‘भारतीय दुचाकीपंथा’ची घडण..

नव्वदच्या दशकात भारतात जपानी कंपन्यांच्या सहयोगाने मोटारसायकली तयार होऊ लागल्या

‘इंडियन आयकॉन : अ कल्ट कॉल्ड् रॉयल एनफिल्ड’ लेखक : अमृत राज प्रकाशक : वेस्टलॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. पृष्ठे : ३०१, किंमत : ६९९ रुपये
वसंत माधव कुळकर्णी

कंपन्या उत्पादने तयार करतात आणि ग्राहक त्या उत्पादनांच्या नाममुद्रे-ब्रॅण्डनेम-ला ओळख देतात, ही व्यवस्थापनशास्त्राची एक शिकवण. ती ‘रॉयल एनफिल्ड’ या दुचाकी वाहननिर्मिती कंपनीने प्रत्यक्षात कशी आणली, मरणपंथाला लागलेल्या या नाममुद्रेचे पुनरुज्जीवन कसे झाले, याची कहाणी सांगणाऱ्या पुस्तकाविषयी..

व्यवस्थापनशास्त्राच्या पदव्युत्तर वर्गात तीनेक दशकांपूर्वी एक वाक्य ऐकले होते : कंपन्या उत्पादने तयार करतात आणि ग्राहक त्या उत्पादनांच्या नाममुद्रे(ब्रॅण्डनेम)ला ओळख देतात! भारतात दुचाकी वाहन उद्योगात वस्तूचे नाममुद्रेत रूपांतर होण्याचे भाग्य ज्या मोजक्या वाहनांना लाभले, त्यांपैकी ‘रॉयल एनफिल्ड (आरई)’ ही एक नाममुद्रा होय. इंग्लंडमध्ये जन्मलेल्या, परंतु भारतात लोकप्रिय झालेल्या या नाममुद्रेच्या वाटचालीचा पट ‘इंडियन आयकॉन : अ कल्ट कॉलड् रॉयल एनफिल्ड’ या पुस्तकात मांडला आहे. बुलेट (आरई) मोटारसायकलमध्ये तेलगळती, सदोष विद्युत यंत्रणा, लवकर गंजणे, क्लचची समस्या आदी यांत्रिक समस्या असूनही ग्राहक या नाममुद्रेचे जणू भक्त झाले. म्हणूनच ‘रॉयल एनफिल्ड’ ही केवळ नाममुद्रा नसून आख्यायिका झाली आहे. या नाममुद्रेमागील आख्यायिकेबरोबरच तिच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक संघर्षांची गोष्ट लेखक अमृत राज यांनी या पुस्तकात सांगितली आहे. या प्रतिष्ठित नाममुद्रेच्या जन्मापासूनची कहाणी कथन करण्याचा लेखकाने प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. एका अयशस्वी कंपनीचे यशस्वी कंपनीत रूपांतर होण्याची कहाणी विस्तृतपणे सांगताना कोणत्याही टप्प्यावर निरसपणा येणार नाही अशा प्रवाही शैलीत हे पुस्तक लिहिले गेले आहे. अमृत राज यांनी आजवर भारतीय कंपन्या, कौटुंबिक व्यवसाय आणि इतर आनुषंगिक बाबींवर लिखाण केले आहे. तो अभ्यासानुभव आणि त्याव्यतिरिक्त या विषयाबद्दल केलेल्या विस्तृत संशोधनाचे प्रतिबिंब या पुस्तकात उमटलेले दिसते. या पुस्तकाला ‘सुझुकी इंडिया’चे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, समविचारी मंडळींनी एका मरणपंथाला लागलेल्या नाममुद्रेला पुनरुज्जीवित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची ही कहाणी आहे.

पुस्तकात लेखकाने विपणन व्यवस्थापनाचे धडे उदाहरणादाखल देत, एखादे उत्पादन किंवा नाममुद्रा बाजारपेठेत नवी घडी कशी घालून देऊ शकते याचे सखोल विश्लेषण केले आहे. दहा वर्षांपूर्वी वार्षिक ५० हजार वाहनविक्री करणारी ही कंपनी बंद होण्याच्या मार्गावर होती. आज ही कंपनी मासिक ५० हजार वाहनांची विक्री करीत भारताच्या दुचाकी बाजारपेठेतील ‘मिडवेट मोटारसायकल’ गटात एक अग्रगण्य कंपनी कशी झाली, हे या पुस्तकात वाचायला मिळते. आज या गटात एखाद्या नवीन उत्पादनाची निर्मिती करण्यापूर्वी संभाव्य उत्पादनाची कार्यक्षमता आणि किंमत अशा वेगवेगळ्या निकषांवर तुलना ‘रॉयल एनफिल्ड’बरोबरच केली जाते. यशापयशाचा विचार करताना वाहननिर्मात्यांसमोर सर्वात मोठा स्पर्धक म्हणून ‘रॉयल एनफिल्ड’च असते. त्यामुळेच बेनेली इम्पीरिअल, होंडा सीबी ३००आर, कावासाकी डब्ल्यू८०० यांसारख्या स्पर्धक कंपन्यांनी भारतात त्यांची मोटारसायकल उपलब्ध करून देताना संभाव्य स्पर्धक म्हणून केवळ आणि केवळ ‘रॉयल एनफिल्ड’चाच विचार केला असेल तर नवल नाही.

‘रॉयल एनफिल्ड’वर ग्राहकांची असलेली निष्ठा, ‘रॉयल एनफिल्ड’चे मालक, त्यांचा प्रवास आदींवरील तपशीलवार लिखाण यापूर्वी प्रसिद्ध झाले असले, तरी अमृत राज यांच्या पुस्तकात कंपनीच्या अनेक अंतर्गत गोष्टी आणि दिवाळखोरीपासून नाममुद्रेच्या पुनरुज्जीवनापर्यंत यापूर्वी प्रसिद्ध न झालेला इतिहास वाचायला मिळतो. हे पुस्तक ‘रॉयल एनफिल्ड’च्या जुन्या-नवीन पिढय़ांमधील व्यावसायिक दृष्टिकोनांतील बदल सांगतेच, शिवाय एका भारतीय उत्पादनाने पहिल्यांदाच जागतिक बाजारपेठेत उमटवलेल्या पदचिन्हांची कहाणी विशद करते. ‘रॉयल एनफिल्ड (बुलेट)’ हे भारतीय समाजात जमीनदारीचे, सावकारीचे, श्रीमंतीचे प्रतीक असल्याचा लेखकाचा दावा आहे. ‘रॉयल एनफिल्ड’ कंपनी अधिग्रहणामागील पडद्यामागच्या अनेक नाटय़पूर्ण कहाण्यांमुळे हे पुस्तक वाचकास शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

‘रॉयल एनफिल्ड’ या नाममुद्रेचा जन्म इंग्लंडमधला. विक्रम लाल यांनी १९९० मध्ये ही नाममुद्रा मूळ ब्रिटिश मालकांकडून विकत घेऊन पुनरुज्जीवित केली. विक्रम लाल यांचे चिरंजीव सिद्धार्थ लाल यांनी या नाममुद्रेला वाहन बाजारपेठेत प्रतिष्ठा मिळवून दिली. विक्रम लाल यांच्या ‘आयशर मोटर्स’ने ‘एनफिल्ड इंडिया’मध्ये बहुसंख्य हिस्सा विकत घेतल्यानंतरच्या या कंपनीच्या उत्क्रांतीचा मागोवा पुस्तकात घेण्यात आला आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्याला मोटारसायकलचा पुरवठा करण्यासाठी ‘एनफिल्ड सायकल कंपनी’ने पन्नासच्या दशकात भारतीय भागीदाराबरोबर (मद्रास मोटर्स) तत्कालीन मद्रास शहरात प्रकल्प उभारला. सुरुवातीला सुटे भाग आयात करून या प्रकल्पात जुळणी केली जात असे. साठच्या दशकात मूळ ब्रिटिश कंपनीचे दिवाळे वाजले. परंतु भारतात या नाममुद्रेअंतर्गत जुळणी सुरूच राहिली. भारतातील प्रकल्पसुद्धा अडचणीत आल्यावर या नाममुद्रेची मालकी दिल्लीस्थित लाल कुटुंबीयांकडे (आयशर मोटर्स) आली. या कुटुंबीयांकडे या नाममुद्रेची मालकी आल्यानंतर सुरुवातीचा काळ तसा खडतरच होता. दरम्यानच्या काळात कंपनीच्या उत्पादन-संशोधन आणि विकास विभागाने केलेल्या बदलांना यश येत, शतकाने कूस वळली तेव्हा ग्राहकांचा या वाहनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. या बदलाची कथा लेखकाला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ लाल यांच्याकडून ऐकायला मिळाल्याचे लेखकाने नमूद केले आहे. विक्रम लाल ते सिद्धार्थ लाल यांच्या व्यवस्थापन शैलीबद्दल आणि नंतरच्या तरुण व गतिशील नेतृत्वात कंपनी कशी फुलली याविषयी पुस्तकात विस्तृत वर्णन आहे. ‘रॉयल एनफिल्ड’ या नाममुद्रेखाली उत्पादन सुरू झाल्याला शंभर वर्षांहून अधिक काळ झाला. सर्वात जुन्या मोटारसायकलची ही नाममुद्रा आज आपल्या जन्मभूमीसहित अमेरिका, ब्राझील, थायलंड अशा तब्बल ६५ देशांत पोहोचली असल्याची माहिती लेखक देतात. भारतात पहिली मोटारसायकल शर्यत २०१६ मध्ये कोलकाता ते गयादरम्यान झाल्याची माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. या पुस्तकासाठी वाहननिर्मात्यांपासून ग्राहक, कार्यशाळेत दुरुस्ती करणाऱ्यांपर्यंत- या साखळीतील अनेकांशी लेखकाने संवाद साधला आहे.

नव्वदच्या दशकात भारतात जपानी कंपन्यांच्या सहयोगाने मोटारसायकली तयार होऊ लागल्या. हिरो-होंडा, कावासाकी आणि बजाज यांसारख्या उत्पादनांमुळे ‘रॉयल एनफिल्ड’समोर आव्हान उभे ठाकले. ट्रायम्फ, हार्ले डेव्हिडसन यांसारख्या मोटारसायकल भारतात उपलब्ध होऊ लागल्याने ‘रॉयल एनफिल्ड’समोरचे आव्हान अधिक कठोर झाले. सायकलवरून येणारा दूधवाला हिरो-होंडा किंवा बजाजच्या दुचाकीवर येऊन दुधाचा रतीब घालू लागले. पुस्तकातील एक प्रकरण या सर्व आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी ‘रॉयल एनफिल्ड’ने आखलेल्या रणनीतीवर आहे. ‘रॉयल एनफिल्ड’ला करावा लागलेला संघर्ष लेखकाने विस्ताराने मांडला आहे. आधी केवळ ‘सैनिक वा पोलीस यांनी वापरावयाची दुचाकी’ अशी ओळख असलेल्या या मोटारसायकलला आज दूरच्या तालुक्यांच्या गावात महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या सधन कुटुंबांतील मुलींचीही पसंती लाभली आहे. (आठवा : ‘सैराट’ चित्रपटातील नायिका बुलेटवरून येतानाचे दृश्य!) भारतातील लोकसंख्येच्या बदलत्या ढाच्याचा या नाममुद्रेला खूप फायदा झाला. भारतीय दुचाकी खरेदीदारांचा वयोगट आणि गेल्या दशकाच्या दृढ आर्थिकवाढीचाही त्यास हातभार लागला. मागील दोन वर्षांतील मंदी पाहता, ‘रॉयल एनफिल्ड’समोर नवीन आव्हाने असून त्या आव्हानांवर मात करण्यासाठी नव्या रणनीतीचा विचार करण्याची गरज आहे, असे मत लेखकाने मांडले आहे. एकुणात, व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक, वाहनप्रेमी, गुंतवणूकदार, विश्लेषक यांनी हे पुस्तक वाचायला हवे.

shreeyachebaba@gmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian icon a cult called royal enfieldabn