अविनाश कोल्हे nashkohl@gmail.com

जयतीर्थ राव हे व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक, कॉपरेरेटविश्वातले अनुभवी. त्यांच्या लिखाणातून उलगडणारे अर्थतज्ज्ञ गांधीअधिक भावतात..

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

विसाव्या शतकातील महान व्यक्तिमत्त्व म्हणून महात्मा गांधींना जग ओळखतं. त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या ‘अहिंसा’ आणि ‘सत्य’ या दोन तत्त्वांचं फार मोठं योगदान होतं. तरीही जगाला आणि सर्वसामान्यांना ढोबळमानाने गांधीजी हे एक राजकीय नेते म्हणूनच परिचित असतात; पण अनेक अभ्यासक गांधी विचारांच्या अनेक पैलूंचा अभ्यास करत असतात. त्यातून ‘शिक्षणतज्ज्ञ गांधीजी’.. ‘पर्यावरणवादी गांधीजी’ वगैरेसारखी पुस्तकं प्रकाशित होत असतात. दुर्दैवाने यातील बऱ्याच पुस्तकांचा बौद्धिक दर्जा फारसा चांगला नसतो. मात्र ‘अर्थतज्ज्ञ गांधी’सारखा विषय जेव्हा एखादा ज्येष्ठ आणि अनुभवी अभ्यासक हाताळतो तेव्हा त्याच्या पुस्तकाची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे ठरते. जयतीर्थ राव यांचे ‘इकॉनॉमिस्ट गांधी : द रूट्स अँड रिलेव्हन्स ऑफ द पोलिटिकल इकॉनॉमी ऑफ द महात्मा’ हे पुस्तक अशा- दखल घेण्याजोग्या- गटात मोडते.

जयतीर्थ राव (जन्म : १९५०) हे अहमदाबादच्या ‘इंडियन इंस्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’चे पदवीधर. अनेक वर्षे ते सिटी बँकेत वरिष्ठ अधिकारी होते. त्यांच्या गाठीशी भारतातील खासगी (कॉपरेरेट) क्षेत्रातील व्यवस्थापनाचा दीर्घ अनुभव आहे. राजकीय आणि आर्थिकदृष्टय़ा जयतीर्थ राव हे उजव्या विचारसरणीचे समर्थक ठरतात. त्यांची ‘नोट्स फ्रॉम अ‍ॅन इंडियन कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह’ (२०१२) तर  ‘द इंडियन कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह : अ हिस्टरी ऑफ इंडियन राइट-विंग थॉट’ (२०१९) ही पुस्तकंही याचीच साक्ष देतात. ताज्या पुस्तकात राव यांनी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून गांधीविचाराचा मागोवा घेतला आहे; त्यातही त्यांनी गांधीजींच्या ‘विश्वस्त’ या संकल्पनेची खोलात जाऊन चर्चा केली आहे. या पुस्तकाला राजमोहन गांधी यांची छोटेखानी प्रस्तावना आहे. राजमोहन गांधी हे गांधी विचारांचे नामवंत अभ्यासक आणि गांधीजींचे नातू. आधुनिक अर्थव्यवस्थेत ‘ग्राहक’ या घटकाचं महत्त्व गांधीविचारातही आहे, हे राव चपखलपणे अधोरेखित करतात, याकडे राजमोहन गांधींनी वाचकांचं लक्ष वेधलं आहे.

गांधीजींच्या अर्थविषयक विचारांचा अनेक अंगांनी वेध घेण्यापूर्वी या पुस्तकात राव यांनी, गांधीजींवर कोणकोणत्या गं्रथांचा/ विचारवंतांचा प्रभाव पडला; इंग्लंडमध्ये शिकत असताना गांधीजींनी ब्रिटिश कायद्यातील ‘समता’ वगैरेसारख्या संकल्पनांचा कसा खास अभ्यास केला; यावर प्रकाश टाकला आहे. ‘गांधीजी फक्त राजकीय नेते नव्हते तर जगाला दिशा देणारे, जगासमोरचे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन पर्याय ठेवणारे महान नेते होते’ या विधानाच्या समर्थनार्थ मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, लेक वालेसा, डॉ. नेल्सन मंडेला आदींची साक्ष काढतात (पृ.२). गांधीजींची लोकमानसातील प्रतिमा म्हणजे ते औद्योगिकीकरणाच्या विरोधात होते, त्यांचा मोठमोठय़ा कारखान्यांना विरोध होता. पण राव यांच्या मते गांधीजी जरी एका बाजूने उच्च दर्जाचे तत्त्वज्ञ होते तरी दुसरीकडून अतिशय व्यवहारी होते, म्हणूनच ते आगगाडीसारख्या यंत्राने प्रवास करत, रेडिओ ऐकत, रेडिओवरूनही भाषणं देत, पोस्ट ऑफिसची तारसेवा वापरत, त्यांच्या जाहीर सभांमध्ये ध्वनिक्षेपक वापरले जात.. ही सर्व आधुनिक जीवनातील तंत्रज्ञानाधारित उपकरणं आहेत जी गांधीजी सर्रास वापरत! गांधी तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी त्यांनी १९०९ साली लिहिलेली ‘हिंद स्वराज’ ही छोटीशी पुस्तिका अनेकदा वाचली पाहिजे. गांधीजींनी या पुस्तिकेत, श्रीयुत सिंगर यांनी बनवलेल्या शिलाईयंत्राचं यथोचित कौतुक केलं आहे! गांधीजींचा विरोध माणसाचा कामातला आनंद हिरावणाऱ्या महाकाय यंत्रांना होता. माणसाचे कष्ट कमी करणाऱ्या शिलाईयंत्रासारख्या उपकरणांना नव्हता, हे राव प्रभावीपणे दाखवून देतात.

विषमतेवरील उपाय

गांधीविचारातील महत्त्वाचा घटक म्हणून ‘विश्वस्त’ या संकल्पनेचा उल्लेख होत असतो; पण गांधीजींच्या अनेक संकल्पनांची टिंगलटवाळी झाली तशीच काही प्रमाणात ‘विश्वस्त’ या संकल्पनेचीसुद्धा झाली आणि आजही होत असते. राव यांच्यासारखा अनुभवी आणि उच्चशिक्षित अभ्यासक या संकल्पनेची यथार्थ मांडणी करतो. युरोपात सतराव्या-अठराव्या शतकात सुरू झालेल्या औद्योगिकीकरणाने गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी भयानक वाढली, यामुळे सामाजिक ऐक्य, सलोखा धोक्यात आला. यातून समाजवादाचा जन्म झाला. हा इतिहास माहिती असला तरी राव वाचकाला त्याही आधीच्या काळात नेऊन विषमतेची चर्चा पुरातन आहे, हे दाखवून देतात. त्यासाठी ते बायबलमधील गाजलेलं वचन उद्धृत करतात ‘एक वेळ हत्ती सुईच्या टोकातून जाऊ शकेल पण श्रीमंत माणसाला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही’ यातून ख्रिस्ताच्या काळातही श्रीमंतांबद्दल समाजात- संतांच्या मनांत क्षोभ भरलेला होता, हे दिसून येते. गांधीजींनी ख्रिस्तविचारांचा- बायबलचा प्रभाव वर्ज्य मानला नव्हता, हे विदीत आहेच.

राव दाखवून देतात की पाश्चात्त्य संस्कृतीची भोगवादी लोकप्रिय मूल्यं मान्य नसलेले मूठभर अभ्यासक युरोप- अमेरिकेतही होते. हेन्री डेव्हिड थोरो, टॉलस्टॉय, जॉन रस्किन वगैरेंची नावं आपल्याला माहीत आहेत. त्यांच्या विचारांचा प्रभाव गांधीजींवर होता, हे राव सांगतातच. पण ‘सविनय कायदेभंग’ ही संकल्पना न्यायाच्या आणि पर्यायानं मानवी समता या मूल्याच्या आग्रहाचाच एक आविष्कार कसा ठरते, हे राव विशद करतात : मध्ययुगीन इंग्लंडमध्ये राजाच्या लक्षात आलं की कायदे करून न्याय होतो असं नाही.. उलट काही प्रसंगी कायद्याच्या नावाखाली अन्याय होत असतो.. अशा प्रसंगी प्रस्थापित कायद्यांच्या बाहेर जाऊन न्याय केला पाहिजे (पृ. २०) चार्लस डिकन्सची कादंबरी ‘ऑलिव्हर ट्विस्ट’मध्ये मिस्टर बम्बल हे पात्र म्हणतं ‘कायदा गाढव आहे’!  असे ‘कायदेशीर अन्याय’ टाळण्यासाठी समतेच्या तत्त्वाचा वापर केला पाहिजे, हे इंग्लंडच्या कायद्यातील महत्त्वाचं तत्त्व ठरलं. या तत्त्वाचा गांधीजींवर प्रभाव पडला, यातूनच पुढचं तत्त्व म्हणजे जे कायदे न्याय करत नाही ते पाळायचे कशाला? असे कायदे मोडलेलेच बरे!

राव नमूद करतात की १९१८ साली अहमदाबाद येथे गांधीजींनी गिरणी कामगारांचा संप केला होता. अटक झाल्यानंतर गांधीजींनी न्यायालयात मोठय़ा आनंदाने ‘आपण गुन्हा केला’ हे मान्य केलं. यातून गांधीजी ‘अन्याय करणारे कायदे मोडण्यात काहीही गैर नाही’, हे प्रत्यक्ष वागून दाखवत होते.

.. आणि कल्याणकारी राज्य’! 

राव यांचा अभ्यास दाखवून देतो की गांधीजींनी ‘विश्वस्त’ ही संकल्पना गुजरातेतील वैश्य/ जैन समाजातून घेतली. त्याही काळी गुजरातेतल्या ‘आनंदजी कल्याणजी ट्रस्ट’कडे अनेक देवळांचं व्यवस्थापन होतं (पृ.३१) ही मंडळी देवळांची संपत्ती, देवळांच्या ताब्यात असलेली जमीन वगैरेंचं व्यवस्थापन ‘विश्वस्त’ या भावनेतून करत होती. यामागची तात्त्विक भूमिका अशी की, हे सर्व जग देवाचं आहे, या जगातील संपत्तीसुद्धा देवाचीच आहे. मी फक्त विश्वस्त या नात्याने या संपत्तीचा कारभार पाहतो. गांधीजींच्या मांडणीनुसार आधुनिक काळात श्रीमंतांनी विश्वस्ताच्या भूमिकेतून त्यांच्या संपत्तीचं व्यवस्थापन करावं. या प्रकारे गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी कमी होईल. राव नमूद करतात की ही दरी मिटवण्याचा मार्क्‍सने सांगितलेला रक्तरंजित मार्ग सोव्हिएत युनियनमध्ये अवघ्या काही वर्षांपूर्वी प्रत्यक्षात आला असताना, गांधीजी श्रीमंतांना आवाहन करत असत की त्यांनी स्वत:हून स्वत:च्या वडिलोपार्जित संपत्तीचे विश्वस्त व्हावे, अन्यथा गरीब त्यांच्या घरात शिरून लूटमार करतील! काही अभ्यासकांच्या मते, पाश्चात्त्य देशांतील श्रीमंतांनी हा धोका ओळखून ‘कल्याणकारी राज्य’ ही संकल्पना पुढे आणली.

गांधीजींच्या अर्थविषयक विचारांची चर्चा करताना ‘नैतिकता’ हा मुद्दा मागे ठेवून चालत नाही, याची जाणीव देताना राव सांगतात की, हाच मुद्दा ज्यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणतात ते ब्रिटिश अर्थतज्ज्ञ अ‍ॅडम स्मिथ यांनासुद्धा प्रिय होता!  स्मिथ याचं गाजलेलं ‘द वेल्थ ऑफ नेशन्स’ हे पुस्तक १७७६ साली प्रकाशित झालं;  पण या पुस्तकाआधी त्यांचंच ‘द थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स’ हे पुस्तक १७५९ साली प्रकाशित झालं होतं. लेखकाच्या मते अ‍ॅडम स्मिथ तेव्हा जे सांगत होते तेच गांधीजी विसाव्या शतकात सांगत होते. आधुनिक काळात भांडवलशाहीत नैतिकता आणायची असेल तर भांडवलदारांनी ‘विश्वस्त’ झाले पाहिजे- विकासाची फळं सर्वाबरोबर वाटून घेतली पाहिजेत. संपत्तीची निष्कारण उधळपट्टी न केलेली बरी (पृ. १७९).

हे पुस्तक म्हणजे गांधीजींच्या अर्थविषयक विचारांचा एकविसाव्या शतकातलं दुसरं  दशक संपताना घेतलेला वेध आहे. राव यांची व्यवस्थापनशास्त्रातील पदवी, खासगी क्षेत्रातला दीर्घ अनुभव वगैरेंमुळे हे पुस्तक एका अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तीनं लिहिलं असल्याची सतत जाणीव होत असते गांधीजींवर अशी पुस्तकं दुर्मीळ असतात. विद्यापीठीय विद्वानांनी लिहिलेल्या पुस्तकांवरची पुस्तकी सावली लपत नाही, तसं हे पुस्तक वाचताना होत नाही. अर्थात, राव यांचं वाचन चौफेर असल्यामुळे त्यांच्या लिखाणात साहित्य-कलांचे संदर्भ येतात. गांधीजींसारख्या बहुआयामी प्रतिभा असलेल्या व्यक्तीलासुद्धा असं सोप्या भाषेत लिहिलेलं पुस्तक वाचायला आवडलं असतं! 

इकॉनॉमिस्ट गांधी

लेखक : जयतीर्थ राव

प्रकाशक : पेंग्विन रँडम हाउस इंडिया

पृष्ठे : २००; किंमत : ५९९ रु.