|| कॅ. (निवृत्त) मिलिंद परांजपे
लेखक तेन्झिन गैचे तेथाँग दलाई लामांचे स्वीय साहाय्यक म्हणून चाळीस वर्षांहून अधिक काम करून निवृत्त झाले. हे नुसते चरित्र नसून दलाई लामा, त्यांचे कुटुंबीय आणि तिबेट याबद्दल ४०० छायाचित्रांचा हा अल्बमही आहे. लेखकाच्या अनेक पिढ्या दलाई लामांच्या किंवा तिबेटी सरकारी सेवेत होत्या. 

पहिला दलाई लामा १४ व्या शतकात झाला. पुस्तकाच्या पहिल्या भागास १३वे दलाई लामा आणि त्या वेळच्या इतिहासापासून सुरुवात होते. एकोणिसावे शतक संपायच्या आधीच रशिया आणि ब्रिटन यांच्यात तिबेटवर अधिकार सांगण्यात स्पर्धा सुरू झाली. तिबेटी बौद्ध शिकवण पार मंगोलियातही प्रचलित होती. १३व्या दलाई लामांचा सल्लागार दोर्जिएव सैबिरियात जन्मलेला भिक्षू होता. रशियाचा झार आणि इंग्रज दोघांशी बोलणी त्याच्या मार्फत होत. त्यासाठी तो सेंट पीटर्सबर्गला (बोल्शेव्हिक क्रांतीनंतरचे लेनिनग्राड) बऱ्याचदा गेला होता. शेवटी  क्रांतीनंतर तो रशियन तुरुंगात मेला. १९०४ मध्ये इंग्रज सैन्य ल्हासात शिरले; तेव्हा १३व्या दलाई लामांना तीन महिन्यांचा प्रवास करून मंगोलियात जाऊन दोन वर्षे राहावे लागले. पुढली तीन वर्षे चीनमध्ये वुताईशान (मंजुश्री बोधिसत्त्वाचं बोधिस्थान) इथे वास्तव्य केले. तिथे अमेरिकन प्रतिनिधी विल्यम रॉकहिलने दलाई लामांशी तिबेटी भाषेत बोलणी करून तिबेट व्यापारासाठी अमेरिकेस खुला केला. दलाई लामा चिनी राजाच्या अंत्यविधीला व नवीन राजाच्या राज्यारोहणास उपस्थित होते. लेखकाच्या मते चीनमधील अनुभव चांगला नव्हता. १९०७ मध्ये रशिया व  ब्रिटनने परस्पर करार करून तिबेटवर चीनचे  वर्चस्व मान्य केले. ल्हासात परतल्यावर १३ व्या दलाई लामांनी सामाजिक- राजकीय सुधारणांप्रमाणेच, तिबेटला स्वतंत्र ठेवण्यासाठी धडपड चालू ठेवली. पण दुसऱ्या वर्षी चीनने सैन्य घुसवून हस्तक्षेप केला. पुन्हा दलाई लामा तिबेट सोडून थोडा काळ सिक्किममार्गे भारतास आले. तिथे कॅलिम्पाँगमधून निघणारी ‘तिबेट मिरर’ आणि ‘शेजा’ ही तिबेटी भाषेतली नियतकालिके दलाई लामा वाचत, असा उल्लेख लेखक करतात. कलकत्त्यात जन्मलेल्या अँग्लोइंडियन आयसीएस ऑफिसर चाल्र्स बेलने दार्जिलिंगला येऊन तिबेटी भाषेत त्यांच्याशी बोलणी केली. मग गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटोशी भेट होऊन १९१३ साली मॅकमहोन रेषा तीन देशांनी ठरवली पण नंतर चीनने तिला मान्यता देणे नाकारली व चीनची महत्त्वाकांक्षा तिबेटपुरतीच मर्यादित नाही हे तेव्हाच दिसून आले, असे लेखक सांगतो.

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव
Body of 12 year old boy who went missing from Thakurwadi in Daighar found in Panvel
डायघर येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह पनवेलमध्ये
Kishore Jorgewar
खळबळजनक..! आमदार किशोर जोरगेवार यांचे फेसबुक व ट्विटर अकाऊंट हॅक, हॅक केल्यानंतर पोस्ट…

१९३९ साली चार वर्षांच्या १४व्या दलाई लामांचा राज्यारोहण समारंभ ल्हासात झाला, त्या वेळच्या इलस्ट्रेटेड लंडन न्यूजमध्ये आलेले छायाचित्र पुस्तकात आहे. बालवयाच्या दलाई लामांच्या अभ्यासक्रमात बौद्ध तत्त्वज्ञान, संस्कृत, लॉजिक, तिबेटी चित्रकला व संस्कृती, वैद्यकीय ज्ञान, द्वंद्वात्मकता (डायलेक्टिक्स), वादविवाद सत्रे, यांचा अंतर्भाव होता. दुसऱ्या महायुद्धकाळी भारतातून ब्रह्मदेशमार्गे चीनला लष्करी सामुग्रीचा पुरवठा होई. १९४२ साली ब्रह्मदेश जपान्यांच्या कब्जात गेल्यावर पर्यायी मार्ग शोधणं सुरू झालं. त्यासाठी महायुद्धाच्या धामधुमीत अमेरिकन राष्ट्रपती फ्रँकलिन डी. रूझवेल्टने टॉलस्टोयचा नातू इल्या टॉल्स्टॉय आणि शोधक प्रवासी ब्रुक डोलन अशा दोघांना, नजराणे घेऊन तिबेटला पाठवले. त्या वेळचा इल्या टॉल्स्टॉयने काढलेला फोटो पाहायला मिळतो. अमेरिकनांचा खरा उद्देश भारतातून तिबेटमार्गे चीनला जाण्यासाठी खुष्कीच्या मार्गाची चाचपणी करणे हा होता.

१९५० मध्ये चिनी कम्युनिस्ट सैन्य पार ल्हासापर्यंत आलं. १९५४ साली दलाई लामांना बीजिंगला जाऊन माओशी नाखुशीने बोलणी करावी लागली. नंतर तिबेटी प्रतिनिधीला माओने १७ कलमी एकतर्फी करारावर सही करणं भाग पाडलं आणि चिनी दडपशाही सुरू झाली. पण तिबेटी जनता आणि दलाई लामांचे कुटुंबीय स्वस्थ बसले नव्हते. १९५७ मध्ये दलाई लामांनी नेहरूंना मदतीची विनंती केली, ती अव्हेरून त्यांनी उलट त्या वेळी भारतात आलेले चौ एन लाय यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला दलाई लामांना दिला. (ही माहिती या पुस्तकात नाही, पण त्या भेटीतला भारतीय पद्धतीप्रमाणे खाली पाटावर बसून लामांबरोबर नेहरू, राजेंद्रप्रसाद वगैरे हाताने भोजन करताहेत असा फोटो आहे.)

१९५९ मध्ये चिनी अत्याचारांचा कळस झाल्यावर दलाई लामांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन तिबेट सोडून भारतात आश्रय घेण्यासाठी १७ मार्चच्या रात्री चिनी सैन्याला शिताफीने चुकवून सैनिकाच्या वेशात पलायन केले. बरोबर त्यांची मातुश्री, एक बहीण, धाकटा भाऊ आणि इतर ८० जण होते. १५ दिवसांच्या पायी किंवा घोड्यावरील खडतर प्रवासानंतर अरुणाचलातील १६८० मध्ये बांधलेल्या तवांग मठास पोहोचले. दोन दिवस आधी चिनी विमानाने त्यांना पहिले तेव्हा घबराट झाली. राजकीय आश्रयाची संमती नेहरूंकडून आधीच मिळाली होती. थकलेल्या स्थितीतही तवांगला त्यांचे एक प्रवचन झालेच. तेजपूरला इंग्लिश व तिबेटी भाषेत ल्हासा(तिबेट) का सोडून यावे लागले याचे निवेदन वार्ताहरांपुढे वाचण्यात आले. त्यावर चीन भडकला. तिकडे तिबेटी जनतेचा प्रतिकार मोडताना चिनी सैन्याने ८७००० तिबेटी ठार मारले, तर ८०००० निर्वासित भारतात आले.

पुस्तकाच्या दुसऱ्या भागाच्या सुरुवातीसच दलाई लामांचे वाक्य छापले आहे : ‘‘भारताने तिबेटला मदत करणं स्वाभाविकच आहे कारण भारताचा तिबेटवर चीनपेक्षा जास्त अधिकार आहे. बौद्ध शिकवण आणि संस्कृती भारतातून आली. चीनचा प्रभाव अगदीच नगण्य होता.’’ नेहरूंनी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला गिरिस्थानावर जागा दिली तिथे स्वर्गाश्रम स्थापून दलाई लामांनी तिबेट व भारतात आलेले निर्वासित यांच्यासाठी कार्य सुरू केले. १९६२ सालचा पराभव हा भारताप्रमाणे दलाई लामांनाही मोठा धक्का होता. नेहरूंना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे : तिबेटचं स्वातंत्र्य आणि भारताच्या उत्तर सीमेचं रक्षण हे एकमेकांशी निगडित आहेत. चीनने तिबेटचं पूर्ण स्वातंत्र्य मान्य केलं की भारताचं स्वातंत्र्यही बळकट होतं.

गेल्या चार-पाच वर्षांत तिबेट सीमेवर झालेल्या घटना अनुभवल्यावर वरील वाक्यांची प्रचीती येते.

या पराभवाचा एक परिणाम म्हणजे गायलो थोंडुप (दलाई लामांचा मोठा भाऊ) यांना विश्वासात घेऊन भारताने उभी केलेली ‘एस्टॅब्लिशमेंट २२’ नावाची तिबेटी सैनिकांची फौज. चीनने तिबेटला त्यांचा ऑटोनॉमस रीजन जाहीर केले, त्याविरुद्ध भारताने संयुक्त राष्ट्रांत तिबेटच्या बाजूने मतदान केले, तेव्हा शास्त्रीजींनी भारताची अधिकृत भूमिका पूर्ण बदलली आहे हे लक्षात आले. लेखकाने शास्त्रींना तिबेटचा ‘खरा मित्र’ म्हटले आहे.  १९६५ च्या युद्धानंतर दलाई लामांना निरोप मिळाला की भारतस्थित निर्वासित तिबेटी सरकारला मान्यता देण्यास भारत तयार आहे; पंतप्रधान शास्त्री ताशकंदहून परत आल्यावर निर्णय कळवतील. पण ताशकंदला शास्त्रीजींचं देहावसान झाल्यामुळे तिबेटचा प्रश्न पुन्हा तसाच राहिला. त्यानंतर आलेल्या सर्व काँग्रेस सरकारांनी मात्र तिबेट हा चीनचा सार्वभौम भाग आहे अशी अधिकृत भूमिका घेतली. जनता पक्ष सरकार, जयप्रकाश नारायण आणि विशेषत: जॉर्ज फर्नांडिस यांनी मात्र खंबीरपणे पूर्ण तिबेटची बाजू घेतली. मोरारजी देसाईंनी भारतीय व तिबेटी संस्कृती एकाच वृक्षाच्या दोन फांद्या आहेत असे म्हटले होते, ते दलाई लामांनाही पटले. अटलबिहारी वाजपेयींनी  लोकसभेत तिबेटच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती परंतु स्वत: परराष्ट्रमंत्री वा पंतप्रधान झाल्यावर मवाळ धोरण अवलंबिले अशी लेखकाची तक्रार आहे.  राजीव गांधींबद्दल आशा होती पण त्यांची हत्या झाली.

१९८९ मधील बीजिंगच्या तियानान्मेन चौक कत्तलीआधी ल्हासातही तसाच उठाव आणि कत्तल झाली. २०११ पासून दीडशेहून अधिक तिबेटींनी आत्मदहन केले, त्यापैकी एक दिल्लीत झाले. दलाई लामांना जाहीर झालेले शांततेचे नोबेल पारितोषिक त्यांनी तिबेटी जनतेला अर्पण केले. २००६ मध्ये अमेरिकन काँग्रेसने चीनच्या विरोधाची अजिबात पर्वा न करता त्यांना सुवर्णपदक दिले. त्यामुळे तिबेटकडे सर्व जगाचे लक्ष वेधले. धर्मशाला हे आता स्वातंत्र्याच्या मनोवृत्तीचे जगप्रसिद्ध केंद्र बनले आहे. दलाई लामांशी वास्तव्य भारताला भूषणास्पद आहे. चौदाव्या दलाई लामांनंतर पंधरावा दलाई असेल किंवा नसेलही. असलाच तर तो तिबेटबाहेरूनच निवडला जाईल.

पुस्तकाला तेन्झिन चोइग्याल (एन्गरी रिम्पोचे- दलाई लामांचे धाकटे बंधू जे १९५९ मध्ये ल्हासा सोडताना त्यांच्यासह होते) यांची प्रस्तावना आहे. जेन मूर या तिबेटवर अनेक वर्ष संशोधन करणाऱ्या विदुषींनी त्यांच्या ‘तिबेट इमेजेस’ या संस्थेतून  दुर्मीळ छायाचित्रे वापरायला दिली. पुस्तक तिबेट व दलाई लामा यांच्या अस्तित्वाच्या लढाईच्या माहितीने खच्चून भरलेले असून गुळगुळीत कागदावरील छायाचित्रांमुळे मनोवेधकही झाले आहे. दलाई लामांनी लिहिलेल्या आत्मचरित्रास ही एक आवश्यक जोड-पुरवणी आहे.

 

 ‘हिज होलिनेस द फोर्टीन्थ   दलाई लामा- अ‍ॅन इलस्ट्रेटेड बायोग्राफी’ लेखक : तेन्झिन गैचे तेथाँग प्रकाशक : इंटरलिंक बुक्स पृष्ठे : ३३२,  किंमत: २७.९९ डॉलर.