scorecardresearch

अव-काळाचे आर्त : अनागोंदीचा ‘डेंजर वारा’

मराठीत चित्रकादंबरी ही विधा (जाँर) नाही. त्या दिशेने जाणारे शेलके प्रयत्न अधूनमधून दिसतात.

अव-काळाचे आर्त : अनागोंदीचा ‘डेंजर वारा’
‘व्ही फॉर व्हेण्डेटा’ लेखक – रेखाटनकार : अ‍ॅलन मूर – डेव्हिड लॉइड प्रथम प्रकाशन :क्वालिटी कम्युनिकेशन्स पृष्ठे : २९६, किंमत : १५२१ रुपये

|| आदूबाळ
दमनकारी राजवटी संपवताना त्या संपवणे हा एकमेव हेतू असून चालत नाही. कुठे जायचं याची खात्री नसेल तर रस्त्यांचा रोख अनागोंदीकडे जाऊ शकतोच…

कुनस्थानी (डिस्टोपियन) साहित्यात वर्णन केलेले जग बहुधा हुकूमशाही पद्धतीचे असते. किंबहुना सर्वंकष सत्तेतून कुनस्थानी समाज उभे राहतात असा जगभरच्या लेखकांचा दावा दिसतो. ‘अवकाळाचे आर्त’ या मालिकेतला हा सोळावा लेख. आजवरच्या लेखनाकडे नजर टाकता कुनस्थानी साहित्य आणि सर्वंकष सत्ता ही जोडी जवळजवळ प्रत्येक लेखात दिसेल. पण कुनस्थान हे फक्त सर्वंकष हुकूमशाहीतच वसतं का? सर्वंकष हुकूमशाहीचा अर्थ ‘सर्व लोकांवर एका व्यक्तीची/ मूठभर व्यक्तींची सत्ता’ असा घेतला, तर सर्वंकष हुकूमशाहीचं विरुद्ध टोक ‘सर्व लोकांवर कोण्या एकाची/ मूठभर व्यक्तींची सत्ता नाही’ असं असायला हवं. उदारमतवादी विचारसरणीचे लोक सामान्यत: ‘कोण्या एकाची/ मूठभर व्यक्तींची सत्ता नसण्या’चा अर्थ ‘सर्वांची सत्ता = लोकशाही’ असा लावतात. पण खरं तर ‘कोण्या एकाची/ मूठभर व्यक्तींची सत्ता नाही’ याचा अर्थ ‘कोणाचीही सत्ता नाही’ अर्थात ‘अराजक माजणे’ असाही असू शकतो!

‘व्ही फॉर व्हेण्डेटा’ ही चित्रकादंबरी (ग्राफिक नॉवेल) अशाच अनागोंदीच्या स्थितीचं वर्णन करते. या चित्रकादंबरीची (अक्षरी) कथा लिहिणारा लेखक आहे अ‍ॅलन मूर, तर चित्रं डेव्हिड लॉइडने काढलेली आहेत. चित्रकादंबरीत अक्षरी आशयाइतकाच, किंबहुना काकणभर जास्तच मान चित्रकाराला असतो. त्यामुळे यापुढे दोघांचाही उल्लेख ‘लेखक’ असाच (एकत्र आणि एकेरी) केला आहे.

***

मराठीत चित्रकादंबरी ही विधा (जाँर) नाही. त्या दिशेने जाणारे शेलके प्रयत्न अधूनमधून दिसतात. अगदी इंग्रजीमध्येही चित्रकादंबरीला ‘हाय फिक्शन’चा दर्जा नाही. असं जरी असलं तरी चित्रकादंबरी हा हलक्यानं घ्यायचा प्रकार नाही. चित्रकादंबरीला कॉमिक्सच्या रांगेत ढकलून तिची कुत्सा करण्याचा एक प्रघात आहे. पण ही चित्रकादंबरी प्रौढ वाचकांसाठी आहे, हे बालकुमार साहित्य नाही याबद्दल लेखकाच्या मनात कोणताही संदेह नाही. म्हणूनच ‘व्ही फॉर व्हेण्डेटा’मध्ये कॉमिक्सचे नेहमीचे नुस्खे टाळले आहेत. उदा- एखादं पात्र विचार करत असेल, पण प्रकट बोलत नसेल, तर वापरला जाणारा विशिष्ट नमुन्याचा ढग या कादंबरीत नाही. कॉमिक्समध्ये आवाज दाखवण्याची एक विशिष्ट पद्धत असते (आठवा ‘चाचा चौधरी’मधले ‘धडाम!’, ‘बडाम!’ वगैरे आवाज.). त्यालाही लेखकानं पूर्ण फाटा दिला आहे. विषयाचं गांभीर्य वाचकाच्या मनावर ठसवण्याचे हे सूचक आणि अलगद प्रकार आहेत.

रौप्यमहोत्सवी आवृत्तीत लेखकानं आपल्या प्रेरणांची लांबलचक (आणि बरीचशी अस्ताव्यस्त) यादी दिली आहे. त्यात रॉबिन हुडपासून रे ब्रॅडबरीच्या ‘फॅरनहाईट ४५१’पर्यंत अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. कादंबरीत दमनकारी सर्वंकष सत्ता राबवणारे लोक, त्यांची प्रचारतंत्रं, सामान्यांच्या स्वातंत्र्यावर टाच आणणारे सरकारी घटक, युद्धपरिस्थितीची किंवा आणीबाणीची वेळोवेळी भीती घालणारे सत्ताधीश, असे अनेक कुनस्थानी साचे (डिस्टोपियन ट्रोप) यात आपल्याला सापडतात.

कादंबरीत लेखकाला जे सांगायचं आहे याची मुळं कादंबरीच्या लेखनकाळात गवसतात. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये ‘थॅचरिझम’चा उदय झाला. ही ब्रिटिश राजकारणासाठी युगप्रवर्तक घटना होती. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या समाजकल्याणात्मक धोरणांना हरताळ फासत मार्गारेट थॅचरच्या हुजूरपक्षाने खासगीकरणाचा डिंडिम वाजवला. परिणामी कामगारांचं जिणं मुश्कील झालं तरी थॅचर सरकारने तमा बाळगली नाही. सरकारी खर्चाला कात्री लावण्यात आली. समाजात बेरोजगारी वाढली, आर्थिक मंदी आली आणि जनतेचा संताप दंगलींतून बाहेर पडू लागला. दुसरीकडे बेगडी देशप्रेमाला ऊत आला; पोकळ अस्मितेपोटी युद्ध खेळण्यात आलं. लेखकाच्या कल्पनेत या काळातल्या परिस्थितीची तार्किक परिणती म्हणजे ‘व्ही फॉर व्हेण्डेटा’मधलं जग.

शीतयुद्धकाळातलं जग दोनदा अणुयुद्धाचा दरवाजा ठोठावून आलं. या कादंबरीत दरवाजा उघडला जाऊन अणुयुद्ध खरोखर घडतं. इंग्लंड अण्वस्त्रहल्ल्यातून वाचलेलं असलं, तरी दुष्काळासारखी पर्यावरणीय संकटं आलेली आहेत. अर्थव्यवस्था मोडून पडली आहे. अशा स्थितीत सुरक्षिततेची हमी देत एक सर्वंकष हुकूमशाही राजवट सत्तेत येते. धार्मिक किंवा वांशिक अल्पसंख्याक समाजगटांना नेस्तनाबूत करणं, समलैंगिक आणि डाव्या विचारांच्या लोकांना समाजद्रोही ठरवून त्यांचा नायनाट करणं, सत्तेला नको असणाऱ्या माणसांचा अमानुष छळ करणं, सतत पाळत ठेवणारं ‘पोलीस स्टेट’ उभारणं, धार्मिक तत्त्वांवर राजकीय धोरणं ठरवणे वगैरे नेहमीच्या हुकूमशाही लीला ही राजवट करते.

या घटना घडून गेल्यानंतर साधारण दशकभराने कादंबरीची सुरुवात होते. ‘एव्ही’ या सोळा वर्षांच्या मुलीवर गरिबीमुळे देहविक्रय करायची वेळ येते. एके रात्री वेश पालटलेले पोलीस तिची गिऱ्हाईकं म्हणून येतात. तिच्यावर बलात्कार करून तिला मारून टाकायचा त्यांचा डाव एक मुखवटाधारी अज्ञात व्यक्ती उधळते. हा मुखवटाधारी ‘व्ही’ या टोपणनावानं वावरणारा पुरुष सरकारविरोधी कारवाया करत असतो हे एव्हीच्या लवकरच लक्षात येतं.

हुकूमशाहीला प्रतीकं प्यारी असतात. पण प्रतीकं किंवा प्रतीकात्मक संस्था नष्ट केल्या, तरी त्या ठिकाणी दुसरं काही तरी उभं राहू शकत नाही. समाजमानसात प्रतीकांच्या अभावी पोकळी निर्माण होते. कथा पुढे सरकते तसं वाचकाला जाणवू लागतं, की ‘व्ही’च्या कारवायांमुळे राजवट जसजशी संपते आहे, तसतशी त्या जागी गोंधळाची स्थिती निर्माण होते आहे. दमनकारी राजवटीची जागा घेण्यासाठी सुशासनाचा सक्षम पर्याय विध्वंसक ‘व्ही’ देऊ शकत नाहीये.

केवळ सत्ता आणि सत्ताधारी बदलले जाणं ही कृती सुशासन आणण्यासाठी अपुरी आहे हे विधान लेखकाला यातून करायचं आहे.

***

कथानकाकडे परत वळून आणखी एका वाटेने जाऊ या. मुखवटाधारी ‘व्ही’ हुकूमशाहीची प्रतीकं आणि संस्था योजनाबद्ध निर्दयतेने नष्ट करत जाताना बघून वाचकाला काही प्रश्न पडतात. एक म्हणजे ‘व्ही’ हे सगळं का करतो आहे? या राजवटीशी त्याचं नेमकं कोणतं वैर आहे?

आपल्या पूर्वायुष्यात राजवटीच्या दडपशाहीत ‘व्ही’ सापडतो. एका छळछावणीत त्याच्यावर अमानुष प्रयोग होतात. इतके, की त्याच्या व्यक्तिमत्त्वात कायमचा (हिंसक) बदल घडतो. ती छळछावणी नष्ट करून ‘व्ही’ निसटतो, आणि राजवटीचा नाश करायचा विडा उचलतो. इथे दुसरा प्रश्न उद्भवतो : या लढ्यात ‘व्ही’ वापरत असलेली साधनं नैतिक आहेत का? अमानुष दडपशाहीचा सामना करण्यासाठी मुक्तिदात्याने तितकंच अमानुष व्हावं का? ‘स्वातंत्र्य’ या साध्यासाठी दहशतवादी कृत्यं करणं योग्य आहे का? ‘व्ही’ची नैतिक भूमिका त्याच्या राजकीय-सामाजिक भाष्यात आणि विशेषत: एव्हीबरोबरच्या संवादांत स्पष्ट होऊन येते.

मग यातून एक वेगळाच प्रश्न उभा राहतो. दमनकारी व्यवस्थेच्या नाशासाठी जबाबदार असलेला मुखवटाधारी ‘व्ही’ हा खरोखर उदात्त नायक आहे का? की तो वैयक्तिक सुडाच्या भावनेने पेटलेला, नृशंस विध्वंसावर श्रद्धा असणारा प्रतिनायक आहे? की तो सामान्य प्रवाहपतित असलेला, आपल्या कृत्यांची जबाबदारी न घेणारा न-नायक आहे? या प्रश्नांचं थेट उत्तर कादंबरीत नाही, पण उत्तर शोधून काढता यावं इतके सूचक दुवे आहेत.

एकीकडे एव्ही या व्यक्तीबद्दल वाचकाचं कुतूहल वाढीला लागतं. एव्ही आणि ‘व्ही’मधलं नेमकं नातं धूसर ठेवायची काळजी लेखकाने घेतली आहे, पण वाचकाला असा प्रश्न पडू लागतो की या घटनाक्रमातली एव्हीची नेमकी भूमिका काय? संकटातून वाचवल्यामुळे एव्ही उपकाराच्या भावनेपोटी, पण काहीशी मनाविरुद्ध ‘व्ही’ला साथ देते आहे का?

जवळ-जवळ याचं उत्तर म्हणून कादंबरीतल्या एका महत्त्वाच्या अध्यायाला सुरुवात होते. एव्हीचं मनपरिवर्तन होतं. इतके दिवस काठावर बसलेली एव्ही संपूर्णपणे, स्वेच्छेने ‘व्ही’च्या कार्यात सहभागी होते. या मनपरिवर्तनाच्या घटनाक्रमात नेमकं काय होतं हे मुळातूनच वाचणं योग्य आहे.

तरीही या मनपरिवर्तनाच्या घटनेचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. स्थित्यंतराच्या काळात माणसांचे सामान्यत: तीन गट पडतात. ‘इकडचे’, ‘तिकडचे’, आणि ‘कुंपणावरचे’. हे ‘कुंपणावरचे’ लोक जेव्हा मोठ्या संख्येने ‘इकडे’ किंवा ‘तिकडे’ जातात, तेव्हा व्यापक सामाजिक-राजकीय बदलांना बळ मिळतं. एव्ही ही ‘कुंपणावरच्या’ लोकांची प्रतिनिधी आहे. समाज म्हणून आपली वाटचाल कोणत्या दिशेने होते आहे हे शोधण्यासाठी अशा ‘कुंपणावरच्या’ लोकांकडे लक्ष ठेवून राहिलं पाहिजे.

***

आशयासाठी लेखकाला चित्रकादंबरी सोयीची का वाटली याचं तपशीलवार विवेचन लेखकाने रौप्यमहोत्सवी आवृत्तीच्या प्रस्तावनेत केलेलं आहे. चित्रकादंबरीच्या स्वरूपामुळे त्यात दृश्य भाग सूचकपणे दाखवता येतो. या दृश्य भागामुळे कादंबरीकाराला काय सांगायचं आहे हे शब्दांविना ‘दाखवता’ येतं.

लेखकाने कादंबरीत प्रतिमांची अक्षरश: आतषबाजी केली आहे. ‘व्ही फॉर व्हेण्डेटा’मधली सर्वात उघड आणि लोकप्रिय प्रतिमा म्हणजे ‘व्ही’ने घातलेला ‘गाय फॉक्स’चा मुखवटा. गाय फॉक्स या सतराव्या शतकातल्या क्रांतिकारकाला इंग्लंडची संसद उडवून देण्याच्या कटात फाशी देण्यात आलं. चारशे वर्षांनंतर ‘व्ही फॉर व्हेण्डेटा’ या कादंबरीने जगाला दिलेला हा मुखवटा क्रांतीचं, सरकारविरोधाचं, प्रतीक ठरला आहे. हाँगकाँगमध्ये लोकशाहीसाठी आंदोलन करणाऱ्या लोकांपासून ते ‘अनॉनिमस’ या संगणक हॅकर टोळीपर्यंत अनेक लोकांनी हा मुखवटा आपलासा केला आहे.

या प्रतिमा दृश्य भागात तर आहेतच, पण त्याचा धागा अलगद शाब्दिक भागातही आहे. दृश्य आणि शाब्दिक कथेतला एकात्मभाव कधी हरवत नाही. कादंबरीच्या प्रमुख पात्राचं नाव ‘व्ही’. रोमन आकड्यांत ‘व्ही’ म्हणजे ‘पाच’ हा आकडा. हा पाच आकडा कादंबरीत वारंवार भेटतो.

***

जत्रेतल्या पाळण्यातून गरगर फिरून शेवटी उतरल्यावर जसं वाटतं, तसं ही कादंबरी संपल्यावर वाटतं. या कादंबरीचं फलित काय असा प्रश्न पडतो. भोवती घोंघावणाऱ्या प्रतिमांचं वादळ थोडं शमल्यावर या कादंबरीचा जास्त चांगला अर्थ लावता येतो. कोणतीही कृती परिणामशून्य नसते. कृतीमुळे होणारे परिणाम कोणाला तरी भोगायलाच लागतात. कुनस्थानातून सुटकेसाठी केलेली तथाकथित उदात्त कृतीही परिणामशून्य नसते. विध्वंस, मृत्यू, अराजक ही स्वातंत्र्याची किंमत वाजवी आहे का? दमनकारी राजवटी संपवताना त्या संपवणं हा एकमेव हेतू असून चालत नाही. कुठे जायचं याची खात्री नसेल तर रस्त्यांचा रोख अनागोंदीकडे जाणार हे जवळजवळ अटळ आहे.

aadubaal@gmail.com

 

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-09-2021 at 00:01 IST

संबंधित बातम्या