बुकअप : करेंजवा लागे  कटार…

‘अख्तरी : द लाइफ अँड म्युझिक ऑफ बेगम अख्तर’ या नव्या पुस्तकाची. हे मूळ हिंदीतलं.

‘अख्तरी: द लाईफ अँड म्युझिक ऑफ बेगम अख्तर’ संपादक : यतिंद्र मिश्रा प्रकाशक : हार्परकॉलिन्स पब्लिशर्स इंडिया पृष्ठे : २५३, किंमत : ६९९ रुपये

|| गिरीश कुबेर
या पुस्तकात ज्यांचे लेख आहेत त्या सर्वांना माहितीये की वाचणारासुद्धा अख्तरीबाईंच्या असंख्य प्रेमिकांपैकीच एक असणार आहे. आणि प्रेमिकांना जास्त काही सांगावं लागत नाही…

काही कलाकार आणि त्यांचे कलाविष्कार निखळ आनंद देणारे असतात. पण काही कलाकारांच्या कलाकृतींचा आनंद दुसऱ्या एखाद्या भावनेच्या कोंदणातून समोर येत राहातो. म्हणजे चित्रकार व्हॅन गॉग, कुमार गंधर्व यांच्या कलाकृतीतून मिळणारा आनंद हा जगण्यातलं कुतूहल जागं करतो. किशोरीबाईंचं गाणं शून्यात घेऊन जातं. हेन्री मूरची शिल्पं आपल्याला कशातलंच कसं काही कळत नाही, याची जाणीव करून देतात. भीमसेनांचं गाणं ‘आज हृदय मम विशाल झाले’ असं वाटायला लावतं. मन्सूरअण्णा, मालिनीबाई, वसंतराव, मुकुल असं प्रत्येकाविषयी काही ना काही सांगता येईल. प्रत्येक कलाकार आणि त्याच्या कलाकृती जागवणाऱ्या भावना वेगळ्या. एकमेव अशा. बेगम अख्तर यांचंही तसंच. त्याचं गाणं छळतं. दिवसभरात ऐकलं तर राहिलेला दिवस त्या गाण्याच्या दावणीला बांधला जातो आणि संध्याकाळनंतर ऐकलं तर रात्रीचा दिवस होतो. अख्तरीबाई अतुलनीय आहेत.

बेगम अख्तर हे नाव शालेय वयात वाचायची आवड लागत असताना ‘भय्या नागपूरकर’च्या आणि/किंवा दाजी भाटवडेकरांच्या ‘काकाजी’च्या तोंडून पहिल्यांदा ऐकल्याचं आठवतंय. ‘दीवाना बनाना है तो दीवाना बना दे’. पण ते तसंच सुटून गेलं. नंतर ऐंशीच्या सुरुवातीला ‘अक्षर’च्या दिवाळी अंकात अंबरीशचा (मिश्र) ‘अख्तरीबाई’ हा लेख वाचला आणि बाईंची ओढ वाटू लागली. आसपासच्या वातावरणात ठासून नाट्यसंगीत भरलेलं होतं आणि चाळीतल्या आयुष्यात आनंदासाठी ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ पुरेसा होता. अशा अतृप्त पण स्वान्तसुखाय जगात बेगम अख्तर पोहोचल्या नव्हत्या. पोहोचणारही नव्हत्या. महाविद्यालयीन काळही आपण म्हणजे मराठी सारस्वताच्या अंगणातील दीपमाळ आहोत असं मानणाऱ्यांच्या आसपास घोंघावण्यात गेला. बेगम अख्तर लांबच राहिल्या. पण शिक्षणासाठी घराबाहेर पडल्यावर एका हिंदी भाषक मित्राबरोबर जाताना गाडीत ऐकलं :

उलटी हो गई सब तदबीरे,

कुछ ना दवाने काम किया।

देखा इस बीमारिये दिलने

आखिर काम तमाम किया ॥

आणि अख्तरीबाई भेटल्या. पहिलीच भेट अशी. आरपार. त्यानंतर आजतागायत या वर उल्लेखलेल्या सर्व महानुभावांप्रमाणे बेगम अख्तर बरोबर आहेत. एक दिवसही असा जात नाही/गेलेला नाही की यातलं कोणीच भेटलं नाही. पण त्यातही विचार करावा लागतो तो अख्तरीबाईंना भेटताना. या सगळ्यांत त्यांची छळण्याची क्षमता अमर्याद आहे. बाईंनी गायलेला शब्द न शब्द तर संग्रही आहेच. पण त्यांच्याविषयी लिहिलेलंही असंच जवळ बाळगलेलं आहे. यात आता नुकतीच एकाची भर पडली.

‘अख्तरी : द लाइफ अँड म्युझिक ऑफ बेगम अख्तर’ या नव्या पुस्तकाची. हे मूळ हिंदीतलं. त्याचा तितकाच रसाळ, गोष्टीवेल्हाळ इंग्रजी अनुवाद मनीषा तनेजा यांनी केलाय. यतींद्र मिश्रा हे या पुस्तकाचे संपादक. यातल्या तनेजा यांच्याविषयी काही फारसं माहीत नाही. पण मिश्राजी माहिती होते. बेगम अख्तर यांच्यावर दिलोजानसे प्रेम करणाऱ्यांच्या टोळीतले सर्वच एकमेकांना तसे माहीत असतात. यतींद्र तर अख्तरीबाईंच्या कुटुंबाशी ताल्लुकात राखून असलेले. गाण्याबजावण्याच्या घराण्यातले. हे गाणाऱ्याचं घराणं कोणतंही असो उल्लेख झाल्या झाल्या कानाच्या पाळीला लागायलाच पाहिजे अशा काहींतलं एक नाव म्हणजे अख्तरीबाई. त्यांच्या आयुष्याची, आकाशगंगेसारखी डोळ्यांत न मावणारी कहाणी त्यांच्या गझलेइतक्याच वेदनादायीपणे या पुस्तकातून समोर येते.

अनेकांनी ती चितारलीये. त्यात दोन दिवसांपूर्वीच निवर्तलेले सलीम किडवाई आहेत. शीला धर आहेत. त्यांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या कोणी शिवानी म्हणून आहेत. खुद्द यतींद्र मिश्रा आहेत. त्यांच्या चित्रपट दुनियेच्या प्रवासाविषयी सांगायला इक्बाल रिझवी आहेत. सत्यजीत रेंचा ‘जलसाघर’ आणि बेगम अख्तर यांचं नातं उलगडून दाखवायला कुणाल रे आहेत. शिवाय प्रवीण झा, ममता लिकिया, अनीश प्रधान. अख्तरीबाईंच्या गळ्यातला गालिब समजावून सांगणारे कोणी मृत्युंजय आहेत. ‘माईरी मैं कासे कहूं’ आणि ‘लग जा गले’ ही दोनच गाणी देऊन थांबले असते आणि तरी महान ठरले असते अशा मदनमोहन यांचा बाईंशी परस्परविषयींच्या आदर-भावनेचा दोस्ताना होता. त्या नक्षत्रांच्या मैत्रीबद्दल युनूस खान आहेत. शिष्योत्तमा शांती हिरानंद आहेत. रिटा गांगुली आहेत. ही यादी आणखी कितीही लांबवता येईल.

हे सगळे जण अख्तरीबाईंशी भरभरून लिहितायत आणि बोलतायत ही बाबच बाईंच्या गाण्यातील वेदनेला आणखी मोठं करते. तिच्यावर बहिर्गोल भिंग धरल्यासारखं हे लेखन. ही इतकी नावं का दिली? कारण अशा प्रकारच्या पुस्तकात लिहिण्याचा एक कंटाळवाणा पायंडा आपल्याकडे पडलाय. गौरवमूर्तीचा आपल्यावर किती विश्वास होता किंवा माझ्यात त्या भविष्य कसं पाहायच्या वगैरे. शुद्ध थोतांड. ते इथे अजिबात नाही. ज्यांचा कोणीही उत्तराधिकारी असूच शकत नाही, असताच नये अशा अख्तरीबाईंविषयी तर इतकी सलगी दाखवण्याचं काही कारण नसतं. पण कळत नाही हे अनेकांना.

या पुस्तकातले लेखक मात्र हे सत्य समजलेले लेखक आहेत. ते आपल्या आपल्या डोळ्यातल्या लोलकातून बाईंकडे पाहात त्यांना ऐकतात आणि तितकं आणि तेवढंच आपल्याला या पुस्तकातनं सांगतात. या सर्वांना माहितीये की हे पुस्तक वाचणारा अख्तरीबाईंच्या असंख्य प्रेमिकांपैकीच एक असणार आहे. आणि प्रेमिकांना जास्त काही सांगावं लागत नाही. गंमत म्हणजे यातल्या जवळपास प्रत्येकाच्या लेखात बाईंच्या आवाजातल्या त्या विशिष्ट ‘जागे’चा उल्लेख आहे. ती जागा ‘क्या बात है’साठी कमावलेली नाही. खरं तर ती ‘क्या बात है’ची नाहीच. ती ‘स्स्स’ अशा शब्दातीत उद्गारचिन्हाची जागा आहे. प्रत्येक ऐकणाऱ्याला त्या जागेवर एक चटका बसतोच बसतो. त्या ‘जागे’चं वेगळेपण या सर्वांनी उलगडून दाखवलंय.

बाईंचं जगणं, त्यांचा संसार, विख्यात आई, लखनऊचा नबाबी माहोल, बाईंच्या नाकातली हिऱ्याची चमकी, मोहर्रमच्या मिरवणुकीत ताबूत नाचवताना बेभान होऊन गाण्याचा रिवाज, मद्य आणि धूम्रपानाचा षोक आणि जगण्याची एकूण उधळपट्टी… असा सगळाच जडजवाहिरी ऐवज या पुस्तकात आढळतो. त्यातले यतींद्र मिश्रा, शांती हिरानंद यांचे लेख आणि मुलाखत वगैरे अधिक उल्लेखनीय.

बेगम अख्तर प्रेमिकांस त्यांच्या गजल, ठुमऱ्या त्यांच्या आवाजासह पाठ असतात. त्यांनी ‘मेरे हमनफस, मेरे हमनवा’ गाताना (त्यात त्या ‘बुलंद’चा उच्चार ‘मेरा अज्म इतना बलंद है’ असा करतात) ‘मुझे खौफ आतिश-ए-गुलसे है, की ये चमन को जला न दे’ ही व्यक्त केलेली काळजी खरी वाटावी असा हा काळ! (‘मला माझ्या आतल्या धगीची चिंता नाही, मला भीती आहे हा ‘वसंत’च (ऋतू) या उद्यानाला आग लावेल की काय!) बाईंची एक प्रचंड छळवादी ठुमरी आहे. ‘कोयलिया मत कर पुकार, करेंजवाँ लागे कटार’.

हे पुस्तक म्हणजे असं ‘करेंजवाँ लागे कटार’ आहे!

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bookup artist enjoy the art curiosity akp

ताज्या बातम्या