रेश्मा भुजबळ reshmavt@gmail.com

धार्मिक हेटाळणी, कुत्सित शेरेबाजीचे पडसाद सुज्ञ मनांवर उमटतातच; पण अशा हेटाळणी वा शेरेबाजीला सामोरे जाव्या लागणाऱ्या कोवळ्या मनांचे काय, या प्रश्नाचा वेध शालेय वातावरणाच्या संदर्भात घेणाऱ्या पुस्तकाविषयी..

घरानंतर मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचं ठिकाण म्हणजे शाळा. घराबरोबरच समांतरपणे मुलांची जडणघडण शाळेत होत असते. भविष्याचा पाया तिथंच घातला जातो. मात्र शाळेचं वातावरणच जर निरोगी नसेल तर तिथंच मुलांच्या अनेक समस्यांना सुरुवात होते. साधारणत: ३ ते १२ वयोगटांतील मुले ही अतिशय संवेदनशील, ग्रहणशक्ती उत्तम असणारी असतात. याच वयात भारतातील अनेक मुस्लीम मुलांना शाळेत धार्मिक हेटाळणीला सामोरं जावं लागतंय. त्यांच्याविषयी अनाठायी भीती, घृणा (इस्लामोफोबिया) व्यक्त केली जाते. याचे तीव्र परिणाम त्या मुलांवर होताना दिसतात. हेच वास्तव नाझिया इरम यांनी ‘मदिरग अ मुस्लीम : द डार्क सीक्रेट इन अवर स्कूल्स अ‍ॅण्ड प्लेग्राऊंड्स’ या पुस्तकात मांडले आहे.

सध्या देशात सुरू असलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातील आंदोलने आणि दिल्लीतील हिंसाचाराने सर्वाचेच लक्ष वेधले आहे. दिल्लीतील हिंसाचारामुळे यापूर्वी झालेल्या दंगली, हिंसाचाराच्या खपल्या निघाल्या. धार्मिक विद्वेषातून घडलेल्या दंगलींचे, हिंसाचारांचे दूरगामी परिणाम कायमच जाणवत राहतात. भारताच्या फाळणीच्या वेळी निर्माण झालेली दुफळी मिटण्यास आणि त्या जखमेवर खपली धरायला आताशा कुठे सुरुवात झाली असतानाच, हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीचे आणि तिच्याशी जवळीक असणाऱ्या पक्षाचे प्राबल्य वाढले आणि निवडणुकीच्या प्रचारात धर्माधारित ध्रुवीकरण होण्यास सुरुवात झाली. याने निवडणुकीच्या राजकारणात फायदा होत असेलही; पण सांधत आलेली धार्मिक दरी रुंदावण्यास यामुळे हातभारच लागतो. यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपचा प्रचार याचं उत्तम उदाहरण ठरावं.

गेल्या तीन दशकांचा इतिहास पाहिला तर, राम मंदिर-बाबरी मशीद वाद, गुजरात दंगल, दहशतवादी हल्ले हे धार्मिक विद्वेषाचं वातावरण अधिकच गडद करत राहिले. याचे परिणाम फक्त समाजातील सज्ञान लोकांवरच होत राहिले का? फक्त एकच समाज यात कायम होरपळत राहिला का? तर नक्कीच नाही. अशा घटना समाजातील सर्वच घटकांना बाधित करतात; पण त्याचे परिणाम आता लहान मुलांवर, त्यांच्यासाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शालेय वातावरणावरही होऊ  लागले आहेत. नाझिया यांनी याची अनेक उदाहरणं पुस्तकात दिली आहेत. उदा. मुस्लीम मुलांना त्यांच्या धार्मिक ओळखीवरून हिणवणं. मात्र, अनेक शाळा अशा घटना शाळेच्या आवारात, क्रीडांगणावर होतात हेच मान्य करायला तयार नाहीत, असं नाझिया सांगतात. कदाचित यामागेही पूर्वी घडलेल्या घटनांचे पडसादच असावेत.

खरे तर नाझिया इरम या फॅशन स्टार्ट-अप चालवणाऱ्या नवउद्यमी. अगदी अचानकच त्यांचं लक्ष आजूबाजूला- विशेषत: शाळांमध्ये घडणाऱ्या घटनांनी वेधून घेतलं. २०१४ मध्ये नाझिया यांनी मुलीला जन्म दिला. वर्तमान धार्मिक ध्रुवीकरणाची प्रक्रिया या काळात सुप्तपणे, पण तीव्रतेनं आकार घेऊ लागली होती. नाझिया यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलीला जवळ घेतलं आणि एका अनामिक भीतीनं त्यांना वेढलं. तिला मुस्लीम ओळख देणारं नाव देतानाही त्यांना काळजी वाटली. मातृत्वाची जबाबदारी आणि आजूबाजूच्या परिस्थितीनं त्यांना अस्वस्थ केलं. त्या म्हणतात, ‘या काळातच आपली पहिली ओळख ‘मुस्लीम’ अशीच आहे हे प्रकर्षांनं लक्षात आलं.’ आपल्या मुलीला उज्ज्वल, सकारात्मक भविष्य देण्यासाठी काय करता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, एक मुस्लीम आई म्हणून भेडसावणारे प्रश्न त्यांना एकटीलाच आहेत की सगळ्या मुस्लीम मुलांच्या मातांना, याचा शोध त्यांना घ्यावासा वाटला. त्याचं उत्तर म्हणजे हे पुस्तक! त्यासाठी त्यांनी देशभरातील १२ शहरांतील १४५ कुटुंबांशी संवाद साधला. यासाठी त्यांनी मुस्लीमबहुल वस्तीत राहणाऱ्या कुटुंबांऐवजी मिश्र जाती-धर्माच्या लोकवस्तीत राहणाऱ्या कुटुंबांची निवड केली. त्यात अगदी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या, मानसोपचारतज्ज्ञ, वकील, अभियांत्रिकी, डॉक्टर, प्राध्यापक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्यांचा सहभाग होता.

नाझिया यांना या शोधाभ्यासात धक्कादायक वास्तवास सामोरं जावं लागलं. पुस्तकातील आठ प्रकरणांपैकी ‘द मुस्लिम्स आर कमिंग’, ‘द एलिफंट इन द स्कूल’, ‘आर वी फ्रॉम पाकिस्तान ममा?’, ‘ऑन द बेस्ट बिहेविअर’, ‘हाऊ  डिड वी गेट हीअर’ या प्रकरणांमध्ये या वास्तवाबद्दल, मुस्लीम मुलांच्या अनुभवांबाबत विस्तारानं लिहिलं आहे. ते लिहिताना त्यांनी कुणाचीही ओळख लपवलेली नाही, हे विशेष!

चार वर्षांची अझानिया तिच्या पालकांबरोबर मोटारगाडीने अलिगढला आजोळी चालली होती. वाटेत मुस्लीमबहुल वस्ती पाहून ती अतिशय घाबरून जाते. दरदरून घाम फुटलेल्या अवस्थेत ती तिच्या आई-वडिलांना सांगते की, ‘‘मुस्लीम येतील आणि ते आपल्याला मारून टाकतील.’’ तिला आपण स्वत: मुस्लीम असल्याचं माहीतही नसतं. मात्र ‘मुस्लीम मारून टाकतात’ हे तिच्यावर शाळेच्या परिसरात बिंबवलं गेलंय. हीच अझानिया तिसरीत असतानाचा एक प्रसंग. तिचा एक वर्गसहकारी शाळेच्या मैदानात फुटबॉल खेळताना, ‘‘ए पाकी, बॉलपासून दूर राहा,’’ असं तिला फर्मावतो. दहशतवादी हल्ल्याविषयी शिक्षिकेनं माहिती दिल्यावर पाचवीत असलेल्या सादला त्याचा वर्गसहकारी, ‘‘साद, यह कर दिया तुमने..’’ असं म्हणून खिल्ली उडवतो. त्यावर शिक्षिकाही शांत बसण्याची भूमिका घेतात. फैझान आपल्या आईला विचारतो, ‘‘आपण पाकिस्तानी आहोत का?’’ हे विचारण्याचं कारण त्याच्या वसतिगृहातील वर्गसहकारी इतरांना सांगतो की, ‘‘हा तर आतंकवादी आहे, हा पाकिस्तानी आहे, त्याला मारा..’’ ही सगळी उदाहरणं आहेत बालवाडी ते पाचवी या वर्गातली. साधारणत: ४ ते १० वयोगटांतली.

याहून मोठय़ा मुलांना, म्हणजे १० ते १८ वयोगटांतल्या मुला-मुलींनाही अशाच हेटाळणीला सामोरं जावं लागण्याचे प्रसंग नाझिया यांनी नमूद केले आहेत. त्यात ‘‘तुझे वडील तालिबानी आहेत का?’’, ‘‘भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान तुम्ही कोणाला प्रोत्साहन देता?’’ किंवा ‘‘तू बुरखा, हिजाब घातला नाहीस, मग तुझ्या घरच्यांना चालतं का?’’, ‘‘तू स्कर्ट घालतेस, तुझे उघडे पडलेले पाय तुझ्या वडिलांना चालतात का?’’, ‘‘मुसलमान घाणेरडे असतात, ते आंघोळ करत नाहीत, प्राण्यांसारखे खातात’’ अथवा ‘‘तुम्ही डुकराचे मांस खाता का?’’, ‘‘तिला त्रास देऊ  नका, ती तुमच्यावर बॉम्ब टाकेल..’’, ‘‘तुम्ही पाकिस्तानी आहात, निघून जा पाकिस्तानात..’’ अशा प्रकारच्या कुत्सित हेटाळणीला सामोरं जावं लागण्याच्या या घटना आहेत.

या मुलांच्या मातांशी संवाद साधल्यावर आणखी काही समस्या समोर आल्या. या मुलांना शेजारची मुलं खेळायला घेत नाहीत; इतर धर्मीय मुलांच्या घरी जेवायला, सण-समारंभांना बोलावलं जात नाही; मुस्लीम कुटुंबांना घर मिळवताना होणारा त्रास; अनेकदा इतर धर्मीय पालक शाळेत मुस्लीम मुलाशेजारी आपल्या मुलाला बसवण्यास, मुस्लीम मुलं जास्त असणाऱ्या शाळेत मुलांना घालण्यास तयार नसतात, आदी अनेक. नाझिया यांनी एक उदाहरण दिलं आहे ते शाळांमधील भाषिक वर्गीकरणाचं. म्हणजे काही शाळा मुलांचं संस्कृत आणि उर्दू असं वर्गीकरण करतात. भोपाळच्या शाळेत तर असं वर्गीकरण करतानाच मुलांना दिली जाणारी वागणूकही बदलते. इतर धर्माचे शिक्षकही अनेकदा मुस्लीमबहुल विद्यार्थ्यांच्या शाळेत शिकवण्यास तयार नसतात. ही उदाहरणं पुरेशी बोलकी आहेत.

अशी उदाहरणं निदर्शनास आणून देताना नाझिया त्या मुलांच्या प्रतिक्रियाही नोंदवतात. त्या सांगतात, अनेक मुलं शांत होऊन जातात. कुणातही मिसळायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही. तर अनेक मुलं अचानकच आक्रमक होतात. लहानसहान गोष्टींवरून त्यांचा आक्रमकपणा बाहेर येतो. कित्येक जण फक्त मुस्लीम मुलांशीच मैत्री करतात. तर देश सोडून जाणे हाही पर्याय अनेकांनी स्वीकारल्याचे दिसते. अनेक जण अचानक धार्मिक व्हायला लागतात. कोणी रोजच मशिदीत जाऊ  लागतो. कोणी उपवास करू लागतो, तर एखादी मुलगी हिजाब घालू लागते. मुलं कट्टरतावादाकडे झुकू लागतात. मुख्य म्हणजे या घटना उच्चभ्रू मुस्लीम समाजातील मुलांच्या बाबतीत घडलेल्या आहेत. यातील एक उदाहरण तर एका माजी सैनिकाच्या मुलीच्या बाबतीतलं आहे.

शारीरिक जखमा या दिसून येतात आणि त्या बऱ्याही होतात; मात्र अशा पद्धतीनं केलेल्या शाब्दिक जखमा खोलवर परिणाम करतात, त्या दिसून येत नाहीत. त्यांचे परिणाम दीर्घकाळ राहतात. ज्या मुलांकडून अशा प्रकारची हेटाळणी होते, ती मुलंही जाणीवपूर्वक या टिप्पणी करत नाहीत. त्यांच्या घरी त्यांच्यासमोर जे बोललं जातं, त्याचा हा परिपाक असतो. वर म्हटल्याप्रमाणे, साधारणत: १९९०च्या सुमारास मुस्लीमविरोधी वातावरण मोठय़ा प्रमाणात निर्माण झालं. तशाच प्रकारच्या चर्चा घराघरांमध्ये होऊ  लागल्या. त्या चर्चा मुलांच्या कानावर पडल्यानंतर त्यांनी त्यातल्याच गोष्टी उचलून आपल्या मुस्लीम वर्गसहकाऱ्यावर अजमावयाला प्रारंभ केला. कित्येकांना त्याचा अर्थदेखील लक्षात येत नसतो, असं नाझिया यांनी संवाद साधलेल्या अनेक मातांनी सांगितलं. म्हणूनच मुलांचं वय लक्षात घेऊन अनेक जणींनी अशा घटनांची तक्रार करणं टाळल्याचं सांगितलंय. एवढंच नव्हे, तर त्यांनी आपल्या पाल्याला इतर धर्माबाबत कटुता राहणार नाही, याची दक्षताही आवर्जून घेतली आहे. त्यासाठी मुलांशी कशा प्रकारचा संवाद साधला, हेही अनेकींनी सांगितलं आहे. कारण सर्वच सुशिक्षित पालकांप्रमाणेच, आपल्या देशात आपली मुलं सुरक्षित आणि सकारात्मक वातावरणात वाढावी असंच याही पालकांना वाटतं.

बरं, या घटना फक्त भारतातच वाढल्या आहेत का? तर नाही. जगभरातच धार्मिक ओळखीवरून हिणवण्याच्या घटना वाढल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारानंतर अमेरिकेतील शाळांमध्येही वर्णद्वेष आणि धार्मिक तणाव वाढला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे वृत्त तेथील वृत्तपत्रांनी दिल्याचं उदाहरण नाझिया देतात.

साधारणत: सत्तरच्या दशकात अनेक भारतीय मुस्लीम मध्य-पूर्वेतील देशांमध्ये कामानिमित्त गेले. तिथून ते लोक परतले रग्गड पैसा घेऊन. त्यातून मग अनेक मशिदी, मदरसे उभे राहिले. मात्र येताना ते फक्त पैसेच घेऊन आले नाहीत, तर तिथल्या चालीरीतीही घेऊन आले. त्यातूनच बुरखा, चार वेळा नमाझ, दाढी राखणे, हिंदूंच्या घरचे जेवायचे नाही असे प्रकार होऊ  लागले. तुम्ही अमुक केलं नाही तर तुम्ही कट्टर मुस्लीम नाही, असं बिंबवणारे ‘हराम पोलीस’ त्यातून वाढू लागले. स्त्रियांचाही त्यात समावेश होताच. इथं तुम्ही तुमची स्वतंत्र ओळख सोडत नाही तोपर्यंत इतर मुस्लीम समाज तुम्हाला स्वीकारत नाही, हे  प्रसिद्ध लेखिका रक्षंदा जलील यांचं निरीक्षण नाझिया यांनी नोंदवलं आहे.

इतर धर्माच्या सहकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक आणि वाढत चाललेला कट्टरवाद यामुळे मुस्लीम मुलं एकाकी पडतात. त्यांच्या या स्थितीला भोवतालची राजकीय स्थिती जबाबदार आहे आणि त्यासाठी अगदी मुस्लीम नेते, पक्षही अपवाद नाहीत. फक्त मुलंच नव्हे, तर त्यांचे पालकही एक प्रकारची सतर्कता बाळगत राहतात. मुलांना उत्तम वागणूक ठेवण्याची, कुणाशीही वाद न घालण्याची, बॉम्ब-बंदुका असणारे गेम न खेळण्याची सूचना करत असतात. एवढंच नव्हे, तर मुलांच्या विनोदावर- म्हणजे ‘दहशतवाद’, ‘हायजॅक’ शब्द असलेले विनोद विमानतळांवर करण्यासही बंदी घालतात.

लहान वयातल्या आठवणी मोठेपणी प्रत्येकाला आकार देतात. सध्या सुरू असलेली धार्मिक हेटाळणी ही धोक्याची घंटा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न नाझिया करतात. मात्र त्या कुठेही स्वत:ची टिप्पणी, भाष्य करत नाहीत. केवळ वास्तव आपल्यासमोर मांडतात. त्यासाठी त्यांनी एकूण १७ जणांच्या मुलाखतीही विस्तारानं दिल्या आहेत.

समाज म्हणून आपली वाटचाल नक्की कोणत्या दिशेनं चालली आहे, हा अस्वस्थ प्रश्न लक्षात घेता, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पालकांनी व शाळांनीही अशा घटनांना प्रतिबंध घालून सहिष्णू वातावरणासाठी आणि मानवी मूल्यांची जाणीव मुलांमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. निकोप समाजासाठी साऱ्यांनीच प्रयत्नरत व्हावे, नाही तर सगळेच त्यात होरपळले जातील, हेच या पुस्तकाचे सांगणे आहे.

‘मदिरग अ मुस्लीम : द डार्क सीक्रेट इन अवर स्कूल्स अ‍ॅण्ड प्लेग्राऊंड्स’

लेखिका : नाझिया इरम

प्रकाशक : जगरनॉट

पृष्ठे: २२०, किंमत : ३९९ रु.