डिजिटल युगाकडे जाताना..

तंत्रस्नेही वापरामुळे खर्चातील कपात व अप्रत्यक्ष व्यवसायातील लाभही सोदाहरण स्पष्ट करण्यात आला आहे.

‘एचडीएफसी बँक २.० : फ्रॉम डॉन टू डिजिटल’

वीरेंद्र तळेगावकर veerendra.talegaonkar@expressindia.com

रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं करणाऱ्या एचडीएफसी बँकेत तंत्रज्ञानाची मुळं कशी रुजली, ते हे पुस्तक सांगतं. तंत्रज्ञानाची जोड असलेल्या वित्त सेवा-उत्पादनांच्या जोरावर देशाच्या बँकिंग क्षेत्रात एचडीएफसीला यश कसं मिळवता आलं, याचं गुपितही त्यातून आपसूकच उलगडत जातं..

सरकारमधील मोदी २.०, मनोरंजनातील रावण २.०, अर्थसंकल्पातील २.०, चांद्रयान मोहिमेतील २.०.. ही २.० ची बिरुदावली लावण्याचा मोह साहित्यालाही आवरता आलेला नाही. खऱ्या अर्थाने नवे पर्व, नवा कालावधी हे आकडय़ात स्पष्ट करणारी ही संकल्पना देशातील एका आघाडीच्या खासगी बँकेतही रुजल्याचा दाखलाच ‘एचडीएफसी बँक २.० : फ्रॉम डॉन टू डिजिटल’ या पुस्तकातून दिला गेला आहे.

चार्ल्स डिकन्सने फ्रेंच राज्यक्रांतीबाबत वर्णन केलेल्या त्याच्या ‘ए टेल अफ टू सिटीज्’ पुस्तकातील प्रारंभीच्या उताऱ्याचा दाखला देतच या पुस्तकाची सुरुवात होते. या गलेलठ्ठ पुस्तकाच्या मुखपृष्ठावर झळकविण्यात आलेल्या एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांच्या छबीमागे डिजिटल अणू-रेणूंचे तेज उमटविण्यात आले आहे. नावीन्यासाठीची धडपड, त्याची दिमाखदार सुरुवात आणि त्याच दरम्यान त्यातील अपयश यांचा तारेखेनिहाय उतारा देताना संबंधित व्यक्तींचे चमूकार्य, त्यातील नेतृत्वगुण हे सारे पुस्तकात अधोरेखित करण्यात आले आहे. डिकन्सचे- ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे,’ असे सांगणारे वचन उद्धृत करताना बँकेला तंत्रस्नेही वळण अंगवळणी पडताना करावी लागणारी कसरत या पुस्तकातून दिसून येते.

‘चिल्लर’, ‘चॅटबोट’, ‘स्मार्टबाय’सारखी तंत्रस्नेही उत्पादने सादर करताना माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे पाठबळ कसे मिळाले, हे नमूद करताना त्या जोरावर गाठलेल्या ग्राहक आणि व्यवहारांचा लाख, कोटी, अब्जाचा टप्पाही अर्थवाचकांना सत्यता पटवत जातो. बँकेचे काम हे माहिती तंत्रज्ञान किंवा नवउद्यमी कंपनी काढण्याचे नाही, तर त्या आधारावर ग्राहकांना, भागधारकांना सुलभ असलेली आणि वेळखाऊ, खर्चीक नसलेली सेवा कशी देता येईल, हे आहे. हेच तत्त्व बँकेने अंगीकारल्याचे पुस्तकातून वर्णित केले आहे. बँकिंगमधले ‘अलिबाबा’ आणि ‘नेटफ्लिक्स’ आपण कसे होऊ, याच दिशेने ‘डिजिटल’ची धरलेली कास यशस्वी कशी ठरली, हा सारा प्रवास पुस्तकात सांगितला गेला आहे.

डिजिटल तंत्रज्ञानामुळे मनुष्यबळावर येणाऱ्या कुऱ्हाडीचा वार परतवून लावताना एचडीएफसी बँकेने उलट उत्पादन व ग्राहककेंद्रित सेवा कशी वृद्धिंगत केली, याचा वस्तुपाठ पुस्तक घालून देते. तंत्रस्नेही वापरामुळे खर्चातील कपात व अप्रत्यक्ष व्यवसायातील लाभही सोदाहरण स्पष्ट करण्यात आला आहे.

पुस्तकाच्या मुख्य प्रकरणात, बँकेने अनुसरलेल्या डिजिटल क्रांतीचा प्रवास वर्णन करतानाच प्रत्येक उत्पादन, सेवा सुरू करतानाचे, त्यातील सहभागी व्यक्तींचे तसेच त्यातील यशापयशाचे टप्पे आकडय़ांसह, नावांसह देण्यात आले आहेत. व्यक्तींचा उल्लेख त्यांच्या नावासह, त्यांच्या पद-आस्थापनेसह (पूर्वाश्रमीचे), त्यांच्या गुणवैशिष्टय़ांसह करण्यात आला आहे; त्यामुळे त्या त्या व्यक्तीबद्दल सुस्पष्ट माहिती मिळते.

मुख्य विषयावर जेवढा भर पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात देण्यात आला आहे, तेवढाच रोख बँकेतील या क्रांतीचे प्रणेते आदित्य पुरी यांच्यावरही आहे. पुरी यांच्या कार्यकर्तृत्वाची आरास मांडताना त्यांचे बँक-वित्त क्षेत्रातील गुण हेरणारी नजर एचडीएफसी समूहाचे अध्यक्ष दीपक पारेख यांच्याकडे कशी होती, हे कळते. सिटी बँकेत महत्त्वाच्या जबाबदारीवर असताना पुरी यांना नव्या बँकेसाठी नेतृत्व म्हणून नियुक्त करणे, त्यांना निर्णयस्वातंत्र्य बहाल करण्याचा पारेख यांचा हेतूही कसा सार्थ ठरला, हे सविस्तर वर्णन केले आहे. २०१४ साली सिलिकॉन व्हॅलीतील काही तंत्रज्ञांना आदित्य पुरी भेटले. तिथे त्यांना तंत्रज्ञान बँकेसाठी नेमके काय करू शकते, याचा अंदाज आला. तिथून पुढे काय घडले, ते पुस्तकात येते. परंतु यात पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या व्यवसायाला यशाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवताना, त्यास हातभार लागणारे हातही तेवढेच सत्कार्यी असावेत, हा पारेख यांचा दूरदृष्टिकोनही दिसतो. पुस्तकातील तीन प्रकरणांपैकी हे मधले, वाचकाला बँकेच्या इतिहासात नेणारे प्रकरण तुलनेत अधिक उत्सुकता चाळवते. बँकेच्या या ‘फ्लॅशबॅक’वर एखादे स्वतंत्र पुस्तक अथवा एखादा सिनेमा तयार होऊ  शकतो, असे वाटते.

रुग्णालयात हृदयशस्त्रक्रिया झाल्यानंतरही या माणसाला आपल्यावर उपचार करणारा डॉक्टर एचडीएफसी बँकेचा ग्राहक का नाही, असा प्रश्न पडतो. तर मुंबईतील बँक मुख्यालयानजीकच्या दुकानदाराला नेमकी कोणती बँक सेवा हवी, हे हा माणूस स्वत: चालत त्याच्या दाराशी जाऊन विचारतो. हे वाचून कामाप्रतीची तळमळ आणि आपण देऊ करत असलेली सेवा अधिक समावेशी कशी करता येईल यासाठीचा प्रयत्न, हे नेतृत्वगुण उठून दिसतात.

बँकिंग विषयातील तज्ज्ञ लेखक, पत्रकार, सल्लागार असलेल्या तमल बंद्योपाध्याय यांचे खास एचडीएफसी बँकेवरील हे तसे दुसरे पुस्तक. पण हा केवळ बँकेचा- त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर – फ्लॅशबॅक नाही, तर बँकेच्या वाटचालीत सुरू झालेल्या डिजिटल युगाची प्रचीती या पुस्तकरूपी पडद्याची पाने उलटविताना येते. एचडीएफसी बँकेचे असे मार्गक्रमण सुरू असताना स्थापनेच्या वेळचे आणि पुढील यशातील एक एक खंदा कार्यकर्ता विलग होत असतानाही ठाम निर्णय आणि लक्ष्यपूर्तीसाठीचे प्रयत्न याच जोरावर बँक क्षेत्रातील सात टक्के हिस्सा काबीज करण्यात बँकेला यश कसे मिळाले, हे पुस्तकात सविस्तर नमूद केले आहे.

एचडीएफसी बँक आणि आदित्य पुरी हे तर समीकरणच झाले आहे. मग ते बँकेबाबत असो अथवा या पुस्तकाबाबत. त्यामुळे एकूणच बँक, पुरी आणि विषयविश्लेषणाचे कोंदण असलेल्या या पुस्तकाला प्रस्तावनाही समर्पक व्यक्तीचीच आहे. ‘आधार’ या देशव्यापी तंत्रस्नेही मंचाची मुहूर्तमेढ रोवणारे नंदन निलेकणी यांची प्रस्तावना पुस्तकाला आहे. प्रस्तावनेच्या जवळपास डझनभर पानांमधून लेखकाचे केवळ कौतुक करण्याचा मोह टाळत त्यांनी ‘फिनटेक’ व्यवस्थेतील संक्रमण अधोरेखित केले आहे. जन्माला आलेले तंत्रज्ञानी बाळ एचडीएफसी बँकेच्या हातात का आणि कशाच्या जोरावर हसतेय-खेळतेय, याची कारणमीमांसा त्यांनी यातून केली आहे. २०१५ मध्ये देशाच्या वित्तीय क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असताना बँका त्यांच्या ग्राहकांना शाखारहित मंच कसा उपलब्ध करून देत आहेत, याचे उदाहरण म्हणून ते एचडीएफसी बँकेचा उल्लेख करतात. या क्षेत्रात इतरही नवागत खेळाडू असताना, बँकेने युनिक तंत्रस्नेही मंच आणि त्याची नावीन्यपूर्ण उत्पादने यांच्या जोरावर केलेल्या प्रवासाचे संक्षिप्त वर्णनही बरीच माहिती देऊन जाते.

या पुस्तकाची तीन भागांत विभागणी करण्यात आली आहे. पैकी पहिला भाग हा अर्थातच पुस्तकाच्या मुख्य विषयाला समर्पित करण्यात आला आहे. बँकेच्या डिजिटल क्रांतीचा उलगडा यातून होतो. तर शेवटच्या भागात बँकेतील या क्रांतीचे प्रणेते आदित्य पुरी यांच्याबद्दल संक्षिप्त चरित्रवजा माहिती आहे. पुस्तकाचा मधला भाग ‘फ्लॅशबॅक’ शीर्षकांतर्गत एचडीएफसी बँकेच्या स्थापनेविषयीचा आहे.

तमल बंद्योपाध्याय आणि ‘जयको’ प्रकाशन या द्वयींचं एचडीएफसी बँकेवरील हे दुसरे पुस्तक. (एचडीएफसी बँकेच्या स्थापनेनंतर १८ वर्षांनी तमल यांनी ‘ए बँक फॉर द बक’  हे पुस्तक लिहिले होते.) तमल यांच्या साहित्यखात्यावरचे मात्र हे स्वतंत्र पाचवे रत्न. हे पुस्तक लिहिण्यापूर्वी त्यांनी बंधन बँक आणि सहारा समूहावर पुस्तकरूपी लिखाण केले आहे. बंधन बँकेच्या स्थापनेपासूनच्या सल्लागाराचा त्यांना मान मिळाला. तर सहारावरील लिखाणाबद्दल त्यांच्यामागील न्यायालयीन ससेमिरा अद्यापही सुटलेला नाही. त्यांचे पहिले पुस्तक ‘फ्रॉम लेहमन टू डिमॉनेटायझेशन’ हे तर विशेषत: बँक क्षेत्रातील संकटकाळी मार्गच दाखविणारे आहे.

बँक, अर्थमाध्यम क्षेत्रात तमल बंद्योपाध्याय यांची स्वतंत्र ओळख आहे. ‘मिंट’मधून ते यापूर्वी ‘बँकर्स ट्रस्ट’ सदरातून वाचकांची अर्थजाण वाढवत होते. रामनाथ गोएंका फाउंडेशनद्वारे २०१७ मध्ये सन्मानित पत्रकार असलेले तमल हे त्यांच्या बंगालीतील कवितांसाठीही प्रसिद्ध आहेत. बँक क्षेत्राचे मूळ, सूक्ष्म वित्तसंस्था ते सार्वजिनक बँक, खासगी बँक, विदेशी बँक अशा एकूणच बँकिंग व्यवस्थेची जाण त्यांच्या लिखाणातून प्रतीत होते. एचडीएफसी बँकेवरील या नव्या पुस्तकासाठी, त्यातील लिखाणासाठी, संदर्भासाठी बँकेच्या, तिच्याशी संबंधित व्यक्तींच्या मुलाखती, वृत्त, रिझव्‍‌र्ह बँकेचे आदेश, बँकेतील बदल अशा साऱ्यांचा अभ्यास करावा लागल्याचे तमल सांगतात. मात्र, १९९० च्या दशकात स्थापन झालेल्या या बँकेशी संबंधित काही माहिती उपलब्ध नसल्याने केवळ आठवणी, चर्चेवर निभवावे लागल्याची कबुलीही ते देतात.

‘एचडीएफसी बँक २.० : फ्रॉम डॉन टू डिजिटल’

लेखक : तमल बंद्योपाध्याय

प्रकाशक : जयको पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे: ४३०, किंमत : ४९९ रुपये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Book review hdfc bank 2 0 from dawn to digital zws

Next Story
विशलिस्ट