बुकरायण : वर्तुळाच्या ओव्या..

मरियन ग्रेव्ह्ज या काल्पनिक वैमानिकेच्या धाडसांची गाथा वगैरे मॅगी शीपस्टेडने यात रचली आहे.

पंकज भोसले pankaj.bhosale@expressindia.com

दोन नायिकांच्या काळातला फरक सत्तर वर्षांचा. पण दोघींच्या कहाण्यांमधला -किंवा बाई म्हणून वाटय़ास आलेल्या आयुष्यांमधला-  जुळेपणा इथं दिसतो. कादंबरी या दोन आयुष्यांसोबतच, आणखीही कुठे कुठे वाचकाला नेते..

मॅगी शीपस्टेड या लेखिकेच्या नावावर ईनमीनतीन कादंबऱ्या आहेत, पण थोडा शोध घेतला तर तिच्या सुटय़ा लेखनाचा पसारा किती मोठा आहे, हे लक्षात येईल. साहसपर्यटन आणि देशाटनाला वाहिलेल्या मासिकांतले तिचे खंडीभर लेख सहज  वाचायला उपलब्ध आहेत (त्यासाठी दुवा http://www.maggieshipstead.com/articles). गेल्या दहा-बारा वर्षांत दबदबा आणि दरारा उत्पन्न व्हावा अशा अवघड स्थळांचा अनुभव घेऊन तिने या लेखनाची व्याप्ती वाढविली. हे अनुभव कसले, तर टोंगा या समुद्री देशात व्हेल माशाबरोबर पोहण्याचे, करोनाकाळात अंटार्टिका खंडात काही आठवडे आपल्या आईसह राहण्याचे, आंतरराष्ट्रीय मत्स्यपाककुशल सेलिब्रिटीसह मासेमारी करण्याचे, ऐन थंडीच्या मोसमात बर्फाळ प्रदेशात अल्पकाळासाठी वस्ती करण्याचे, आफ्रिकेतील गवताळ प्रदेशात अश्वसहल करण्याचे, पाठपिशवी अडकवून एकटय़ाने त्रिखंडाला पालथे घालण्याचे, आठवडाभर ऐतिहासिक शहरांतून चालणाऱ्या रेल्वेमधून दिसणारे जग चितारण्याचे. प्रत्येक प्रवासातील साहसभरल्या क्षणांचे वाचकाला साक्षीदार करण्याची हातोटी असलेल्या या लेखिकेचे कथात्म साहित्यही प्रवासवर्तुळाच्या ओव्यांनी बहरत चालले आहे. बुकरच्या लघुयादीत आकाराने सर्वात मोठय़ा असलेल्या ‘ग्रेट सर्कल’ या कादंबरीतील खुसखुशीत लेखनाचा पैस लेखिकेच्या भटकंतीवेडाचे उत्पादन आहे. कारण यात येणारी आणि स्मृतीत गोंदवली जाणारी स्थळे आहेत अमेरिकेत मोंटाना प्रांतातील डोंगरकाठाडी वसलेले गाव, दोन महायुद्धांच्या वेढय़ात पेटलेले लंडन, अलास्का, न्यूझीलंड आणि अगदी अलीकडच्या ‘#मीटू’ मोहिमेपूर्वीचे रंग दाखविणारे हॉलीवूडप्रचुर लॉस एंजलिस. अन् त्यांचा काळआवाका किती, तर गोष्टीत बसविण्यासाठी शंभर वगैरे वर्षांचा (मध्ये वाटेल तेव्हा, वाटेल तितका मागे नेणारा). म्हणजे खऱ्या टायटॅनिक जहाजाच्या अपघातानंतर काहीच वर्षांनी या कादंबरीतील काल्पनिक जहाजाचा अशाच प्रवासादरम्यान अपघाती अंत होतो. पाचशेहून अधिक जणांचा मृत्यू होतो आणि त्यातून मॅगी शीपस्टेडची नवजात अर्भकावस्थेतील नायिका आपल्या जुळ्या भावासह आश्चर्यकारकरीत्या बचावल्याचा दाखला येतो. या नायिकेच्या जीवनकहाणीचा आराखडा शंभर वर्षे विस्तारत नेण्याची किमया लेखिकेने ‘ग्रेट सर्कल’मध्ये साधली आहे.

मरियन ग्रेव्ह्ज या काल्पनिक वैमानिकेच्या धाडसांची गाथा वगैरे मॅगी शीपस्टेडने यात रचली आहे. प्रतिकूल परिस्थितीत पुरुषी वर्चस्वाला झुगारून तयार होणारी ‘तिची कथा’ किंवा ‘स्त्री शक्ती’चा आविष्कार वगैरे थाट बाजूला सारत. म्हणजे इथले पुरुषवर्चस्व मरियन ग्रेव्ह्ज ही वैमानिक महिला उपयोजित कारणांसाठी मान्यही करते अन् त्यांतून स्वत:ला घडविण्यासाठी सज्ज होते. गूगलपंडित बनून या मरियन ग्रेव्ह्जची मुळं शोधायला गेलात, तर अमेरिकी वैमानिक अमेलिया एअरहार्ट आणि न्यूझीलंडमधील वैमानिक जीन बॅटन ही दोन नावे ठळक होतील. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्याच्या काहीच वर्षांत या दोघींनी विमानोड्डाणाचे विक्रम रचले. पैकी अमेलिया एअरहार्ट हिचा धाडसप्रवासातच मृत्यू झाला. शीपस्टेडच्या काल्पनिक मरियन ग्रेव्ह्जचा १९५० साली साहस मोहिमेतच मृत्यू होतो आणि २०१४ साली हॉलीवूडमधील बहुवादग्रस्त अभिनेत्री हेडली बॅक्स्टर आपल्या प्रतिमावृद्धीसाठी मरियन ग्रेव्ह्जचा चरित्रपट बनवण्याचा घाट घालते; हे ‘ग्रेट सर्कल’ कादंबरीचे मुख्य सूत्र.

ते मांडण्यासाठी शीपस्टेडने शंभर वर्षांचा काळ व्यापणारी महाकादंबरीच उभी केली. या काळात दोन महायुद्धांनी, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीच्या टप्प्यांनी, कला-संस्कृतीच्या विशेषत: सिनेमाच्या अंगाअंगांतील बदलांनी सामान्य माणसाचे आयुष्य ढवळून निघाले. तसेच सर्वच क्षेत्रांतील कलावंतांच्या सेलिब्रेटीत्वाचे मापदंड बदलत गेले. या सगळ्या अवघड नोंदींची प्रकरणे ‘ग्रेट सर्कल’मधून आकार घेतात.

मरियन ग्रेव्ह्ज आणि हेडली बॅक्स्टर या दोन वेगवेगळ्या काळात जगणाऱ्या कादंबरीच्या नायिका वाचकांसमोर येतात त्याही पूर्णपणे भिन्न स्वरूपांत. मरियनची कहाणी तृतीयपुरुषी तर हेडलीची गोष्ट प्रथमपुरुषी निवेदनात वाचायला मिळते. एकाच कादंबरीत हा निवेदनाचा दुपदरी प्रयोग फसत नाही. उलट लेखनातील कल्पना ताकदीने अधिक प्रमाणात पोहोचते. शीपस्टेड ही लेखिका तपशील-संशोधनाची पोतीच्या पोती येथे ओतत राहते. पण तो काल्पनिक इतिहास रंगतदार व्हायला लागतो. मरियनच्या जन्मापूर्वीच्या एक पिढी आधीपासून शीपस्टेड कादंबरीला आरंभ करते. त्यात लंडनहून अमेरिकेला निघणाऱ्या जहाजाला अपघात होण्यापूर्वीची पार्श्वभूमी येते. व्यभिचार, प्रेमप्रकरणे आणि लैंगिकज्ञान आकलनाच्या अवस्थेतील व्यक्तिरेखांमधून प्रवास करीत मरियनच्या आई आणि वडिलांचा संदर्भ स्पष्ट होऊ लागतो. भीषण जहाज अपघातातून काही मरियन आणि तिचा जुळा भाऊ जेमी यांना जहाजाचा कप्तान असलेला त्यांचा पिता वाचवितो. अपघाताचा ठपका लागून या पित्याला तुरुंगवास होतो. जुळ्या बालकांची जबाबदारी अमेरिकेतील काकाकडे सोपवली जाते. निसर्गसान्निध्यात आपल्या चित्रकलेची जोपासना करणाऱ्या या विचित्र काकाच्या घरात ही दोन बालके स्वत:च आपले संगोपन करण्याचे शिकतात. मोंटाना प्रांतातील मिसोला खेडय़ात सेलेब नावाच्या मित्राला घेऊन त्यांची भटकबहाद्दरी सुरू होते. दहाव्या वर्षांतच मरियनचे धाडसअंग चारचाकी गाडी यशस्वी हाताळण्यातून दिसू लागते. जागतिक मंदीच्या दशकातील मिसोलाचा निसर्गसंपन्न, तरी मागास भाग- स्त्रियांना पैसे मिळविण्यासाठी केवळ वारांगना होणे एकच पर्याय ठेवणारा. सेलेबची आई या मार्गाद्वारेच घर चालवताना मरियनसमोर येते. पण मरियन आपल्या थोराड अंगाला पुरुषी वेशात कोंबून गाडीचालकाची नोकरी मिळविते. जमिनीवरून अवैध व्यापाराची वाहतूक करताना तिला नव्याने विकसित झालेल्या विमानांचे दर्शन होते. तिच्या मनात विमान चालविण्याची असोशी तयार होते आणि त्यासाठी चौदाव्या वर्षी ती सर्वस्व पणाला लावते. अवैध व्यापाऱ्याचा म्होरक्या तिच्या इच्छापूर्तीचे मार्ग शोधून देतो. तिच्यासाठी खास विमान आणि ते चालविणे शिकविणारा मास्तर यांना पाचारण केले जाते. शरीरविनिमय, अत्याचार, िहसा आदी साऱ्या दु:खांवर मात करायला लावणारी आकाशभ्रमंतीची कला ती आत्मसात करते आणि स्वत:च्या अस्तित्वाला झळाळी देते.

या मरियनच्या गाजण्याच्या तब्बल सत्तर वर्षांच्या कालावधीनंतर अवतरलेली हेडली बॅक्स्टर ही आजच्या ‘बचपनी सेलेब्रिटीत्वात’ पोळलेली हॉलीवूड तारका. एका खूपविक्या कादंबरी मालिकेवरून बेतलेल्या चित्रपट मालिकेत लहानपणासून नायिकापद लाभलेली (उदाहरणादाखल ब्रिटिश हॅरी पॉटर घ्या अथवा अमेरिकी ट्वायलाइट मालिका. दोन्ही चित्रपटांतील बालकलाकारांचे मोठेपण चर्चिल कहाण्यांनी भंगलेले आहे.). ऑलिव्हर या आपल्यापेक्षा बऱ्याच मोठय़ा वयाने असलेल्या सहकलाकाराची पत्नी असतानाही व्यभिचारात नवऱ्याच्या खांद्याला खांदा भिडवणारी. एका गायकाबरोबरचे तिचे शरीर विनिमयाचे प्रकरण छायाचित्रांच्या पुराव्यासह समाजमाध्यमांत सैरावैरा विहार करू लागल्यावर तिच्या सेलिब्रेटीपदाला ग्रहण लागते आणि पुन्हा स्वप्रतिमेचा शोध घेताना तिला आपल्या आयुष्याशी तंतोतंत साधर्म्य असलेल्या मरियन ग्रेव्ह्जच्या आयुष्याचा छडा लागतो. विमान अपघातात आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या हेडलीचे बालपणही काकाच्या छत्रात घडलेले असते. मरियनच्या चित्रकार काकाला तुल्यबळ असलेल्या ड्रग अ‍ॅडिक्ट काकाच्या सान्निध्यात हेडलीचा कसा आत्मविकास होतो, याची कहाणी गेल्या दहा-वीस वर्षांतील सगळेच हॉलीवूडी संदर्भ कथानकात मुरविते.

मरियनचा दोन ध्रुवांवर विमान चालविण्याच्या धाडसी बेत रचण्यापर्यंतचा प्रवास आणि हेडलीकडून तिच्यावर चरित्रपट बनविण्याची महत्त्वाकांक्षा दोन आयुष्यांना सांधणारे वर्तुळ पूर्ण करतो आणि महाकाय अशा कथागुंफेत वाचकाला फिरवू लागतो. कादंबरीचा सर्वाधिक भाग मरियनवर केंद्रित झाला आहे. अमेरिकेतील अगदी छोटय़ाशा खेडय़ाला अधोरेखित करताना रचलेल्या ‘अ‍ॅन इनकम्प्लीट हिस्ट्री ऑफ मिसोला, मोंटाना’ या दीर्घ प्रकरणात लेखिका शेकडो वर्षे मागे जाऊन गावविकासाच्या अवस्था शब्दांत पकडते. आपल्या वडिलांच्या संग्रहातील जुन्या पुस्तकांच्या वाचनामुळे बहाद्दरी आणि साहसांचा शिरकाव मरियनच्या मेंदूत कसा शिरतो, याचा सूक्ष्म आढावाही येथे मिळतो.

आयोवा राज्यातील लेखन विद्यापीठात विद्यार्थिदशेतच पुस्तक करारासाठी एजंट नेमावा लागणाऱ्या शीपस्टेडची शैली तेथील बेतीव परंपरेहून भिन्न आहे. या कादंबरीत काळाला मागे-पुढे करणारी अनेक प्रकरणे असली, तरी छोटय़ा-छोटय़ा उपविभागांत ती विखुरली गेली आहेत. त्यामुळे वाचकाला ती अधिक काळ जखडून ठेवतात. आंतरजालावर मुबलक असलेल्या शीपस्टेडच्या कोणत्याही साहस प्रवासलेखातून चुरचुरीत कसे लिहावे, याचे धडे मिळू शकतात. आपल्याकडे (आर्थिक, तांत्रिकदृष्टय़ा अनंत अडचणी असल्याने) आवाक्याबाहेर असलेल्या लेखनाचा अभ्यास म्हणूनही त्याकडे एक नजर टाकता येईल अन् कादंबरी वाचण्यास घेण्याइतपत उत्सुकतेचा प्रदेश निर्माण होईल.

[बुकरायण मालिकेतील हा यंदाचा शेवटचा लेख. पुढील आठवडय़ात पुरस्कारप्राप्त कादंबरी निवडली जाईल. यंदा लघुयादीतील सहा पुस्तकांची ओळख करून देताना मराठी साहित्य, संस्कृतीची आणि समाजमनाची नस अचूक पकडलेल्या दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या कविता आणि शब्दमाला शीर्षकांसाठी वापरण्याचा प्रयोग केला होता;  त्याचेही एक वर्तुळ पूर्ण झाले. कुतूहल असणाऱ्या वाचकांना दि.पुं.च्या समग्र कविता आणि ‘शीबा राणीच्या शोधात’ या प्रवासवर्णनात्मक पुस्तकातून या शीर्षकांची मुळे सापडू शकतील]

ग्रेट सर्कल

लेखिका : मॅगी शीपस्टेड

प्रकाशक : ट्रान्सवर्ल्ड पब्लिशर्स लि.

पृष्ठे : ६०८ :  किंमत (पेपरबॅक): ७९९ रु.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Great circle maggie shipstead book review zws

ताज्या बातम्या