महाराष्ट्रातल्या दुष्काळाची चिकित्सा करणारं, ‘दि इंडियन एक्स्प्रेस’च्या सहयोगी संपादक कविता अय्यर यांनी लिहिलेलं ‘लॅण्डस्केप्स ऑफ लॉस : द स्टोरी ऑफ अॅ न इंडियन ड्रॉट’ हे पुस्तक ‘टाटा लिटफेस्ट’च्या पुरस्कारांमुळे पुन्हा चर्चेत आलंय. बीड, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये स्वत: फिरून लिहिलेलं हे पुस्तक महाराष्ट्रातल्या दुष्काळाचा उभाआडवा छेद अभ्यासतं. खेड्यापाड्यांतल्या आयामाया पाण्यासाठी कशी वणवण करतात, त्यांना केवळ पाण्यापायी- दुष्काळापायी गाव सोडून मुंबईपुण्याकडे मोलमजुरी करत कसा जीव जगवावा लागतो, हे सांगतानाच उद्योगांना महाराष्ट्र सरकार किती दरानं पाणी देतं, ते किती वापरलं जातं याचाही हिशेब काढणारं आणि दुष्काळाचे ‘नवउदारमतवादी अर्थव्यवस्थे’तले अनेक पैलू पुढे आणणारं हे पुस्तक आहे. ‘दुष्काळावरचं इंग्रजी पुस्तक’ म्हटल्यावर ज्या पी. साईनाथ यांचं ‘एव्हरीबडी लव्हज अ गुड ड्रॉट’ (मराठी अनुवाद : दुष्काळ आवडे सर्वांना) आजही आठवतं, त्या साईनाथ यांनीच कविता अय्यर यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. अय्यर यांचं हे पहिलंच पुस्तक. त्याला ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’ पुरस्कारांच्या ललितेतर विभागात पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. योगायोगानंच, या पुस्तकाचे प्रकाशक हार्पर कॉलिन्स यांना यंदा याच पुरस्कारांपैकी ‘प्रकाशन पुरस्कार’ मिळाला आहे. गज़्ााला वहाब यांचं ‘बॉर्न अ मुस्लिम’ या पुस्तकानंही ललितेतर विभागात बाजी मारली. 

‘अ डेथ इन सोनागाछी’  ही रिजुला दास यांची कादंबरी सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्काराची मानकरी ठरली. दीपा ही या कादंबरीची नायिका कोलकात्याच्या सोनागाछी भागात शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी ‘पुनर्वसन कार्य’ करणाऱ्या संस्थेची कार्यकर्ती, पण या स्त्रियांचं आयुष्य जवळून पाहताना दीपाचं मत बदलतं ते कसं, त्यातून पुढं काय होतं, याची ही कथा! याच ललितगद्य विभागातला पुरस्कार ‘अशोक : अ सूत्र’ या आयर्विन अॅालन सीली यांच्या कादंबरीलाही मिळाला आहे. अलाहाबाद ही जन्मभूर्मी आणि युरोप, अमेरिका, कॅनडा ही कर्मभूमी असलेले सीली हे यापूर्वी ‘पद्माश्री’प्राप्त ठरलेले आहेत, तर ‘पद्माभूषण’ तसेच साहित्य अकादमीची फेलोशिप अशा सन्मानांना पात्र ठरलेल्या ज्येष्ठ भारतीय  लेखिका अनिता देसाई यांना यंदाचा ‘टाटा लिटरेचर लाइव्ह- कारकीर्द गौरव पुरस्कार’ मिळाला आहे.