‘प्लेबॉय’ मासिकाने आपल्या पानांवरून स्त्री-शरीराची दिगंबरावस्था दाखवणार नसल्याचे या महिन्यात जाहीर केल्यानंतर, खऱ्या अर्थाने खळबळ वगैरे झाली नाही. गेल्या १५ ते १८ वर्षांपासून अव्याहत सुरू असलेल्या इंटरनेटमुळे जगभरात ‘दर्शनमात्र’ पिढीला हवे ते संगणकावर एका क्लिकनिशी उपलब्ध आहे. त्यामुळे इतक्या उशिराने निव्वळ या दाव्याद्वारे मासिकाला सोज्वळतेचे रूप प्राप्त होणार आहे. पण तसे तर त्याचे स्वरूप आधीपासूनच उच्च कोटीचे साहित्य आणि पत्रकारिता पुरवणारे होते.. प्लेबॉयने गेल्या सात दशकांत साहित्य आणि पत्रकारितेत जे प्रयोग केले, त्याकडे निव्वळ स्त्री-नग्नता प्रसारक या प्रतिमेमुळे दुर्लक्ष झाले असावे.. आजही प्लेबॉयबाबत गैरसमजांचाच जगभरात मोठा भरणा आहे. ‘सोज्वळतेच्या उपरती’निमित्ताने त्याच्या साहित्यिक योगदानाचा आढावा, साहित्यप्रेमी प्लेबॉय ‘वाचका’कडून..

इतर अनेक घटकांप्रमाणेच अमेरिका हे राष्ट्र साहित्यिक नियतकालिकांसाठी अद्यापपर्यंत तरी समृद्ध आहे. ऑनलाइन मोफत साहित्य पुरविण्यापासून जगभरात वर्गणीदार घडविणाऱ्या मासिकांमध्ये अमेरिकी आघाडी मोडता येणे शक्य नाही. शतकोत्तर परंपरा असणारे न्यूयॉर्कर, अटलांटिक, हार्पर्स, एस्क्वायर, युद्धोत्तर काळानंतर निर्माण झालेले पॅरिस रिव्ह्यू, न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स ही निव्वळ वैचारिक घुसळणीसह साहित्य, समीक्षा पुरवणारी व्यासपीठे म्हणून ओळखली जातात. या मासिकांच्या वैचारिक परिपाठाहून थोडे वेगळे देण्यासाठी १९७० च्या दशकात जीर्णोद्धार होऊन सादर झालेले जीक्यू (जंटलमेन्स क्वार्टरली) आणि रोलिंग स्टोन जागतिक पटलावर लोकप्रिय झाली. मात्र गंमत म्हणजे या सर्व वैचारिक आणि उपवैचारिक घटकांचा पाठपुरावा करणाऱ्या तथाकथित सभ्य मासिकांच्या प्राबल्य काळातही खपाच्या- प्रसिद्धीच्या आकडय़ांनी प्लेबॉयच पुढे होते. १९७२ साली ७२ लाख प्रतींसह जगभरातील नियतकालिक बाजारात उतरलेले हे मासिक निव्वळ स्त्री-नग्नतेच्या लखलखीत रूपामुळे लोकप्रिय होते हे म्हणणे त्यावर अन्याय ठरेल. विज्ञान, विनोद, साहित्यिक धीटपणा, मुलाखतींमधील निर्भीडता यांना युद्धोत्तर काळामध्ये खूप महत्त्व आणले, ते प्लेबॉय मासिकाने.
आपल्या सोबतच्या वैचारिक व्यासपीठांमधील सर्वोत्तम लेखकांना सर्वाधिक मोबदला देऊन लेखनाची प्रायोगिक बैठक तयार करण्यात प्लेबॉयने आघाडी घेतली. सुरुवातीपासून जवळपास प्रत्येक अंकात प्लेबॉयने आघाडीच्या लेखकांची मांदियाळी जुळवून आणली.
१९५३ ते १९८०
पहिल्याच अंकाच्या मुखपृष्ठावर (१९५३) ‘मेरेलीन मन्रो पहिल्यांदाच नग्न रूपात’ अशी जाहिरात तिच्या मादक अदाकारीसह प्लेबॉयने छापली. तत्कालीन कुटुंब आणि महिला मासिकांच्या सुळसुळाटावर बोट दाखवणाऱ्या संपादकीयात त्यांनी म्हटले आहे, की ‘महिलांनो, चुकून तुमच्या हाती हे मासिक लागल्यास तुमच्या ओळखीच्या पुरुषांकडे लगेचच सुपूर्द करा. तुम्ही कुणाच्या भगिनी, पत्नी अथवा सासू असलात, तरी हे मासिक तुमच्यासाठी नसून, तुमच्यासाठी असलेल्या मासिकांकडे जाण्यास तुम्ही समर्थ आहात.’ लेख, कथा, चित्रकथा, व्यंगचित्रे, विनोद आणि आघाडीच्या कलावतींची ‘विशेष चित्रे’ या नव्या मासिकातून देण्याचे आश्वासन ह्यू हेफ्नर या प्लेबॉय कर्त्यांने अद्यापपर्यंत पाळले. पहिल्याच अंकात ‘इन्ट्रोडय़ूसिंग शेरलॉक होम्स’ या सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या (जुन्या) कथेसोबत इतर दोन कथा आहेत. फुटबॉलवर एक लेख आहे. विनोदी लेख, व्यंगचित्रे आणि तत्कालीन लोकप्रियतेच्या शिखरावर वावरणारी मेरेलीन मन्रो हिची (आधीच कॅलेंडरवर छापलेली) नग्न छायाचित्रेही. शिवाय आणखीही काही, आजच्या पोर्नयुगात ओंगळच वाटावी अशी नग्नचित्रे आहेत
जानेवारी १९५४ पासून अंकामध्ये वाचकांच्या पत्रांचा पाऊस दिसतो. घडय़ाळ आणि पुरुषांच्या इतर चैनीच्या वस्तूंना जाहिरातींद्वारे मांडलेले दिसते. आजच्या ग्लॉसी जाहिरातींची ही मुळे पाहणे गमतशीर आहे. मार्च १९५४ च्या अंकात रे ब्रॅडबरी यांची सर्वाधिक गाजलेली कादंबरी ‘फॅरनहैट- ४५१’ पहिल्या भागासह दाखल झालेली दिसते. ब्रॅडबरींना विज्ञानकथालेखक म्हणून दिग्गजावस्था प्राप्त झालेली असताना, तीन भागांची ही मालिका प्लेबॉयच्या साहित्यिक आघाडीची नांदी होती. जानेवारी १९५५ च्या अंकात ब्रॅडबरींसोबत जॉन स्टाइनबॅक यांचीदेखील कथा आहे. तर गाय द मोपासाँ यांच्या चावट कथा ‘क्लासिक रिबाल्ड’ मालिकेअंतर्गत सुरू झाल्या. पी. जी. वुडहाऊस यांच्या कथांचीदेखील उपस्थिती येथे दिसते.
जानेवारी १९५७ च्या अंकात पहिली चौदा पाने जाहिराती व इतर घटकांत जाऊन १५व्या पानावर अनुक्रमणिका दिसते. जॅक केरूअॅक १९५८ च्या अंकात कथेसह अगदी तळातील नावांत दिसतो. १९६० च्या दशकानंतर मद्य, अत्तर, घडय़ाळ यांच्यासह उंची वस्तूंच्या जाहिरातींनी प्लेबॉय भरलेला दिसतो. पण तत्कालीन कथाकार, विनोदकार आणि उपरोधकार यांची अंकांमध्ये उपस्थिती दिसतेच दिसते. सामाजिक बदलांना, कुटुंबाच्या विघटनाला, स्त्रीवादाच्या आरंभाला या मासिकातील साहित्यविषयांत स्थान दिसते.
‘चार्ली अॅण्ड चॉकलेट फॅक्टरी’सह दर्जेदार बालसाहित्य प्रसविणारे रोआल्ड डाल यांनी ‘माय अंकल ओसवाल्ड’ ही मोठय़ांसाठी भन्नाट कादंबरीही लिहिली आहे. या कादंबरीचे बीज ‘व्हिजिटर’ (मे १९६५) या प्लेबॉयमध्येच प्रसिद्ध झालेल्या कथेत आहे. ‘लोलिता’कार व्लादिमिर नोबोकोव्ह, ‘कॅच-२२’ देणारा जोसेफ हेलर, जेम्स बॉण्ड शब्दरूपात साकारणारा इयान फ्लेमिंग, विज्ञानकथा लेखक आर्थर सी क्लार्क, फिलिप के डिक, रिचर्ड मथिसन आदी नावे जरी पाहिली, तरी ५० ते ८० पर्यंतची दशके गाजविणाऱ्या लेखकांची सामूहिक उपस्थिती अंकांत दिसेल.
धीट, निर्भीड मत मांडण्याची या काळात नियतकालिकांमध्ये स्पर्धा लागली होती. एस्क्वायर मासिकाने ‘फ्रँक सिनात्रा हॅज कोल्ड’ (१९६६) या गे तलिस या पत्रकाराचा कथावृत्तान्त प्रसिद्ध करून पत्रकारितेत फिक्शन-नॉन फिक्शनची नवी दिशा तयार केली. याच मासिकाने पुढे नोरा एफ्रॉनचा आत्मलेख ‘ए फ्यू वर्ड्स अबाऊट ब्रेस्ट’ (१९७२) मांडून स्त्रीवादी खळबळ उडवून दिली. रोलिंग स्टोन या उभरत्या मासिकाने हण्टर थॉम्पसन या लेखकाची अतिधीट पत्रकारिता मांडली. पत्रकारिता व साहित्य यांच्या घर्षणातून प्रायोगिक निर्भीड लेखनाला या काळात सुरुवात झाली. ही लेखनसंस्कृतीही प्लेबॉयने स्वीकारून अतिधीट विषयांवर चर्चा, मुलाखती यांवर भर देण्यास सुरुवात केली. याच काळात प्लेबॉयला मोठा स्पर्धक तयार झाला. १९७४ साली आलेल्या ‘हस्लर’ या मासिकाने साहित्याऐवजी फक्त नग्नतेचे प्रदर्शन करण्यास सुरुवात केली. लॅरी फ्लिन्ट या त्याच्या निर्मात्याला साहित्याऐवजी फक्त ग्लॉसी पेपरमध्ये सुंदर शरीर दाखविणे आवश्यक वाटत होते. प्लेबॉयने या स्पर्धेतही आपल्याकडील ‘नग्नपऱ्यां’ना दाखविण्याची मर्यादा आखून ठेवली. साहित्याचा दर्जा कायम ठेवला. १९८० नंतर होम व्हिडीओच्या आगमनाने मात्र प्लेबॉयच नाही तर इतर मासिकांचाही खप कमी केला.
१९८० ते २०००
अॅलिस के टर्नर या प्लेबॉयला फिक्शन एडिटर म्हणून लाभल्यानंतर प्लेबॉयच्या कथासाहित्याला १९८० पासून वेगळी वळणे मिळाली. त्यातले सर्वात पहिले म्हणजे नव्या- ताज्या दमाच्या अनेक लेखकांना प्लेबॉयचे व्यासपीठ मिळाले. १९८६ सालापासून ‘प्लेबॉय कॉलेज फिक्शन’ ही कथास्पर्धा राबवून त्यांनी नवे लेखक तयार केले. ब्रॅडी उडाल, जोनाथन ब्लूम, रायन हार्टी, रोलण्ट केट्स, केव्हिन गोन्झालेस ही आज अमेरिकी कथाविश्वात स्थिरावलेली नावे कॉलेज फिक्शनमध्ये बाजी मारून आलेली आहेत. (२००६ पर्यंतच्या २१ कथांचे संकलनही उपलब्ध आहे. यंदाचा म्हणजेच ऑक्टोबर २०१५ चा अंकही ‘कॉलेज इश्यू’ असून डॉनी वॉटसन नावाच्या विद्यार्थ्यांने कथापुरस्कार पटकावला आहे.) इतकेच नाही, तर दिवंगत डेव्हिड फॉस्टर वॉलेस याच्या विद्याíथदशेतील कथेला टर्नर यांनी प्लेबॉयमध्ये झळकवले होते. जॉन अपडाइक, जॉयस कॅरोल ओट्स, मार्गारेट अॅटवुड, चक पाल्हानिक, डेनिस लेहेन, टी. सी. बॉयल, हारुकी मुराकामी आदी सर्व तऱ्हेचे, सर्व भाषांत लिहिणारे आघाडीचे साहित्यिक प्लेबॉयमध्ये आपल्या खणखणीत कथांसह सादर झाले आहेत. या काळात प्लेबॉयच्या साहित्य आणि सामाजिक विषयांमध्येही उच्चभ्रूंपासून अतिसामान्य माणसांच्या गोष्टी, मुलाखती सादर झाल्या आहेत.
२००१ ते २०१५
व्हिडीओ पोर्नोग्राफी, हस्लर या स्पर्धकाचा वाढता व्याप आणि इतर इंटरनेटच्या आगमनासारख्या घटकांमुळे घटत जाणाऱ्या वाचकाला रोखण्यासाठी उत्तानतेचा स्वीकार या काळात काही अंशी मासिकाने केलेला दिसतो. साहित्य आणि सेलेब्रिटींच्या नेहमीच्या मुलाखतींसोबत, महिलांना ‘स्वयं-कामा’साठी उपयुक्त साधनांची चर्चा आणि व्हायग्रा या कामोत्तेजक गोळ्यांच्या आगमनानंतरची खळबळ या काळातील सुरुवातीच्या अंकांमध्ये दिसून येते. आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सच्या जाहिरातींनी परिपूर्ण असलेल्या अंकांमध्ये फोटोग्राफीला लाभलेल्या संगणकीय साहाय्याचा प्रभावही जाणवतो. मुळात नग्नता इंटरनेटवर आधी फोटोंच्या आणि नंतर चलच्चित्राच्या रूपात उपलब्ध होण्याचा हा काळ होता. त्यामुळे या काळात मासिकाने अधिक उग्र स्वरूपात नग्नता सादर करण्यास सुरुवात केली. मात्र तरीही मोठय़ा मानधनामुळे प्लेबॉयमध्ये लिहित्या लेखकांची गर्दी मोठी आहे. चक पाल्हानिक, टी. सी. बॉयल, नोलान टर्नर, एटगर केरेट, स्कॉट वुल्व्हेन, डेनिस जॉन्सन या आघाडीच्या कथालेखकांना मासिकात मानाचे स्थान असते.
प्लेबॉयने यापुढे आपल्या अंकांतून नग्नतेला रामराम ठोकायचे ठरविले असले तरी त्याचे भक्त असलेल्या ‘वाचकां’मध्ये काही फरक पडेल असे वाटत नाही. त्यांनी साहित्य, मुलाखतींचा आधीचा दर्जा कायम ठेवल्यास, जुना वाचक कुठेच जाणार नाही. १९८० मध्ये जन्मलेल्या इंटरनेट वापरणाऱ्या पहिल्या पिढीला प्लेबॉयमधील नग्नता आज सहज मिळणाऱ्या पोर्नच्या पातळीवर बाळबोध भासते. ही पिढी मुलाखती व त्यातील टोकदार साहित्यासाठीच प्लेबॉय घेते अथवा डाऊनलोड करते. मासिकाने बदललेल्या कौटुंबिकपणाच्या भूमिकेमुळे त्यांच्या वाचकांमध्ये नवी भर पडली तर तीही आश्चर्यकारक गोष्ट असेल. इंटरनेट आणि इतर आक्रमणांमुळे जगभरात नियतकालिकांच्या वाचकांची घटत जाणारी आवर्तने सुरू असताना, ‘प्लेबॉय’ आमूलाग्र बदलातून काही नवीन मार्ग इतरांसाठी तयार करू शकला, तर तीदेखील मोठीच गोष्ट असेल.
ankaj.bhosale@expressindia.com

Loksatta Lokrang Maharashtra Foundation is recognized in Maharashtra for awards in literary and social fields
पंचम देणे सामाजिक जाणिवेचे !
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
CM Eknath Shinde
शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ नेत्याचं नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा