हद्दपार स्मृतींची गाथा..

पहिल्या महायुद्धात जर्मनीचे युद्धकैदी बर्लिनजवळ व्युन्सडोर्फमधल्या हाफमून कॅम्पमध्ये ठेवले गेले होते

‘इंडियन्स इन द फर्स्ट वर्ल्ड वॉर : द मिसिंग लिंक्स’ लेखक : अरविंद गणाचारी प्रकाशक : सेज पब्लिकेशन पृष्ठे : ३८९, किंमत : १,४९५ रुपये

जयश्री हरि जोशी

पहिल्या महायुद्धात विविध आघाडय़ांवर दहा लाखांहून अधिक भारतीय सैन्य सामील झाले होते. महायुद्धात आपले लढवय्येपण दाखविणाऱ्या भारतीयांच्या पदरी मात्र उपेक्षाच आली. ती दूर करू पाहणारे, भारतीय सैनिकांच्या कर्तृत्वाची आणि आनुषंगिक घडामोडींची साद्यंत दखल हे पुस्तक घेते..

पहिल्या महायुद्धात जर्मनीचे युद्धकैदी बर्लिनजवळ व्युन्सडोर्फमधल्या हाफमून कॅम्पमध्ये ठेवले गेले होते. हाफमून कॅम्पमध्ये सुमारे दोन हजार भारतीय सैनिक गजाआड खितपत होते- बहुतांशी शीख, शिवाय गोरखा, हिंदू आणि मुस्लीम. त्या वेळी जगातल्या भाषांचे एक संग्रहालय बनवण्याचा मानस ठेवून उपलब्ध तंत्रज्ञानाच्या मदतीने १,६५० ध्वनिमुद्रणे केली गेली. बर्लिनच्या साऊंड अर्काइव्हज्मध्ये जर्मन इतिहासाच्या विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या अशा अनेक आवाजांची चिरमुद्रित कथने आहेत. बर्लिनमध्ये हुंबोल्ट विश्वविद्यालयात भूतकाळातले सुमारे ७०० भारतीय आवाज संग्रहित करून ठेवलेले आहेत. इतिहासाची सांगड नव्या कथनमाध्यमांशी घालून त्यांच्यात फिलिप्स शेफ्नरने पुन्हा प्राण ओतला ‘द हाफमून फाइल्स’ या माहितीपटाच्या निमित्ताने. पंजाबमधले माल सिंग, दार्जिलिंगचे जसबहादूर, अलमोडाचे भवन सिंह आणि असे किती तरी आवाज, त्यांना ९० वर्षांनंतर ओळख मिळाली होती, त्यांच्या अस्तित्वाची दखल घेतली गेली होती. जर्मनीसारख्या पराभूत राष्ट्रानं हे धन जतन केलं आणि जगापुढे मांडलं. भारतात मात्र आजमितीलाही या वीरांच्या स्मृतींच्या वाटय़ाला अनास्था, उपेक्षा, दुर्लक्ष आणि कोरडा अनुल्लेख येतो. किंबहुना ही नावे सोयीस्करपणे विस्मृतीच्या गर्तेत गाडली गेली आहेत. ब्रिटिश राजसत्तेला साम्राज्यांतर्गत देशांतील धारातीर्थी पडलेल्या लढवय्यांच्या सामूहिक स्मृतींचे सादर जतन आणि संवर्धन करण्यात स्वारस्य नव्हतेच; ब्रिटिश साम्राज्यासाठी ज्यांनी प्राण पणाला लावले त्यांना एक प्रतीकात्मक अभिस्वीकृती, एक पोच कधीच दिली गेली नाही, त्यांच्या बलिदानाचा गौरव झाला नाही. एका तऱ्हेने ही जाणूनबुजून हद्दपार केलेल्या स्मृतींची गाथा. अभिजात अन्यता- द ओरिजिनल अदर- हीच त्यांची ओळख.

स्वतंत्र भारतात अजूनही हे चित्र बदललेले नाही. भारतभरातल्या विद्यापीठांतल्या अभ्यासक्रमांत कुठेही या विषयाचा वैकल्पिक म्हणूनही समावेश नाही. राजकीय आणि सामाजिक ऊहापोहाच्या संदर्भक्षेत्रात तर ही नावे वळचणीलाही उभी नाहीत. हेच विदारक सत्य, ही अन्याय्य उपेक्षा प्रा. अरविंद गणाचारी यांनी त्यांच्या ‘इंडियन्स इन द फर्स्ट वर्ल्ड वॉर : द मिसिंग लिंक्स’ या पुस्तकात अधोरेखित केली आहे. पहिल्या महायुद्धातील भारताच्या सहभागाबद्दल संशोधन, विश्लेषण आणि विवेचन या तीन पायाभूत सूत्रांचा अवलंब करून या विषयावर भारतातील लेखकाने लिहिलेले हे पहिलेच पुस्तक- तत्कालीन घटनांचा विश्वासार्ह, साद्यंत आणि अभ्यासपूर्व मागोवा घेणारे. मात्र या पुस्तकात प्रा. गणाचारी यांनी केवळ भाराभर माहिती संकलित केलेली नाही, तर इतिहासकार म्हणून त्यांच्या जबाबदारीची त्यांना सखोल जाणीव आहे, हे या पुस्तकाच्या मांडणीतून ठसठशीतपणे सामोरे येते. भूतकाळात घडलेल्या घटनांचे, घडामोडींचे आणि स्थित्यंतराचे प्रत्यक्षार्थवादी संगतवार निवेदन इथे आहेच, पण त्यांचे कालसुसंगत परिशीलनही आहे. कॉलिंगवुडने मांडलेली इतिहासाची गृहितकृत्ये प्रा. गणाचारी यांनी यथोचित पार पाडली आहेत : ऐतिहासिक भूतकाळ विवक्षित अवकाशात आणि काळात घडलेला असतो, आज उपलब्ध असलेल्या पुराव्यांपासून त्याच्या तपशिलांचे अनुमान करता येते; हा तपशील केवळ घटनांच्या स्वरूपाचा नसतो, तर मानवी कृतींच्या स्वरूपाचा असतो; कृतींचे वैचारिक अंग असते, काही विचार त्या कृतींतून व्यक्त झालेले असतात; उपलब्ध पुराव्याशी हे विचार आणि त्यांचा आविष्कार करणाऱ्या कृती सुसंगत असल्या पाहिजेत आणि त्यांच्यामुळे या पुराव्याचा उलगडा झाला पाहिजे. इतिहासाच्या याच चिकित्सक तत्त्वज्ञानाला अनुसरून लेखकाने ठोकताळे बांधले आहेत, निष्कर्ष काढले आहेत, आणि वाचकासमोर एक आरसाही धरला आहे.

इतिहास म्हणजे भूतकाळात यदृच्छया घडलेल्या घटनांचा विस्कळीत समूह किंवा क्रम नव्हे. वरवर पाहता विस्कळीत, असंबद्ध भासणाऱ्या या घटनांमागे काही योजकसूत्र असते वा ऐतिहासिक विकासाच्या गहन नियमांना अनुसरून या घटना घडलेल्या असतात, म्हणजेच या घटनांत एक आकृतिबंध असतो. इतिहासात उलगडत जाणाऱ्या किंवा वारंवार उलगडलेल्या या आकृतिबंधात इतिहासाचा ‘अर्थ’ सामावलेला असतो. हा आकृतिबंध समजून घेण्यानेच आपल्याला वर्तमान परिस्थितीचा अर्थ, तिच्यात गर्भित असलेल्या प्रवृत्ती आणि या प्रवृत्तींमुळे जो भविष्यकाळ वर्तमानातून अटळपणे उद्भवणार आहे त्याचे व उद्याचा इतिहास होऊ घातलेल्या वर्तमानाचे आकलन होऊ शकते. प्रा. गणाचारींच्या लेखनात हा शास्त्रीय बाज आढळतो.

या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे लॉर्ड भीखू पारेख यांच्यासारख्या विदग्ध विश्लेषकाने. प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार, भारतीय युद्धकैद्यांचे अनुभव त्यांनी कुटुंबाला लिहिलेल्या पत्रांतून सामोरे येतात. ही पत्रे लिहिणारे सैनिक निरक्षर होते, त्यामुळे त्यांनी तोंडी सांगितलेला मजकूरच पत्रात असेल याची शाश्वती नाही. ही पत्रे पाठवण्याआधी वाचली जायची, त्यावर कडक नियंत्रण व निर्बंध असत, हे माहिती असल्याने काही पत्रांत सांकेतिक कूटभाषा वापरली आहे. फ्रेंच भागातील युद्धकैदी तेथील स्त्रियांबरोबर जुळलेल्या नाजूक नात्याबाबत वर्णनात्मक शैलीत लिहितात; काही पत्रे वैफल्य, वंचना, घराची ओढ व्यक्त करतात.

पुस्तकात आठ प्रकरणे आहेत. पहिल्याच प्रकरणात प्रा. गणाचारी यांनी लेखक म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि विस्मृतीच्या गर्तेत गेलेल्या जीवांचे वीरस्मरण करणे ही एका सुजाण नागरिकाची जबाबदारीच आहे हे विशद केले आहे. उर्वरित प्रकरणांत युद्धाची घोषणा, वसाहतवादी राष्ट्रांच्या अंकित देशांतील राष्ट्रीयत्वाच्या कायद्याची गुंतागुंत, भारतीय सैनिकांच्या भरतीची प्रक्रिया, त्यांना त्या काळी दिले गेलेले सन्मान आणि पारितोषिके, युद्धकैद्यांची हलाखीची अवस्था, युद्धानंतर भारतात घडून आलेली राजकीय व सामाजिक उलथापालथ आणि ब्रिटिश राजवटीने लादलेले अतार्किक कायदे व नियम (उदा. प्रसारमाध्यमांवरील निर्बंध, अपप्रचार आणि सेन्सॉरशिप तसेच राज्यद्रोहविषयक कायदा) या विषयांची सांगोपांग मांडणी केली आहे. शेवटच्या दोन प्रकरणांपैकी, ‘पहिल्या महायुद्धाशी निगडित भारतीय जनमानसाच्या स्मृती’ या प्रकरणात दिल्लीतील इंडिया गेट तसेच मुंबईतील सेलर्स होम आणि बॉम्बे पोर्ट ट्रस्ट अशा अनेक वास्तूंची छायाचित्रे पाहायला मिळतात; तर ‘महायुद्धाच्या खोलवर गेलेल्या जखमांचे व्रण : एक भळभळता वारसा’ हे प्रकरण सामूहिक अस्मिता आणि सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीने आपल्याला आत्मपरीक्षणासाठी उद्युक्त करणारे आहे. एकुणातच, तर्कशुद्धरीत्या सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून सुसूत्र आकलन करून प्रतिपाद्य विषयाची एकसंध मांडणी पुस्तकात केली गेली आहे.

१९१६ साल. पहिल्या महायुद्धात १४ लाख भारतीय सैनिक स्वेच्छेने इंग्लंडच्या बाजूने रणभूमीवर उतरले. पहिल्या महायुद्धाला ब्रिटिशांच्या अंकित असलेल्या भारताने आर्थिक साहाय्य दिले, त्याचबरोबर लढाऊ मनुष्यबळही पुरवले. हिंदी सैन्यातील मुस्लीम व विविध जातींचे हिंदू सैनिक हे राजकीय हेतू साधण्यासाठी किंवा देशसंरक्षणासाठी अथवा धार्मिक कारणांवरून शत्रूशी लढले नाहीत, तर आपल्या घराण्याच्या, परंपरेच्या व पलटणीच्या मानासाठी ते लढले. भारताबाहेर पाठवलेल्या मनुष्यबळाचा तपशील सांगतो की, फ्रान्स, पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, इजिप्त, गलीपली, इराणी आखात या सगळ्या आघाडय़ांवर साधारणत: अडीच लाख ब्रिटिश सैन्य, तर ११ ते १३ लाख भारतीय सैन्य युद्धात सामील झाले होते. त्यातले ५४ हजार मृत्यू पावले, ६५ हजार जखमी झाले आणि साडेतीन हजार युद्धकैदी आणि बेपत्ता.

पहिल्या महायुद्धाचा आरंभ १ ऑगस्ट १९१४ रोजी झाला. महायुद्धात राष्ट्रांचे दोन तट होते; त्यांपैकी दोस्तराष्ट्र तटात ब्रिटिशांचे अंकित राष्ट्र म्हणून भारत सामील झाला, इतपत माहिती आपल्याला असते. पण प्रा. गणाचारींनी या पुस्तकात महाविशाल माहितीपट साकारला आहे, आणि समग्रतेच्या पटलावर या घटितांचा परामर्श घेतला आहे.

१९१५ मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिग यांनी जे वक्तव्य केले होते, त्यावरून भारताच्या पदरात स्वातंत्र्याचा मोठा अंश पडेल, असा समज भारतात निर्माण झाला. १९१६ साली भारतातील विविध राजकीय गटांची एकी झाली. १९१७ साली स्वराज्याची योजना तयार होत असताना सुदैवाने हिंदू व मुसलमान यांच्यात आपखुशीने तडजोड घडून आली. होमरुल लीगची चळवळ सर्वत्र पसरली. चळवळीत सामील होणाऱ्या भारतीय कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्याचा तडाखा सरकारने सुरू केला. काँग्रेसच्या प्रांतिक कमिटय़ा नि:शस्त्र प्रतिकाराचा उपाय अमलात आणायचा की नाही, याबद्दल गंभीरपणे विचार करू लागल्या. राजकीय परिस्थितीत बदल दिसू लागले. ११ नोव्हेंबर १९१८ रोजी महायुद्ध तहकूब झाले. दोस्त राष्ट्रांचा पूर्ण विजय झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड लॉइड जॉर्ज व इतर दोस्त राष्ट्रांच्या नेत्यांनी स्वयंनिर्णयाची घोषणा केली. दिल्ली येथील (२६ डिसेंबर १९१८) काँग्रेस अधिवेशनात वरील घोषणेवर विचारविनिमय झाला, पण भारताच्या पदरात मात्र स्वयंशासनाचे दान पडले नाही.

पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना सैन्यरूपाने मदत करण्याबद्दल संस्थानिकांपासून ते गोखले, टिळक आणि गांधीजी या स्वातंत्र्यलढय़ातील नेत्यांचीही भूमिका सकारात्मक होती. ब्रिटिश अभियान सेनेत २३ ऑक्टोबरपासून भारतीय दुसरे कोअर होते. या हिंदी कोअरमध्ये सर्व धर्माचे आणि जातींचे सैनिक होते. आपण १९१६ सालच्या समाजाबद्दल बोलत आहोत. स्पृश्य, अस्पृश्य या अमानुष भेदाचे, जातींच्या उतरंडीचे मानसिक जोखड मनावर घेऊनच हे भारतीय सैनिक नोकरीवर रुजू झाले. तथाकथित उच्चवर्णीय सैनिकांनी तथाकथित खालच्या जातीच्या अधिकाऱ्यांकडून आदेश स्वीकारण्यास नकार दिला. त्यातच, काही जाती लढवय्या मानल्या जात. त्यांच्या पातळीवर नेमणूक होऊन कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाल्यामुळे तत्कालीन अस्पृश्य समाजातील सैनिकांना आपला सामाजिक व जातीय स्तर या नेमणुकीने उंचावल्याची भावना निर्माण झाली. तत्कालीन समाजाचे असे अनेक पदर या पुस्तकात साक्षेपाने दाखवून दिलेले आहेत.

भारताच्या इतिहासात ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय सैनिक लढण्याचे हे पहिलेच उदाहरण होते. अद्वितीय पराक्रम करून आणि प्राणहानी सोसून आपण प्रथम श्रेणीतील लढवय्ये आहोत, हे त्यांनी जर्मनांना व सर्व जगाला दाखवून दिले.

या महायुद्धात भारताच्या औद्योगिक विकासकार्याचा पाया घातला गेला. युद्धसामग्री उत्पादन, नागरी उद्योगधंदे व व्यापार, शासकीय आर्थिक धोरण, सागरी दळणवळण व वाहतूक, भूप्रदेशी वाहतूक, अन्नधान्यविषयक धोरण, शेतकी उत्पादन व त्याची वाटणी, इंधन व ऊर्जापुरवठा, तसेच युद्धकालीन सामाजिक सेवायंत्रणा, विशेषत: नागरी संरक्षण, आर्थिक युद्धतंत्र, ब्रिटनचे वसाहती व साम्राज्यांतर्गत देशांबद्दलचे धोरण आणि समग्र संरक्षणव्यवस्था या सर्व पातळ्यांवर पहिल्या महायुद्धाचे दूरगामी परिणाम झाले. ब्रिटनमध्ये युद्धामुळे ज्या युद्धकालीन आर्थिक व इतर समस्या निर्माण झाल्या आणि त्यांच्या निराकरणासाठी जी धोरणे, योजना व कार्यवाही करण्यात आली, त्यांचे प्रतिबिंब भारतातील राज्यकर्त्यांच्या आचारविचारांत दिसले. भारत सरकारने १९१९ साली ‘इशर समिती’ स्थापली. या समितीने १९२० साली हिंदी सेना सुधारण्याच्या सूचना केल्या. तथाकथित लढाऊ जातींतून सैनिकभरती अपुरी होत असल्याने, अस्पृश्य जमाती आणि ब्राह्मण, तेलुगू, भिल्ल, बंगाली आदी ७५ बिनलढाऊ जातींतून सैनिकभरती करण्यात आली. लोकमान्य टिळकांनी भारताची संरक्षणव्यवस्था व हिंदी सेना यांबद्दल १८९८ ते १९०८ व १९१४ ते १९२० या काळात जी मते व विचार मांडले, ते महत्त्वाचे ठरले. वायुसेनेचे आधुनिक काळातील महत्त्व व जागतिक राष्ट्रमंडळातील भारताचे स्थान हे टिळकांनी अचूक हेरले होते.

खरे तर पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस जागतिक स्तरावर इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था व समाजकारण या सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडून आले होते. ब्रिटिश साम्राज्यवाद आणि वसाहतवादाचा पाया डळमळीत झाला होता. १९१४ च्या हिवाळ्यात फ्रान्स आणि फ्लँडर्स येथील रणांगणात हिंदी सैन्याने जी सहनशक्ती दाखवली व जर्मन सैन्याला धैर्याने तोंड दिले, त्यामुळे युरोप व आशियाई राष्ट्रांना भारताविषयी आदर वाटू लागला होता आणि भारताचे आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढले होते.

शत्रुराष्ट्राविषयी वाटणारा तिरस्कार जेव्हा पराकोटीला जातो, तेव्हा त्यातून छळछावण्या उभ्या राहतात. पहिल्या महायुद्धाच्या काळात ‘प्रिझनर्स ऑफ वॉर’ ही संकल्पना अस्तित्वात नव्हती, त्या वेळीही कित्येक जर्मन कैद्यांना अहमदनगरमधल्या कॅम्पमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. केवळ जर्मन वंशाचे असणे इतकाच त्यांचा अपराध होता. पहिल्या महायुद्धाशी त्यांचा दूरान्वयानेही संबंध नव्हता. पण इंग्लंड या विजेत्या राष्ट्राने त्यांच्यावर ठपका ठेवून, त्यांच्यावर कसकसे निर्घृण अत्याचार केले, हेही प्रा. गणाचारींनी सप्रमाण दाखवून दिले आहे. जेत्यांनी लिहिलेल्या इतिहासात अशा घटनांचा उल्लेख केला जात नाही.

मुळात, जेमतेम पावणेदोन लाख एवढेच खडे सैन्य पहिल्या महायुद्धाच्या आधी भारतात उपलब्ध होते. मग युद्धासाठी अचानक १२ लाखांची अतिरिक्त कुमक उभी राहिली कुठून? ब्रिटिश सत्ताधिकाऱ्यांनी साम-दाम-दंड-भेद नीती वापरून अशिक्षित, गरीब, साध्यासुध्या भारतीयांना सैन्यात जाण्यास भाग पाडले. कुणाला किताब दिले, कुणाला जमीन देऊ केली, कुणाला विहीर बंद करण्याच्या धमक्या दिल्या, कुणाला आमिषे दाखवली, कुणाची पिळवणूक केली आणि अखेर ही मुकी बिचारी कळपात सामील झाली, जुलमी राज्यकर्त्यांच्या बाजूने निष्ठेने लढली आणि स्वजनांची निव्वळ उपेक्षा त्यांच्या माथी आली, हे प्रा. गणाचारींनी पुस्तकात पोटतिडकीने मांडले आहे.

ते युद्ध भारतीयांचे नव्हते. जी भूमी, जे सिंहासन, जो अभिमान जपण्यासाठी त्यांनी प्राण पणाला लावले, त्यातले काहीच त्यांच्या अस्मितेचा भाग नव्हते. वीरगतीला गेलेले सैनिक खरे तर संपूर्ण देशाच्या स्मरणक्षेत्रात एका सामायिक स्मृतीच्या रूपे एक अक्षय ठसा उमटवून जातात; पण भारताने त्यांना श्रद्धांजली वाहिली नाही. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी कोरडे कर्तव्य पार पाडले ते दिल्ली येथे इंडिया गेटच्या स्वरूपात- १९३१ साली ऑल इंडिया वॉर मेमोरियल बांधून. पहिल्या महायुद्धात व अँग्लो-अफगाण युद्धात मरण पावलेल्या ९० हजार सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक राष्ट्रीय स्मारक उभे करून. त्या भव्य कमानीवर वपर्यंत कुणाची नावे कोरली गेलेली आहेत हे आज स्वतंत्र भारताच्या सर्वसामान्य नागरिकाला ठावे नाही.

बा. सी. मर्ढेकरांनी त्यांच्या ‘काही कविता’मध्ये लिहिलेल्या ओळी या दुस्तर अज्ञातवासातले वैफल्य साकल्याने मांडतात :

‘बेभानले मन, रोखता संगीन;

विटली ही काया, देशावर माया

कुणाच्या? कोणाची?

पडत्या फळाची, आज्ञा होता वीर

हाती घेई शिर, कुणाचे? कशाला?

– भाकरी पोटाला!!’

jayharijoshi@gmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indians in the first world war book review abn

ताज्या बातम्या