अर्थव्यवस्था ही मोठय़ा उद्योगांवर अवलंबून असते. तर उद्योगांना त्यांचा गाडा सुरळीत चालू राहावा यासाठी वित्तओघ सुरू राहणे आवश्यक असते. हे वित्त मिळविण्याचे जे कायदेसंमत मार्ग आहेत, त्यांत विदेशातून कर्ज उभारणी हा अलीकडच्या वर्षांमधील भारतातील उद्योगजगतासाठी वित्तपुरवठय़ाचा महत्त्वपूर्ण स्रोत बनला आहे. सामान्यपणे ज्याचा ‘ईसीबी’ असा उल्लेख केला जातो, त्याची कूळकथा डॉ. आशुतोष रारावीकर यांनी ‘इंडियाज् एक्स्टर्नल कमर्शियल बॉरोइंग : फीचर्स, ट्रेण्ड्स, पॉलिसी अ‍ॅण्ड इश्यूज्’ या छोटेखानी पुस्तकाच्या रूपात अतिशय सुगम रूपात मांडली आहे.

जागतिकीकरणाच्या आजच्या युगात भारतीय अर्थव्यवस्था अधिकाधिक बहिर्मुखी बनत जाणे हे ओघाने घडणारच आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांनी थेट विदेशी गुंतवणूक मिळवावी अथवा विदेशातून तिथल्याच चलनातील अल्प व्याजदरातील ‘ईसीबी’सारखे वित्तपुरवठय़ाचे किफायती स्रोत आजमावावेत, याला सरकारच्या धोरणात प्राधान्य दिसते. तथापि, अशा प्रकारच्या वित्तपुरवठय़ाशी संलग्न जोखमांची, त्यास असणाऱ्या मर्यादांची पूर्ण जाणीव ठेवली पाहिजे. विशेषत: आजच्या करोनासारख्या जागतिक महाआपत्तीच्या प्रसंगात ही जाणीव अतिशय महत्त्वपूर्णच ठरते, असे रारावीकर सांगतात.

रारावीकर रिझव्‍‌र्ह बँकेत संचालकपदी कार्यरत असल्याने त्यांची या विषयावर असलेली पकड पुस्तकातील सुगम विश्लेषणातून दिसून येते. उदारीकरणानंतर बाजारपेठा खुल्या करण्याचा सरकारचा प्रयत्न, ‘ईसीबी’चा आकृतिबंध आणि संकल्पना, ‘ईसीबी’चा वाढता प्रवाह आणि नियामक पैलू असा आजवरचा प्रवास त्यांनी क्रमाने मांडला आहे. सरकारच्या धोरणात केव्हा व कसा बदल झाला आणि वेळोवेळी बदललेले नियम व निर्बंध आणि त्यामागची कारणे याचाही त्यांनी तपशीलवार आढावा घेतला आहे.

विदेशी चलन विनिमय हा अशा वित्तपुरवठय़ातील सर्वात कळीचा घटक असल्याचे लेखक सांगतात. आजघडीला विदेशी व्यापारी कर्ज हा भारताच्या बाह्य़ कर्जाचा सर्वात मोठा घटक आहे. परदेशी कर्जाचे जास्त प्रमाण हे रुपयाच्या मूल्यात वाढीस कारणीभूत ठरेल. पर्यायाने आपली निर्यात महागडी ठरून, जागतिक बाजारपेठेत तिची स्पर्धात्मकता कमी होऊ शकते. म्हणून विदेशातून उसनवारी मर्यादित ठेवणे हे निर्यातवाढीस चालना देणारे ठरते, असे लेखकाने नमूद केले आहे. रुपयाचे विनिमय मूल्य घसरत गेले तर विदेशी कर्जाची परतफेड जिकिरीची बनेल. तसेच चलनाचा दर आणि त्यातील अस्थिरता हे अशा उसनवारीपुढचे गंभीर आव्हान ठरते. त्या आव्हानास उत्तर म्हणून ‘हेजिंग’ची संकल्पना लेखकाने मांडली आहे. एकुणात, देशाच्या विकासविषयक गरजा भागविणाऱ्या एका महत्त्वाच्या अंगाचा हा पुस्तकरूपी पाठपुरावा अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठीही उद्बोधक ठरावा.