कोविड- टाळेबंदीच्या दीड वर्षात सहकुटुंब पर्यटन, त्यातही परिवातील ज्येष्ठ नागरिकांसह फिरायला जाणे हे सारे कल्पनेच्याही पलीकडचे ठरले. राजकीय पक्षांनी कितीही शंख केला, तरी आपल्या देवदर्शनावरही काहीएक मर्यादा स्वेच्छेने पाळणे बरे, असा विचार सुज्ञांनी केला. पण याच काळात, पेशाने डॉक्टर असलेल्या विराग गोखले यांचे ‘महाराष्ट्र- रस्टिक, मिस्टीक अ‍ॅण्ड चार्मिंग’ हे सचित्र इंग्रजी पुस्तक एप्रिल २०२१ मध्ये प्रकाशित झाले. या १०४ पानी पुस्तकातील ९८ पैकी ९४ भाग किंवा प्रकरणे महाराष्ट्रातील विविध स्थळांबद्दल आहेत. पुस्तकातील सुमारे २०० हून अधिक छायाचित्रे लेखकानेच (किंवा कुटुंबातील सहप्रवाशांनी) टिपलेली आहेत! पुस्तकाचे स्वरूप छोट्या-छोट्या छायाचित्रांच्या आल्बमसारखे आहेच, पण त्या-त्या ठिकाणी कसे जायचे याचे रेखाटनवजा नकाशेही काही पानांवर आहेत .  अर्थातच प्रत्यक्ष गेल्यानंतर समजलेली माहिती, स्थानिक आख्यायिका, त्यावर सामान्यज्ञानातूही सहज व्हावीच अशी आवश्यक टिप्पणी, महाराष्ट्राच्या भटकंतीविषयीची बरीच आणि इतिहासाविषयीची थोडीफार मराठी पुस्तके वाचून त्यातून टिपलेले माहितीकण या साऱ्यांचा परिपाक म्हणून झालेले सोप्या इंग्रजी भाषेतले लिखाणही आहे!

मराठीत महाराष्ट्राविषयी बरीच पुस्तके असूनही इंग्रजीत आपल्या राज्याच्या कौटुंबिक पर्यटनासाठी साकल्याने भरपूर माहिती देणारे पुस्तक नाही, या रुखरुखीतून हे पुस्तक तयार झाले. ‘ट्रेक द सह्याद्रीज’सारखी विशेष पुस्तके इंग्रजीत आहेतच, पण चारचाकी गाडी घेऊन कुटुंबातील आबालवृद्धांनी कुठे जायचे, हा प्रश्न सोडवणारे पुस्तक चटकन मिळत नाही हे खरे; ती कमतरता या पुस्तकाने भरून काढली आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाची सारी स्थळे तर यात आहेतच, पण फार माहिती नसलेली अनेक ठिकाणेही आहेत. शिवाय, या स्थळांची माहिती जिल्हावार किंवा ‘लोनली प्लॅनेट’ सारखी पुस्तके देतात तशी फेरीच्या मार्गानुसार नसून, उदाहरणार्थ-  ‘जागोजागच्या दीपमाळा’, ‘ठिकठिकाणचे वेताळ’ अशी आहे! त्यामुळे हे प्रवासाचे निव्वळ गाइडबुक ठरत नाही, तर एका चोखंदळ पर्यटकाने मनात केलेल्या नोंदींचेही दर्शन यातून घडत राहाते. महाराष्ट्रातील- किंवा कुठल्याही भारतीय प्रांतातील भारतीय कुटुंबांचे- पर्यटन हे प्रामुख्याने धर्मस्थळांना केंद्रस्थानी मानणारे. याचे प्रतिबिंब पुस्तकातही आहेच. पण अशाही पर्यटनात कुतूहलाची भावना जागृत ठेवण्याचा लेखकाचा स्वभाव पानोपानी दिसतो. त्यामुळेच आवास येथील ‘पांडवकालीन’ दगडी होडीचे छायाचित्र (होडीला पांढरा रंग फासला गेल्यामुळे छायाचित्रात तिचा दगडीपणा लपला आहे, हा लेखकाचा दोष नव्हे!) आणि ‘बहुधा देवीचे वाहन म्हणून ही होडी बनविण्यात आली असावी’ अशी टिप्पणी, किंवा चालुक्य राजा मंगलेश याने राणे हाळीदेवी हिच्या स्मृत्यर्थ सहाव्या शतकात संगशी (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथे उभारलेली स्मारक-शिळा, सिन्नर-घोटी मार्गापासून जरा वळल्यावर ताकेड येथील जटायू तीर्थ, सोलापूरच्या भूदुर्गातील मशिदीचे हेमाडपंती खांब, हे सारे लेखकाने टिपले आहे, त्याची माहितीदेखील उत्साहाने आणि विवेकीपणे दिली आहे.

पुस्तकातील काही छायाचित्रे निसर्गसौंदर्याची आणि ‘नैसर्गिक वारशा’ची आहेत. महाराष्ट्रातील डझनभर प्रकारच्या अळिंब्या (मशरूम), वडाचे प्रचंड झाड, वैज्ञानिक कुतूहलातून अवश्य भेट द्यावी असे लोणारचे सरोवर, सिन्नरनजीकचे गारगोटी संग्रहालय अशा स्थळांची माहिती इथे सचित्र आहे. कोकणात खडकांवर चितारलेली- खोदीव अशी ‘कातळशिल्पे’ अनेक ठिकाणी दिसतात, त्यांचीही अनेक छायाचित्रे पुस्तकात आहेत, पण त्यांच्याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही. तरीही, ही चित्रे खरोखरच पांडवकालीन असावीत की आदिमानवांच्या काळातील असावीत की त्याहीनंतरची, असा प्रश्न वाचकांपर्यंत पोहोचवण्यात लेखक यशस्वी होतो.

कोकणाच्या पर्यटनावर लेखकाचा भर अधिक दिसतो. नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबादनजीकची प्रसिद्ध स्थळे हे सारे या पुस्तकात येते. पण विदर्भ मात्र पुरेसा येत नाही. कदाचित पुढल्या आवृत्तीत ही उणीवही दूर होईल! २७० रुपये किमतीचे हे पुस्तक खासगीरीत्या प्रकाशित झाले असल्याने ते मिळवण्यासाठी ‘विरागगोखले(अ‍ॅट) याहू.कॉम’ या ईमेलवर संपर्क साधावा लागेल.