विबुधप्रिया दास

बोरिस पहोर हे आज १०८ वर्षांनंतरही आपल्याला माहीत नसतील, तर व्हायला हवेत.. मुसोलिनी, हिटलर, स्टालिन, टिटो.. या सर्वाच्याच अतिरेकी राष्ट्रवादाचा तमाशा घडताना-बिघडताना त्यांनी कसा पाहिला आणि स्वत्व, अस्मिता जपूनसुद्धा समतामय सहजीवनाची आस कशी टिकवली, हे पाहायलाच हवं..

UPSC 2023 Topper Aditya Srivastava
अडीच लाख महिना पगार सोडून UPSC ची तयारी केली आणि थेट देशात पहिला आला; आदित्य श्रीवास्तवचा अविश्वसनीय प्रवास!
loksatta analysis causes of rising inflation
विश्लेषण : महागाईविरोधी युद्धात ‘नव्या शत्रूं’चा समावेश?
number of Pune residents spending lakhs of rupees to get attractive number for vehicle has increased
आकर्षक क्रमांकासाठी पुणेकरांचा होऊ दे लाखोंचा खर्च! जाणून घ्या सर्वांत महागडे क्रमांक…
Francoise Bettencourt Meyers
Richest Woman In The World : ‘या’ प्रसिद्ध कंपनीची सीईओ ठरली जगातील सर्वांत श्रीमंत महिला, संपत्ती वाचून व्हाल थक्क!

भारत हा लोकसंख्येबाबत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि इंग्रजी पुस्तकांच्या उलाढालीबाबतही जगात आपला तिसरा क्रमांक लागतो. पण एवढय़ामुळे, भारतीयांना एखादा लेखक माहीत नाही म्हणून तो बिनमहत्त्वाचा, असं कसं म्हणावं? मूळ लिखाण स्लोव्हेन भाषेत करणारे आणि इंग्रजीसह अन्य युरोपीय भाषांमध्ये अनुवाद झालेले बोरिस पहोर हे असे एक लेखक. भारतात ते कदाचित माहीत नसतील, पण बीबीसीनं त्यांच्यावरला लघुपट कधीच दाखवलाय, जर्मन आणि फ्रेंच माध्यमांनी मुलाखती घेतल्यात, इटलीमध्ये तर त्यांच्या पुस्तकासाठी दुकानात चेंगराचेंगरी झाली आहे.. अशा बोरिस पहोर यांचं निधन ३० मे रोजी – वयाच्या १०८ व्या वर्षी झालं, तेव्हा इटली आणि स्लोव्हेनिया या दोन्ही देशांच्या सरकारप्रमुखांनी आदरांजली वाहिली आहे.. मुख्य म्हणजे, त्यांचं इंग्रजीत आलेलं आणि सर्वच इंग्रजी भाषक देशांत गेलेलं ‘नेक्रोपोलिस’ हे पुस्तक उत्तम आणि महत्त्वाचं असल्याचा निर्वाळा जगानं दिला आहे. तरीही ते आपल्यापासून अपरिचितच राहिले. सन १९१३ मध्ये जन्मलेल्या बोरिस पहोर यांच्यावर गेल्या शतकभरात अनेक घाव घातले गेले, इतिहासाचे अनेक ओरखडे त्यांच्यावर उमटले. ते केवळ निमूट सहन न करता, पहोर यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. लिखाणातून त्यांनी संघर्ष सुरू ठेवला. हा संघर्ष कुणाशी? कशासाठी? हे त्या-त्या काळानंच ठरवलं. बोरिस पहोर काळाबरोबर जगले..

म्हणजे कसं जगले? हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चरित्रतपशील पाहावेच लागतील. पण जग दुसऱ्या महायुद्धानंतर बदललं, तसं बोरिस यांचं जगणंही साधारण १९४६ नंतर बदललं. त्यांच्या पूर्वायुष्याची अखेर हिटलरी छळछावणीत झाली. ते जन्मले भूमध्यसागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या ट्रीस्टे नावाच्या छानशा शहरात. हे शहर आज इटलीत आहे, पण स्लोव्हेनियाच्या सीमेपासून अवघ्या दहा-अकरा किलोमीटरवर आहे. बंदरामुळे नावारूपाला आलेलं हे शहर पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीपर्यंत (१९१८ पर्यंत) ऑस्ट्रियाच्या साम्राज्याचा भाग होतं. कोणत्याही बंदराच्या शहरात जसं वैविध्य असतं, तसंच इथंही होतं. स्लोव्हेनियन, इटालियन आणि इतर अठरापगड लोक. वयाच्या सातव्या वर्षी कुटुंबाची धूळधाण बोरिस यांनी पाहिली. इटालियन फॅसिस्टांनी हे शहर ताब्यात घेतलं, ऑस्ट्रियन शासकांना हुसकावलं आणि तोवर सरकारी नोकर असलेले बोरिसचे वडील रस्त्यावरचा विक्रेता म्हणून जगू लागले. मग सुरू झाला, इटलीला पुण्यभू मानणाऱ्या फॅसिस्टांचा राष्ट्रवादी वरवंटा.. स्लोव्हेन भाषक मुलांना इटालियन भाषेतच शिकण्याची सक्ती झाली, वयात आल्यावर इटलीच्या सैन्यात भरती सक्तीची ठरली. म्हणून मग १९२० च्या दशकात, म्हणजे मुसोलिनीचा दरारा टिपेला पोहोचला असताना बोरिस पहोर यांनासुद्धा फॅसिस्टांच्या सैन्यात जावं लागलं असतं. पण हे काम नको म्हणून त्यांनी आजच्या स्लोव्हेनियात असलेल्या एका चर्चमध्ये धर्मशिक्षण घेणं सुरू केलं. त्यादरम्यान चर्चनंच त्यांना निमवैद्यकीय शुश्रूषेचं शिक्षणही दिलं. १९३८ पर्यंत ते या ना त्या प्रकारे शिकतच राहिले होते. पण अखेर, १९४० पासून त्यांना इटालियन फॅसिस्टांच्या लष्करासाठी काम करावंच लागलं. १९४३ मध्ये मुसोलिनीचा पाडाव होत असताना, हिटलरच्या नाझींनी युगोस्लाव्हियातला कैदी म्हणून बोरिस यांना पकडलं आणि आधी इथं, मग तिथं असं करत दाखाउ छळछावणीत त्यांची रवानगी केली. या छळछावण्यांतल्या कैद्यांना तोवर युद्धात उद्ध्वस्त झालेले रस्ते-पूल झटपट उभारणं यांसारख्या कामांसाठी वापरलं जायचं. त्या कैदी-मजुरांना उपयुक्त स्थितीत ठेवणाऱ्या वैद्यकीय पथकात बोरिस यांची वर्णी लागल्यामुळे मरणयातनांपासून ते सुटले, पण इतरांचं मरण मात्र त्यांना मुर्दाडपणे पाहावं लागलं. युद्ध संपलं, बोरिस जिवंत परतले, पण त्यांना क्षयरोगानं ग्रासलं म्हणून ते पॅरिसला गेले.

इथं त्यांचं दुसरं आयुष्य सुरू झालं. पॅरिसच्या मुक्कामात त्यांचा स्नेहबंध एका परिचारिकेशी जडला. तोवर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया या दोस्तराष्ट्रांनी युरोपची घडी पालटून टाकली होती. ‘युगोस्लाव्हियाचं साम्राज्य’ हा आता स्वतंत्र युगोस्लाव्हिया देश झाला होता. तिथल्या स्लोव्हेनबहुल भागात जाऊ, तिथंच राहू, हा प्रस्ताव ‘पॅरिसिअँ’ परिचारिकेनं धुडकावला. स्लोव्हेन भाषक प्रांतातच जगायचं ठरवून बोरिस परतले, इथं जगण्याचा नवा मार्ग बोरिस यांना मिळाला होता. त्यांनी स्लोव्हेन भाषेत एक नियतकालिक सुरू केलं, इथेच त्यांना सहचरी मिळाली, १९५२ मध्ये – ३९ व्या वर्षी- ते विवाहबद्धही झाले. मात्र पुढल्याच वर्षी टिटो यांनी स्वत:ला युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष घोषित केलं आणि ‘इथंही एकाधिकारशाहीच’ अशी बोरिस यांची खात्री पटू लागली, ही अस्वस्थता त्यांनी लिखाणातून व्यक्तही केली.. परिणाम व्हायचा तोच झाला. युगोस्लाव्हिया सोडावा लागून ते पुन्हा मूळ गावी, ट्रिस्टे इथं परतले. एव्हाना ट्रिस्टेचं ‘इटलीकरण’ जवळपास पूर्णच झालं होतं, तरीही इथं स्लोव्हेनभाषक होते, आता त्यांना छळाऐवजी अल्पसंख्याक दर्जा होता इतकंच. इथंच त्यांनी ‘नेक्रोपोलिस’ ही आता विश्ववाङ्मयाचा भाग झालेली आत्मचरित्रपर कादंबरी लिहिली. १९६७ मध्ये ती प्रकाशित झाली. युगोस्लाव्हियातही गेली आणि तिथल्या स्लोव्हेन भाषकांनी तिचं स्वागतच केलं. पण तिची भाषांतरं होऊन, ती जगापर्यंत पोहोचेस्तोवर १९९० उजाडलं.

‘नेक्रोपोलिस’ आणि नंतर..

हिटलरी छळछावण्यांमध्ये काढलेल्या १५ महिन्यांचं अगदी तपशीलवार वर्णन ‘नेक्रोपोलिस‘मध्ये आहे, पण या लिखाणाचा बाज मात्र कथा सांगितल्यासारखा. कथानायक हाच निवेदक आहे आणि तोही बोरिस होते तसाच, छळछावणीच्या वैद्यकीय पथकात आहे. तिथं राहून तो जगण्यामरण्याच्या मधल्या मानवी भावनांचा खेळ पाहातो आहे. काम टाळण्यासाठी ‘आजारी’ असल्याचं दाखवण्याचा हट्ट धरणारे, तर ‘अनुपयुक्त’ म्हणून आपली रवानगी थेट मरणगृहांमध्ये होऊ शकते असं लक्षात येताच ‘मी आहे की धडधाकट’ अशी विनवणी करणारे मजूरकैदी त्याच्या अवतीभोवती आहेत, पीटर नावाचा जरा सहृदय म्हणावा असा नाझी या साऱ्यांच्या देखरेखीसाठी आहे, पण तो या शत्रू-कैद्यांना मदत करत असल्याचा संशयही अन्य नाझींना आलेला आहे! अशा चित्रविचित्र परिस्थितीतून अखेर नायकाची सुटका होते, पण म्हणून ती नरकमय स्थिती बदलते का? – या प्रश्नाचं दूरगामी उत्तर पुढल्या काळात, ‘बोनस’ मिळालेल्या आयुष्यात बोरिस नेहमीच शोधत राहिले. त्यामुळेच अन्याय त्यांना दिसत राहिला, त्याविरुद्ध ते बोलत राहिले. स्टालिनच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवलाच, पण म्हणून कम्युनिस्टविरोधाचा गंडा गळय़ात न घालता, त्यांनी वित्तभांडवलाच्या दादागिरीविरुद्धही लिखाण केलं, भाषणं केली, मुलाखती दिल्या.

‘प्रामुख्यानं स्लोव्हेन भाषकांच्या अस्मितेसाठी ते काम करत राहिले’ असं आता त्यांच्या निधनाच्या बातम्या जरूर म्हणताहेत, पण केवळ ‘आपण नि आपली माणसं’ असं नव्हतं ते.. तसंच असतं तर, १९८० च्या दशकाअखेरच युगोस्लाव्हिया फुटू लागला, पुढे त्या तुकडय़ांपैकी एक देश म्हणून स्लोव्हेनियाचा जन्म झाला, तेव्हाच इटलीतून ‘स्लोव्हेन राष्ट्रवादा’ची तुतारी फुंकत, इटालियन फॅसिस्टांनी जसा ट्रीस्टे शहराचा भाग ऑस्ट्रियाकडून खेचून घेतला होता, तसं काही करण्याचा विचार बोरिस पहोर करू शकले असते. पण तसं काही झालं नाही. होणारही नव्हतं. कारण मुसोलिनी, हिटलर, स्टालिन, टिटो.. या सर्वाच्याच अतिरेकी राष्ट्रवादाचा आणि त्यांच्यामागे मेंढरांसारखे जाणाऱ्यांच्या तथाकथित राष्ट्रप्रेमाचा तमाशा घडताना-बिघडताना बोरिस यांनी ‘याचि देही याचि डोळा’ पाहिला होता. सहजीवन महत्त्वाचं, त्यासाठी समतेची भावना महत्त्वाची.. संख्येवर कुणा समाजाचं महत्त्व ठरवणं चूक, हे सारे धडे ते कधीपासूनच आचरणात आणत होते. त्यावर आधारित पुस्तकंही लिहीत होते. मध्यंतरी कधी तरी त्यांनी ‘स्लोव्हेन पार्टी’तर्फे इटलीतल्या प्रांतिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला आणि प्रचारबिचारही केला, पण ते तेवढंच. पुढे काही ते आमदार वगैरे झाले नाहीत. त्यांची प्रचारभाषणंही राजकारण्यासारखी नव्हती, साहित्यिकासारखीच होती.

‘अ डिफिकल्ट स्प्रिंग’, ‘ऑब्स्क्युरेशन’ आणि ‘इन द लॅबिरिन्थ’ या बोरिस पोहोर यांच्या पुढल्या कादंबऱ्या. यापैकी पहिली आणि तिसरी एकाच धारेतल्या म्हणाव्यात अशा, कारण दोन्हीकडे दुरावलेल्या प्रेयसीचं पात्र येतं. ‘अ डिफिकल्ट स्प्रिंग’मध्ये ही प्रेयसी, नायकाला पॅरिसमध्ये भेटलेली आहे आणि ‘इन द लॅबिरिन्थ’मध्ये ट्रीस्टे शहरात राहणाऱ्या नायकाकडे उरल्या आहेत त्या तिच्या आठवणी आणि तिच्याशी सुरू असलेला पत्रसंवाद. महायुद्ध संपल्यावर माजी कैद्यांची झालेली अवस्था ‘अ डिफिकल्ट स्प्रिंग’मध्ये येते. तीही कादंबरी तपशीलवार वर्णनांमुळेच महत्त्वाची ठरते. पण अखेरच्या ‘इन द लॅबिरिन्थ’मध्ये मात्र स्वत:च्या पलीकडे जाऊन बोरिस यांनी युरोपचीही अवस्था चितारली आहे. नायकाची प्रेयसी पॅरिसमध्येच लग्न करते, संसाराला लागते, पण तिचा लग्नाचा नवरा तिला मनापासून आवडत नसतो आणि हा संसार मनाविरुद्ध चालू असतो, ही कथा रूपकासारखी ठरते आणि युगोस्लाव्हियासारख्या एके काळच्या एकीकृत देशांचे नावही न घेता त्यांची आठवण देते, तसंच ट्रीस्टे या शहरातल्या स्लोव्हेन भाषकांना इटलीतल्या ‘देशप्रेमी’ इटालियन भाषकांसह कसं राहावं लागतं आहे हेही सांगतं. या पुस्तकाचं इटालियन भाषांतर चटकन उपलब्ध झालं, याचसाठी चेंगराचेंगरी झाली आणि याचमुळे इटालियन चित्रवाणीवरल्या बोरिस पहोर यांच्या मुलाखती गाजल्या.

या साऱ्या काळात, समतामय सहजीवनाची आस कधीही बोरिस यांनी सोडली नव्हती. त्यामुळेच त्यांच्या या पुस्तकाचा परिणाम सकारात्मक झाला. करोनाकाळ काहीसा सरल्यानंतर इटली आणि स्लोव्हेनियाचे राष्ट्राध्यक्ष २०२० च्या जुलै महिन्यात एकत्र आले,  ट्रीस्टेमध्ये १९२० साली झालेल्या संहाराच्या स्मारकाला हे दोघे जोडीनं- एकमेकांचे हात हाती धरून- सामोरे गेले आणि त्या संहाराबद्दल, स्लोव्हेनांना भोगाव्या लागलेल्या यातनांबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केलं. याच दोघांनी परवा बोरिस पहोर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

बोरिस पहोर हे न विसरता येणाऱ्या लेखकांपैकी एक आहेत. ते १०८ वर्षे जगले म्हणून त्यांच्याबद्दल काहीसं कुतूहल असणं स्वाभाविक, पण अल्पसंख्य म्हणून- आणि तरीही जीवनेच्छा आणि सर्जनशीलता कायम ठेवून – जगलेले बोरिस पहोर हे ‘किती वर्षे या संख्येला महत्त्व नाही, कसे जगलात हे महत्त्वाचे’, असा विचार देणाऱ्यांपैकी होते. विसाव्या शतकापासून आजवरच्या अनेक स्थित्यंतरांचे नुसते मूक साक्षीदार नव्हे, तर संघर्षशील साक्षीदार म्हणून ते जगले!