scorecardresearch

फारसीचे सांस्कृतिक साम्राज्य

आज इतिहासाची मोडतोड मोठय़ा प्रमाणात होत आहे, धर्माधता मोठय़ा प्रमाणात पसरवली जात आहे,

फारसीचे सांस्कृतिक साम्राज्य

प्रा. सचिन चंद्रकांत केतकर

भारताच्या सांस्कृतिक इतिहासाबद्दलच्या काही ठरावीक, साचेबंद (गैर)समजुतींना बाजूला सारून धारणांची पुनर्माडणी करण्याचा प्रयत्न करणारे हे पुस्तक डाव्या-उजव्या विचारसरणींच्या चष्म्यांतून झालेल्या इतिहासमांडणीतील चुका दाखवून देतेच; पण इतिहासाकडे लख्खपणे पाहायला सांगते..

सर्वोच्च न्यायालयाच्या बाबरी मशिदीविषयीच्या नुकत्याच आलेल्या निर्णयामुळे भारतीय इतिहासातील मुसलमान राजवटीचा विषय गंभीरपणे पुन्हा आपल्यासमोर उभा राहिला आहे. भारतीय इतिहासातील इस्लामी राजवटी आणि संस्कृती हा विषय नेहमीच राजकीय दृष्टीने हाताळला जातो आणि निष्पक्षपणे त्याचा अभ्यास कमीच होताना दिसतो. या पार्श्वभूमीवर अ‍ॅरिझोना विद्यापीठातील प्राध्यापक रिचर्ड एम. इटन यांचे संशोधकीय काम अतिशय महत्त्वाचे म्हणता येईल. ‘इंडिया इन द पर्सिआनेट एज १०००-१७६५’ हे इटन यांचे नवे पुस्तक त्यांच्या आतापर्यंतच्या कामाची फलश्रुती म्हणून पाहता येईल.

आधीची पुस्तके

इटन यांचे २००५ साली प्रसिद्ध झालेले ‘अ सोशल हिस्टरी ऑफ द डेक्कन, १३००-१७६१ : एट इंडियन लाइव्ह्ज’ हे पुस्तक म्हणजे दख्खनच्या सामाजिक इतिहासावरील महत्त्वाचे अभ्यासलेखन आहे. या पुस्तकात इटन यांनी दख्खनचा सामाजिक इतिहास आठ व्यक्तिरेखांद्वारे मांडला आहे. मलिक अंबर, तुकाराम आणि महाराणी ताराबाई यांच्या व्यक्तिरेखांतून इटन यांनी मराठय़ांचा सामाजिक इतिहास उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

‘एसेज् ऑन इस्लाम अ‍ॅण्ड इंडियन हिस्टरी’ या २००२ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात इटन यांनी भारतीय इतिहासलेखन आणि इस्लाम यांबद्दलच्या काही वादग्रस्त विषयांवर महत्त्वाचे संशोधकीय लेखन केले आहे. मंदिर ध्वंस, धर्मातर, हिंसा वगैरे आज राजकीयदृष्टय़ा संवेदनशील विषय इटन यांनी विद्वत्तापूर्ण व निष्पक्षपणे हाताळले आहेत. त्यांच्या मते, मंदिरभंजनाच्या कृत्याविषयी मध्ययुगातल्या मुस्लीम इतिहासकारांनी मुद्दामहून अतिशयोक्तीपूर्ण अहवाल दिले आणि वास्तविक मंदिर ध्वंसाची उदाहरणे कमीच सापडतात. इटन फक्त ८० मंदिरांचा दाखला देतात, जी मुस्लीम जेत्यांनी तोडल्याचा पुरावा सापडतो. मुख्य म्हणजे, ही मंदिरे धर्माधतेमुळे तोडली नसून राजकीय हेतूने तोडली गेली, असे मत इटन देतात. राजाश्रय असलेली देवळे तोडल्यामुळे त्या राज्यावर चालून आलेल्या योद्धय़ाला किंवा सुलतानाला तिथे आपली सत्ता स्थापित करता येत होती.

‘द राइज ऑफ इस्लाम अ‍ॅण्ड द बेंगॉल फ्रंटियर, १२०४-१७६०’ या पुस्तकात इटन यांनी धर्मातराविषयी महत्त्वाचे निरीक्षण मांडले आहे. त्यांच्या मते, धर्मातरे प्रामुख्याने राजकीय बळ व शक्तिप्रयोगामुळे होतात असे गृहीत धरले, तर राजकीय सत्ताकेंद्रापासून (दिल्लीपासून) दूर प्रदेशांत- म्हणजेच पूर्व बंगाल व पश्चिम पंजाबात धर्मातराचे प्रमाण सर्वाधिक कशामुळे आढळते, हे समजत येत नाही. त्याचबरोबर धर्मातराबद्दलच्या इतर मान्यतासुद्धा (उदाहरणार्थ, धर्मातर राजकीय आश्रय मिळवण्याकरता होते किंवा जातिव्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी होते) आपण संपूर्णपणे स्वीकारू शकत नाही, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न इटन करतात. त्यांच्या मते, धर्मातर हे कृषक समाजाच्या सीमांच्या (फ्रंटियर) अभिवृद्धीशी (अ‍ॅक्रिशन) आणि नंतर होणाऱ्या सुधारणांशी (रिफॉम्र्स) जुळलेली प्रक्रिया आहे. दोन विश्व दर्शने (इस्लामी व बिगर-इस्लामी) एकमेकांमध्ये मिसळल्यामुळे भारतीय इस्लाममध्ये बिगर-इस्लामी तत्त्वे मोठय़ा प्रमाणात सापडतात. नंतर सुधारणेच्या प्रक्रियेत या बिगर-इस्लामी गोष्टींना बाजूला सारून शुद्ध मुस्लीम ओळख निर्माण करण्याचे प्रयत्न होताना दिसतात.

नंतरच्या काळात मुस्लीम इतिहासकारांचे अतिरंजित, अतिशयोक्तीपूर्ण वृत्तान्त इंग्रज शासकांना व इतिहासकारांना अतिशय सोयीस्कर झाले; कारण या वृत्तान्तांचा दाखला देऊन आपण (इंग्रज) कसे ‘सुसंस्कृत’ व ‘सभ्य’ आहोत आणि आपले शासन त्या मुस्लिमांपेक्षा कसे चांगले आहे, हे शाबीत करता आले. वसाहतवादाचे समर्थन आणि त्यास अधिमान्यता मिळवण्याकरता हे अतिशयोक्तीपूर्ण वृत्तान्त इंग्रजांना सोयीस्कर पडले. अर्थातच ही सर्व मते सामाजिक इतिहासकाराची आहेत आणि म्हणून सर्वच समकालीन राजकीय विचारधारांना ती गैरसोयीची वाटणारी आहेत.

धारणांची पुनर्माडणी

इटन यांच्या या आधीच्या पुस्तकांच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया इन द पर्सिआनेट एज, १०००-१७६५’ या नव्या पुस्तकाकडे पाहण्याची गरज आहे. हे पुस्तक भारताच्या सांस्कृतिक इतिहासाबद्दलच्या काही ठरावीक, साचेबंद (गैर)समजुतींना बाजूला सारून त्यांची पुनर्माडणी करण्याचा प्रयत्न करते. पहिली रूढ धारणा म्हणजे : ‘भारतीय सभ्यता स्थिर व अपरिवर्तनशील असून अकराव्या शतकानंतर ती आणखी साचलेली होते.’ मात्र, इसवी सनाच्या दुसऱ्या सहस्रकातच बौद्ध धर्म नाहीसा होतो; शीख धर्माचा उदय होतो. मोठय़ा प्रमाणात जंगलांची जमीन शेतजमिनीत परिवर्तित होते; त्याचबरोबर आदिवासी जमातींचा समावेश ‘हिंदू समाजव्यवस्थे’त ‘जातीं’च्या स्वरूपात होतो. इतकेच नव्हे, तर औद्योगिक क्षेत्रात मोठी शक्ती म्हणूनही भारत याच कालखंडात पुढे येतो, हे इटन दाखवून देतात. दुसरी गैरसमजूत म्हणजे : ‘भारतीय सभ्यता ऐतिहासिकदृष्टय़ा अन्य संस्कृती व सभ्यतांपासून अलिप्त असून संस्कृत-हिंदू मुळातून स्वयंनिर्मित आहे.’ इटन दाखवतात की, भारतीय सभ्यता मध्य आशिया, आफ्रिका, पूर्व आशिया आणि मध्य-पूर्वेतील समाज व सभ्यतांबरोबर सतत संपर्कात असून, या संपर्काच्या इतिहासाशिवाय तिचा इतिहास अपूर्ण राहील. त्यामुळे भारतीय सभ्यता समावेशक, संकरित सभ्यता आहे आणि तिचा विकास इतर सभ्यतांबरोबरच्या आदान-प्रदानातून झाला आहे.

इतिहासलेखनावरील आक्षेप

इटन भारतीय समाजाच्या इतिहासलेखनाविषयी (हिस्टरिओग्रफी) काही गंभीर मुद्दे मांडतात. आपल्याकडे सामान्यपणे इ.स. १००० ते १८०० पर्यंतच्या कालखंडास इतिहासकार ‘मुस्लीम युग’ किंवा ‘मध्य युग’ असे संबोधतात. परंतु अशा नामकरणात गंभीर समस्या आहेत. उदाहरणार्थ, आपण दक्षिण अमेरिकेवर स्पॅनिश लोकांनी केलेल्या आक्रमणाला आणि वसाहतीला ‘ख्रिस्ती आक्रमण’ किंवा ‘ख्रिस्ती वसाहत’ म्हणत नाही. जरी त्यांनी मोठय़ा प्रमाणात बळजबरी धर्मातरे, कत्तली आणि जुलूम केले तरीही आपण त्यास ‘स्पॅनिश आक्रमण’ असेच म्हणतो.

दुसरा मुद्दा म्हणजे, त्या काळच्या हिंदू लोकांनीसुद्धा परधर्मीयांना ‘तुर्क’ हेच संबोधन दिले. ‘अन्यत्व’ (अदरनेस) धार्मिक कारणांवरून नव्हे ‘मानववंशविषयक’ (एथनिक) कारणांवरून होत होते. मग आपण दुसऱ्या सहस्रकातल्या सहा शतकांना ‘मुस्लीम युग’ म्हणून का संबोधतो? जणू इतिहासलेखनातच धार्मिक विभाजनाची मुळे आहेत. ‘मुस्लीम युगा’ची ही कल्पना इंग्रज इतिहासकारांनी उचलून धरावी, हा निव्वळ योगायोग नाही! हेच इतिहासलेखनाचे वसाहती प्रारूप भारतीयांनीसुद्धा आत्मसात केले. गंमत म्हणजे, इंग्रज राजवटीच्या कालखंडास आपण ‘ख्रिस्ती युग’ म्हणत नाही हे लक्षात ठेवायला हवे! म्हणून ऐतिहासिक युगांच्या धर्मकेंद्रित विभागणीला आणि नामकरणाला अधिक योग्य पर्याय सुचवण्याचा प्रयत्न इटन करताना दिसतात. यासाठी ते शेल्डन पोलॉक या सुप्रसिद्ध संस्कृत पंडितांची ‘कॉस्मोपोलीस’ ही संज्ञा वापरतात.

शेल्डन पोलॉक सांगतात की, संस्कृत साहित्य व ज्ञान परंपरांचा वावर अफगाणिस्तानपासून सिंगापूपर्यंत विस्तारलेला आहे. तो स्थानसापेक्ष नाही की धर्मसापेक्ष नाही; ब्राह्मण, जैन, बौद्ध वगैरे धर्माचे ज्ञान व साहित्य संस्कृत भाषेत उपलब्ध आहे. संस्कृत भाषा, साहित्य व ज्ञान असणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा व सत्ता प्राप्त होत होती. हा विस्तार- ज्यास ‘मार्गीय’ असेही संबोधतात- ट्रान्सरिजनल’ आहे; कोणत्या एका प्रदेशाशी जुळलेला नाही. यामुळे पोलॉक त्याकडे ‘कॉस्मोपोलीस’ किंवा ‘सार्वभौम मार्गीय अवकाश’ म्हणून पाहतात. या मार्गीय अवकाशात व्यापक प्रमाणात लोकांचे, संहितांचे, प्रतीकांचे अभिसरण (सक्र्युलेशन) होत असे. त्याचप्रमाणे ऐतिहासिकदृष्टय़ा आपण ‘फारसी कॉस्मोपोलीस’ची कल्पनाही करू शकतो, असे इटन सुचवतात. या ‘फारसी कॉस्मोपोलीस’चा विस्तार पश्चिम, मध्य आणि दक्षिण आशियामध्ये झालेला दिसतो. इटन यांचे हे पुस्तक म्हणजे या फारसी सांस्कृतिक साम्राज्याच्या जडणघडणीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मागच्या सहस्रकाचा इतिहास ‘धर्मा’च्या चष्म्यातून न पाहता, इटन संस्कृतीच्या ऐतिहासिक सत्ताकारणाच्या (हिस्टरी ऑफ कल्चरल पॉलिटिक्स) दृष्टीतून भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाची पुनर्माडणी करतात. हेच त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणावे लागेल.

दोन समकालीन धाडींची कहाणी

इटन यांची लेखनशैली जितकी सोपी आणि रसाळ आहे, तितकीच त्यांची विद्वत्ता सखोल. ही विद्वत्ता ओझे न होता त्यांच्या कथनशैलीला उत्तम जोड देते. इतिहासकार नेहमीच उत्तम कथाकार असेल असे नाही; पण इटन हे उत्तम कथाकारही  आहेत- जे वाचकाला इतिहासाच्या प्रेमात पाडू शकतात! या कथनशैली आणि विद्वत्तेच्या योगाचा उत्तम नमुना म्हणजे त्यांनी पुस्तकातील पहिल्या प्रकरणात वर्णन केलेली- ‘दोन समकालीन धाडींची कहाणी’! यात इटन यांनी, अकराव्या शतकात चोल वंशाच्या पहिला राजेंद्र या राजाने वंग देशाच्या पाल साम्राज्यावर केलेल्या आक्रमणाची तुलना महमूद गझनीने सोमनाथच्या मंदिरावर केलेल्या धाडीशी करतात. गझनीनंतर येणाऱ्या जेत्यांनी भारतात फारसीच्या सांस्कृतिक साम्राज्यवादाची मुहूर्तमेढ रोवली.

या दोन्ही धाडी राज्य स्थापित करण्याच्या किंवा तिथे स्थायिक होण्याच्या हेतूने केलेल्या नव्हत्या. परतताना चोल योद्धे शिवाची मूर्ती, ओरिसाहून भरव, भरवी आणि कालीची मूर्ती वगैरे तंजावरला नेतात. त्याचप्रमाणे गझनीसुद्धा मंदिरातून शीव मूर्ती तोडून इतर संपत्ती घेऊन जातो. दोन्ही धाडींमध्ये देवळे भ्रष्ट होतात, दोन्ही धाडींत संपत्ती लुटली जाते. पण या दोन्ही धाडींत महत्त्वाचा फरक असल्याचेही इटन सांगतात. तो असा की, पहिल्या राजेंद्रची राजकीय विचारधारा मार्गीय संस्कृत अवकाशातून निर्माण झालेली होती. ही विचारधारा प्रामुख्याने कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’तील ‘मंडळ’, ‘दिग्विजय’ व ‘चक्रवर्ती’ या कल्पनांतून आलेली असते. त्याचबरोबर भगिरथाच्या कथेप्रमाणे राजेंद्रला गंगाजलही तंजावरला आणायचे होते, म्हणून त्याचे सैनिक मडकी भरून गंगाजल घेतात. इटन फारसीतून निर्माण झालेल्या राजकीय विद्य्ोचीही चर्चा करतात आणि नंतरच्या काळात भारतीय राजकीय विद्य्ोवरील या ज्ञानाच्या प्रभावाचा विचारही करतात.

इटन यांना जुन्या डाव्यांप्रमाणे सत्ताकारण, हिंसाचार व संघर्षांवर पडदा पाडून ‘त्या काळी सगळे काही चांगले होते आणि सर्व गुण्यागोविंदाने राहत होते’ असे दाखवण्यात रस नाही. त्याचप्रमाणे त्यांना हिंदुत्ववाद्यांच्या- ‘मुस्लिमांनी सर्वनाश केला आणि धर्माधतेपोटी हजारो देवळे ध्वंस करून मोठय़ा प्रमाणात जबरदस्तीने धर्मातरे केली,’ या विचाराला कोणताही ऐतिहासिक आधार नाही हे दाखवायचे आहे. तसेच आधुनिक भारतीय सभ्यतेच्या विकासप्रक्रियेत या फारसी कॉस्मोपोलीसचा मोठा वाटा आहे- जो आपण नाकारू शकत नाही, हेही दाखवायचे आहे.

आज इतिहासाची मोडतोड मोठय़ा प्रमाणात होत आहे, धर्माधता मोठय़ा प्रमाणात पसरवली जात आहे, अशा काळात भारताच्या सांस्कृतिक इतिहासाची पुनर्माडणी करण्याची मोठी गरज आहे. त्यात रिचर्ड इटन यांच्यासारख्यांचे प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत.

‘इंडिया इन द पर्सिआनेट एज १०००-१७६५’

लेखक : रिचर्ड एम. इटन

प्रकाशक : अ‍ॅलन लेन

पृष्ठे: ३३६, किंमत : ६९६ रुपये

लेखक ‘महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठा’त इंग्रजीचे अध्यापन करतात. त्यांचा ईमेल : sachinketkar@gmail.com

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-11-2019 at 04:33 IST

संबंधित बातम्या