|| गिरीश कुबेर

व्यक्तिगत आयुष्यातील प्रसंग सांगताना पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयींचे आणि अर्थमंत्री म्हणून(च) डॉ. मनमोहन सिंग यांचे सकारण कौतुकही शंकर आचार्य करतात…

नियतकालिकांतून अर्थविश्लेषण वाचायची सवय असणाऱ्यांस शंकर आचार्य हे नाव माहीत नसणे अशक्य. त्यांच्या स्तंभांची पुस्तकेही अनेकांघरी असतील. पण त्यांचे ताजे ‘अ‍ॅन इकॉनॉमिस्ट अ‍ॅट होम अँड अब्रॉड’ हे पुस्तक असे स्तंभसंकलन नाही. शंकर आचार्य म्हणतात त्याप्रमाणे हे पुस्तक म्हणजे त्यांचा ‘अ पर्सनल जर्नी’ आहे.

तो मोठा विलोभनीय आहे. आपल्या देशात योग्य घरात, योग्य शहरात, योग्य प्रांतात, योग्य जातीत आणि योग्य काळात जन्माला येण्यात यशाची शाश्वाती किंवा अपयशाची हमी असते. शंकर आचार्य यांच्या उत्तुंग यशाबाबतीत हे असे झाले आहे. अर्थात तो काही कमीपणाचा भाग नाही, हे नमूद करायला हवे. कारण अन्यथा अशा आदर्श परिस्थितीत जन्माला आलेला प्रत्येक कर्तबगार निघाला असता. तसे अर्थातच होत नाही. म्हणून ज्यांच्याबाबत ते होते त्याचे अप्रूप.

शंकर आचार्य हे अशा भाग्यवंतांतील एक. वडील आयसीएस ऑफिसर. कोणाच्या प्रशासनात? तर पंडित नेहरू यांच्या. त्यातून मग ‘इंडियन फॉरिन सर्व्हिस’मधे नियुक्ती. त्यामुळे ढाका ते लंडन, झेकोस्लोवाकिया, स्वित्झर्लंड, ब्राझील, कॅनडा आणि पाकिस्तानचे उच्चायुक्त अशा ठिकाणच्या नियुक्त्या, त्यामुळे लहान वयातच जग पाहायची संधी, त्यात बंगाली भद्रलोकांतील असल्यामुळे साक्षात सत्यजीत रे यांनी लहानग्या शंकर याची ‘पाथेर पांचाली’तल्या ‘अपु’च्या भूमिकेसाठी निवड करणे, अभ्यासात खंड पडेल म्हणून रे यांना नकार देणारे आईवडिलांचे असणे, ऑक्सफर्ड विद्यापीठात अगदी लहान वयात प्रवेश, मग अमेरिकेतले हार्वर्ड. तेथे सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या शुल्क माफीसाठी प्रयत्न करणे. मित्रपरिवार म्हणाल तर म्यानमारच्या ऑँग सान स्यु की या वर्गमैत्रीण ते माँटेक सिंग अहलुवालिया हे घट्ट वर्गमित्र, हार्वर्डच्या भेटीत अमत्र्य सेन यांनी शंकर यांचा निबंध वाचून चौकशी करणे, जागतिक बँकेत सहज प्रवेश असे अनेक बरेच काही त्यांच्या आयुष्यात घडले. यातील एकेक घटना एकाच्या आयुष्यातही कधी घडते असे नाही. येथे शंकर आचार्य यांच्याबाबत त्या सर्वच एकाच आयुष्यात घडल्या. त्याची हेवा वाटावी अशी कहाणी या पुस्तकात आचार्य ‘जशी घडली तशी’ सांगतात. उगाच बडेपणा नाही. हे सर्व हेवा वाटावे असेच.

पण त्याहीपेक्षा हेवा वाटावी असा इतिहास घडवण्याची, त्यास हातभार लावण्याची संधी आचार्य भारतात ठरवून परतल्यावर त्यांच्या समोर चालून आली. अमेरिकेत राहण्याची, उत्तम वेतनादी सोयीसुविधा असतानाही ‘त्याकाळी’ (यात त्याकाळी या शब्दावर विशेष भर जाणीवपूर्वक) अनेक गुणवंत मायदेशी परतले. आचार्य त्यातील एक. एकूण २३ वर्षे अमेरिकादी देशांत काढल्यानंतर परत मायदेशी येणे सांप्रतकाळी नुसते नव्हे तर ठार वेडेपणाचे लक्षण ठरेल.

तो वेडेपणा आचार्यांनी केला.

त्यातून केंद्र सरकारच्या वित्त खात्यात विविध जबाबदाऱ्या हाताळण्याची संधी त्यांना मिळाली. ‘१९९३ ते २००१ हा भारताचा खरा धोरणदिव्यतेचा काळ’ असे त्याबाबत लिहितात. कारण देशाच्या सर्वोच्च पातळीवरील राज्यकर्ते आणि धोरणकर्ते प्रशासक यांत आर्थिक सुधारणावादी धोरणांबाबत काही एक समान पण अभ्यासू दृष्टिकोन होता. तो घडवण्यात महत्त्वाची जबाबदारी असलेल्यांतील आचार्य हे एक. मनमोहन सिंग, पी. चिदम्बरम तसेच यशवंत सिन्हा यांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळात ते या जबाबदाऱ्या हाताळत होते.

अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग हे त्यांच्या मते सर्वोत्तम. (पण मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीबाबत मात्र ते तितके उदारमतवादी नाहीत. ते रास्तच. आचार्य ते प्रामाणिकपणे नमूद करतात हे विशेष.) आर्थिक सुधारणांसाठी त्यांच्याकडून कौतुक दोघांचेच. नरसिंह राव आणि अटलबिहारी वाजपेयी. त्यातही वाजपेयी यांच्या वाट्यास चिमुटभर कौतुक अधिक. कारण ‘करायलाच हव्या असे काळाचे दडपण नसतानाही त्यांनी अनेक सुधारणा हाती घेतल्या’.

भारतात आल्यावर आचार्यांनी काळ्या पैशाचे नियंत्रण कसे करावे यावर एक शोधनिबंध लिहिला. त्यानुसार ‘निश्चलनीकरण हा काळा पैसा रोखण्याचा मार्ग असूच शकत नाही’. त्यासाठी ते आर्थिक सुधारणावादी मार्ग सुचवतात आणि या सुधारणावादी उपायांच्या आकलनाची वानवा असल्याचेही सूचित करतात.

सर्वसाधारण अनुभव असा की सरकारी अधिकाऱ्याचा, त्यातही अशा उच्चपदावरील, प्रयत्न असतो निवृत्तीनंतरच्या नियुक्त्या मिळवण्यात. आचार्य त्यातील नाहीत. उलट सेवापूर्तीस पाचेक वर्षांची मुदत असतानाच त्यांनी पदत्याग केला आणि नंतर लेखन, वाचन आणि शिकवणे यात आनंद मानला. आणि दुसरे असे की निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे आत्मचित्र मुंग्या लागतील इतके गोडमिट्ट असते. कोणास दुखवायचे नसल्याने ही माणसे खरे काही लिहीतच नाहीत. आचार्य हे अपवाद. अगदी करोनाकालीन टाळेबंदी कशी चुकीची होती, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे कसे बारा वाजले, त्यापेक्षा नियंत्रित सवलती देण्यात कसा शहाणपणा होता, हेही सुनावण्यास ते कमी करीत नाहीत.

एकंदरीत हा आचार्यानुभव विचारी जनांनी जरूर घ्यावा असा.

‘अ‍ॅन इकॉनॉमिस्ट अ‍ॅट होम अ‍ॅण्ड अब्रॉड : अ पर्सनल जर्नी’  लेखक : शंकर आचार्य प्रकाशक : हार्परकॉलिन्स, इंडिया पृष्ठे : २९८, किंमत :  ५९९ रु.