संदीप नलावडे

अडचणींवर मात करत तीर्थस्थळांकडे धाव घेणाऱ्या पाकिस्तानी महिलांच्या जगण्याचा वेध घेणारे हे पुस्तक पाकिस्तानातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाचाही धांडोळा घेते..

ईश्वरावरील श्रद्धा हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. सांसारिक कोंडमाऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी किंवा जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण करण्याच्या इच्छेने माणूस ईश्वरी श्रद्धेचा आधार घेतो. त्यात मनाला आनंद, समाधान, स्थर्य देण्यासाठी तीर्थस्थळांचा आसरा घेतो. स्त्री-पुरुष असमानता म्हणा किंवा अन्याय-अत्याचार यांमुळे पिचलेल्या बहुतेक स्त्रिया आनंदाच्या शोधात तीर्थस्थळांना भेटी देतात. तीर्थस्थानांना भेटी देऊन आध्यात्मिक समाधान मिळवण्यात महिलांचा कल अधिक असतो हे सार्वत्रिक आहे, हे अ‍ॅनी अली खान या पाकिस्तानी लेखिकेच्या ‘सीता अण्डर द क्रीसेंट मून’ या पुस्तकातून अधोरेखित होते. विविध अडचणींवर मात करत पाकिस्तानातील निरनिराळ्या तीर्थस्थळांना भेटी देणाऱ्या महिला भाविकांच्या प्रवासाची क्षणचित्रे हे पुस्तक उभे करते.

न्यू यॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अ‍ॅनी यांनी महिला सक्षमीकरण आणि लैंगिक व सामाजिक असमानता यांबाबत लेखन केलेले आहे. २०१८ मध्ये एका दुर्घटनेत वयाच्या ३८व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर वर्षभराने प्रकाशित झालेल्या ‘सीता अण्डर द क्रीसेंट मून’ हे पुस्तक श्रद्धेच्या शोधात पाकिस्तानातील देवस्थानांना भेट देणाऱ्या महिलांच्या प्रवासावर प्रकाशझोत टाकते. पाकिस्तानातील विविध मंदिरे, दर्गे व इतर तीर्थस्थळी अ‍ॅनी यांनी या महिला भाविकांसोबत प्रवास केला आणि त्यांच्या आध्यात्मिक भावना जाणून घेतल्या. या महिलांचे वर्णन अ‍ॅनी यांनी ‘सती’ किंवा ‘सीता’ असे केले आहे. पतीच्या मृत्यूनंतर सती जाणाऱ्या स्त्रिया किंवा रामायणातील सीता या ‘त्यागमूर्ती’ म्हणून ओळखल्या जातात. त्याप्रमाणेच या महिलादेखील त्यागमूर्ती असून आपली सारी दु:खे, वेदना विसरून त्या ईशभक्तीचा आनंद घेतात, यावर लेखिका या पुस्तकातून भाष्य करते.

पाकिस्तान म्हणजे मुस्लीम राष्ट्र.. तिथे मुस्लिमेतर जनतेवर अत्याचार होत असतील.. अन्य धर्मीयांच्या देवस्थानांकडे दुर्लक्ष केले जात असेल.. या ‘भारतीय’ समजाला हे पुस्तक छेद देते. पुस्तकात शिव व सतीची कथा आणि रामायणातील काही कथांचा उल्लेख आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच ‘हब चौकी’चा उल्लेख आहे. हब चौकी हे सिंध आणि बलुचिस्तान या प्रांतांदरम्यान असलेले प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावर ‘मुंद्रा’ असे लिहिलेले आहे; संस्कृतमध्ये ज्याचा अर्थ पवित्र देवस्थान असा होतो. याच प्रवेशद्वारावर ‘सीरत’ हा शब्द अरबी लिपीत ठळकपणे लिहिला आहे. या शब्दाचा अर्थ आहे- अंतर्गत सौंदर्य! पवित्रतेकडे आणि सौंदर्याकडे नेणाऱ्या या मार्गावरून लेखिकेने पाकिस्तानी अध्यात्म दृष्टीचा वेध घेतला आहे.

पाकिस्तानातील सिंध, बलुचिस्तान या प्रांतातील दुर्गम कोपऱ्यांत वसलेली ही तीर्थस्थळे. तिथे जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी डोंगराळ प्रदेशातून, तर कधी रखरखत्या वाळवंटातून प्रवास करावा लागतो. पोलिसांच्या किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तपासणीस सामोरे जावे लागते. कधी रेल्वेतून, तर कधी बसमधून प्रवास करावा लागतो. पण या सर्व अडचणींवर मात करत त्या महिला केवळ श्रद्धेपोटी या तीर्थक्षेत्रांना भेटी देतात. या महिलांसोबत लेखिका कराचीजवळील ल्यारी, बलुचिस्तानातील हिंग्लाज, सिंध प्रांतातील थत्ता, नानी पीर, मांघो पीर आदी देवस्थानांना भेट देते. या प्रवासात ती या महिला भाविकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आणि अध्यात्माच्या आड लपवली जाणारी त्यांची दु:खे, वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न करते. या महिला वरचेवर आनंददायी आणि श्रद्धाळू असल्याचे दाखवत असल्या, तरी विविध कारणांमुळे त्या आतून पिचलेल्या आहेत याची जाणीव झाल्याने त्यांची कोंडी फोडण्याचा प्रयत्न लेखिका करते. काही महिलांच्या व्यथा लेखिकेने शब्दश: या पुस्तकात उतरवल्या आहेत. श्रद्धेच्या छायेखाली आत्मशोध घेणाऱ्या या महिला म्हणजे ‘चंद्रकोरीखाली दबलेल्या सीता’ असे वर्णन लेखिकेने केले आहे.

महिला भाविकांसोबतचे प्रवासवर्णन करताना लेखिका तिच्या आयुष्यातील काही प्रसंग सांगते. बलुचिस्तानातील हिंग्लाजमधील दुर्गा माता मंदिराला भेट देताना तिला आपल्या आजोबांच्या मित्राच्या घरी दरवर्षी करण्यात येणाऱ्या दुर्गोत्सवाची आठवण येते. एके काळी सिंध प्रांतात हिंदू-मुस्लीम कसे गुण्यागोविंदाने राहात होते, याची माहिती लेखिका देते. ‘माझे आजोबा मुस्लीम आणि त्यांचा मित्र देवराज हे हिंदू. मात्र दोघेही एकमेकांची सांस्कृतिक मूल्ये जाणून घेत. माझे कुटुंबीय आजोबांच्या मित्राच्या घरी दुर्गापूजेच्या कार्यक्रमात दरवर्षी सहभागी होत असत. दुर्गामूर्तीच्या बाजूला नमाज पढताना मी आजोबांना पाहिले आहे,’ हे सांगताना- ‘पाकिस्तानातील इतर प्रांतांत असलेला धर्मवाद एके काळी सिंध प्रांतात दिसत नव्हता,’ असे लेखिका नमूद करते. ‘पाकिस्तानातील पंजाब प्रांताला फाळणीच्या रक्तलांच्छित वेदना आहेत. त्यामुळे तिथे मोठय़ा प्रमाणात धार्मिक संस्कृतीवाद आहे. मात्र सिंध प्रांतात हिंदू-मुस्लीम मिळूनमिसळून राहतात. हिंदू आणि मुस्लीम कुटुंबे एकमेकांच्या सण-उत्सवांत सहभागी होतात आणि एकमेकांची संस्कृती जाणून घेतात,’ असे लेखिका सांगते.

तीर्थस्थळांना भेटी देणे हे जिकिरीचे काम. मात्र श्रद्धा आणि ईशभाव यांच्यामुळे या यात्रेकरू महिलांच्या अंगात वेगळेच बळ संचारते. अगदी डोंगराळ भागात असलेल्या किंवा वाळवंटात असलेल्या देवस्थानाला भेट देताना त्या थकत नाहीत. लेखिकेचा त्यांच्यासोबतचा पहिलाच प्रवास हिंग्लाज देवस्थानाचा. कराचीपासून २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराळ प्रदेशातील हे मंदिर. डोंगरदऱ्या तुडवत रखरखत्या उन्हात हा प्रवास करावा लागतो. एका उंच टेकाडावर असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचताना या भाविक महिलांना थोडा थकवा आला खरा; मात्र जसे जसे मंदिर जवळ येऊ लागले, तसे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि भक्तिमय भाव कसे उमटले, याचे वर्णन लेखिकेने केले आहे. हिंग्लाज हे हिंदू देवस्थान असले, तरी कोणत्याही धर्माच्या, पंथाच्या भाविकास येथे येण्याची मुभा आहे. त्यामुळे हिंदूंसह मुस्लीम धर्मीयही मोठय़ा संख्येने या मंदिरात येतात आणि देवीच्या मूर्तीसमोर नतमस्तक होतात, असे लेखिका नमूद करते.

हिंग्लाज येथील दुर्गा मंदिराशिवाय, थत्ता येथील नौचंडी उत्सव, कराचीजवळील मिरान पीर, मांघो पीर या देवस्थानांचे वर्णन पुस्तकात आहे. थत्ता येथील नौचंडी उत्सवात सहभागी झालेल्या रुबी आणि रुबिना यांची कहाणी हृदयद्रावक आहे. आजारी असलेल्या आपल्या आईचा उदरविकार दूर व्हावा यासाठी रुबिना प्रार्थना करण्याकरिता या देवउत्सवात सहभागी होते, तर आपला विवाह व्हावा यासाठी रुबी तिथे आलेली असते. आपल्या कौटुंबिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पिचलेल्या स्त्रिया कशा प्रकारे देवस्थानाकडे धाव घेतात, याचे वर्णन लेखिकेने केले आहे.

तीर्थस्थळी जाणाऱ्या महिलांच्या केवळ प्रवासाविषयीच हे पुस्तक भाष्य करत नाही, तर पाकिस्तानातील बदलत्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीची माहितीही देते. पाकिस्तानातील लोकशाही उलटून टाकणारा लष्करशहा जनरल झिया-उल-हक यांच्या काळात सिंध प्रांतात झालेला अत्याचार आणि त्यामुळे सामान्य जनतेची बदललेली मते या संदर्भात या पुस्तकात माहिती आहे. कट्टर अतिरेक्यांमुळे बलुचिस्तानामध्ये उसळलेली शिया आणि सुन्नी पंथीयांमधली दंगल आणि त्यामुळे निर्माण झालेले भयग्रस्त वातावरण याचे वर्णन लेखिका करते. मक्ली या पुरातन शहराविषयीदेखील ओझरती माहिती या पुस्तकात आहे. त्याशिवाय हलाखीचे जीवन जगणाऱ्या विविध समाजांविषयीही लेखिकेने लिहिले आहे. चिखल व गवताच्या पेंढय़ापासून घरे तयार करणारा ओढ समाज, वंशावळ तयार करणारा चारण समाज, वस्त्रोद्योगातील मेघवार समाज यांच्याबाबतची माहिती पाकिस्तानातील समाजव्यवस्थेचा एक निराळा कोन दाखवते.

sandip.nalawade@expressindia.com