scorecardresearch

ताबेदारीची भूमि-गाथा

सुंदर, ओघवत्या भाषेत लिहिलेला हा ग्रंथ मनोरंजक माहितीने खच्चून भरलेला आहे. अमेरिका खंडावर मानव निअँडर्थलसारखा उद्भवलेला नसून गोठलेल्या बेअिरग सामुद्रधुनीवरून तो सुमारे १३ हजार वर्षांपूर्वी भूमार्गे आशियातून आला.

जमिनीवरल्या ताब्याचा लोभ आपल्या आजच्या जगाला आकार देणारा ठरला तो कसा, याची माहितीपूर्ण पण रंजक गोष्ट सांगणारं पुस्तक..

मिलिंद रा. परांजपे

सुंदर, ओघवत्या भाषेत लिहिलेला हा ग्रंथ मनोरंजक माहितीने खच्चून भरलेला आहे. अमेरिका खंडावर मानव निअँडर्थलसारखा उद्भवलेला नसून गोठलेल्या बेअिरग सामुद्रधुनीवरून तो सुमारे १३ हजार वर्षांपूर्वी भूमार्गे आशियातून आला. पुस्तकात १७व्या शतकातील हडसन नदीच्या खोऱ्यातल्या नेटिव्हाबरोबर झालेल्या जमिनीच्या खरेदीखताची हस्तलिखित प्रत छापली आहे. युरोपातून आलेले स्थलांतरित नेटिव्हांना कसे तुच्छतेने वागवीत आणि नेटिव्हांना त्याबद्दल होणारा मानसिक क्लेश आणि विरस पुस्तकात सर्वत्र आढळून येतो.   

पृथ्वीचा आकार आणि परीघ किंवा इतर अंतरे शोधण्यासाठी फार पूर्वीपासून विद्वानांनी किती तरी प्रयत्न केले. इरॅटोस्थेनीस नावाच्या ग्रीक खगोलशास्त्रज्ञाने २२०० वर्षांपूर्वी इजिप्तमधील अलेक्झांड्रिया शहरात विहिरीत पडलेल्या सूर्याच्या सावलीचा सात अंशांचा कोन मोजून त्याची तुलना नाईल नदीवरील ५२४ मैल थेट दक्षिणेला असलेल्या आस्वान गावी पडलेल्या ९० अंश लंबकोनाशी केली. त्यावरून त्याला पृथ्वीच्या ३६० अंशांचा परीघ सुमारे २४ हजार मैल असणार असं गणित करता आलं. प्रत्यक्ष परिघाच्या ते अगदी जवळपास आहे. सर्व जगासाठी एकाच पद्धतीचे नकाशे असावेत (इंटरनॅशनल मॅप ऑफ द वल्र्ड- ‘आयएमडब्लू’) ही संकल्पना दूरदृष्टीच्या आल्बर्ट पेंक या जर्मन माणसाने प्रथम मांडली. त्यासाठी झालेल्या परिषदेत प्राइम मेरिडियन (शून्य रेखांश) ग्रीनिचचा असावा का पॅरिसचा यावर इंग्लिश आणि फ्रेंच प्रतिनिधींमध्ये खडाजंगी झाली. शेवटी शून्य रेखांश ग्रीनिचचा पण नकाशे मीटरमध्ये, फूट-इंचात नाही, अशी तडजोड झाली.  ही सारी माहिती या पुस्तकात आहे, परंतु जॉन कीच्या ‘हाऊ इंडिया वॉज मॅप्ड अ‍ॅण्ड एव्हरेस्ट नेम्ड’चा उल्लेख फक्त शेवटी संदर्भ ग्रंथात आला आहे.  

भारताचे अखेरचे व्हाइसरॉय माऊंटबॅटन यांनी ३ जून १९४७ रोजी फाळणीची योजना मंजूर करवून घेतली. फाळणीची रेखा आखण्याचं काम सर सिरिल रॅडक्लिफ नावाच्या एका बॅरिस्टरावर टाकलं. रॅडक्लिफला भारताचा ओ की ठो माहीत नव्हता, तो कधी पॅरिसच्याही पूर्वेला आला नव्हता. तो आधी इंग्लंडच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा संचालक होता. रॅडक्लिफला फाळणीची रेषा ठरवायला मदतनीस म्हणून दोन हिंदु आणि दोन मुसलमान वकील, राहायला सिमल्यात एक बंगला आणि फक्त सात आठवडय़ांचा वेळ दिला. फाळणीची रेषा माऊंटबॅटनने मुद्दाम प्रत्यक्ष फाळणीनंतर दोन दिवसांनी जाहीर केली. नवीन सरहद्दीजवळच्या अनेक हिंदुंना वाटत होतं ते भारतात आहेत आणि मुसलमानांना वाटलं ते पाकिस्तानात आहेत, पण १७ ऑगस्टला एकदम जो धक्का बसला त्यामुळे भयभीत झालेल्या जनतेचा पळताना कल्पनेबाहेर नरसंहार झाला. विंचेस्टरने त्यासाठी एकटय़ा माऊंटबॅटनला पूर्णपणे जबाबदार धरलं आहे. फाळणीवर अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत, पण संदर्भ ग्रंथांच्या यादीत एकाही पुस्तकाचा- परदेशी किंवा भारतीय लेखकाने लिहिलेल्या- नामनिर्देश आलेला नाही. 

भारताची बांगलादेशबरोबर चार हजार किमी लांबीची सीमा आहे तर पाकिस्तानबरोबर ती तीन हजार ३५३ किमी लांबीची आहे. पूर्व बंगाल तोडून त्याचा पूर्व पाकिस्तान केल्यावर पलीकडचा आसाम एका १२ का १५ मैल रुंदीच्या पट्टीने, जिला ‘चिकन नेक’ म्हणतात, उर्वरित भारताला जोडलेला राहिला. आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने तो कमकुवत राहणार हे उघडच होते, पण परदेशी आक्रमणाच्या दृष्टीने त्याच्या सीमा पूर्णपणे असुरक्षित होणार होत्या. त्या वेळेस चितगांव बंदर भारताला मिळालं असतं किंवा ते भांडून घेतलं असतं तर निदान समुद्रमार्गे आसामशी संपर्क ठेवणं शक्य झालं असतं, पण नकाशे आणि फाळणीची रेषा माऊंटबॅटननी अतिशय गुप्त ठेवल्यामुळे अशी मागणी भारतीय नेत्यांनी फाळणीपूर्वी करणं शक्य नव्हतं. नंतर केल्याचं कुठे कधी वाचनात आलं नाही. सामरिकदृष्टय़ा भारत फार मोठय़ा प्रतिकूल परिस्थितीत कायमचा अडकला. माऊंटबॅटनचा तोच उद्देश होता. अमृतसर-लाहोरदरम्यानच्या  हजारो मैलांच्या सीमेवर रस्त्यावर एकच प्रवेशद्वार आहे. अमेरिका-कॅनडा ही जगातली पाच हजार किमीची सर्वात लांब सीमा असंरक्षित आहे, पण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तिच्यावर अगदी बारकाईने नजर ठेवलेली असते.       

नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या काटरेग्राफिक डिव्हिजनचा उल्लेख लेखकाने केलेला नाही. ब्रिटिश साम्राज्याची आठवण जगात फारशी कोणाला आवडत नाही ही गोष्ट लेखक मोकळेपणाने लिहितो. बिशप डेस्मॉन्ड टुटू यांनी म्हटलं आहे (त्याआधी ते जोमो केन्याटाने म्हटले होते) ‘‘मिशनरी आफ्रिकेत आले तेव्हा त्यांच्या हातात बायबल होतं आणि आमच्याकडे जमीन होती. ते म्हणाले ‘आपण प्रार्थना करू.’ म्हणून आम्ही डोळे मिटले. डोळे उघडले तर आमच्या हातात बायबल आलेलं होतं आणि त्यांच्याकडे आमची जमीन होती.’’      

सर्व भूमी इतिहासपूर्वकालीन प्राचीन आहे, पण १९ आणि विसाव्या शतकातही काही जमीन (बहुतेक बेटं), नव्याने निर्माण झाली. त्यातलं प्रसिद्ध म्हणजे ‘अनाक क्राकाटोआ’. अनाक म्हणजे बालक. सुंदा सामुद्रधुनीत ज्या ठिकाणी १८८३ साली क्राकाटोआ बेटावरच्या ज्वालामुखीचा कानठळय़ा बसवणारा उद्रेक झाला त्याच ठिकाणी १९२३ मध्ये एक लहान बेट आपोआप समुद्रातून वर आले. ते म्हणजे अनाक क्राकाटोआ. मनुष्याने निर्माण केलेली जमीन म्हणजे हाँगकाँगजवळील स्टोनकटर्स आयलंड, न्यूयॉर्कचं बॅटरी पार्क आणि १९०६ च्या भूकंपामुळे झालेला  राडारोडा समुद्रात टाकून निर्माण केलेला सॅनफ्रॅन्सिस्कोचा मरीना डिस्ट्रिक्ट. मुंबईचा नरिमन पॉइंट लेखकाच्या नजरेतून सुटलेला दिसतो. ईश्वराने जग निर्माण केलं, पण नेदरलॅण्ड डचांनी निर्माण केला हे वाक्य प्रसिद्धच आहे कारण खाडीत बांध घालून समुद्राचं पाणी अडवून त्यांनी हजारो एकर जमीन मिळवली.

१८७९ मध्ये पोंका टोळीच्या राजाच्या खटल्यात नेब्रास्काच्या अमेरिकन न्यायसंस्थेने प्रथम मान्य केलं की मूळ तद्देशीय लोक ‘मानव जातीत’ मोडतात! (‘स्टँिडग बेअर’ नावाच्या अमेरिकेतील पोंका टोळीच्या राजाचा फोटो छापून लेखकाने पुस्तक त्यास अर्पण केले आहे.) ओक्लाहोमा राज्यात तद्देशीय रहिवासी हजारो वर्ष शांततेने राहात आलेले  आहेत. त्यांना गोऱ्या अमेरिकनांनी तिथून हाकलून लावलं. मग जाहिराती देऊन ठरवलेल्या वेळेस आणि जागेवरून घोडे आणि बग्ग्यांमधून गोऱ्या लोकांना दौड करून हव्या तेवढय़ा जमिनीवर मालकी हक्क प्रस्थापित करू दिला. हे नैतिक बळ डच कायदेपंडित ह्युगो ग्रॉशसच्या ‘टेरा नलीअस’ तत्त्वामुळे मिळालं- ‘जी जमीन आधी कोणाचीही  नव्हती ती कोणीही हक्काने घेऊ शकेल.’    

उत्तर आर्यलडमध्ये कॅलेडन कुटुंबाच्या मालकीची २७ हजार एकर जमीन होती. १७७२ साली बंगालमधून काही तरी भानगड करून चिक्कार पैसे घेऊन आलेल्या पूर्वजाने ती नऊ हजार पौंडांना विकत घेतली होती. तिथल्या मॅनॉरमध्ये राहणाऱ्या लॉर्डने म्हटलं,  ‘मला कसलीच घाई कधी नसते,’ त्याचं वर्णन वाचून कुळांनी कसलेल्या जमिनींवर भारतातील जमीनदार कसे निरुद्योगी, आळशी, पण आरामदायी जीवन जगत त्याची आठवण होते. आर्यलड, स्कॉटलंडमधील जमीनदारांच्या जाचाला कंटाळून हजारो शेतमजूर कॅनडा, अमेरिकेत कायमचे गेले. पण तिथेही आता बदल होतो आहे. भारतात आपण कुळकायदा १९५० मध्येच आणला. १९व्या शतकात नेब्रास्का राज्यात आगगाडीतून पश्चिमेकडे जात असताना खिडकीतून बाहेर चरणाऱ्या शेकडो रानबैलांची (बायसन) बंदुकीने गोळय़ा झाडून हत्या करण्याचा खेळ फार लोकप्रिय झाला होता. रानबैलांना पूज्य मानणारे तद्देशीय ‘इंडियन्स’ हा प्रकार पाहून अक्षरश: रडत असत. पाच कोटी रानबैलांची अशी हत्या झाली. आता सीएनएनच्या टेड टर्नरने तिथे २० लाख एकर जमीन विकत घेऊन रानबैलांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. एके काळी कोणी कुठेही मोकळय़ा जागेवर चालत जाऊन निसर्गाशी एकरूप होऊन मन:शांती मिळवू शकायचा, पण आयडाहो राज्यात आता बेकायदा प्रवेश, अपप्रवेश वगैरेच्या  कायद्यांनी ते अशक्य झाले आहे. स्कॉटलंडमध्ये मात्र ट्रेसपास-बेकायदा प्रवेश, उल्लंघन हा गुन्हा म्हणून आता काढूनच  टाकला आहे. एका इटालियन न्यायाधीशाने १३ व्या शतकात म्हटले की एखाद्या जमिनीचा मालक आकाशापासून पाताळापर्यंत त्या जमिनीचा मालकच असतो. विमानाचा शोध लागल्यानंतर १९४६ सालच्या ‘युनायटेड स्टेट्स  विरुद्ध कॉस्बी’ खटल्याच्या निर्णयाप्रमाणे आता ३६५  फूट उंचीपर्यंतच मालकाचा हक्क राहतो. म्हणून ड्रोन ४०० फुटांवरून जातात.                      

उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये १९५३ पासून चार किमी रुंदीचा जमिनीचा १५५ मैल लांब पट्टा ‘निर्मनुष्य जमीन’ केला आहे. तेव्हापासून आता निसर्ग तिथे मुक्तपणे वावरत असतो. अस्वलापासून दुर्मीळ अमूर चित्त्यापर्यंत अनेक जातींचे पशुपक्षी त्या पट्टय़ात दिसतात. परंतु नेदरलँडमध्ये कृत्रिम जमिनीवर केलेला असा प्रयोग अयशस्वी झाला. तज्ज्ञांच्या मते जमिनीची शास्त्रीयदृष्टय़ा योग्य काळजी घेऊनच जास्त यश मिळेल. ऑस्ट्रेलियातील तद्देशीय आदिवासी आज अनेक वर्ष जाळून जमीन भाजण्याची पद्धत अवलंबित आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियात सध्या वणवे पेटून जी अपरिमित हानी होत आहे तशी पूर्वी होत नसे. आता तिथले सरकार त्यावर विचार करत आहे. २००४ च्या त्सुनामीत अंदमानातले आदिवासी कोणीच दगावले नाहीत कारण त्यांच्या परंपरेप्रमाणे भूकंप झाला की ते टेकडीवर उंच ठिकाणी आश्रयाला जातात. तद्देशीय लोकांना फोर्ट विल्यमपासून दूर ठेवण्यासाठी इंग्रजांनी कोलकात्याचं मैदान ठेवलं, पण अतिशय कोंदटलेल्या गिचमिडीत राहणाऱ्या लाखो कोलकातावासीयांना त्यामुळे मोकळय़ा श्वासाचा दिलासा मिळतो, असंही लेखक म्हणतो. तिथल्या व्हिक्टोरिया मेमोरियलचं अस्तित्वच गुलामगिरीच्या कटू आठवणी जागवतं. जगातल्या ५० सर्वात प्रदूषित शहरांपैकी १४ चीनमध्ये आहेत तर ३४ भारत, काही पाकिस्तानात आहेत. फुकुशिमा, चेर्नोबिल, कोलोराडोतील डेन्वर शहरी अणुबॉम्बसाठी लागणाऱ्या प्लुटोनियममुळे  प्रदूषण झाले त्यावर लेखकाने बरेच लिहिले आहे, पण भोपाळ वायुदुर्घटना मात्र तो विसरलेला आहे.  

ज्यू आणि पॅलेस्टिनी अरबांच्या कलहाचा इतिहास बाल्फोर घोषणेपासून आतापर्यंत पुस्तकात वाचायला मिळतो, पण प्राचीन संस्कृतीचा तिबेट चीनने गिळंकृत केला त्याचा उल्लेखही नाही.           

समाजवादी विचाराप्रमाणे सहकारी तत्त्वावर केलेल्या शेतीचा प्रयोग सफल झाला आहे हे जगाला  दाखवण्यासाठी सोव्हिएट राज्यात हजारो शेतकऱ्यांना लेनिन आणि स्टॅलिनने मारून टाकले याची तुलना लेखक ज्यूंच्या हिटलरी हत्याकांडाशी करतो. पिकवलेलं धान्य स्वत:च्या कुटुंबासाठी थोडेही न ठेवता सर्वच्या सर्व सरकारजमा करावे लागायचे. नाही तर त्या शेतकऱ्याची गोळय़ा घालून हत्या करण्याचा अधिकार वसुली करणाऱ्यास दिला होता. तशा  लेनिनने पाठवलेल्या तारा पुस्तकात छापल्या आहेत. गॅरेथ जोन्स या इंग्लिश वार्ताहराने १९३३ सालात युक्रेनमध्ये गावोगावी हिंडून वृत्तान्त लिहून ठेवला आहे. सोव्हिएत हस्तकांनी जोन्सची मांचुरियात हत्या केली. आज युक्रेनमध्ये त्याचे पुतळे उभारले आहेत, हॉलीवूडने त्याच्यावर बोलपट काढला आहे. 

राष्ट्रवादावर वांशिक शंका!

युरोपातून आलेल्यांना मिळते तसे नागरिकत्व जपानी स्थलांतरितांना अमेरिकेत मिळत नसे. कष्टाळूपणा, सचोटी, निश्चयीपणा आदी गुणांमुळे जपान्यांचा विकास होत असलेला गोऱ्यांना पाहवला नाही. त्यांनी कायदे करून त्यांचे जमीन विकत किंवा भाडय़ाने घेण्याचे, देण्याचे अधिकार काढून घेतले. दुसऱ्या महायुद्धकाळी त्यांच्या एकनिष्ठेविषयी संशय घेऊन अमेरिकी अध्यक्षांनी जपानी वंशाच्या सव्वा लाख अमेरिकनांना छावण्यांमध्ये दोन वर्षे बंदिस्त करून टाकले. ज्या गोऱ्यांना त्या काळात त्यांच्या जमिनींची देखभाल करायला सांगितले त्यांनीच त्या जमिनी बळकावल्या. शेतसारा भरला नाही म्हणून अनेकांच्या जमिनी जप्त झाल्या. महायुद्धानंतर अमेरिकेत शिकलेल्या जपानी वंशाच्या कायदा पदवीधराला वकिली करायला बंदी घातल्यामुळे जपानला जावे लागले. पण १९८८ साली अमेरिकी सरकारने वॉशिंग्टनमध्ये ‘हिअर वी अ‍ॅडमिट अ राँग’ ( आम्ही आमची चूक मान्य करतो)  असे वाक्य लिहिलेली शिळा बसवली. त्यामुळे अमेरिकन जनतेचे कौतुकही वाटते. 

न्यूझीलंड हा पृथ्वीवरचा मनुष्याने वसाहत करण्याचा शेवटचा देश. १४ व्या  शतकात इथे पॉलिनेशियन आले. ३००  वर्षांनी डच आले. त्यांनी बेटांना न्यूझीलंड नाव दिलं. १७६९ मध्ये इंग्लिश कॅप्टन कुक आला. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया, अमेरिका यातला फरक म्हणजे न्यूझीलंडच्या एतद्देशीयांना गोऱ्या युरोपियनांसह मतांचा आणि इतर नागरी हक्क मिळाले. आता तर ब्रिटिशांनी न्यूझीलंड/ ऑस्ट्रेलियाची बळकावलेली जमीनही त्यांना परत मिळत आहे. वसाहतींच्या इतिहासात न्यूझीलंड एक अपवाद आहे. ‘जगातल्या सर्व अविकसित देशांनी, अत्यंत  दुर्दैवी, अडाणी भारतानेदेखील खेडोपाडय़ांत सुधारणा पोहोचवल्या.’ (भारताबद्दल हे लेखकाचे शब्द). फक्त आफ्रिकाच गर्तेतून बाहेर पडत नाही. अमेरिकेतील योसेमिटी भागातल्या मीवाक लोकांना हाकलून पर्यटकांना मोकळीक केली. त्यांचा फोटो पुस्तकात छापला आहे. त्याच्या खाली ‘सहा हजार मीवाकपैकी फक्त १५० पर्यटकांच्या करमणुकीसाठी राहू दिले’ असं वाक्य आहे. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सुकोमिश इंडियन जमातीचा राजा सियाल्ठ (ज्याचं नाव हल्लीच्या  सिएटल शहराला पडलं) म्हणाला होता, ‘आकाश कसं कोणाला विकता येईल काय?’ जमीन आणि पाणी यांची खरेदी-विक्री ही कल्पनाही आम्हाला करवत नाही. विनोबाजींचा मोठय़ा जमीनमालकांनी त्यांची एकषष्ठांश जमीन वाटण्याचा भूदान प्रयोग शेवटी सोडून देण्यात आला. पुस्तकाचा शेवट टॉलस्टॉयची ‘हाऊ मच लॅण्ड अ मॅन नीड्स’ (‘माणसाला किती जमिनीची आवश्यकता असते’) ही  प्रसिद्ध गोष्ट सांगून होतो.           

‘विशिष्ट शब्दांचा अर्थ’ कोशात ‘योजन’ शब्दाचा अर्थ ‘पाचव्या शतकात भारतात प्रचलित असलेलं आठ ते नऊ मैल अंतराचे परिमाण’ असा दिला आहे. कृष्णधवल छायाचित्रांची यादी अडीच पान भरून आहे. संदर्भ ग्रंथांच्या लांबलचक सूचीमध्ये जॉन की या लेखकाच्या ‘हाऊ इंडिया वॉज मॅप्ड अ‍ॅण्ड  एव्हरेस्ट वॉज नेम्ड’ पुस्तकाचा समावेश असला तरी एकाही भारतीय लेखकाचा उल्लेख नाही. 

अमेरिका आणि कॅनडात लाखो इंग्रज आणि स्कॉटिश लोकांनी स्थलांतर केलं. त्याला ब्रिटनमधील १६ व्या शतकापासून सुरू असलेलं जमिनीचं खासगीकरण आणि त्यामुळे बंदिस्तीकरण कितपत जबाबदार असेल याचा विचार करताना लेखकाला हे पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली. आपल्या जमिनी गेल्या म्हणून महासागर ओलांडून स्थलांतर करणाऱ्या युरोपीय लोकांनी महासागर ओलांडल्यावर तिथल्या भूमीवर हजारो वर्ष शांततेत राहणाऱ्या लोकांना हाकलून देऊन स्वत: त्यांच्या जागा बळकावल्या. लेखकाच्या मते हे एक मोठं विडंबन आहे.

जमिनीवर सर्वाची सारखी मालकी असावी, पृथ्वी सर्व प्राणिमात्रांची एकच भूमाता आहे हे सगळं सर्वाना पटण्यासारखंच आहे. पण पुस्तक वाचल्यावर आपल्या भूमीचं आपणच डोळय़ात तेल घालून रक्षण करायला पाहिजे हा धडा मिळतो.

captparanjpe@gmail.com

मराठीतील सर्व बुकमार्क ( Athour-mapia ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ground possession world book texts entertaining europe migrants natives ysh

ताज्या बातम्या