scorecardresearch

यादवीच्या अभ्यासाचा इशारा

यादवी युद्धाचे भावी उमेदवार देश कोण आहेत हे ठरवण्यासाठी लेखिकेने ‘पॉलिटी प्रोजेक्ट – सेंटर फॉर सिस्टमिक पीस’ या विनानफा संस्थेने केलेल्या संशोधनाचा आधार घेतलेला आहे.

‘हाऊ सिव्हिल वॉर्स स्टार्ट अ‍ॅण्ड हाउ टु स्टॉप देम’ लेखिका : बार्बरा वॉल्टर प्रकाशक: पेन्ग्विन रँडम हाउस पृष्ठे : २९४, किंमत : ७९९ रुपये

|| सुधीर आपटे

कोणत्या देशांमध्ये यादवी युद्धे घडली, कोणते देशच त्यातून तुटले आणि कोणत्या देशांतील राजकीय व्यवस्थांनी वा कोणत्या प्रकारच्या राजवटींनी स्वत:ला दूर राखले, याचा अभ्यास केल्यानंतरही अमेरिकेची चिंता लेखिकेला वाटते, ती का?

‘घडामोडींकडे दुर्लक्ष केले तर अमेरिका यादवी युद्धाचे लक्ष्य बनेल’ असे काहीसे अविश्वसनीय, सनसनाटी भाकीत मांडल्याने ‘हाऊ सिव्हिल वॉर्स स्टार्ट (अ‍ॅण्ड हाउ टु स्टॉप देम)’ या पुस्तकाकडे लक्ष जाते. प्रत्यक्षात, या विषयाचा अभ्यास करणाऱ्या प्राध्यापिका आणि पत्रकार बार्बरा वॉल्टर ( बार्बरा वॉल्टर्स या प्रसिद्ध टीव्ही व्यक्ती नव्हे. त्या ९२ वर्षांच्या असून निवृत्त आहेत.) यांनी ते लिहिले असून त्यांना असे का वाटते, याची तपशीलवार कारणमीमांसा त्यांनी केली आहे. या पुस्तकात आफ्रिका, युरोप आणि आशिया या खंडांतील देशांत आणि आखाती देशांत झालेली यादवी युद्धे आणि त्यामागची कारणे यांचा मात्र सखोल अभ्यास लेखिकेने केला आहे आणि तो वाचणे उद्बोधक आहे.

यादवी युद्धाचे भावी उमेदवार देश कोण आहेत हे ठरवण्यासाठी लेखिकेने ‘पॉलिटी प्रोजेक्ट – सेंटर फॉर सिस्टमिक पीस’ या विनानफा संस्थेने केलेल्या संशोधनाचा आधार घेतलेला आहे. यासाठी त्यांनी राज्य पद्धतींचे तीन भागांत वर्गीकरण केले आहे. लोकशाही, हुकूमशाही आणि ‘सदोष लोकशाही’ असे हे तीन भाग. सदोष लोकशाहीला त्यांनी अ‍ॅनाक्रसी असे नाव दिले आहे. या वर्गवारीला त्यांनी  १० ते -१० असे गुणांक दिले आहेत. १० म्हणजे संपूर्ण किंवा दोषरहित लोकशाही, तर हुकूमशाहीला  -१० गुणांक. संपूर्ण लोकशाही म्हणून अस्तित्वात आलेल्या पण हळूहळू दडपशाहीकडे वळणाऱ्या राज्यपद्धतीला १० पेक्षा क्रमाक्रमाने कमी गुणांक  दिले आहेत. नॉर्वे, न्यूझीलंड, डेन्मार्क, कॅनडा आणि एके काळी अमेरिका हे १० गुणांचे मानकरी होते. पण या समूहात अमेरिका आता बसत नाही, असे लेखिकेचे मत आहे. उत्तर कोरिया, सौदी अरेबिया आणि बहारीन हे देश याच्या दुसऱ्या टोकाला -१० गुणांकाचे मानकरी आहेत. -५ आणि ५ गुणांक मिळवणाऱ्या देशांना वरील संस्थेने अ‍ॅनाक्रसी असे संबोधले  आहे. म्हणजे या देशात निवडणुका होत असतील पण त्या नावापुरत्या. बहुतेक सगळी सत्ता त्या देशाच्या अध्यक्षांकडे एकवटलेली असते. रशिया, टर्की हे देश अशा पद्धतीची उदाहरणे.

भारतातील परिस्थितीचा ऊहापोह त्यांनी त्यांच्या नजरेतून केला आहे आणि भारतही त्यांना यादवी युद्धाचा भावी उमेदवार वाटतो. त्यासाठी, भारतातील वाढत्या हिंसाचाराचा आणि त्याला मिळणाऱ्या राजकीय सहमतीचा उल्लेख पुस्तकात असला तरी लोकशाही गुणांकांच्या बाबतीत भारत बराच पुढे (२०१८ सालच्या मूल्यांकनानुसार ९ गुण) आहे, हे येथे नमूद केले पाहिजे.

कोणत्या देशात यादवी युद्धाची शक्यता आहे हे आधी कळण्यासाठी अमेरिकेने ‘पोलिटिकल इन्स्टॅबिलिटी टास्क फोर्स’ स्थापन केला. (लेखिका या समूहाची सभासद होती.) यासाठी कारणीभूत असू शकणाऱ्या ३८ शक्यतांचा त्यांनी अभ्यास केला. गरिबी, वंशभेद, देशाची एकूण लोकसंख्या, आर्थिक विषमता, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही कारणे सगळय़ात महत्त्वाची आहेत असे या समूहाच्या लक्षात आले. पण आश्चर्यजनक निरीक्षण म्हणजे संपूर्ण हुकूमशाही असलेल्या देशात या उणिवा असल्या तरी अशा देशात यादवी युद्ध सुरू झाल्याची उदाहरणे नाहीत. सद्दाम हुसेनला त्याच्या २४ वर्षांच्या कारकीर्दीत एकदाही यादवीला तोंड द्यावे लागले नाही. पण सद्दामनंतर इराकमध्ये स्थापन झालेल्या राजवटीला यादवी युद्धाला तोंड द्यावे लागले. पूर्ण हुकूमशाहीच्या जागी आलेली अ‍ॅनाक्रसी हुकूमशाहीइतकी क्रूर आणि सर्व शक्तिमान नसते. त्यांचे कर्तृत्वही कमी पडते आणि त्यामुळे त्याच्या विरोधातील राजकारणी किंवा सैन्य सत्तेत येण्याचा प्रयत्न करू लागतात आणि त्यातून यादवी युद्धाची सुरुवात होऊ शकते. एक अनपेक्षित निरीक्षण म्हणजे अ‍ॅनाक्रसी (-६ पातळीची) ज्या वेळी आर्थिक व राजकीय सुधारणा करून लोकशाहीच्या दिशेने प्रवास करू लागते, त्या वेळी यादवी युद्धाचा धोका अधिक संभवतो. अशा सुधारणा समाजाच्या एका मोठय़ा समूहाला मान्य नसणे हे याचे कारण असू शकते.

एखाद्या देशात साम्यवादी, लोकप्रिय, चाणाक्ष आणि काही प्रमाणात एकाधिकारशाही राजवट चालवणारा मार्शल टिटोसारखा नेता असेल तर यादवी युद्धाला अनुकूल परिस्थिती असूनही ती टाळता येते याचे टिटोकालीन (अविभाजित) युगोस्लाव्हिया हे उत्तम उदाहरण ठरते, असे लेखिकेने सविस्तर सांगितले आहे. युगोस्लाव्हियामध्ये तुर्क, अल्बेनियन, सर्ब, रुमेनिअन, ग्रीक आणि बल्गेरिअन हे सर्व भिन्नवंशीय लोक एकमेकांत न मिसळता, पण एकमेकांशेजारी शांततेने राहत होते. पण टिटो १९८० मध्ये मृत्यू पावल्यावर अगदी थोडय़ाच दिवसांत त्याच्या युगोस्लाव्हियाच्या ऐक्याच्या कल्पना धुळीस मिळाल्या आणि पुढे तेथे अनेक यादवी युद्धे झाली. त्यात युगोस्लाव्हियाची सहा शकले होऊन बोस्निया-हर्जगोव्हिना, क्रोएशिया, मॅसिडोनिया, माँटेनेग्रो आणि सर्बिया अशी सहा नवी राष्ट्रे अस्तित्वात आली. मात्र हे सारे टिटो राजवटीच्या नंतर.. म्हणजे काही वेळा मर्यादित हुकूमशाही देशाचे विभाजन टाळू शकते. हे विभाजन अत्यंत क्रूर पद्धतीने झाले. एकूण चार युद्धे झाली आणि त्यात तीन लाख बळी गेले. या युद्धासाठी वंशवाद आणि ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मीय लोकांमधील वितुष्ट ही कारणे देता येतात. एखाद्या समूहावर अन्याय होत असेल किंवा असे वातावरण त्या समूहाच्या नेत्याने निर्माण केले तर यादवी युद्धाची सुरुवात होते. याचे आपल्या जवळचे उदाहरण म्हणजे श्रीलंकेचे. तमिळना दुय्यम नागरिक म्हणून वागवले जात आहे अशा वस्तुस्थितीतून किंवा समजुतीतून तमिळ आणि सिंहली भाषकांत यादवी युद्ध सुरू होऊन ते अनेक वर्षे चालले.

समाजमाध्यमांनंतर..

या सर्व अस्तित्वात असलेल्या कारणांमध्ये तेल ओतण्याचे काम समाजमाध्यमांनी केले आहे, असे लेखिकेला वाटते. समाजमाध्यमांच्या प्रसारामुळे वांशिक भेद वाढले, समाजातील वेगवेगळय़ा समूहांतील दरी रुंदावू लागली , स्थलांतरितांबद्दलचा द्वेष फोफावू लागला, गुंडगिरीचा प्रसार करणारे निवडून येऊ लागले आणि एकंदरीत हिंसेच्या प्रसारात वाढ झाली. दुर्दैवाने व्यवसायाचे हे प्रारूप फेसबुक, गूगल, व्हॉट्सअ‍ॅप ,ट्विटर यांना त्यांचा प्रसार आणि जाहिरातींची प्राप्ती वाढण्यासाठी अतिशय अनुकूल होते, पण त्याचा समाजावर दुष्परिणाम होतो. अलीकडल्या काही वर्षांत यादवी युद्धांची ठिणगी पडायला आणि त्याचे आगीत रूपांतर व्हायला या माध्यमांचा हातभार मोठा आहे असे लेखिकेचे निरीक्षण आहे आणि ते सहज पटणारे आहे.

आता अमेरिकेत यादवी युद्ध होऊ शकेल असे बार्बरा वॉल्टर यांना का वाटते?  असे वाटू लागण्याची सुरुवात ६ जानेवारी २०२१ रोजी ट्रम्प समर्थकांनी वॉशिंग्टनच्या कॅपिटॉल हिलवर घातलेल्या धुडगुसाने झाली. ही स्थिर लोकशाहीत कधीही न घडणारी अशी घटना होती. सगळय़ा स्थिर लोकशाहींमध्ये निवडणुका झाल्यानंतर सत्तारूढ पक्षाच्या विरुद्ध पक्षाने निवडणूक जिंकली असली तर सत्तांतर बिनबोभाट व शांततेने होते. अमेरिकेतही ते आत्तापर्यंत असेच होत होते. पण ट्रम्पच्या रूपाने एक वेगळेच व्यक्तिमत्त्व अमेरिकेला अध्यक्ष म्हणून मिळाले. या ट्रम्प महाशयांना बायडेन हे वैध मार्गाने निवडणूक जिंकले आहेत हे मान्यच होईना. बायडेन यांची निवडणूक कायदेशीर मार्गाने रद्द करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यावर ट्रम्प  यांचा तोल गेला आणि त्यांनी आपल्या दोन ते अडीच हजार चेल्यांना राजधानी वॉशिंग्टन येथे मोर्चा नेऊन एक प्रकारे उठाव करायला सांगितले. या लोकांनी अमेरिकन काँग्रेसच्या कॅपिटॉल इमारतीवर हल्ला चढवला आणि काहींनी या इमारतीच्या सभागृहातही प्रवेश केला. गोष्टी हाताबाहेर जाणार असे वाटू लागत असताना पोलीस यंत्रणेने परिस्थिती आटोक्यात आणली, पण टीव्ही प्रसारणामुळे ही दृश्ये जगभर बघितली गेली आणि त्याचा परिणाम अमेरिकन लोकशाहीची प्रतिमा डागाळण्यात झाला.  डोनाल्ड  ट्रम्प हे मूळचे व्यावसायिक. अध्यक्ष होण्यापूर्वीपासून अमेरिकन समाजात दरी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या लवकरच लक्षात आले की अमेरिकन गौरवर्णीय समाजाला त्यांच्या वेगळय़ा ओळखीची किंवा अस्तित्वाची प्रकर्षांने जाणीव करून दिली की ही दरी सहज वाढत जाईल. गौरवर्णीयांना आफ्रिकन अमेरिकन्स किंवा मेक्सिकन्स किंवा अमेरिकेतील इतर स्थलांतरित यांच्यापेक्षा श्रेष्ठ समजणाऱ्या, व्हाइट सुप्रीमसिस्ट, लोकांचा एक समूह अमेरिकेत पूर्वीपासून अस्तित्वात आहे, पण त्यांना भडकवण्याचे काम ट्रम्प यांनी सुरू केले. याशिवाय ‘फॉक्स न्यूज’सारख्या टीव्ही वाहिनीवरून अतिरेकी प्रचाराचे तंत्र लोकांना भडकावण्यासाठी सारखे वापरले जात होते. याचा परिणाम वर उल्लेख केलेल्या ‘पॉलिटी प्रोजेक्ट – सेंटर फॉर सिस्टमिक पीस’ या संस्थेने अमेरिकेचे  मूल्यांकन १० पासून ५ केले. हे मूल्यांकन  या संस्थेच्या मते देश यादवी युद्धाच्या सीमेवर असल्याचे दर्शविते. हे मत सामान्य अमेरिकन नागरिकाला पटणे फार अवघड आहे. पण लेखिकेने तिला वाटणाऱ्या शक्यतेबद्दल होत असलेल्या घटनांची अनेक उदाहरणे दिली आहेत. ती सविस्तर वाचताना ही शक्यता अगदीच अस्वाभाविक आहे असे वाटत नाही.

aptesudhir@gmail. com

मराठीतील सर्व बुकमार्क ( Athour-mapia ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Civil wars which countries dynasties agent and how to stop them the famous tv barbara walters akp

ताज्या बातम्या