बुकबातमी : ‘जेसीबी’ची लघुयादी!

‘जेसीबी पुरस्कार’ चार ऑक्टोबरला जाहीर झालेल्या लघुयादीमुळे चर्चेत आला आहे.

भारतीय साहित्यासाठीचा सर्वाधिक रकमेचा (२५ लाख रुपये) मानला जाणारा ‘जेसीबी पुरस्कार’ चार ऑक्टोबरला जाहीर झालेल्या लघुयादीमुळे चर्चेत आला आहे.  काय आहे या यादीत? व्ही. जे. जेम्स यांच्या, मल्याळममधून इंग्रजीत भाषांतरित झालेल्या ‘अँटिक्लॉक’चा नायक-निवेदक ख्रिस्ती ‘अंडरटेकर’ (शवपेटय़ा बनवणारा) आहे. हेन्ड्री (हेन्री नव्हे, हेन्ड्री!) नावाचा हा नायक आदिनाडु नावाच्या गावात राहातो आणि या गावातला सॅटन लोप्पो मरूदे आणि मीच त्याला पुरूदे एवढीच हेन्ड्रीची महत्त्वाकांक्षा असते. गावात परतलेला ११२ वर्षांचा पंडित त्याला भेटतो आणि मग ही कादंबरी जादुई वळणं घेते. याच मल्याळम कादंबरीला ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळाला होता. ‘नेम प्लेस एनिमल थिंग’ ही दरिभा लिण्डेम यांचं पुस्तक वाचकाला बालपणातून किशोरावस्थेत प्रवेश करणाऱ्या एका मुलीच्या जगात तुम्हाला स्पष्टपणे, प्रामाणिकपणे आणि खोलवर पाहण्याची संधी देतं. दरिभा सुलभ आणि सोप्या पद्धतीने लिहितात. त्यामुळे घुसखोरीसारखे कठीण विषयही ‘सहज’ – तरीही धारदारपणेच, हाताळले जातात. या दृष्टीनं, कादंबरीची नायिका लहान मुलगी असणं उपयुक्तच ठरतं.  शाबीर अहमद मीर यांचं ‘द प्लेग अपॉन अस’ हे पुस्तक – म्हटलं तर कौटुंबिक पातळीवर घडणारंच, पण  काश्मीरच्या परिस्थितीवर भाष्य करणारं. लेखक इथं राजा ईडिपसचं कालातीत मिथक वापरतो. या कादंबरीतल्या  व्यक्तिरेखांचं अस्थैर्य हे काश्मीरमधील अस्थैर्याचं प्रतिबिंब आहे. अनेक छोटय़ा प्रसंगांतून कथानक उलगडतं प्रत्येक किश्श्यागणिक गुंतागुंत वाढते.  दिल्लीत आलेल्या दाक्षिणात्त्य स्थलांतरिताचं स्व-गत मांडणारं एम. मुकुंदन लिखित ‘दिल्ली: अ सोलिलॉक्वी’ हे पुस्तकही लघुयादीत आहे. चांगलं आयुष्य जगण्याच्या आशेनं मोठय़ा शहरांत आलेल्या गरिबांच्या आयुष्यावर इतिहासाच्या लाटांचा – राजकारणाचा- कसा प्रभाव पडतो, याची गोष्ट मोजक्या व्यक्तिरेखांमधून लेखक सांगतो. ही सगळी पुस्तकं भारतात घडणारी, पण लिंडसे परेरा यांचं ‘गॉड्स अँड एन्ड्स’ ओब्रिगाडोमध्ये घडणारं. एकमेकांना मूर्ख बनवण्याच्या जणू स्पर्धेतच उतरलेले इथले रहिवासी, जगातल्या आजच्या घटनांची आठवणही वाचकाला देतात हे परेरा यांच्या तीक्ष्ण विनोदबुद्धी आणि तिरकस लिखाणाचं यश. यापैकी कोणतं पुस्तक ‘जेसीबी’ पटकावणार, हे १३ नोव्हेंबरच्या रात्री कळेल!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bookmark jcb prize for literature 2021 zws

Next Story
व्यवस्थेचीच ‘जुगाड’बाजी