विबुधप्रिया दास

‘रे हिंदबांधवा थांब या स्थळी, अश्रु दोन ढाळी..

ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली।’

हा राजकवी भा. रा. तांबे यांनी लिहिलेला पोवाडा आणि पुढल्या- ‘तांबेकुलवीरश्री ती.. नेवाळकरांची कीर्ती’ या ओळीसुद्धा अनेक मराठीजनांना आठवत असतील. या मराठी स्त्रीच्या लढय़ाची गाथा सांगणारं ‘वीज म्हणाली धरतीला’ हे नाटकही काही रसिकांना आठवत असेल.. पण हे सारं चाळिशीपार असलेल्यांना आज आठवेल. स्वा. सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकातून या विखुरलेल्या लढय़ाची प्रेरणा जागती ठेवली होती, पण ‘मराठी हार्ड आहे’ म्हणून ती न वाचण्याकडे नव्या पिढीचा कल दिसतो आहेच. अशा वेळी महाराष्ट्राचं १८५७ च्या  बंडाशी- पहिल्या स्वातंत्र्य समराशी- नातं किती घट्ट होतं, हे नेमकं सांगणारं एक इंग्रजी पुस्तक आलं आहे.

मुंबईचे इतिहास-अभ्यासक डॉ. एम. डी. डेव्हिड यांनी विविध साधनं वापरून हे पुस्तक सिद्ध केलंय! पुस्तकाची विभागणी सात प्रकरणांत आहे. मराठय़ांच्या राज्यविस्ताराचा इतिहास हाही १८५७ ला प्रेरणादायीच असून कंपनी राजवटीविरुद्ध अनेक ठिकाणी असंतोष होताच, हे इतिहासकथन मांडण्यासाठी पहिलं (बंडाची मुळे, स्वातंत्र्याची आस) आणि तिसरं (बंडापूर्वीचा असंतोष) प्रकरण कामी आलं आहे. दुसऱ्या प्रकरणात या लढय़ाच्या नेतेपदी भूतपूर्व मराठा साम्राज्यातील केंद्रांचे नेतेच कसे प्रमुख होते, हे लेखक सांगतात. चौथ्या- पाचव्या प्रकरणात लेखकाचा खरा अभ्यास दिसून येतो. आजच्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यजिल्ह्यंचा १८५७ शी नेमका संबंध काय, याचा पट मांडणारी ही दोन प्रकरणं, पुस्तकाचा गाभा आहेत. त्याबद्दल विस्तारानं पुढे बोलूच. पण इतिहास कुणालाही केंद्रीभूत मानून लिहू नये, या अभ्यासकी शिस्तीचं उदाहरण अखेरच्या दोन प्रकरणांतून मिळतं. भिल्ल, कोळी या समाजांमधले ब्रिटिशांविरुद्धचे उठाव कसे आणि का झाले, हे सांगणारं सहावं प्रकरण. तर सातव्या प्रकरणात, या महा-बंडाळीला प्रत्युत्तर देणाऱ्या मुंबई इलाख्यातल्या अधिकाऱ्यांवर कसकसे परिणाम झाले, प्रशासन कसं ‘हलून गेलं’ याचा लेखाजोखा अखेरच्या प्रकरणात आहे.

आता पुस्तकातल्या महाराष्ट्राबद्दल. पुस्तकाची काही पानं अर्थातच उत्तरेकडल्या राज्यांत चाललेल्या उठावाविषयी असली आणि नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई आदींचा उल्लेख त्या संदर्भात अधिक आला असला, तरी रंगो बापूजी (गुप्ते) यांचा कर्तृत्वपट विशेषत्वाने मांडणारं हे पुस्तक आहे. रंगो बापूजींनी सातारपासून रत्नागिरी, कोल्हापूर- पंढरपूर- बेळगाव- विजापूपर्यंत जाऊन रणनीतीची आखणी केली होती. नागपूरकर भोसले यांचे राज्यदेखील सातारच्या गादीसारखेच ब्रिटिशांनी खालसा केले असल्याने तेथून आपणांस मदत मिळू शकते, हे ओळखून रंगो बापूजींनी वाठार, आर्वी असा प्रवासही केला. फलटण-कराड येथे सैन्य उभारलेच पण कोकणापर्यंतचे मावळे, रामोशी, कोळी, भंडारी यांनाही ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी एकत्र करण्याचे प्रयत्न आरंभले होते, असा तपशील लेखक देतात.

पण कोल्हापूर, बेळगाव, नरगुंद, जमखंडी, तोरगल, सोलापूर, या ठिकाणी ब्रिटिशांना झालेले प्रतिकार स्वप्रेरित होते. नागपुरात टाकळी येथे सैनिकांचा उठाव ब्रिटिशांनी ठेचून काढला, पण भंडाऱ्यात ब्रिटिशांवर त्यांचेच भारतीय सैनिक उलटले होते. वध्र्यापर्यंत तात्या टोपे यांनी मजल मारली होती! औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद येथूनही क्षीण का होईना, पण प्रतिकार झाला. एकापाठोपाठ दुसरा, अशा या स्थानिक उठावांमुळे ब्रिटिश पुरेसे जेरीला आले. मात्र लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी या बंडाची वेळीच दखल घेऊन राजकीय उपाययोजनाही हव्यात हे हेरले. संस्थानिकांना पूर्णत बेदखल करणे (उदा.- सातारच्या वंशजांना तेथून बाहेर काढणे) आणि जेथे ज्या जमातींची बहुसंख्या नाही, तेथेच त्या जमातींचे सैनिक ठेवणे अशा उपाययोजना तर तातडीने झाल्या. तरीही, केवळ ईस्ट इंडिया कंपनीच्या हवाल्यावर हा प्रांत सोडता येणार नाही, हे इंग्लंडच्या राणीलाही अखेर मान्य करावेच लागले, इतका या प्रतिकारांचा प्रभाव होता. इतिहास माहीत करून घेण्यासाठी, हे भावनिकतेत वाहून न जाता तपशील पुरवणारे पुस्तक वाचायलाच हवे. महाराष्ट्रीय पराक्रमाच्या ज्योतींचा प्रकाश त्यातून पुन्हा उजळेल!

टॉर्च बेअर्स ऑफ द डेक्कन ब्लेझिंग अप द नॉर्दर्न स्काइज’ (१८५७ इन महाराष्ट्र- अ हिस्टरी). लेखक : एम. डी. डेव्हिड

प्रकाशक : हिमालया पब्लिशिंग हाउस,

पृष्ठे : १४+१९४, किंमत : ९५० रु.