scorecardresearch

गाथा भारतातल्या वलंदेजांची..

युरोपहून सोने-चांदी आणून त्या बदल्यात भारतातून रोख खरेदी करणे हा आतबट्टय़ाचा आणि धोकादायक व्यापार होता.

गाथा भारतातल्या वलंदेजांची..

निखिल बेल्लारीकर nikhil.bellarykar@gmail.com 

डच ईस्ट इंडिया कंपनी, तिचे भारतातील जाळे, भारतीय-डच संबंध आणि नेदरलॅण्ड्समधील घडामोडी यांविषयीचे अज्ञात पैलू शब्द आणि चित्र यांची सांगड घालत वाचकासमोर आणणाऱ्या पुस्तकाविषयी..

भारतीय मनातली युरोपीय माणसाची प्रतिमा ही बव्हंशी एका इंग्रजाची असते. त्यांचे भारतातील प्रदीर्घ वास्तव्य, भारतव्यापी साम्राज्य या गोष्टी लक्षात घेतल्या तर हे साहजिकच आहे. परंतु इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांच्या जोडीला भारतात डच आणि डॅनिश व्यापारीही दोनेक शतके होते ही वस्तुस्थिती त्यामुळे नजरेआड होते. विशेषत: जवळपास अख्खे सतरावे शतक आणि अठराव्या शतकाचा काही भाग इतक्या मोठय़ा कालावधीत डच कंपनी ही भारतातील सर्वात मोठी व बलशाली व्यापारी सत्ता होती हे आज सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही. डचांचे साम्राज्य पुढे इण्डोनेशियात आकारास आल्यामुळे भारतीय इतिहासलेखनात त्यांची योग्य ती दखल घेतली जात नाही. परंतु राजकीय, आर्थिक आणि सौंदर्यशास्त्रीय प्रेरणांमुळे डचांचे भारताशी संबंध अति दृढ झाले. या परस्परसंबंधांचा सामान्य जनतेस पचेलसा आढावा घेणारी पुस्तके तशी एकुणात कमीच. अ‍ॅमस्टरडॅम येथील राइक्स म्युझियममधील मध्ययुगीन भारतीय वस्तुसंग्रह आणि डच ईस्ट इंडिया कंपनीची मुबलक कागदपत्रे यांचा मेळ घालून लायडेन विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख यॉस खोमान्स यांनी लिहिलेले ‘द अनसीन वर्ल्ड : इंडिया अ‍ॅण्ड द नेदरलॅण्ड्स फ्रॉम १५५०’ हे पुस्तक त्यामुळेच खूप महत्त्वाचे आहे.

हे पुस्तक एकूण तीन भागांत विभागलेले असून साधारणपणे इ.स. १५५० ते इ.स. १७०० हा कालखंड त्यात विचारात घेतलेला आहे. भारतातही प्रामुख्याने मुघल साम्राज्याच्या परिप्रेक्ष्यात विवेचन आहे. पहिल्या भागात भारतात बस्तान बसवण्याचे डच कंपनीचे प्रयत्न आणि काही उल्लेखनीय डच व्यक्तिरेखांचा उल्लेख येतो. दुसऱ्या भागात तत्कालीन राजकीय व आर्थिक परिस्थितींना प्रतिसाद देण्यावरून भारत आणि नेदरलॅण्ड्स यांची तुलना केलेली असून, तिसऱ्या भागात परस्परसंबंध, त्याचे कलेत दिसणारे परिणाम हा विषय येतो.

भारतातले वलंदेज

इ.स. १६०२ साली डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. त्याआधीही काही वर्षे डच व्यापारी भारतात येत होतेच; पण कंपनीच्या स्थापनेनंतर त्यांचा ओघ खूपच वाढला. या व्यापाऱ्यांचा मराठी ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये ‘वलंदेज’ असा उल्लेख केलेला आढळतो. भारतात प्रामुख्याने मलबार ऊर्फ केरळ किनारा, सुरत, कोरोमंडल ऊर्फ तमिळनाडू व आंध्र किनारा आणि बंगाल ही कंपनीची मुख्य प्रभावक्षेत्रे होत. कोकणातील वेंगुल्र्यातील वखार ही तुलनेने छोटी असून, व्यापारापेक्षा गोवेकर पोर्तुगीजांवर लक्ष ठेवणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट होते. भारतातून अनेक प्रकारच्या मालाचा व्यापार करता येण्याजोगा होता. त्यातही मसाले व कपडे हे दोन पदार्थ मुख्य होते. परंतु मिरीचा अपवाद वगळता बाकी मसाल्याचे पदार्थ मुख्यत: इण्डोनेशियातील काही बेटांवरूनच आणले जात. तत्कालीन युरोप, मध्यपूर्व आदींसाठी भारताची सर्वात उल्लेखनीय निर्यात म्हणजे सुती व रेशमी कपडे ही होती. युरोपहून सोने-चांदी आणून त्या बदल्यात भारतातून रोख खरेदी करणे हा आतबट्टय़ाचा आणि धोकादायक व्यापार होता. त्यापेक्षा भारतातील कपडे आग्नेय आशियात विकून, त्या बदल्यात तेथील मसाले भारतात आणणे हा व्यापार अनेकपट किफायतशीर होता. यातील उत्पन्नाद्वारे आशिया खंडातील व्यापारखर्च भागून आणखी माल विकत घेता येत होता. तो मध्यपूर्व आणि युरोपात विकून डच कंपनीने तुफान नफा कमावला. पूर्वेस जपान, इण्डोनेशियापासून पश्चिमेस नेदरलॅण्ड्सपर्यंतच्या या जगड्व्याळ व्यवस्थेने भारतात ठिकठिकाणी पाय रोवण्यासाठी कोणकोणत्या मार्गाचा अवलंब केला, त्याचे सखोल वर्णन या भागात येते.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हटली की क्लाइव्ह, हेस्टिंग्स आदी प्रशासक आणि विल्यम जोन्स, प्रिन्सेप आदी नावांची मांदियाळी आठवल्याशिवाय राहत नाही. या पुस्तकात तत्सम प्रभावी अनेक डच व्यक्तिरेखांचे वर्णन येते. यातली अनेक नावे सर्वसामान्य भारतीयाला तशी नवीनच आहेत. सुरुवातीला पोर्तुगीजांच्या नोकरीत असलेला आणि नंतर डच कंपनीला व्यापारविषयक मदत करणारा फान लिन्स्खोटेन; सुरतेच्या डच वखारीचा पहिला प्रमुख आणि कंपनीचे बस्तान उत्तरेत बसवण्यास कारणीभूत ठरलेला पीटर फान डेन ब्रूक; मलबार प्रांताचा डच प्रमुख आणि ‘हॉर्ट्स मलाबारिकस’ या तब्बल बारा खंडांत अनेक चित्रांसह मलबार प्रांतातील वनस्पतींचे वर्णन करणाऱ्या ग्रंथाचा लेखक हेंड्रिक एड्रियान फान ऱ्हीड; कोरोमंडल प्रांतात कार्यरत असलेला, फारसी, हिंदुस्तानी आदी भाषांचे सखोल ज्ञान असलेला ‘डच मुन्शी’ डॅनिएल हॅवार्ट; कंपनीच्या जिवावर मोठी वैयक्तिक मालमत्ता संपादणारा ‘नवाब’ यान सिख्टरमान.. अशांच्या कारकीर्दीचे वर्णन मोठे रंजक आहे. एकाच वेळी डच व ब्रिटिशांमधील साम्य आणि फरक त्यातून अधोरेखित होतात. डच कंपनीने अगोदरपासूनच व्यापारावर दिलेला भर, मिरी आणि वस्त्रे यांच्या व्यापारात जमेल तिथवर पूर्ण पुरवठा साखळी आपल्याच ताब्यात ठेवण्याचा केलेला प्रयत्न आदी गोष्टी मुळातूनच वाचण्यासारख्या आहेत.

जागतिकीकरणाचे सांस्कृतिक प्रतिसाद

जागतिकीकरण ही आजचीच गोष्ट नव्हे. सतराव्या शतकातही ही प्रक्रिया तत्कालीन तुलनेने पाहता तितकीच वेगवान, परिणामकारक आणि गुंतागुंतीची होती. भारतातल्या व्यापाराच्या अमर्याद संधींचे इतर कुणापेक्षाही डचांनी अक्षरश: सोने केले. ‘डच सुवर्णयुगा’त (इ.स. १६३५-१६९०) मुख्यत: व्यापारामुळे नेदरलॅण्ड्समध्ये अभूतपूर्व समृद्धी आली. इकडे भारतातही सतराव्या शतकाची शेवटची तीनेक दशके वगळता मुघल साम्राज्याची भरभराटच सुरू होती. या भरभराटीमुळे दोन्ही प्रदेशांतील संस्कृतींत काही महत्त्वाचे बदल झाले. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात या बदलांचा तौलनिक आढावा घेतलेला आहे. जगाची व्यामिश्रता समजून घेण्याचे आणि त्याद्वारे जगावरील स्वत:चे प्रतीकात्मक सामर्थ्य दाखवण्याचे केलेले काही प्रयत्न हे पृथ्वीगोल, जगाचे नकाशे व इतिहास, उद्याने, चित्रसंग्रह आदींमधून दिसतात. दोन्ही देशांच्या एतद्विषयक दृष्टिकोनांची तुलना पुस्तकाच्या या भागात येते.

इराण आणि मध्य आशियायी जाणिवांवर पोसलेल्या मुघल सांस्कृतिक विश्वात उद्यानाला महत्त्वाचे स्थान होते. विशेषत: चारबाग प्रकारचे उद्यान स्वर्गातील उद्यानाचे प्रतीक म्हणून इस्लामी विश्वात खूप प्रसिद्ध होते. मुघलांनी अशा उद्यानांची निर्मिती जागोजागी केली. उद्याननिर्मितीमागे मुघलांची प्रेरणा ही स्मरणरंजन आणि सौंदर्यशास्त्रीय होती. तुलनेने डच उद्याने ही प्रतीकात्मकतेसोबतच वैद्यकीय पैलू डोळ्यांसमोर ठेवून निर्मिलेली होती. याखेरीज मुघल चित्रशैली पाहिली तर तीही इराणी व भारतीय प्रभावाखाली विकसित झाली. या कलेचा उपभोग मुख्यत: उच्चभ्रू वर्तुळांपुरताच मर्यादित राहिला. तुलनेने नेदरलॅण्ड्समध्ये या वेळेस एक कलासंग्राहकांचा मध्यमवर्गही हळूहळू विकसित होऊ  लागला होता. भारताशी संबंधित अनेक चित्रे डच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काढून घेतली आणि नेदरलॅण्ड्समध्ये पाठवली. तेव्हा अ‍ॅमस्टरडॅम हे अखिल युरोपमधील पुस्तकव्यापार आणि ‘अँटिक’ व्यापाराचे अव्वल दर्जाचे केंद्र असल्याने ही चित्रे व अन्य अनेक वस्तू अ‍ॅमस्टरडॅममधील बाजारात विक्रीसाठी येत. डच कलासंग्राहकांमधील विट्सेन आणि कँटर-फिशर या दोन अतिमहत्त्वाच्या व्यक्तींबद्दलही इथे थोडक्यात विवेचन येते. यातील विट्सेनच्या संग्रहातच छत्रपती शिवाजी महाराजांची काही प्रसिद्ध चित्रेही आहेत. तत्कालीन युरोपमध्ये अशा अनेक रोचक वस्तू जमा करण्याची, अर्थात ‘अजबखान्या’ची संस्कृती झपाटय़ाने वाढीस लागली होती. तत्कालीन युरोपमधील या सांस्कृतिक बदलाचा सखोल आणि रोचक आढावा पुस्तकात घेतला आहे.

युरोप आणि पर्यायाने नेदरलॅण्ड्समध्ये समृद्धी ही प्रामुख्याने परदेशी मुशाफिरी आणि व्यापाराशी निगडित असल्याने तिथे या काळात नव्या प्रदेशांची प्रवासवर्णने, जगाचा इतिहास या प्रकारच्या पुस्तकांचे लेखन जोमाने चालू झाले. या पुस्तकांचे उत्पादन आणि उपभोग हा फक्त उच्चवर्गीय उपक्रम राहिला नव्हता. झपाटय़ाने वाढणारा मध्यमवर्ग या पुस्तकांचे सर्वात मोठे गिऱ्हाईक होता. भारताचा भूगोल, वातावरण, धर्म-जातीव्यवस्था, राजकीय इतिहास अशा अनेक विषयांवर नेदरलॅण्ड्समध्ये अनेक पुस्तके लिहिली गेली. याउलट तत्कालीन भारताच्या दृष्टीने युरोप ही ज्ञात जगाची हद्द असल्याने युरोपीयांबद्दल भारतीयांनी विशेष रस घेतलेला दिसत नाही. तरी अब्दुस समद लाहोरीने केलेली काही लॅटिन इतिहासग्रंथांची फारसी भाषांतरे, मुघलांनी बनवलेले पृथ्वीगोल यांसारख्या काही अपवादांचा आवर्जून उल्लेख पुस्तकात येतो.

पुस्तकाच्या तिसऱ्या भागात भारत व नेदरलॅण्ड्स यांच्या सांस्कृतिक अभिव्यक्तींमागील काही समान सूत्रे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. यातही प्रामुख्याने चित्रकलेवर भर आहे. मुघल दरबारातील केशू दास, मनोहर, लाल, हुसेन यांसारखे भारतीय व हेंड्रिक डेल्फ, योसेफ फोस्ख, अब्राहम इमॅनुएल्स यांसारखे डच चित्रकार, दख्खनमधील कॉर्नेलियस हेडा, तर नेदरलॅण्ड्समधील विल्यम स्खेलिंक्स आणि रेम्ब्रांसारखे प्रसिद्ध चित्रकार यांच्या चित्रकलेवरचे पौर्वात्य व पाश्चात्त्य प्रभाव उलगडून दाखवतानाच त्यामागील ‘निओप्लेटॉनिझम’ या विचारधारेचा युरोप आणि आशिया खंडात असलेला प्रभावही दर्शविलेला आहे. अगोदरच्या दोन भागांपेक्षा हा भाग जास्त विवेचनात्मक असून त्यात उत्तरांसोबतच प्रश्नही आहेत.

कलाविषयांमधले साधर्म्य

तत्कालीन भारत व युरोपातील दरबारी पाश्र्वभूमी विशद करताना लेखक म्हणतो, की साम्राज्यातील अनेकविध लोकांची मोट एकत्र धरून ठेवण्यासाठी मुघल किंवा अन्य साम्राज्यांत सम्राट ही व्यक्तिरेखा केंद्रिभूत ठेवून त्याद्वारे शांतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली जात असे. या कामी नीतिकथा, चित्रकला आदींचा वापर केला जात असे. याखेरीज ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ यासारखे विचार भारतात अद्वैत वेदांताद्वारे हिंदू धर्मात आणि नंतर सूफी पंथाद्वारे इस्लाम धर्मात पसरले होते. प्लेटोच्या विचारांचे एक सारही काहीसे असेच होते. ‘भौतिक जग हे त्यापेक्षा श्रेष्ठ विश्वाचे, विश्वनियंत्यासाठीचे एक रूपक मात्र आहे’ हा विचार रेनेसाँ काळात युरोपीय कलाविश्वातही होताच. यासारख्या पाश्र्वभूमीमुळे एकीकडच्या कलाविषयांना दुसरीकडे वाव मिळणे सोपे झाले.

भारत आणि नेदरलॅण्ड्स यांचा परस्परसंबंध तसा नवा असला तरी मुघल काळातील दोन्ही देशांमधील प्रबळ सत्तांची सांस्कृतिक व धार्मिक मुळे तपासल्यास लक्षात येते की, एकाच वेळी इराणी-रोमन सांस्कृतिक परंपरा आणि इस्लामी-ख्रिस्ती धार्मिक परंपरा यांची कल्पना दोन्ही देशांतील अभिजनांना होती. त्यामुळे अकबराच्या दरबारात आलेल्या जेसुईटांनी नजराणा म्हणून आणलेली येशू, मेरी आदी चित्रांची मुघल दरबारातील चित्रकारांनी हुबेहूब नक्कल केली. इतकेच नव्हे, तर केशू दासने काही रोमन दृश्ये असलेली चित्रेही मुळाबरहुकूम काढली आहेत; अर्थातच त्यात काही थोडे, परंतु महत्त्वाचे बदल करून. तत्कालीन भारतातील इस्लामी राजदरबारांत युरोपीय चित्रकारांना मागणी होती; कारण पस्र्पेक्टिव्ह आदी तंत्रांच्या आधारे मानवी चित्रे काढण्याच्या तंत्रात तेव्हा युरोपीय अग्रेसर होते. ही देवाणघेवाण एकेरी अर्थातच राहिली नाही. तेव्हाच्या नेदरलॅण्ड्समध्ये भारतातली अनेक लघुचित्रे येत असत. त्यांपासून प्रेरणा घेऊन रेम्ब्रांसारख्या प्रख्यात चित्रकारानेही काही रेखाटने केलेली आहेत. रेम्ब्रां हा स्वत: चित्रकारासोबतच एक मोठा चित्रसंग्राहकही होता. रेम्ब्रांखेरीज विल्यम स्खेलिंक्स यानेही भारतीय चित्रांपासून प्रेरणा घेऊन चित्रे काढली; इतकेच नव्हे, तर भारतीयांच्या चित्रकलेचे कौतुक करणारी एक कविताही रचलेली आहे! त्या कवितेचा मूळ डच मजकूर आणि इंग्रजी भाषांतर असे दोन्ही पुस्तकांत विस्ताराने दिलेले आहे. हे पुस्तक एकूणच वाचण्याइतकेच ‘बघण्या’सारखेही आहे; कारण दर दोन पानांआड असलेली अनेक चित्रे व अन्य वस्तूंची छायाचित्रे. त्यातही हा भाग म्हणजे शब्द आणि चित्र यांची सांगड घालत वाचणे अवश्यमेव आहे.

जागोजागच्या चित्रांमुळे रसभंग न होता उलट पुस्तकातील मजकूर समजून घेण्यास मदत होते. डच ईस्ट इंडिया कंपनी, तिचे भारतातील जाळे, भारतीय-डच संबंध आणि नेदरलॅण्ड्समधील घडामोडी यांचे एक वेगळेच विश्व या पुस्तकातून दिसते. सर्वसामान्य वाचकासाठी ते जवळपास अज्ञातच असल्यामुळे ‘द अनसीन वर्ल्ड’ हे शीर्षकातील शब्द अगदी योग्य आहेत. भारतातील युरोपीय वास्तव्य आणि प्रभावाचा हा वेगळा पैलू उलगडून दाखवणे आणि मुख्यत: भाषेच्या अडचणीमुळे भारतीय वाचकापासून दूर राहिलेला हा ठेवा अंशत: तरी भारतीय वाचकाला खुला करून दाखवणे हे या पुस्तकाचे प्रमुख बलस्थान आहे!

 

मराठीतील सर्व बुकमार्क ( Athour-mapia ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Book about the dutch east india company and its network in india zws

ताज्या बातम्या