत  पत्रकारितेच्या तज्ज्ञांनी संशोधकवृत्तीनं  अभ्यासावं, असं ते पुस्तक आहे. ही अभ्यासू कारणं कुणाला ‘भलतीच’ वगैरे वाटतील. त्यावर इलाज नाही.

या पुस्तकाचा मुख्य हेतू स्पष्ट आहे. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध करणाऱ्या ‘मीडिया’चा- अमेरिकेत ‘मुख्य धारे’तल्या मानल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांचा ‘बुरखा’ टराटरा फाडणं, हा सर्वोच्च हेतू. यामागची बातमी अशी की, ‘प्रोजेक्ट व्हेरिटास’ या ट्रम्पधार्जिण्या ना-नफा (आणि करसवलत पात्र) कंपनीचे संस्थापक अध्यक्ष जेम्स ओकीफ यांनी या संस्थेच्या काही नोकरांकरवी काही पत्रकारांवर पाळत ठेवली. पत्रकार मिळाले नाहीत, तेव्हा मग उदाहरणार्थ न्यूयॉर्क टाइम्सच्या इंटरनेट विभागात फक्त दिलेल्या व्हिडीओ-क्लिपपैकी काही क्लिप ‘अपलोड’ करण्याचं काम करणारा माणूसदेखील चालेल; पण ही ‘मीडिया’तली माणसं ट्रम्प यांच्या विरोधात आहेत, याचा थोडा तरी वानवळा ‘प्रोजेक्ट व्हेरिटास’च्या या नोकरांनी मिळवला पाहिजे, असा दंडक होता. तो या नोकरांपैकी काहींना पाळता आला. त्यातून ‘प्रोजेक्ट व्हेरिटास.कॉम’ (ऑर्ग नव्हे) या संकेतस्थळावर १० ऑक्टोबरपासून एक व्हिडीओ-मालिका सुरू झाली. तिचं नाव ‘अमेरिकन प्रावदा’. तेच आता पुस्तकाचंही नाव आहे आणि कंपनीचालक ओकीफ हे पुस्तकाचे ‘लेखक’ आहेत. न्यूयॉर्क टाइम्स आणि सीएनएन यांच्यावर रोख धरणारे सहा ते १४ मिनिटांचे चार व्हिडीओ सध्या आहेत. समजा यापुढे आठवडय़ाला एक व्हिडीओ आला, तरी पुस्तकाची १४ प्रकरणं होतील!

‘प्रावदा’ ही भूतपूर्व सोविएत रशियाची प्रचारसंस्था आणि अधिकृत वृत्तसंस्था. तिचं नाव शिवीसारखं वापरून हे पुस्तक सिद्ध झालंय. ही शिवी सध्याच्या सर्वच त्या पत्रकारांना लागू आहे, जे सत्ताविरोधी आहेत.. असं (अमेरिकेपुरतं) ओकीफ यांना वाटत असावं. या अंदाजामागे कारण असं की, ‘अमेरिकन प्रावदा’चे सध्याचे चार भाग ‘सारंच संशयास्पद’ असा पवित्रा घेणारे आहेत. विद्यमान संस्थांची विश्वासार्हता मोडून काढताना, ‘आमचं रोखलेलं बोट तुमच्याकडे आणि उरलेली तीन बोटंही आमच्याकडे नव्हे, तुमच्याचकडे’ असा- आत्मपरीक्षणास कदापि तयार नसलेला हुकूमशाहीवादी पवित्रा या प्रकल्पात सध्या दिसतो आहेच. ‘आम्हीच खरे, तुमचं सारं खोटं’ अशा प्रचाराचं या पुस्तकात सापडणारं उदाहरण हे पत्रकारिता-अभ्यासकांच्या संशोधकवृत्तीला आवाहन करणारं ठरेल!